Education

स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानतर्फे स्मार्ट अभ्यासिका केंद्र

पुणे, दि. २९ मे : शिक्षणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध नसलेल्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान या संस्थेतर्फे स्मार्ट अभ्यासिका केंद्र हा उपक्रम राबविण्यात येत आहे. एकूण २६ वस्त्यांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत असून तब्बल ७५० विद्यार्थ्यांनी या अभ्यासिकेचा लाभ घेतला आहे. त्यासाठी २७ शिक्षिकांसह आठ समन्वयक काम करत होते. सध्या शाळांना सुट्टी असल्यामुळे ही अभ्यासिका बंद असून जून महिन्यात पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.

संजय देशपांडे यांच्या चैतन्य सॉफ्टवेअर कंपनीने तयार केलेल्या टूलकिटच्या सहाय्याने या अभ्यासिका चालविल्या गेल्या. या टूलकिटमध्ये पहिली ते दहावी पर्यंतचा अभ्यासक्रम दृक-श्राव्य स्वरूपात उपलब्ध आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागते आणि अभ्यास करणेही सोपे जाते. घराच्या जवळच अशी अभ्यासिका सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेणे सहज शक्य झाले. सहा विद्यार्थ्यांचा एक गट अशा पद्धतीने विद्यार्थी या केंद्रात येऊन अभ्यास करत होते. शिक्षिकांकडून मार्गदर्शन घेत होते. विविध विषय शिकत होते. सोमवार ते गुरुवार रोज चार तास असे या अभ्यासिकेचे कामकाज सलग सहा महिने चालले.

या उपक्रमाचे अनेक फायदे झाले. आपली मुले वस्तीतच शिकत आहेत, हा आनंद पालकांना होता. अभ्यासाबरोबरच अवांतर वाचन, लिखाण, पाढे पाठांतर, घरचा अभ्यास या क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित झाल्या. परीक्षांमध्ये त्यांना चांगले गुण मिळू लागले. स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानने सुरू केलेल्या या उपक्रमात सहभागी होण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी 7620744029 या क्रमांकावर इच्छुकांना संपर्क साधता येईल.

Back to top button