National SecurityNaxalismNews

तेलंगणा पोलिसांचा नक्षल ‘ विजय ‘

Maoist rebels

छत्तीसगड राज्यातील नक्षलवाद्यांनी केलेल्या अनेक घातपातातील मास्टर माईंड असलेला अत्यंत जहाल नक्षलवादी, प्रतिबंधित कम्युनिस्ट माओवादी (CPI-Maoist) पक्षाचा केंद्रीय समितीचा सदस्य, नक्षलवाद्यांच्या पश्चिम घाट समितीचा कमांडर विजय उर्फ संजय दीपक रावला त्यांच्या पत्नी सोबत अटक करण्यात तेलंगणा पोलिसांना मोठं यश मिळालं आहे.विजय उर्फ संजय दीपक रावच्या अटकेसाठी महाराष्ट्र सरकारसह विविध राज्यातील सरकारने त्याच्यावर दोन कोटींच्या वर बक्षिसे जाहीर केलेली होती.

लोकशाही विरोधी,गरीब आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासात अडथळा ठरलेल्या प्रतिबंधित कम्युनिस्ट माओवादी (CPI-Maoist) पक्षाचा अत्यंत महत्त्वाचा सदस्य असलेला विजय उर्फ संजय दीपक राव हा मागील अनेक वर्ष नक्षल चळवळीत सक्रिय राहून देश विघातक कार्यात मोठी भूमिका बजावत होता.देशातील शेकडो जवानाच्या मृत्यूचा कारण ठरलेल्या विजय उर्फ संजय दीपक राव उर्फ आनंद सहस्रबुद्धे अशी वेगवेगळी उपनावे वापरून महाराष्ट्रातील आदिवासी आणि दलितांसाठी काम करणारा सामाजिक कार्यकर्ता असल्याचा दावा करणाऱ्या ढोंगी डाव्या विचारांच्या अडून देश विरोधी कारवाया करणाऱ्या माओवाद्याच्या मुसक्या आवळल्या बद्दल.. तेलंगणा पोलिसांच्या सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन…

विजय उर्फ संजय दीपक राव हा मूळचा महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील शिवगंगा नगर येथील मूळ रहिवासी असून त्यांनी अंबरनाथमधील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेतले असून डोंबिवलीत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.राव यांचे वडील कम्युनिस्ट कामगार संघटनेशी संबंधित होते.संजय राव याचे वडील डाव्या विचारांचे असल्यामुळे सुरवातीपासूनच संजय वर डाव्यां विचारांचा प्रभाव होता. 1983 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये बीटेक करत असताना काश्मीरमधील फुटीरतावादी चळवळीला पाठिंबा देणाऱ्यांपैकी काही लोकांशी त्याची मैत्री होऊन तो स्वतंत्र काश्मीरची मागणी करणाऱ्या फुटीरवाद्यांच्या संपर्कात आला. 1999 मध्ये नक्षली चळवळीचे नेते कोनाथ मुरलीधरन उर्फ अजित यांनी नक्षली समूहाची स्थापना केली. त्याला संजय राव यांनी समर्थन देऊन तो पण या समूहात सामील झाला होता.

संजय यावर्षी मार्चमध्ये नक्षल्यांचा गड समजल्या जाणाऱ्या छत्तीसगडमधील अबुझमाड भागात जाणार होता. परंतु आजारी असल्याने तो काही काळ जंगलातून शहरी भागात वास्तव्यास होता. चार दिवसांपूर्वी तो अबुझमाड येथे जाण्यासाठी हैदराबाद येथे आला होता. येथे तो त्याच्या जुन्या मित्रांनादेखील भेटला. अबुझमाडमध्ये तो नक्षल्यांचा वरीष्ठ नेता बसवराज, गणपतीसह काही महत्वाच्या नेत्यांसोबत नव्या रणनीती संदर्भात चर्चा करणार होता. मागील वर्षी केंद्रीय समिती सदस्य मिलिंद तेलतुंबडे चकमकीत ठार झाल्याने त्याच्याकडे दंडकारण्य झोनची जबाबदारी देण्यात येणार होती. मात्र, त्याआधीच संजय पोलिसांचा जाळ्यात अडकला, अशी माहित पोलीस सूत्रांनी दिली आहे. संजयच्या अटकेने नक्षलवादी चळवळीला मोठा धक्का बसला आहे.

राव याला आता पर्यंत विविध प्रकारच्या गुन्ह्याच्या आरोपाखाली खालील ठिकाणी अटक करण्यात आली होती…

१.राव आणि त्यांच्या साथीदारांना नंदुरबार जिल्ह्यातील शहादा पोलिसांनी 2000 मध्ये तीन प्रकरणांमध्ये आयपीसी कलम आणि मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायद्यांतर्गत देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.

२.2005 मध्ये त्याला कर्नाटक मधील मुलकानूर पोलिसांनी अटक केली होती, परंतु त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.

३. 2015 मध्ये पुण्यातील तळेगाव दाभाडे येथून अटकदेखील करण्यात आली होती. मात्र वरील सर्व प्रकरणात जामिनावर सुटका होताच तो पुन्हा सक्रिय व्हायचा.

छत्तीसगड राज्यमधील नक्षल घातपाताच्या ताडमेटला, राणी बोदली, झीरम येथे झालेल्या नक्षलवादी घटनांचाही तो मास्टरमाईंड होता. केंद्रीय समिती सदस्य आणि इतर बड्या नेत्यांच्या नक्षलवादी घटनांची योजना आखत असलेल्या टीमचा तो एक भाग होता.

झीरम, ताडमेटला, राणी बोदली अशा अनेक मोठ्या घटनांमधील मुख्य मास्टर माईंड तोच असल्याचे सांगितले जाते.वरील घटनाची माहिती घेतल्यास त्या हल्याची भीषणता आपल्या लक्षात येईल..

१.छत्तीसगडमधील विजापूर जिल्हयातील राणी बोदली येथे 15 मार्च 2007 रोजी आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला नक्षलवाद्यांनी केला होता, ज्यामध्ये छत्तीसगड पोलीस आणि शस्त्र दलाचे 55 जवान शहीद झाले होते. झोपलेल्या सैनिकांवर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले होते. त्यावेळच्या दुर्घटनेचे दृश्य असे होते की आजही ते आठवून स्थानिक लोकांना भिती भरते असे सांगितले जाते.2005 साली सलवा जुडूम सुरू झाल्यानंतर मदत छावणीत आलेल्या ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी ठिकठिकाणी मदत शिबिरे उभारून जवानांना तैनात करण्यात आले होते. त्यात राणीबोदली येथील जवानाच्या शिबिर छावणी चा देखील सहभाग होता.

२.नक्षल चळवळीच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना 6 एप्रिल 2010 रोजी सुकमा जिल्ह्यातील ताडमेटला गावात नक्षलवाद्यांनी घडवून आणली होती. यामध्ये 75 सीआरपीएफ जवान आणि एक जिल्हा पोलिस दलाचा जवान शहीद झाला. बस्तरमध्ये दरवर्षी मार्च ते जून दरम्यान मोठ्या नक्षलवादी घटना घडत असल्या, तरी आजही ताडमेटला येथील नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या घटनेची आठवण आल्यास लोक थरथर कापतात.चिंतलनार कॅम्पपासून पाच किमी अंतरावर असलेल्या ताडमेटला गावाजवळ गस्त घालणाऱ्या सीआरपीएफ जवानांना नक्षलवाद्यांनी झाडांच्या मागे लपून मोकळ्या मैदानात चारही बाजूने घेरून हल्ला केला होता.ताडमेटला येथे नक्षलवाद्यांनी जवानांची 80 शस्त्रेही लुटली. या घटनेनंतर काही दिवसांनी नक्षलवाद्यांनी माध्यमांना बोलावून त्याच परिसरातील जंगलात लुटलेल्या शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन भरविले होते.

३.छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील झीराम घाटी मध्ये 25 मे 2013 रोजी नक्षलवाद्यांनी काँग्रेसच्या ताफ्यावर हल्ला केला.नक्षलवाद्यांनी झीराम खोऱ्यात रक्तरंजित खेळ खेळून अनेक काँग्रेस नेत्यांसह 30 हून अधिक लोकांची हत्या केली होती.

४.छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात 25 एप्रिल 2017 रोजी सीआरपीएफ जवानांचे एक पथक बुरकापाल परिसरात बांधण्यात येत असलेल्या रस्त्याच्या कामाला मदत करत असताना सुमारे 300 नक्षलवाद्यांच्या एका मोठ्या गटाने, अनेक गटांमध्ये विभागून, सीआरपीएफ जवानाच्या पथकावर हल्ला केला होता त्यामध्ये 25 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते तर अन्य सहा जखमी झाले.

वरीलप्रकारच्या नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या अनेक घटनांमध्ये मुख्य मास्टर माईंड विजय उर्फ संजय दीपक राव हाच होता…त्यामुळे त्याच्या अटकेचे महत्त्व अनन्यसाधारण असून पोलिस यंत्रणेने नक्षलवाद्यांच्या विजय ला अटक करून एक प्रकारे नक्षलवाद्यांवर विजय च मिळविला म्हणल्यास अतिशयोक्ती होणार नाही.

माओवाद्यांनी आदिवासी बांधवांच्या जीवनातील विकासाला विरोध करून त्यांना त्यांच्या मूलभूत अधिकारापासून दूर ठेवलं आहे.मध्य भारतात उपलब्ध असलेली नैसर्गिक साधन संपत्ती,अनेक निसर्गरम्य ठिकाणी,येथील आयुर्वेदिक संपन्न अशी नैसर्गिक उत्पादने, येथे मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेली विविध नैसर्गिक उत्पादने तसेच खनिज संपन्न असलेला हा सर्व भाग हे सर्व असूनही या भागातील नागरिक अजूनही विकासापासून वंचित असल्याचं कारण हे नक्षलवादी चळवळ च आहे हे वारंवार नक्षलवाद्यांनी त्यांच्या विकासविरोधी कार्यातून दाखवून दिलं आहे.

महाराष्ट्रतील गडचिरोली जिल्हा पोलिसांनी छत्तीसगड राज्याच्या सीमा भागा जवळील धानोरा तालुक्यातील ग्यारापत्तीच्या घनदाट जंगलातील माओवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत धानोरा तालुक्यातील ग्यारापत्तीच्या घनदाट जंगलातील माओवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत १३ नोव्हेंबर २०२१ रोजी नक्षलींच्या केंद्रीय समितीचा सदस्य तसेच महाराष्ट्र-मध्य प्रदेश-छत्तीसगड क्षेत्रीय समितीचा प्रमुख म्हणून कार्यरत असलेला जहाल नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे याचा खात्मा करण्यात पोलिसांना यश मिळाले. मिलिंद तेलतुंबडे हा कॉम्रेड एम, दीपक, सह्याद्री अशा वेगवेगळ्या नावांनी नक्षलवाद्यांमध्ये प्रसिद्ध होता.कोरेगाव भीमा प्रकरणात अटकेत असलेल्या आनंद तेलतुंबडे यांचा मिलिंद तेलतुंबडे भाऊ आहे. भिमा-कोरेगाव हिंसाचाराचा सूत्रधार अशी पोलिसांत त्याची नोंद आहे. 1 मे 2019 रोजी गडचिरोलीत कुरखेडा – जांभुळखेडाज पोलिसांवर झालेल्या हल्ल्यामागे मिलिंद तेलतुंबडेचा हात होता.मिलिंद तेलतुंबडेवर 50 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. नक्षलवादी चळवळ शहरी भागात रुजवण्यात त्याचा हात होता. केंद्र सरकारच्या मोस्ट वॉण्टेड नक्षलवाद्यांच्या यादीत त्याचा सहभाग होता. त्याच्यावर हत्या देशद्रोहासह अनेक गुन्हे दाखल होते.

नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे हा गडचिरोली पोलिसांनी केलेल्या कारवाई मध्ये ठार झाल्यानंतर देशातील माओवादी चळवळीला मोठा हादरा बसला होता…त्यानंतर विजय उर्फ संजय दीपक राव ची अटक ही माओवादी/नक्षलवादी चळवळीला सर्वात मोठा धक्का आहे.देशातील सर्व राज्यातील पोलिसांनी विविध प्रकारच्या मोहिमा राबवून नक्षल चळवळी प्रभावहीन केलेली असताना गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या खात्रीशीर माहिती मुळे तेलंगणा पोलिसांनी खूप मोठे यश मिळविले आहे.आदिवासी विरोधी,संविधान विरोधी,लोकशाही व्यवस्थेला आव्हान देणारी चळवळ अशीच खरी ओळख माओवाद्यांनी त्यांच्या कृत्यातून वारंवार दाखवून दिलं आहे.त्यांचा कायमचा बंदोबस्त जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर भारतीय लोकशाही ला लागलेली ही लाल कीड नष्ट झाली पाहिजे.
परत एकदा तेलंगणा राज्याच्या पोलिसांचे मनःपूर्वक अभिनंदन…

लेखक :- अशोक तिडके (विवेक विचार मंच)

(tidkeashok2023@gmail.com)

https://marathi.hindustantimes.com/nation-and-world/maoist-movement-naxalite-leader-sanjay-rao-aka-vijay-rao-arrested-at-hyderabad-141694714267683.html

https://indianexpress.com/article/cities/pune/pune-crime-files-maoist-leader-sanjoy-rao-8944731/

Back to top button