National SecurityNews

सिमीच्या १२ दहशतवाद्यांना आजन्म कारावास

जयपूर, दि ३१ – सिमिच्या १२ सदस्यांना दहशतवादी असल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनाविली आहे. तर एका आरोपीला मुक्त केले आहे. आजन्म कारावासासह प्रत्येक आरोपीला दीड लाख रुपये दंडही सुनावला आहे. संबंधित आरोपी अभियात्रिंकी महाविद्यालयाचे विद्यार्थी होते आणि त्यांच्यावर इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेसाठी काम करत असल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या आरोपींना २०१४ साली दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली होती.

या आरोपींपैकी सहाजण सिकरचे, तिघे जोधपूरचे, उर्वरीत तिघे जयपूर, पाली व बिहारमधील गया येथील निवासी होते. दहशतवाद विरोधी पथकाने म्हटले होते की, सिमीचे स्लीपर सेल कार्यरत करण्याबाबत अटकेत असलेल्या उमर याने इंटरनेटच्या माध्यमातून या युवकांना सिमीशी जोडून घेतले होते. त्यानंतर ते दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झाले होते. कोणतीही धोकादायक कारवाई करण्यापूर्वीच दहशतवादविरोधी पथकाने यांना ताब्यात घेतले होते. मागील सात वर्षे या खटल्याची कार्यवाही न्यायालयात सुरू होती.

खोट्या कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड  खरेदी करणे, जिहादच्या नावावर पैसे गोळा करणे, दहशतवाद्यांना आसरा देणे तसेच बॉम्बस्फोटासाठी रेकी करणे आदी बाबतीत संबंधित दहशतवाद्यांवर आरोप सिद्ध झाले आहेत. त्यांच्याकडून लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, पुस्तके, कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू ताब्यात घेतल्या आहेत.दिल्लीतील दहशतवादी पथकाच्या सूचनेवरून राजस्थानमधील पथकाने त्यांच्याविरोधात २८ मार्च २०१४ रोजी गुन्हा दाखल केला होता.

Back to top button