Opinion

“बौद्ध धर्माचा हिंदू धर्माशी संबंध” स्वामी विवेकानंद यांच्या शब्दात…

“ख्रिस्ती धर्माचा यहुदी धर्माशी, जो संबंध आहे, प्रायः तोच आजकाल ज्याला बौद्ध धर्म म्हणतात त्याचा हिंदू धर्माशी, म्हणजेच वेदप्रणीत धर्माशी आहे.
येशू ख्रिस्त यहुदी होते आणि शाक्यमुनी ( बुद्धदेव ) हिंदू होते. परंतु फरक एवढाच की, यहुदी लोकांनी येशुंचा त्याग केला, नव्हे, त्यांना क्रूसावर खिळे ठोकून मारले, तर हिंदुलोक शाक्यमुनींना ईश्वराच्या आसनावर बसवून अजूनही त्यांची पूजा करीत आहेत.

पण आज प्रचलित असलेल्या बौद्धधर्मात आणि खुद्द बुद्धदेवांच्या उपदेशांत जो एक मुख्य भेद आम्ही दाखवून देऊ इच्छितो तो हा की, शाक्यमुनी कोणत्याही नवीन मताचा प्रचार करण्यासाठी अवतरले नव्हते. येशूप्रमाणेच तेही पूर्ती करण्यासाठी आले होते, ध्वंस करण्यासाठी नव्हे. फक्त, येशू ख्रिस्तांना जुने यहुदी लोक ओळखू शकले नाहीत, तर बुद्धांच्या खुद्द अनुयायांनाच त्यांच्या उपदेशाचे मर्म कळले नाही. यहुदी लोकांना येशू ख्रिस्तांच्या धर्मात प्राचीन धर्ममतांची ( Old Testament ची ) परिपूर्ती दिसू शकली नाही, तर इकडे बुद्ध देवांचा धर्म म्हणजे हिंदुधर्मान्तर्गत सत्यांचीच परिणती होय हे बुद्धांच्या अनुयायांनाच उमजले नाही.

मी आपणास पुन्हा सांगतो की बुद्धदेव ध्वंस करण्यासाठी आले नव्हते, ते पूर्ती करण्यासाठी आले होते. आणि म्हणून त्यांचा धर्म म्हणजे हिंदुधर्माचीच स्वाभाविक परिणती, हिंदु धर्माचाच स्वाभाविक विकास होय.”

शिकागो येथील सर्वधर्मपरिषदेत
२६ सप्टेंबर १८९३ रोजी स्वामी विवेकानंद यांनी दिलेल्या भाषणातून.


विवेक विचार फेब्रुवारी 2021 मधून साभार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button