Opinion

१ डिसेंबर- पारंपरिक स्वधर्म दिन

ईशान्य भारतातील सर्वात पूर्वेकडील राज्य, अरुणाचल प्रदेश. तेथे दि. १ डिसेंबरला ‘स्वधर्म दिन’ साजरा केला जातो. त्यानिमित्ताने या फारशा परिचित नसलेल्या दिनाविषयी…

अरुणाचल प्रदेशमध्ये प्रमुख म्हणता येतील असे धर्म खालीलप्रमाणे-


१. बौद्ध धर्म : भूतानला जोडून असलेल्या तवांग जिल्ह्यात प्रामुख्याने बौद्ध धर्मीयांची वस्ती आढळते. तसे ते सगळीकडेच आहेत.
२. द्योनीपोलोईझम : हे लोक सूर्य माता आणि चंद्र पित्याची आराधना करतात. निसर्गाला देव मानतात. नद्या, जमीन (माती) यांची शपथ घेतात. हे ग्रहगोलांच्या अभ्यासानुसार ठरवलेले नसून यामागे भावना अशी की, सूर्यापासून पृथ्वी आणि जीवसृष्टी अस्तित्त्वात आली. सूर्यच जगाचे लालनपालन, पोषण करतो. म्हणून सूर्य-माता. चंद्राच्या वेगवेगळ्या कलांनुसार आयुष्यातील विविध गोष्टी हे लोक करतात. कालगणनेसाठी त्याचा खूप उपयोग होतो. शेतीतील विविध टप्पे ठरवण्यासाठी, बांबू कापण्यासाठी, ‘झूम’ शेतीसाठी,मोठ्या शिकारीला जाणे इत्यादी अनेक गोष्टी ठरवण्यासाठी ते चंद्रस्थितीची मदत घेतात. म्हणजे चंद्रजीवन प्रवाहित ठेवणारा किंवा कार्याचा कारक आहे म्हणून तो चंद्र पिता ठरतो. एकंदरीत अरुणाचलच्या सर्वच भागांत हे सूर्य-चंद्रोपासक पसरलेले आहेत.
३. अमिकमताईझम : हे लोक ‘अमिक मताई’ यांना मानतात.
४. रंगफ्राईझम : हे लोक रंगफ्रा बाबाची पूजा करतात. तिराप, चांगलांग इत्यादी नागालँडला खेटून असलेल्या भागात हे लोक राहतात.
५. नानी इंतान्या : ‘इदू मिश्मी’ जमातीची ही इष्ट देवता.
६. तसेच ‘नेझिनो’ या देवतेची पूजा ‘अका’ जमातीचे लोक करतात.


शेकडो-हजारो वर्षे चालत असलेल्या या धार्मिक परंपरा आहेत. सर्वदूर, निबीड अरण्यात राहणाऱ्या या लोकांनी त्यांच्या अस्तित्वाला आवश्यक अशी जीवनपद्धती निर्माण केली. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रथा, परंपरा, चालीरीती सुरू केल्या. उदाहरणार्थ, तिथे विविध प्राण्यांचे बळी देण्याची प्रथा आहे. आपल्याला हे भयानक वाटते. पण, एका विचारवंत अभ्यासकांनी यावर अगदी समर्पक असे भाष्य केले. ते म्हणाले, ”आम्ही जंगलात राहतो. जंगलाचे काही नियम असतात. ते दया-माया जाणत नाही. मला, माझ्या पिढ्यांना जगायचंय, तर शस्त्र चालवण्याची सवय, माहिती हवी. विविध प्राणी हे आमचे अन्न आहे. बळीची भीती ठेवून, भूतदया दाखवून आमचा जीव कसा जगेल? असा विचार करून ही प्रथा सुरू झाली असावी. पण, यातही ते शूचिता पाळतात. बळीच्या प्राण्याची मनधरणी केली जाते. त्यांची क्षमा मागितली जाते. उठसूट पकडला प्राणी आणि मारला, असे करीत नाहीत. वाघाला मारणे म्हणजे मनुष्यहत्येसारखे पाप समजले जाते. निसर्गाचा समतोल कसा सांभाळायचा, हे ते जाणतात. किंबहुना, तेच अधिक चांगल्या प्रकारे जाणतात. या सगळ्या राज्यांमध्ये प्रचलित असणारी ‘झूम शेती’ याचे उत्तम उदाहरण आहे.”


आपण समतल जमिनीवर राहणारे, गेली हजारो वर्षे विविध प्रकारे भारताच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत एकमेकांना जोडले गेलेले ईशान्येतर भारतीय. त्यांच्या जीवनपद्धतीची कल्पनाही आपल्याला करता येणे कठीण! एक उदाहरण घेऊ. आपल्याकडे व्यापारीवर्गात असे म्हणण्याची पद्धत आहे, मुलगा हाताशी आला, हे कसे ओळखावे? त्यासाठी दोन दिवसांची शिदोरी बांधून त्याला भाषा माहिती नसलेल्या, ओळखपाळख नसलेल्या गावात सोडून यावे. सहा महिन्यांनी जर त्याला तिथे आपले काही स्थान निर्माण करता आले असेल, तर तो व्यवसायात येण्याच्या योग्यतेचा तरुण झाला, असे समजावे. तिथेही मला अशाच प्रकारची म्हण ऐकायला मिळाली. एक काका सांगत होते, ”आमच्या पोरांना एक डाव (मोठ्ठा सुरा) देऊन तुम्ही कितीही निबीड जंगलात सोडा. तो तिथे आपले बस्तान बसवून दाखवेल!” विचार करा, एखाद्या दुर्गम,दरीखोऱ्यात, जंगली श्वापदांनी भरलेल्या अरण्यात आपण एकटे पडलो, तर आपले काय हाल होतील!


आता ईशान्येतली परिस्थिती अनेक स्तरांवर सकारात्मक-नकारात्मक दोनही प्रकारे बदलते आहे. या समाजासमोर असणाऱ्या आव्हानांचा ‘पॅटर्न’च बदलला आहे. ख्रिश्चन धर्माचे मोठ्या प्रमाणात आक्रमण तेथील संस्कृती नष्ट करते आहे. ढोंगी मानवतावादाच्या गोष्टी करत चर्च तिथे आपली दुकाने मांडून बसली आहेत. त्यांना प्रगत देशांतून या कामांसाठी पैसा पुरवला जातो. सुंदर-सुंदर, मोठमोठी ‘आरसीसी’ची प्रार्थनागृहे अगदी रस्त्यालगत, मोक्याच्या जागी, सर्वांच्या नजरेत येईल, अशा जागी बांधली जातात. त्यांच्या धर्मगुरुला नियमित पगार असतो. वेगवेगळे मनोरंजनात्मक कार्यक्रम ठरवून, नाचगाणी करून, लोकांना भुलवलं जातं. आधी थोडे पैसे देऊन, फुकट औषधपाणी देऊन लोकांना धर्मांतरित करून घेतात, मग वेगवेगळ्या कारणांसाठी त्यांच्याचकडून पैसे मागतात. दर महिन्याला आलेल्या उत्पन्नातील दहा टक्के रक्कम प्रार्थनास्थळांमध्ये दान म्हणून घेण्याची सर्रास पद्धत आहे. जे देत नाहीत त्यांच्याकडूनगोड बोलून, कधी काही वाईट होण्याची भीती दाखवून किंवा इतर काही कारणांनी पैसे उकळले जातात. लोकांच्या अंधश्रद्धेचा पुरेपूर वापर करून घेतला जातो.


पूर्वांचलातील दहशतवादी, फुटीरतावादी गटांना काही विधर्मी संस्था पैसे पुरवतात. नागालँडमधील जनतेला हे लोक ‘सोपी शिकार’ (एरीू झीशू) म्हणतात. नुसता बंदुकीचा धाक दाखवला, तरी लगेच धर्मांतरित होतात असे म्हणतात आणि हसतात.


सूर्य-चंद्र केवळ ग्रह-तारे आहेत. त्यांची पूजा बांधणे म्हणजे निव्वळ वेडेपणा, अशी शिकवण देत धर्माच्या मूळ कल्पनांबाबत त्यांना भ्रमात केले जाते. स्वधर्मी लोकांच्या धार्मिक भावनांची खिल्ली उडवली जाते. त्यांच्या धर्माची सूक्ष्म जाणीव जाणूनबुजून नाकारली, अव्हेरली जाते. यांची शिकवणच अशी असते की, त्यामुळे सख्खे भाऊ एकमेकांकडे जाण्याचे बंद होतात. धर्मांतरित लोक वाडवडिलांपासून चालत आलेल्या आपल्याच धर्माला ‘सैतानाचा धर्म’ म्हणू लागतात. यामुळे या समाजात स्वधर्मी आणि धर्मांतरित यांच्यात फूट पडली आहे. एक मोठी दरी निर्माण झाली आहे. सामान्य अनुयायांना तिथे असे शिकवले जाते की, ‘तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा धर्म पोहोचवला पाहिजे, हे पुण्य कर्म आहे. शेवटी स्वर्ग मिळवण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे.’ साधेभोळे लोक अशा भूलथापांना भुलतात आणि प्रेरित होऊन, अज्ञानाने हे विष पसरवू लागतात. रस्त्यात, बाजारांत, दवाखान्यांत, प्रवासात असे ठिकठिकाणी आपल्याला धर्मांतरित झालेले असे धर्मप्रसारक पाहायला मिळतात. यांचा स्वर्ग तो स्वर्ग आणि हिंदू किंवा इतरांच्या पाप-पुण्य, स्वर्ग या संकल्पना म्हणजे मूर्खपणा. हो की नाही?


या सगळ्याच्या भयावहतेची जाणीव झालेला एक द्रष्टा म्हणजे अरुणाचलातील तालोम रुकबोजी. त्यांनी ’खपवळसशर्पेीी ऋरळींह र्चेींशाशपीं’ प्रथम सुरू केली. आपल्या धर्मात असणाऱ्या अनिष्ट रूढी, कालबाह्य चालीरीती, परंपरा कमी करण्याच्या द़ृष्टीने नवीन पर्याय लोकांसमोर ठेवले. रोजच्या आयुष्यात उपयोगी पडतील, अशा चांगल्या गोष्टी पुनरुज्जीवित केल्या. लोकांना या परिस्थितीचा सारासार विचार करायला शिकवले. काही गोष्टी नव्याने सुरू केल्या. तिथे मंदिरे बांधण्याची पद्धत नव्हती. पण, आता तिथे कच्ची, बांबूची का होईना पण अनेक ‘गांगिन’, ‘नामलो’, ‘मेदेर्नेलो’ इत्यादी प्रार्थनास्थाने आहेत. लोकांना एकत्रितपणे प्रार्थना करण्याची, मंदिरात जाण्याची सवय लागते आहे. स्वधर्माभिमानाची भावना जागृत होते आहे.


अशा सुखकारक बदलाची सुरुवात करणाऱ्या तालोम रुकबो यांची जयंती दि. १ डिसेंबरला संपूर्ण राज्यात साजरी केली जाते. त्यांना आदरांजली म्हणून हा लेखप्रपंच. शेकडो, हजारो कार्यकर्त्यांना सादर प्रणाम…

  • अमिता आपटे

Back to top button