LiteratureOpinion

95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने…

साहित्य संमेलनाचा अजेंडा काय?

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला हिंदूत्ववादी विचारधारेचे वावडे कधीही नव्हते. हिंदूत्ववादीचं काय, साम्यवादी-समाजवादी विचारधारेचे अभ्यासक देखील अभा मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेले आहेत. मुळात विचारधारा हे अध्यक्षनिवडीचे प्रमाण नसून ‘मराठी साहित्यात ‘साहित्यिक’ म्हणून मोलाची घातलेली भर’ हे प्रमाण पूर्वी होते.

१९३८च्या मुंबई येथे भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, दस्तुरखुद्द स्वातंत्र्यवीर सावरकर. आपल्या प्रखर आणि ज्वलंत अध्यक्षीय भाषणात स्वातंत्र्यवीरांनी ‘ लेखण्या मोडा आणि हाती बंदूका घ्या’ असे खणखणीत आवाहन केले होते. याचा संदर्भ आजही दिला जातो.
(सहज विचार करा, हे वर्तमानात शक्य आहे काय.?)

१९९० साली रत्नागिरीत भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, डॉ मधु मंगेश कर्णिक यांनी पुढे चालून, ‘शिवसेननेचे हिंदूत्व शालीसारखे पांघरलेले असून, संघाचे हिंदूत्व अंगाला कातडीसारखे घट्ट चिकटलेले आहे, असे परखड आणि वास्तववादी विधान केले होते.

साहित्य संमेलनासंदर्भात पु.ल. देशपांडे आणि बाळासाहेब ठाकरे या दोहोंमधील वाद सर्वश्रूत आहे. ठाकरेंनी साहित्य संमेलनाला ‘बैलांचा बाजार’ म्हणून टिपण्णी केली होती. तर त्याविरोधात पु.लं नी नाराजी प्रकट केली होती.

गेल्या ९४ साहित्य संमेलनांचा बारकाईने विचार केला तर पाच-सहा नावे (अरुण साधू, उत्तम कांबळे, अक्षयकुमार काळे, श्रीपाल सबनीस आदी) वगळता कुठल्याही साहित्य संमेलनाध्यक्षांनी ‘आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हिंदूत्ववादामुळे, केंद्र सरकारमुळे गदा आली आहे, अशा स्वरुपाची मांडणी कधीही केली नाही. की कुठल्या थेट राजकीय विचारधारेशी संबंध दाखवून त्याविरोधी विचारधारेवर कडवट टीका केली नाही. ‘भाषा-साहित्याचे भवितव्य’ यावरचं बहुतांश अध्यक्षीय भाषणं झाली.

उदगीर येथे नुकतेच पार पडलेल्या ९५ व्या साहित्य संमेलनात मात्र संमेलनाध्यक्ष डॉ भारत सासणे यांच्या अध्यक्षीय भाषणात ‘साहित्य प्रवाहाविषयी चर्चा कमी आणि राजकीय प्रवाहाविषयी अधिक भाष्य केले गेले’. अर्थात संमेलनाध्यक्षांनी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक घटनांवर भाष्य केलेचं पाहिजे पण मराठी भाषा-साहित्याविषयी आपला वर्षभराचा अजेंडा काय असणारं आहे, यावर भाष्य न करता राजकीय विषयांवर चर्चा करणं कितपत योग्य. शिवाय ‘आम्ही म्हणू तेचं सत्य-प्रमाण’ ही दूराग्रही भूमिकाही दुटप्पीपणा दर्शवते.

उदगीरच्या साहित्य संमेलनात प्रथमदर्शनी कुठल्याही स्वरुपाचा वाद झाला नसला तरी, साहित्य संमेलन हे एखाद्या स्थानिक राजकारण्याला प्रस्थापित करण्यासाठीचे साधन होऊ शकत नाही. राजकीय नेते सतत कोणत्या ना कोणत्या कार्यक्रम वा इव्हेंटच्या शोधात असतात आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे जगभरातील १५ कोटी मराठी भाषकांसमोर जाण्याचा एक मोठा राजमार्ग आहे, हे १५ वर्षांपूर्वी एका चाणाक्ष, धूर्त मराठी राजकारण्याने हेरले. पूर्वी साहित्य संमेलन ठरले की होणा-या खर्चासाठी साहित्यिक सरकारदरबारी जात. पैसे मागत पण त्या धूर्त मराठी राजकारण्याने ‘आम्ही स्वखर्चाने उत्तम इव्हेंट करु, तुमचे स्वातंत्र्य अबाधित ठेवून, हे आमीष ठेवले.


महाराष्ट्र साहित्य परिषद, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे तत्कालिन पदाधिकारी बळी पडले असावेत बहुधा. आणि वेळ येताचं महाराष्ट्र साहित्य परिषदेचे / अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी हे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या राजकीय नेत्याने अक्षरशः खिशात टाकले. हा राजकीय नेता महाराष्ट्रातील आणि देशातील सहकार, क्रीडा, सांस्कृतिक, राजकीय, प्रशासकीय, मूलभूत सोयीसुविधा संदर्भात निर्माण केल्या गेलेल्या सर्व महामंडळांना खिशात टाकण्यासाठी प्रसिद्ध आहे. संघ-भाजप-मोदी आणि एकूणचं हिंदूत्ववादाविषयी जनमानसातं वाढत चाललेली विश्वासार्हता या ८० पार राजकीय नेत्याला खुपत आहे. मिळेल त्या व्यासपीठावर संघ-भाजपवर शिंतोडे उडवत फिरणे, हे या नेत्याचे पूर्णवेळ राजकारण झाले आहे. याच्यासोबत सध्या डाव्या विचारसरणीचे साहित्यिक, पत्रकार हिरीरीने सहभागी होतात. कारण इतर ठिकाणी त्यांना कोणी विचारेनासे झाले आहे.

उदगीरच्या साहित्य संमेलनात हेचं झाले. संमेलनाध्यक्ष डॉ भारत सासणे, डॉ जनार्दन वाघमारे, अन्वर राजन, जयदेव डोळे, अतुल देऊळगावकर, नीलम गोऱ्हे या मंडळींनी संघ-भाजप-मोदींवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष येथेच्छ तोंडसुख घेतले. क्षणभर असे वाटले की, महाविकास आघाडीवर ईडी-सीबीआयच्या ज्या एकामागोमाग एक धाडी पडत आहेत, त्याचा राग साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर काढला जातोयं की काय.? असो.
पण उद्घाटनप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भाषणाला उपस्थित प्रसारमाध्यमांनी जी प्रसिद्धी दिली ती समारोपप्रसंगी नितीनजी गडकरी यांच्या भाषणाला तुलनेने दिलीचं नाही. गडकरींचे भाषण समतोल, समयोचित आणि साहित्यिकांना ‘साहित्यधर्माची’ आठवण करवून देणारे होते. अर्थातचं पवारानुगामी साहित्यिक आणि प्रसारमाध्यमांना गडकरींचे भाषण रुचले नाही. मात्र उपस्थित साहित्य रसिकांनी नितीन गडकरी यांच्या संतुलित भाषणाला उचलून धरल्याचे जाणवले.

असो. मराठी साहित्य संमेलन हा जगभरातील १५ कोटी मराठी भाषकांचा वर्षातील सर्वात मोठा भाषा-साहित्य सोहळा असतो. तो कोणत्याही एका राजकीय पक्षाचा, विचारधारेचा असता कामा नये. चर्चा, वाद-विवाद-संवाद जरुर व्हावेत पण त्यातून विशिष्ट अजेंडा ठरता कामा नये. अजेंडा ठरलाचं तर तो मराठी भाषा-साहित्य-जनमानसाला विविधांगानी समृद्ध करणारा असला पाहिजे, हेचं यानिमित्ताने सांगावेसे वाटते.

  • अनिरुद्ध पाटील, लातूर
Back to top button