Opinion

वर्क फ्रॉम होममुळे मुंबईच्या डबेवाल्यांची नियतीशी झुंज

मुंबईतील चाकरमान्यांना वेळेवर डबा पोहोचवण्याचे काम अव्याहतपणे करणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांची जगभरात ख्याती आहे. मुंबईत सुमारे पाच हजार डबेवाले असून दररोज दोन लाख डबे घरातून चाकरमान्यांपर्यंत पोहचवण्याचे काम हे डबेवाले करतात. मात्र गेल्या वर्षभरापासून कोरोना आणि लॉकडाऊनमुळे डबेवाल्यांच्या व्यवसायावर गदा आली आहे. त्यामुळे अनेकांनी आपला हा व्यवसाय सोडून हमाली आणि सुरक्षा रक्षकाची नोकरी पत्करली. मधल्या काळात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येईल अशी आशा डबेवाल्यांना होती. पण पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यामुळे डबेवाल्यांचा व्यवसाय पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे.

नोकरी, व्यवसायासाठी कार्यालयात बसलेल्या आपल्या आप्तांना घरचं ताजं आणि पौष्टिक जेवण मिळावं अशी अपेक्षा घरच्या मंडळींना असते. त्यांची हीच अपेक्षा पूर्ण करण्याचं काम मुंबईतील ५ हजार डबेवाले करत होते. मुंबई परिसरातील घराघरातून जवळपास २ लाख डबे गोळा करुन ते वेळेत पोहोचवण्याचं काम हे डबेवाले करत. मात्र, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेक कार्यालयं बंद आहेत. अनेकांना वर्क फ्रॉम होम देण्यात आलं आहे. त्यामुळे डबेवाल्यांच्या व्यवसायावर कुऱ्हाड कोसळलीय. मधल्या काळात व्यवसाय पुन्हा सुरु करण्यात आला. पण आता पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्यात आल्यामुळे डबे पोहोचवण्याचं काम बंद झालंय. अशावेळी पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक डबेवाल्यांनी आता हमाली, तसंच सुरक्षा रक्षकाची नोकरी धरली आहे.

कितीही मोठे संकट आले तरीही पोटाची भूक काही कमी होत नाही ती लागतेच. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या अर्थार्जनासाठी कसरत करावी लागत आहे, अशी प्रतिक्रिया कैलाश शिंदे या डबेवाल्यानी दिली. डबे देण्याचे काम ते २५ वर्षांपासून करीत आहेत. या व्यवसायात ते जेव्हापासून आले आहेत. तेव्हापासून दिवसाला २०० ते २३० डबे ते वितरित करायचे. डबे वितरित करण्यासाठी त्यांच्याकडे १० माणसं मदतनीस म्हणून कामास होते. डबे पोहोचविण्याचे काम सुरळीत सुरु होते. चांगले अर्थार्जन होत होते. मात्र कोरोनामुळे सगळंच खंडित झाले आहे, अशीही खंत ते व्यक्त करतात.

कोरोनापूर्वी चांगले अर्थार्जन करणारे कैलाश शिंदे सध्या हमालीचे काम करत आहेत. त्यातुन उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटत नाही, म्हणून त्यांना इतर छोटी-मोठी कामे करावी लागत आहेत. कोरोनामुळे त्यांचे उत्पन्न तुंटपुजे जरी झाले असले तरीही जगण्याची उमेद त्यांनी सोडलेली नाही. कोणते ना कोणतेतरी काम करून आपला प्रपंच चालवायचाच, या दृढ निश्चयाने ते आपली वाटचाल करीत आहेत.

लॅाकडाऊन कालावधीत हॅाटेल व्यवसाय बंद आहेत. पण हॅाटेलमध्ये पार्सल ॲार्डर सुरु आहेत. पण ही पार्सल ॲार्डर पोहचवायला मनुष्यबळाची गरज आहे. मग अशा वेळी काही ठिकाणी ही गरज काही डबेवाल्यांकडून पूर्ण केली जात आहे. एरवी फूड ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांच्या घरी येणाऱ्या डिलीव्हरी बॉईजच्याऐवजी पांढराशुभ्र मराठमोळा पोशाखात आपले हे डबेवाले ग्राहकांपर्यंत जेवण, खाद्य पदार्थ घेऊन पोहोचत आहेत.

कैलाश शिंदे सांगतात की, सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत त्यांचे हे काम सुरु असते. प्रत्येक डब्यामागे मिळणाऱ्या फक्त ३०-४० रुपयांच्या मिळकतीवर त्यांना धन्य मानून घ्यावे लागत आहे. जिथे तेय पूर्वी अख्खी मुंबई आणि उपनगर पालथी घालायचे तिथे ते आपल्या राहत्या ठिकाणच्या जवळच्याच भागात डबे पोहोचविण्याचे काम करीत आहेत.

१३० वर्षांपासून आजेपावेतो नित्यनेमाने सुरू असणारी ही डबेवाल्यांची सेवा आज पूर्णतः ठप्प झाली आहे. त्यांचे रोजंदारीचे साधनच हातचे निसटून गेले आहे. असे असतानाही हतबल होऊन न जाता… आपण आपले काम करत राहायचे. हाच जणू एक सकारात्मक संदेश ते आपल्याला देतात.

Back to top button