FoodsHealth and Wellness

वजन कमी करायचय,तर मग ही धान्ये खा

धकाधकीचे तणावयुक्त आयुष्य, बिझी लाइफस्टाइल, खाण्यापिण्याच्या तसेच झोपण्याच्या अनियमित वेळा, राहणीमानात झालेले बदल, जंकफूड-फास्टफूडचे वाढते सेवन, व्यायाम न करणे व हॉर्मोनल बदल अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे आपले वजन वाढू लागते. त्यात जर काही हॉर्मोनल असंतुलन झाले असेल तर वजन कमी होणे देखील कठीण होऊन बसते. अश्या वेळी लोक कमी खाणे किंवा उपाशी राहणे आणि भरपूर व्यायाम करणे, इंटरनेटवर बघून तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय कुठलेतरी फॅड डाएट करणे असे उपाय करतात. पण अशाने वजन तर कमी होत नाही, उलट शरीराचे नुकसानच होते. वजन कमी करायचे असेल तर त्यावर उपाशी राहणे हा उपाय नाही,तर योग्य व्यायाम आणि समतोल आहार व पुरेशी शांत झोप घेणे ही पथ्ये पाळावी लागतात. सगळेच आहारतज्ज्ञ सांगतात की उपाशी राहून नव्हे तर योग्य आहार घेऊन वजन कमी करता येते.

आहारात बदल करा;

प्रत्येकाची शारीरिक ठेवण जशी वेगवेगळी असते त्याचप्रमाणे प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचा व्यायाम चालतो. सरसकट एकच नियम सगळ्यांना लागू होत नाही. म्हणूनच तज्ज्ञांच्या सल्ल्याने केलेला व्यायाम आणि आपण रोज जो आहार घेतो, त्यातच काही बदल केले तर आपण वजन कमी करू शकतो. काही धान्यांमधून पोषणमूल्ये तर मिळतातच शिवाय ही धान्ये वजन कमी करण्यात देखील हातभार लावतात. जाणून घेऊया ही धान्ये कोणती आहेत;

नाचणी/ रागी

वजन कमी करण्यासाठी रागी किंवा नाचणी हे ‘वंडर ग्रेन’ म्हणून ओळखले जाते. कारण नाचणीमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते शिवाय त्यात फायबर देखील असते. ज्यांना उष्णतेचा त्रास होतो अशांनी तर आवर्जून नाचणीची भाकरी किंवा नाचणी सत्व घ्यावे कारण नाचणी शीत गुणधर्माची आहे आणि शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते. नाचणीमध्ये प्रोटीनचे प्रमाण लक्षणीय आहे. तसेच फायबर भरपूर प्रमाणात असल्याने नाचणी खाल्यावर पोट भरलेले राहते व सारखी भूक लागत नाही.

बाजरी

बाजरी पचायला अत्यंत हलकी असते आणि सहसा ऍलर्जीकारक नसते. बाजरीमध्ये भरपूर पोषणमूल्ये तर असतातच शिवाय सोल्युबल व इन्सोल्युबल फायबरही मोठ्या प्रमाणात असते. बाजरीचा ग्लायसेमिक इंडेक्स गहू आणि तांदुळापेक्षा कमी असतो.बाजरीतून आपल्याला प्रोटीन सुद्धा मिळते. बाजरीमध्ये नियासिन म्हणजेच व्हिटॅमिन बी 3 असते. ह्यामुळे आपल्या शरीरातील तब्बल 400 एंझाइम रिऍक्शन्स सुरळीत चालतात. ह्याशिवाय बाजरीत बीटा -कॅरोटीन सुद्धा असते जे अँटिऑक्सिडन्ट म्हणून काम करते.

कुट्टू

कुट्टू हे अत्यंत पौष्टिक धान्य आहे. हे धान्य खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते. ह्यात ग्लूटेन नसल्याने ह्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. तसेच मधुमेहींसाठी तर हे सुपरफूड समजले जाते. कुट्टूमध्ये प्रोटीन, फायबर आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असतात. ह्याशिवाय ह्या धान्यात व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन के, थियामिन, नियासिन ही पोषणमूल्ये असतात. कुट्टुमुळे पोटाची पचनशक्ती देखील सुधारते.

हातसडीचा तांदूळ

भात हा आपल्या भारतीयांच्या जेवणातला अविभाज्य भाग आहे. त्यामुळे भात खाल्याशिवाय आपल्याला जेवण झाल्यासारखे वाटत नाही. पण नेहमीच्या प्रक्रिया केलेल्या पांढऱ्या तांदुळाऐवजी हातसडीच्या तांदुळाचा भात खाल्ला तर वजनात फरक नक्कीच पडेल. कारण हातसडीच्या तांदुळात तांबूस भाग (राईस ब्रान) शिल्लक असतो. ह्यात आवश्यक जीवनसत्वे आणि खनिजे असतात. पांढऱ्या तांदुळापेक्षा हा तांदूळ खूप चांगला असतो कारण ह्याचा ग्लायसेमिक इंडेक्स पांढऱ्या तांदुळापेक्षा कमी असतो.

योग्य व्यायामासह आहारात ही धान्ये समाविष्ट केल्यास वजनात नक्कीच फरक पडेल.

Back to top button