EducationHinduismNewsSevaSpecial Day

भटके विमुक्तांच्या सर्वांगीण विकास व सन्मानासाठी भटके विमुक्त विकास परिषद व प्रतिष्ठान कटिबद्ध – अध्यक्ष उध्दवराव काळे

एकरस, समरस व सामर्थशाली हिंदू समाज निर्माण करण्यासाठी हिंदू समाजाचा अभिन्न अंग असलेला भटके विमुक्त समाज अविकसित, मुख्य प्रवाहापासून लांब राहिला तर संघाचे ध्येय पूर्ण होऊ शकत नाही या विचारामधून भटके विमुक्त समाजाची सर्वांगीण उन्नती करण्यासाठी १०९१ मध्ये या कामाची मुहूर्तमेढ केल्या गेली दि.२ ऑक्टोबर १९९१ला पुण्यात भटके विमुक्त विकास परीषद स्थापना झाली. “बंधुभाव हाच धर्म “हे सामाजिक सुत्र आधारभूत मानुन दिशा निश्चित झाली. शिक्षण, स्वावलंबन, सन्मान व सुरक्षा या चतुसुत्रीवर काम सुरू झाले. भटकेविमुक्तांचा वैभवशाली गौरवपूर्ण इतिहास, परंपरा, आणि त्यांच्या समस्या सकारात्मक पध्दतीने मांडत परीषदेचे कार्यकर्ते समाजात फिरु लागले. भटके विमुक्त विकास परिषद हे महाराष्ट्रातील असे पहिले संघटन आहे जे पाला पालावर, तांड्या तांड्या पर्यंत पोहचले. समन्वय संवाद यांच्यावर भर दिला. गरज पडली तर संघर्षांचा पवित्रा पण घेतला.

निवेदने, मोर्चा, धरणे आंदोलने यातुन जागृती केली. परंतु यातुन अपेक्षित समाज पुनर्रचना साध्य होणार नाही याची जाणीव कार्यकर्त्यांना होती म्हणून प्रबोधनाबरोबर रचनात्मक कार्य पण सुरु झाले त्यासाठी भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान ची स्थापना झाली. चतुसुत्रीवर काम सुरू झाले व १९९३ला १० पारधी मुलांना घेवुन यमगरवाडी सेवा प्रकल्प सुरू झाला.

आज या प्रकल्पात इ. १ ली ते १० चे वर्ग, एकूण मुले २३५ व मुली १३२ एकूण ३६७ निवासी विदयार्थी वास्तव्यास आहेत. हे विदयार्थी प्रांतातील १५ जिल्हयातून २८ समाज घटकातील आहे. आज प्रकल्पात एकलव्य प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेची स्वतंत्र सर्व भौतिक सुविधांनी संगणक कक्ष, प्रयोग शाळा भव्य क्रीडांगण, स्मार्ट क्लासरूम असलेली भव्य दुमजली इमारत आहे. तालुका स्तरापासून ते राज्य स्तरावर विविध प्रकारच्या क्रिडा स्पर्धात शाळेचे अनेक विद्यार्थी विद्यार्थीनी मैदान गाजवत आहेत.

शिक्षण आयामाचा एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम म्हणून 2003 साली पालावरची शाळा या अभिनव शैक्षणिक उपक्रमाची सुरुवात झाली. महाराष्ट्रभर चालवल्या जाणाऱ्या या पालावरच्या शाळांमुळे अनेक समाज गटांच्या पहिल्या पिढ्या शिक्षणाच्या प्रवाहात आल्या. दरवर्षी सुमारे दीड हजार मुले- मुली प्रमाण शाळेमध्ये नियमीत जाऊ लागली. आज साधारण ६८ पालावरच्या शाळा देवगिरी, प. महाराष्ट्र व कोकण प्रांतात कार्यरत आहेत. पालावरची शाळा हे फक्त शिक्षणाचे केंद्र नसुन वस्तीच्या सर्वांगीण विकासाचे , भटकेविमुक्त समाजाच्या प्रगतीचे सामाजिक नेतृत्व विकसीत होण्याचे व अभिमानाचे केंद्र झाले आहे.

पालावरची शाळा / अभ्यासिकेची उपलब्धीः

अभ्यासिकेतील सर्व मुले नियमित प्रमाण शाळेत जाऊ लागली आहेत. मुलांच्या लेखन-वाचनात सुधारणा होत आहे. मुलांच्या लेखन वाचना व्यतिरिक्त मुलांच्या विविध कलागुणांचा विकास ही अभ्यासिकांच्या मार्फत केले जाते. या वर्षी १२२ मुलांना पहिली मध्ये दाखला अभ्यासिकांच्या माध्यमातून करून देण्यात आला. अभ्यासिकांमुळे वस्तीतील मुलींचेही शाळेत जाण्याचे प्रमाण वाढले. आधी मुलीना शाळेत पाठवत नसत, मोठ्या मुली घरीच असत घर काम करायला, भावंडांना सांभाळायला. मुली प्रमाण शाळेत जाव्या यासाठी वस्तीवरील शिक्षकाने खूप प्रयत्न केले, त्यांच्या पालकांना समजावले. त्याचा परिणाम चांगला झाला, आता स्थिति बदलू लागली आहे त्यापण प्रमाण शाळेत जाऊ लागल्या आहेत.

काही वस्तीत मुलां सोबत पालक ही अभ्यासिकेत शिकायला येतात. विशेष करून मुंबई भागातील उल्हासनगर येथील अभ्यासिकेत काही पालक नियमित शिकण्यासाठी येतात.

अभ्यासिकेत राबविलेल्या आरोग्याच्या उपक्रमांनी मुलांच्या आरोग्यात सुधारणा दिसू लागली आहे. धारशिव भागातील काही अभ्यासिकेत शिक्षकाच्या प्रयत्नातून मध्यान्ह भोजन वस्तीतील मुलांसाठी सुरु झाले आहे. अभ्यासिकेतील सततच्या प्रयत्नाने वस्तीत बालविवाह होत नाहीत.

  • आरोग्य :- भटके विमुक्त समाजातील विशेष करून मुलांच्या आरोग्यसमस्या दुर करण्यासाठी आरोग्य आयामाची सुरवात करण्यात आली. याच्या अंतर्गत मुलांना पोषण आहार, लसीकरण तसेच वस्तीला डॉक्टर जोडणे, आरोग्यशिबीर, आरोग्य मार्गदर्शन असे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात. त्याचबरोबर वस्ती स्वास्थ्य नीट रहावे म्हणून 14 ठिकाणी आरोग्य पेटीचेही वाटप करण्यात आले आहे. आरोग्य सेवकांचे एक दियावसीय प्रशिक्षण शिबिर एकलव्य विद्या संकुल, यमगरवाडी येथे घेण्यात आले. या प्रशिक्षणात १८ आरोग्य सेवकांनी सहभाग घेतला. डॉ. शहापूरजीनी या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले होते. त्यांनी वेगवेगळ्या आरोग्य संदर्भातील विषयांवर आरोग्य सेवकांचे मार्गदर्शन केले जाते. २४ वस्तीवर आरोग्यपेटीच्या औषधांचा वापर खूप उत्तमरीत्या चालू आहे. सर्व अभ्यासिकांवर लसीकरण नियमित सुर करण्यास यश आले आहे. आरोग्य विषयाच्या २७ वस्त्यांवर ४१ बैठका झाल्या. या बैठका प्रामुख्याने यावर्षी महिला व किशोरी यांच्या विविध विषयाच्या झाल्या. २५ वस्त्यांवर डॉक्टर जोड करण्यात आली आहे. डॉक्टर त्यांच्या सोईनुसार या वस्त्यांवर येऊन तपासणी करतात. कोल्हापूर भागात दोन वस्त्यांवर व नाशिक येथे एका वस्तीवर नियमित चिकित्सा फिरता दवाखान्याच्या मार्फत सुरू आहे. वस्तीवरील गरोदर मातांना पोषण आहार मिळवून देण्यात यश आले आहे. वस्तीवरील सर्व प्रसूती आता शासकीय दवाखान्यात होत आहेत. आरोग्य विषयक योजनांची माहिती वस्तीतील लोकांना करून देण्यात आली.
  • स्वावलंबन-शिक्षणाच्या अभावामुळे आणि पारंपारिक कला कौशल्य, कारागिरी यातून पुरेसा रोजगार मिळत नसल्याने या समाजाने गुन्हेगारी, व्यसनाधीनता, भीक मागणे याकडे वळू नये यासाठी परिषदेच्या माध्यमातून उ‌द्योग- प्रशिक्षण व स्वावलंबनाचे अनेक प्रयोग करण्यात आले. १९९५ साली अनसरवाडा, तालुका निलंगा, जिल्हा लातूर येथे गोविंद महाराज गोपाळ विकास परिषदेच्या माध्यमातून खेळकरी-गोपाळ समाजाला बँड वादनाचे प्रशिक्षण देण्यात आले. एकेकाळी शिंदीची दारू गाळणारा आणि भिक मागून जगणारा गोपाळ समाज आज लग्नसराईच्या काळात लाखो रुपयाची उलाढाल करतो. मागच्यावर्षी २१ बॅन्ड पथकांनी ८५ लाख रु कमाई केली. परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सिद्ध झालेले स्वावलंबनाचे उत्तम उदाहरण आहे. तसेच बचत गटांच्या माध्यमातून महिला व युवकांचे सक्षमीकरण सुरू आहे. साधारणपणे ६५ बचतगटाच्या माध्यमातून विविध उद्योग व व्यवसाय प्रशिक्षण तसेच अंतर्गत कर्ज व मोठे कर्ज या बचतगटांना मिळवून दिले आहे..
  • सुरक्षा- १८७१ मध्ये गुन्हेगार जमाती कायद्यामुळे जन्मजात गुन्हेगार ठरलेले समाज बांधव १९५२ मध्ये सेटलमेंट मधून विमुक्त झाले तरी समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आजही फारसा बदललेला दिसत नाही. गावाच्या रचनेत स्थान नसलेला भटका समाज आजही वर्षातील सहा आठ महिने भटकत असतो. वृद्ध मंडळी, स्त्रिया, लहान मुले गावकुसाबाहेर पालात राहतात. अत्यंत असुरक्षित वातावरणात राहणाऱ्या या समाजाला अन्याय- अत्याचारांना सतत तोंड द्यावे लागते. परिषदेच्या माध्यमातून मोर्चे, आंदोलने, सभा, संघटन या माध्यमातून सामाजिक सुरक्षा मिळवून देण्याचे काम सातत्याने तीस पस्तीस वर्ष करण्यात येत आहे.. नुकताच डिसेंबर २०२५ मध्ये लातूर येथे भटक्या विमुक्त समाजाची एक भव्य चेतना परिषद जागरण मेळावा घेण्यात आला.
  • सन्मान – प्राचीन भारताच्या उज्वल परंपरांचा वाहक असणारा आणि मुस्लिम व ब्रिटिश आक्रमकांविरुद्ध कसोशीने लढणारा हा समाज हिंदू धर्माचा खरा रक्षक आहे. या समाजाला पुन्हा एकदा सामाजिक सन्मान मिळवून देण्याचे काम परिषदेच्या माध्यमातून केले जात आहे. त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे जानेवारीमध्ये अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मंदिराच्या उ‌द्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी भटके विमुक्त समाजातील बांधवांना पूजेचा मान देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच अनेक ठिकाणी भागवत कथा सप्ताह तसेच प्रसिद्ध मंदिरे जसे काळाराम मंदिर नाशिक, गंगा गोदावरी सायंकालीन सामुहिक आरतीसाठी भटकेविमुक्त समाजातील जेष्ठ समाज प्रमुख यांना सन्मानाने आमंत्रित करण्यात येते. माजी विदयार्थी संघटनः गेल्या तीन वर्षापासून आपण क्रिकेट मॅचच्या निमित्ताने एकत्रिकरण करत आहोत. माजी विदयार्थी संघटना तयार करून प्रांत स्तरावर कार्यकारिणी नक्की केलेली आहे. आत्तापर्यंत सूमारे १५०० माजी विद्यार्थ्याशी वैयक्तिक संपर्क केलेला असुन सर्व माजी विदयार्थ्यांचे एकत्रीकरण दरवर्षी केले जाते.
  • उपलब्धी व प्रकल्पातून परिवर्तन :- या प्रकल्पातून शिकुन पुढे गेलेले अनेक माजी विद्यार्थी आहेत. संकुलामध्ये शिकलेले विदयार्थी आज समाजात डॉक्टर, इंजिनियर, वकील शासकीय नौकरीत आहेत. आणि कांही सामाजिक कामात कार्यरत आहेत. विशेषतः मुली पॅरामेडिकल शिक्षण घेवून मेडिकल क्षेत्रात नर्सिंगची सेवा देत आहेत. मा. परमेश्वर काळेने भटके-विमुक्त मुलासाठी वसतीगृह सुरू केले. अर्जुन चव्हाण डॉक्टर झाला. शुभम भोसले राज्य पातळीवरील धावपटू झाला. राजश्री काळे, ललिता जाधव राजकीय क्षेत्रात स्थिरावत आहेत. या सर्व माजी विद्यार्थ्याचे दरवर्षी एकत्रीकरण होते. शैक्षणिक, सामाजिक, नैतिक परिवर्तनाचा प्रवास निश्चितच प्रेरणादायी कार्यकर्त्यांना बळ देणारा आहे. ज्या विचाराने ही संस्था काम करते त्या मुळ संस्थेच्या शताब्दी वर्षात दोन माजी विदयार्थी प्रचारक म्हणून या वर्षी निघालेले आहेत. ही आपणांसाठी आनंदाची बाब आहे.

भविष्यातील विस्तार इ. 11 वी व 12 वी उच्च माध्यमिक जूनपासून सुरू होण्याची शक्यता आहे. कौशल्य विकासाचे सहा कोर्सेस जूनपासून सुरू करण्यात आले आहे.

भ.वि.वि.परिषद :- सुरवातीपासून संघटनात्मक चळवळ म्हणून परीषदेचे कार्य सुरू आहे आता ते राज्यातील सर्व शासकीय जिल्ह्यात व महाराष्ट्राच्या विदर्भासह चारही प्रांत पोहचले आहे. चारही प्रांतात प्रांत संयोजक सहसंयोजक व सर्व आयामांना संयोजक आहेत. तसेच जिल्हा स्तरावरही जिल्हासंच पुर्ण करण्याचे उद्दिष्ट या शताब्दी वर्षात ठरविलेले असुन सर्व शासकीय तालुक्यात परीषदेचे कार्य पोहचेल असा ठाम विश्वास आहे. अन्याय अत्याचाराच्या घटना असो की त्यांच्या सन्मान सुरक्षेचा प्रश्न असो भटके विमुक्त विकास परिषद हे सर्व भटके विमुक्तांसाठी क्रमांक एक चे आश्वासक असे संघटन झाले आहे. मागील दोन वर्षांत भटके विमुक्त विकास परिषद च्या साधारणपणे ९५० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी सुमारे ६०० वस्त्यांमध्ये ७५००० पेक्षा जास्त भटकेविमुक्त समाजबांधवांचे आधार जात दाखला अश्या दहा प्रकारच्या कागदपत्राबाबत वैयक्तिक सर्वेक्षण केले. त्यातुन समोर आलेली आकडेवारीनुसार भटके विमुक्त समाजात आजही ८०% लोकांकडे जन्म दाखला नाही तर जात प्रमाणपत्र नाही याचे प्रमाण ८५% आहे.या समाजाला जात दाखला मिळणे म्हणजे आकाशातून तारे तोडून आणण्यासारखे महादिव्य काम आहे . महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यात ७५ तालुक्यात साधारण २४० ठिकाणी विशेष शिबिरांचे आयोजन झाले यात सुमारे ५०००० पेक्षा संख्येने कागदपत्र मिळालीत त्यात आधार कार्ड, मतदान ओळखपत्र शिधापत्रिका वयाचे दाखले आयुषमान भारत कार्ड पेन्शन तशेच जातीचे दाखले यांचा समावेश आहे. सर्वेक्षणसाठी स्वतंत्र अॅप तयार करण्यात आले असुन त्याचा वापर करण्याचे प्रशिक्षणही चारही प्रांतात झाले आहे.

त्यामुळेच सर्वेक्षण अभियानाला गती येणार आहे. अनेक जिल्ह्यात झालेल्या सर्वेक्षाणानुसार शिबीर लागले नाहीत पण मिळालेली उपलब्धी हि काही कमी नाही, परीषदेच हे यश समाजापुढे सरकारपुढे व प्रशासकीय अधिकार्यांपुढे यावी अनुभवांची हि शिदोरी अन्य कार्यकत्यांना मिळावी त्यातून भटके विमुक्त समाजाचे प्रश्न ऐरणीवर यावे ते सुटावेत हि अपेक्षा ठेवुन कार्यकर्ते सातत्याने प्रयत्नशील आहेत.

भटकेविमुक्त समाजातील पारंपरिक कारागीर व लोककलावंत यासाठीही परीषदेचे कार्य सुरू आहे .लोककलाकारांचे संघटन या विषयात काम सुरू झाले आहे. तसेच सरकारशी समन्वय व संवाद ठेवुन अनेक भटकेविमुक्त समाजासाठी अनेक शासन आदेश व जिल्हास्तरीय समित्यांचे गठन तसेच भटके विमुक्तांसाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना राजे उमाजी नाईक पुरस्कार, पारंपरिक कारागीर यांना विश्वकर्मा पुरस्कार तर पारंपरिक लोक कलाकारांसाठी नटराज पुरस्कार शासनाने घोषीत केले तसेच दि.३१ ऑगस्ट हा भटके-विमुक्त दिवस म्हणून शासन स्तरावर या वर्षापासून साजरा करण्यात येत आहे.

या कामाचे अंतिम ध्येय म्हणजे भटके विमुक्त समाजातील व्यक्तींचे सामाजिक नेतृत्व विकसित करणे ज्याच्यामुळे समाज स्वयंविकासाकडे वाटचाल करेल व भटके विमुक्त समाज या निस्वार्थी प्रामाणिक नेतृत्वा चे अनुवर्तन करेल. मागील ३५ वर्षाच्या यशस्वी वाटचालीनंतर आता समाजामध्ये या प्रकारचे नेतृत्व निर्माण होऊ लागले महादेवराव गायकवाड या सारखे एका छोट्या गावातील कैकाडी समुदायातील व्यक्तींनी या समाजाच्या उन्नती मध्ये मोठे योगदान दिले. शिवा कांबळे सारखा तरुण परिषदेच्या संपर्कात आल्यामुळे अवघे चौथीपर्यंतचे शिक्षण असले तरी स्वतःला विकसित करत आज जिल्हाधिकारी तत्सम अधिकाऱ्यांसोबत आत्मविश्वासाने संवाद करून शेकडो लोकांची जात प्रमाणपत्र काढून देण्यामध्ये यशस्वी झाला आहे. उमेश जोगी, लक्ष्मण सुपणार, डॉक्टर संजय पुरी, संगीता पाचंगे, शरद माकर, सुनील पवार, गिरीश काळे इत्यादी नेतृत्व परिषद च्या संपर्कात आल्यामुळे आपल्या समाजाप्रती दायित्व समजून या कामात तन-मन-धनपूर्वक सक्रिय कार्य करीत आहे.

भटकेविमुक्त समाजास मुख्य राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी या समाजाच्या सर्वांगीण विकास तसेच सामाजिक सन्मानासाठी ” बंधुभाव हाच धर्म” या विचारातून भटके विमुक्त विकास परिषद व प्रतिष्ठान जी वाटचाल सुरू आहे व यातुन भटकेविमुक्त समाज पुन्हा आपले गतवैभव प्राप्त करून आपला देशही परम वैभव प्राप्त करेल यात शंका नाही.

लेखक :- उध्दवराव विश्राम काळे नाशिक
अध्यक्ष भटके-विमुक्त विकास प्रतिष्ठान व परिषद महाराष्ट्र प्रदेश

Back to top button