महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक वाटचालीत १३व्या शतकातील संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या ‘ज्ञानेश्वरी’चे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण आणि चिरंतन आहे. त्यांच्या कार्याने अध्यात्मज्ञान लोकभाषेत पोहोचवून समाजजीवनाला नवी दिशा दिली आणि मराठी साहित्याला समृद्ध परंपरेचे अधिष्ठान प्राप्त करून दिले. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि पसायदान यांच्या माध्यमातून त्यांनी भगवद्गीतेतील तत्त्वज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहोचवले.ज्ञानेश्वर महाराजांचे कार्य केवळ एका ग्रंथाच्या निर्मितीपुरते मर्यादित नव्हते. ज्ञान, भक्ती, कर्म, आत्मबोध, समरसता आणि विश्वकल्याण यांचा सुंदर समन्वय त्यांच्या विचारांत दिसतो. संत ज्ञानेश्वरांचे कार्य हिंदू समाजातील आत्मीयता वाढवणारे, समाजाला आपल्या सांस्कृतिक मुळांशी जोडणारे आणि भेदांपलीकडे एकात्मतेची जाणीव निर्माण करणारे आहे.
संघर्षातून घडलेले बालपण
संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म इ.स. १२७५ च्या सुमारास झाला. परंपरेनुसार त्यांचे जन्मस्थान आपेगाव, पैठण परिसर मानले जाते. त्यांचे वडील विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणीबाई. निवृत्तिनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई ही चार भावंडे. विठ्ठलपंतांनी संन्यास स्वीकारल्यानंतर पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला तत्कालीन सामाजिक रूढींमुळे मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले. चारही भावंडांना सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागला. या अनुभवातून धर्माचा खरा आधार केवळ बाह्य कर्मकांड नसून ज्ञान, सदाचार, भक्ती आणि आत्मबोध आहे हा धडा तसेच आणि कठीण परिस्थितीतही ज्ञान, साधना आणि सदाचार सोडू नये, हा त्यांच्या जीवनाचा मोठा संदेश आहे.
निवृत्तिनाथांचे मार्गदर्शन
ज्ञानेश्वर महाराजांच्या आध्यात्मिक जीवनात त्यांचे ज्येष्ठ बंधू संत निवृत्तिनाथ यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे.नाथपरंपरेतील साधना आणि आध्यात्मिक ज्ञानाचा संस्कार निवृत्तिनाथांकडून ज्ञानेश्वरांना मिळाला. त्यामुळे त्यांच्या विचारांमध्ये योग, अद्वैत, आत्मज्ञान आणि भक्ती यांचा सुंदर समन्वय दिसतो. ज्ञानेश्वरांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी तत्त्वज्ञान सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत मांडले.
ज्ञानेश्वरी : जनभाषेत भगवद्गीतेचे ज्ञान

इ.स. १२९० च्या सुमारास नेवासे येथे ज्ञानेश्वरीची निर्मिती झाली, असे संतपरंपरेत मानले जाते. निवृत्तिनाथांच्या प्रेरणेने ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवर मराठीत विस्तृत विवेचन केले.ज्ञानेश्वरीला ‘भावार्थदीपिका’ असेही म्हटले जाते. भगवद्गीतेतील ७०० श्लोकांचा अर्थ त्यांनी ओवीबद्ध स्वरूपात सुमारे ९ हजार ओव्यांत स्पष्ट केला. गीतेतील तत्त्वज्ञानाचा भावार्थ, त्यामागील जीवनदृष्टी आणि आध्यात्मिक अर्थ त्यांनी मराठीत रसाळ आणि सहज भाषेत मांडला. त्यामुळे गीतेचे तत्त्वज्ञान सामान्य मराठी माणसाच्या जीवनाशी जोडले गेले.
ज्ञानेश्वरीचे महत्त्व:-
- ज्ञानाचे लोकभाषेत रूपांतर : संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेतील गहन तत्त्वज्ञान संस्कृतच्या विद्वत् वर्तुळातून बाहेर आणून सामान्य जनतेला समजेल अशा मराठीत मांडले. त्यामुळे अध्यात्मज्ञान समाजाच्या व्यापक स्तरापर्यंत पोहोचले.
- स्वभाषेचा गौरव : ज्ञानेश्वरीने मराठीला केवळ व्यवहाराची भाषा न ठेवता ज्ञान, तत्त्वज्ञान आणि अध्यात्म व्यक्त करण्याची समर्थ भाषा म्हणून प्रतिष्ठा मिळवून दिली. स्वभाषेविषयीचा आत्मविश्वास निर्माण करण्याच्या दृष्टीने हे योगदान महत्त्वाचे आहे.
- भारतीय जीवनदृष्टीचे संवर्धन : ज्ञानेश्वरीच्या केंद्रस्थानी भगवद्गीतेची कर्मयोग, भक्ती, ज्ञान, आत्मसंयम आणि समत्वाची शिकवण आहे. त्यामुळे भारतीय संस्कृतीतील जीवनाकडे पाहण्याची समग्र दृष्टी सामान्य समाजापर्यंत पोहोचली.
- समाजाला जोडणारी संतपरंपरा : संत ज्ञानेश्वरांच्या कार्यातून अध्यात्म हे केवळ व्यक्तिगत साधनेपुरते न राहता समाजाच्या जीवनाशी जोडले गेले. पुढे महाराष्ट्रातील संतपरंपरेने समता, बंधुभाव, भक्ती आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश अधिक व्यापक केला.
- सांस्कृतिक आत्मभान : परकीय आक्रमणे आणि सामाजिक अस्थिरतेच्या काळात भारतीय तत्त्वज्ञान आणि आध्यात्मिक परंपरेचा लोकजीवनाशी संबंध दृढ करण्याचे कार्य ज्ञानेश्वरीने केले. त्यामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या परंपरेत तिचे स्थान महत्त्वाचे आहे.
- कर्मप्रधान जीवनाचा संदेश : भगवद्गीतेतील कर्मयोगाचे विवेचन करताना ज्ञानेश्वरी निष्क्रियतेऐवजी कर्तव्य, प्रयत्न आणि लोककल्याणाची प्रेरणा देते. म्हणूनच ज्ञानेश्वरीचे महत्त्व मराठी साहित्यापुरते मर्यादित नाही; ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे.
ज्ञानेश्वरी -विवेकाची गोष्ट
श्रेष्ठ दर्जाचा काव्यग्रंथ म्हणून साहित्यिकांनी ज्ञानेश्वरीचे विविध अंगानी रसग्रहण केलेले आहे. श्रेष्ठ तत्त्वज्ञान ग्रंथ म्हणून विचारवंतांनी तिचा गुणगौरव केलेला आहे. वारकरी भक्ती परंपरेचा – भागवत धर्माचा पायाभूत ग्रंथ म्हणून आध्यात्मिक, पारमार्थिक महानुभव-मठपतींनी तिला शिरोधार्य मानलेले आहे तर, सर्वसामान्य भाविक, उपासक, श्रद्धावंतांनी ‘माउली’ म्हणत तिला मनमंदिरात स्थापन केलेले आहे. अशा विविध प्रकारे ज्ञानेश्वरीची मोहिनी एकाच वेळी सर्वसामान्य भाविक आणि अभ्यासक, संशोधक, विचारवंत यांना आकर्षित करीत आली आहे. ज्ञानेश्वरी हा भक्ती संप्रदायाचा धर्मग्रंथ असला तरी ही भक्ती डोळस आहे. या भक्तीला ज्ञानाचा डोळा आहे. ज्ञानदेवांच्या पुढील दोन ओव्या ज्ञान, बुद्धी यांचे त्यांच्या विचारात कसे प्राधान्य आहे ते दर्शवितात –
मनाच्या कानी ऐकावे ।
बोल बुद्धिच्या डोळा देखावे ॥ (ज्ञा.6.484)
म्हणोनि कर्माचे डोळे ज्ञान ।
ते निर्दोष होआवे ॥ (ज्ञा.9.350)
ज्ञानेश्वरीच्या तिसर्या अध्यायात ज्ञानदेवांनी अर्जुन-श्रीकृष्णाचा संवाद रंगवला आहे. त्यामध्ये श्रीकृष्णाला अर्जुन म्हणतो, ‘माझ्या या मोहग्रस्त संभ्रमी अवस्थेत तुम्ही मला ‘विवेक’ सांगावा.’
मी आधीचि काही नेणे । बरी कवळिलो मोहे येणे ।
कृष्णा विवेकु या कारणे । पुसिला तुज ॥ (3.10)
म्हणोनि आइके देवा । हा भावार्थु आता न बोलावा ।
मज ‘विवेकु’ सांगावा । मर्हाटी जी ॥ (3.17)
श्रीकृष्णाला गुरू, माउली म्हणून संभ्रमी अर्जुनाने शरणभावाने विवेक सांगा म्हणून प्रार्थना केली आणि म्हणून पुढे श्रीकृष्णाने जो उपदेश केला तो सर्व ‘विवेक विचार’ आहे. विवेकाची गोष्ट आहे.अशा प्रकारे ज्ञानेश्वरी डोळस भक्ती विचार आहे. ही भक्ती ज्ञानोत्तर भक्ती आहे. भारतीय ज्ञान परंपरेतील ‘ज्ञानेश्वरी’ हा एक प्राकृत भाषेतील अमृतठेवा आहे.
‘ज्ञानेश्वरी’कालीन सामाजिक आणि धार्मिक स्थिती
एखाद्या व्यक्तीच्या किंवा ग्रंथाच्या कार्याचे योग्य मूल्यमापन करण्यासाठी त्या काळातील सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक परिस्थिती समजून घेणे आवश्यक असते. संत ज्ञानेश्वरांच्या काळात महाराष्ट्रात यादवांचे राज्य होते. त्या काळात समाजजीवनावर धर्माचा मोठा प्रभाव होता. धार्मिक रूढी, कर्मकांड, व्रतवैकल्ये, सोवळे-ओवळे आणि विविध सामाजिक भेद यांमुळे सामान्य माणसाचे जीवन अनेक बंधनांनी वेढलेले होते. धर्मग्रंथ आणि शास्त्रग्रंथ मुख्यतः संस्कृतमध्ये असल्यामुळे त्यातील तत्त्वज्ञान सामान्य जनतेपर्यंत सहज पोहोचत नव्हते. त्याचबरोबर विविध लोकश्रद्धा आणि रूढींचाही समाजजीवनावर प्रभाव होता. अशा परिस्थितीत संत ज्ञानेश्वरांनी भारतीय ज्ञानपरंपरेतील गहन विचार सामान्य माणसाला समजतील अशा मराठी भाषेत मांडण्याचे धाडसी कार्य केले. त्यांनी ब्रह्मसूत्रे किंवा उपनिषदांऐवजी भगवद्गीतेची निवड केली आणि तिच्यातील जीवनोपयोगी तत्त्वज्ञान ओवीबद्ध, सोप्या आणि रसाळ मराठीत उलगडले. त्यामुळे गीतेचा संदेश विद्वानांच्या मर्यादित वर्तुळातून बाहेर पडून सामान्य जनतेपर्यंत पोहोचला. ‘भावार्थदीपिका’ किंवा ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानाचे लोकभाषेतील प्रभावी रूप होय. म्हणूनच ज्ञानेश्वरीला महाराष्ट्राच्या ज्ञान, भक्ती आणि सांस्कृतिक परंपरेतील मैलाचा दगड मानले जाते.
संतवाणीतील ज्ञानेश्वरीचे महात्म्य..

संत ज्ञानेश्वरांचे समकालीन आणि निकटचे संतसहकारी संत नामदेव महाराज यांनी या शब्दांत ज्ञानेश्वरीचे आध्यात्मिक महत्त्व अत्यंत सुंदरपणे व्यक्त केले आहे. आजच्या साहित्यिक दृष्टिकोनातून पाहिले, तर नामदेवांची ही ओवी म्हणजे ज्ञानेश्वरीवरील तिच्या काळातील एक हृदयस्पर्शी आणि आस्वादक समीक्षा म्हणता येईल. संत जनाबाई आणि संत चोखामेळा यांच्यासह पुढील काळातील संत एकनाथ आणि संत तुकाराम यांनीही आपल्या अभंगांतून ज्ञानेश्वरीचे महत्त्व अधोरेखित केले. या संतपरंपरेतील गौरवोद्गारांतून ज्ञानेश्वरीचे मराठी साहित्य, अध्यात्म आणि समाजजीवनातील वैशिष्ट्यपूर्ण स्थान स्पष्ट होते.
आधुनिक काळातही ज्ञानेश्वरीच्या विचारांचा प्रवास थांबला नाही. आंग्ल राजवटीच्या काळात विद्वान, पत्रकार आणि संपादक बाळशास्त्री जांभेकर यांनी पुढाकार घेऊन इ.स. १८४५ मध्ये ज्ञानेश्वरीची मुद्रित आवृत्ती प्रकाशित केली. त्यामुळे नवशिक्षित, विचारवंत आणि समाजसुधारक वर्गाला या महान ग्रंथाचा नव्या दृष्टीने परिचय झाला. अध्यात्मिक विचारांची समृद्ध परंपरा, रसाळ काव्य आणि सखोल तत्त्वज्ञान यांचा सुंदर संगम असलेली ज्ञानेश्वरी नव्या पिढीच्या विचारविश्वात चर्चेचा विषय बनली.
सातशेहून अधिक वर्षांचा प्रदीर्घ काळ उलटून गेला, तरी ज्ञानेश्वरीचे आकर्षण आणि महत्त्व कमी झालेले नाही. संतपरंपरेपासून आधुनिक साहित्यिक, अभ्यासक आणि विचारवंतांपर्यंत ज्ञानेश्वरीचा प्रभाव आजही कायम आहे. काळ बदलला, समाजजीवन बदलले आणि वाचनाच्या पद्धती बदलल्या; मात्र ज्ञानेश्वरीतील ज्ञान, भक्ती, तत्त्वचिंतन आणि जीवनदृष्टी यांचे चिरंतन मूल्य आजही तितकेच जाणवते.
मराठी भाषेला मिळालेले सामर्थ्य
मराठीला उच्च तत्त्वज्ञान, अध्यात्म आणि साहित्य व्यक्त करणारे समर्थ माध्यम बनविण्यात ज्ञानेश्वरांचे योगदान अत्यंत मोठे आहे.त्यांच्या लेखनामुळे मराठी भाषेची अभिव्यक्तीशक्ती व्यापक झाली.
त्यांच्या प्रसिद्ध ओवीत मराठीविषयीचा आत्मविश्वास दिसतो..
“माझा मराठाचि बोलू कौतुके ।
परि अमृतातेही पैजा जिंके ।”
ही केवळ भाषेची स्तुती नाही. आपल्या मातृभाषेतून श्रेष्ठ विचार व्यक्त करण्याचा आत्मविश्वास या भावनेतून दिसतो. आजच्या काळातही हा संदेश महत्त्वाचा आहे, आपल्या मातृभाषेचा अभिमान ठेवत ज्ञानाच्या सर्व क्षेत्रांत तिचा वापर वाढवणे.
ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचा समन्वय
ज्ञानेश्वरांच्या विचारांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी ज्ञान आणि भक्ती यांना परस्परविरोधी मानले नाही.त्यांच्या विचारांत.. ज्ञान हे आत्मबोध देते, भक्ती ही मनाला शुद्ध करते आणि कर्म हे जीवनाला दिशा देते. भगवद्गीतेच्या आधारे त्यांनी माणसाला आपल्या कर्तव्यापासून पळून न जाता कर्तव्यभावनेने जीवन जगण्याचा संदेश दिला.समाजजीवनात परिवर्तन घडवण्यासाठी केवळ विचार पुरेसा नसतो तर विचार, आचरण आणि समाजासाठी कार्य यांचा समन्वय आवश्यक असतो.
सामाजिक समरसतेचा संदेश
ज्ञानेश्वरांच्या विचारांतील सर्वांत महत्त्वाचा सामाजिक संदेश म्हणजे सर्व जीवांमध्ये एकच चैतन्य आहे, ही अनुभूती.ज्ञानेश्वरीत भगवद्गीतेच्या नवव्या अध्यायाचे विवेचन करताना ते जन्म, कुल, जात आणि सामाजिक स्थान यांपेक्षा भगवंताशी असलेले नाते आणि भक्ती महत्त्वाची मानतात. त्यांच्या ओव्यांतून हा विचार स्पष्ट होतो..
“म्हणोनि कुळजातिवर्ण ।
हे आघवेचि गा अकारण ।
एथ अर्जुना माझेपण ।
सार्थक एक ॥”
ज्ञानेश्वरांचे कार्य आजच्या भाषेत सामाजिक समरसतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरते. ज्ञानेश्वरांच्या काळातील संतपरंपरेत विविध सामाजिक स्तरांतील संतांचा सहभाग होता. नामदेव, गोरा कुंभार, सावता माळी, चोखामेळा, नरहरी सोनार, जनाबाई आदी संतांच्या परंपरेतून भक्तीच्या माध्यमातून सामाजिक अंतर कमी करण्याची प्रक्रिया पुढे आली.
‘पसायदान’ : विश्वकल्याणाची प्रार्थना..

ज्ञानेश्वरीच्या अखेरीस असलेले पसायदान हा ज्ञानेश्वरांच्या विचारांचा अत्यंत सुंदर सारांश आहे.
“आतां विश्वात्मके देवे ।
येणे वाग्यज्ञे तोषावे ।
तोषोनि मज द्यावे ।
पसायदान हे ॥”
आणि..
“जे खळांची व्यंकटी सांडो ।
तया सत्कर्मी रती वाढो ।
भूतां परस्परे जडो ।
मैत्र जीवांचे ॥”
तसेच..
“दुरितांचे तिमिर जावो ।
विश्व स्वधर्म सूर्ये पाहो ।
जो जे वांछिल तो ते लाहो ।
प्राणिजात ॥”
या ओव्यांत दुष्ट प्रवृत्ती दूर व्हाव्यात, सत्कर्माची आवड वाढावी, सर्व जीवांमध्ये मैत्री निर्माण व्हावी आणि संपूर्ण विश्वाचे कल्याण व्हावे, अशी प्रार्थना आहे.पसायदानाचा अर्थ केवळ एका समाजापुरता किंवा एका समूहापुरता मर्यादित करणे योग्य नाही. त्याची दृष्टी विश्वकल्याणाची आणि सर्वांच्या उन्नतीची आहे. बंधुभाव, सदाचार, आत्मीयता, स्वधर्म, समाजकल्याण आणि विश्वकल्याण हे मूल्य अत्यंत महत्त्वाचे आहेत.
‘स्वधर्म’ म्हणजे काय?
“विश्व स्वधर्म सूर्ये पाहो”
ज्ञानेश्वरांच्या संदर्भात स्वधर्म म्हणजे आपले कर्तव्य, आपली आध्यात्मिक जीवनदृष्टी आणि धर्मानुसार आचरण असा व्यापक अर्थ लक्षात घ्यावा.समाजाने आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवावी, सदाचाराने जीवन जगावे आणि धर्माधिष्ठित मूल्यांचा प्रकाश सर्वत्र पसरावा.
तैसा वाग्विलास विस्तारू । गीतार्थें विश्व भरूं।
आनंदाचे आवारूं । मांडू जगा ॥ (ज्ञा.13/1160)
गीतार्थाने ‘विश्व’ भरून टाकण्याचा व सारे ‘जग’ अद्वैय आनंदाचे अंगण करण्याचा ठाम मनोदय ज्ञानदेव या ओवीतून व्यक्त करतात. या ओवीतील ‘विश्व’, ‘जग’ हे शब्द ज्ञानदेवांचे लक्ष्य कसे प्रारंभापासूनच विश्वात्मक आहे ते दर्शवतात. त्यामुळे ज्ञानेश्वरी हा विठ्ठलभक्त-वारकरी संप्रदायाचा धर्मग्रंथ म्हणून लोकप्रिय असला तरी तो संप्रदायापुरता, मराठीपुरता, देशापुरता मर्यादित, संकुचित नाही. ज्ञानेदवांच्या विश्वकल्याणार्थ समर्पित विश्वमनाचे ‘ज्ञानेश्वरी’ हे विश्वात्मक दर्शन आहे. ‘विश्व हेचि माझे घर।’ म्हणत ज्ञानेश्वरीच्या शेवटी ‘आता विश्वात्मके देवे।’ असे विश्वात्मक देवाकडे ते पसायदान मागतात. विश्वबंधुत्वाच्या विशाल, व्यापक दृष्टिचा जो पाया ज्ञानदेवांनी घातला त्यावरच पुढे संत नामदेव, एकनाथ, तुकाराम महाराज, बहिणाबाई आदी संतपरंपरेने भक्तीप्रेमाचा कळस चढवलेला आहे.
वारकरी परंपरेला मिळालेले अधिष्ठान
ज्ञानेश्वर महाराजांचा वारकरी परंपरेवर अत्यंत मोठा प्रभाव आहे. ज्ञानेश्वरांमुळे या भक्तिपरंपरेला महत्त्वाचे वैचारिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान मिळाले.पंढरपूरचा विठ्ठल, नामस्मरण, संतसाहित्य, कीर्तन, दिंडी आणि वारी यांमधून महाराष्ट्राच्या लोकजीवनात भक्तीची परंपरा दृढ झाली.ज्ञानेश्वरांनंतर नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि इतर संतांनी या परंपरेला अधिक व्यापक स्वरूप दिले.
वारी : समाजाला जोडणारी परंपरा
वारी ही भक्ती, शिस्त, सामूहिकता, सेवा आणि समरसतेचा अनुभव देणारी लोकपरंपरा आहे. वारीमध्ये विविध गावांतील, विविध सामाजिक स्तरांतील आणि विविध व्यवसायांतील लोक एकत्र येतात.दिंडीतील सामूहिक जीवनातून, शिस्त , परस्पर सहकार्य , सेवा , साधेपणा , नामस्मरण , सामाजिक आत्मीयता यांचा अनुभव येतो.या परंपरा समाजाला जोडणाऱ्या आणि सामाजिक ऐक्य दृढ करणाऱ्या सांस्कृतिक शक्ती म्हणून महत्त्वाच्या ठरतात.
संत ज्ञानेश्वर महाराजांचे कार्य हे केवळ वारकरी परंपरेपुरते मर्यादित नसून हिंदू समाजातील एकात्मता, समरसता, स्वभाषेचा अभिमान आणि विश्वकल्याणाची भावना जागवणारे आहे. त्यामुळे संघाच्या दृष्टीने त्यांच्या कार्याकडे हिंदू राष्ट्रकल्पनेला प्रेरणा देणाऱ्या संतपरंपरेतील महत्त्वपूर्ण योगदान म्हणून पाहता येते.
संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेतील गहन तत्त्वज्ञान ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सोप्या मराठीत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले. ज्ञान, भक्ती आणि कर्म यांची सांगड घालत त्यांनी समाजातील भेदांपलीकडे जाऊन एकात्मतेचा संदेश दिला. संत नामदेव, गोरा कुंभार, चोखामेळा आदी संतांच्या सहवासातून भक्तीच्या माध्यमातून समाजाला जोडण्याची परंपरा अधिक बळकट झाली. प्रत्येक जीवामध्ये एकच चैतन्य पाहण्याची त्यांची दृष्टी सामाजिक समरसतेचा आधार ठरते.
ज्ञानेश्वरीच्या पसायदानातील “भूतां परस्परे पडो मैत्र जीवांचे” ही भावना परस्पर स्नेह आणि बंधुभावाचा संदेश देते, तर “दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्ये पाहो” ही प्रार्थना अज्ञान व दुष्ट प्रवृत्ती दूर होऊन सद्भावनेचा प्रकाश सर्वत्र पसरावा, अशी व्यापक मंगलकामना व्यक्त करते.
ज्ञानेश्वर आणि हिंदू समाजाची एकात्मता
त्यांच्या कार्यातून आध्यात्मिक एकात्मता, समाजातील भेद कमी करणे, स्वधर्माची जाणीव, मातृभाषेतून ज्ञानाचा प्रसार, सदाचार, भक्ती आणि विश्वकल्याण याचा बोध होतो .
संत ज्ञानेश्वरांचे योगदान
संपूर्ण हिंदू समाजाची एकात्मता, सामाजिक समरसता, सांस्कृतिक आत्मभान आणि राष्ट्रजीवनातील कर्तव्यभावना या दृष्टिकोनातून संत ज्ञानेश्वरांचे योगदान अनन्यसाधारण असे आहे . भगवद्गीतेचे ज्ञान मराठीत आणून त्यांनी आपल्या सांस्कृतिक परंपरेबद्दल आत्मविश्वास निर्माण केला.अध्यात्म आणि तत्त्वज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहोचवले. जन्माधारित श्रेष्ठ-कनिष्ठतेपेक्षा भक्ती, ज्ञान आणि सदाचाराला महत्त्व दिले.सामाजिक समरसता साधण्यासाठी कार्य , भगवद्गीतेच्या माध्यमातून कर्मयोग आणि स्वधर्माचे महत्त्व स्पष्ट केले.आध्यात्मिक जीवन सर्वसामान्यांसाठी सहज केले.पसायदानातून केवळ स्वतःच्या कल्याणाऐवजी संपूर्ण प्राणिमात्राच्या कल्याणाची प्रार्थना केली.
आजच्या युवकांसाठी ज्ञानेश्वर महाराजांचा संदेश.
ज्ञानेश्वरांचे आयुष्य अत्यंत अल्प होते; परंतु त्या अल्प आयुष्यात त्यांनी केलेले कार्य विलक्षण व्यापक होते.आजच्या युवकांनी त्यांच्या जीवनातून, ज्ञानाची साधना,स्वतःच्या संस्कृतीचा अभिमान,मातृभाषेचा सन्मान,कठीण परिस्थितीत धैर्य,समाजातील सर्व घटकांशी आत्मीयता,कर्तव्यभावना आणि विश्वकल्याणाची दृष्टी ही मूल्ये आत्मसात करावीत.
आज माहितीचा प्रचंड स्फोट झाला आहे, मात्र माहिती आणि ज्ञान यात फरक आहे. ज्ञानेश्वरांचा संदेश आजही सांगतो की, ज्ञानाचा उपयोग आत्मविकासासाठी आणि समाजाच्या कल्याणासाठी झाला पाहिजे.
आजच्या काळातील प्रासंगिकता
आज समाजासमोर जातीय तणाव, सामाजिक दुरावा, सांस्कृतिक विस्मरण, भाषेपासून दुरावणे आणि मानसिक अस्थिरता यांसारखी अनेक आव्हाने आहेत.
अशा वेळी ज्ञानेश्वरांचे विचार मार्गदर्शक ठरतात. “भूतां परस्परे जडो । मैत्र जीवांचे” हा संदेश सामाजिक ऐक्यासाठी महत्त्वाचा आहे. “माझा मराठाचि बोलू कौतुके” हा मातृभाषेच्या अभिमानाचा संदेश आहे. “दुरितांचे तिमिर जावो” ही प्रत्येकाच्या जीवनातील अज्ञान, दुःख आणि दुष्ट प्रवृत्ती दूर होण्याची प्रार्थना आहे.
ज्ञानेश्वर महाराजांचा संदेश एका वाक्यात सांगायचा झाल्यास.. “ज्ञानातून आत्मबोध, भक्तीतून आत्मीयता, कर्मातून समाजसेवा आणि समतेतून समाजाची एकात्मता.”
संदर्भ :-
https://anantasatsang.org/teachers/dnyaneshwar
https://greenmesg.org/saints/life/sant_jnaneshwar.php
https://www.sanatan.org/en/a/174859.html
https://warkarirojnishi.in/2017/09/sartha-ingraji-pasaydan-english-warkari-bhajni-malkika/
https://www.indiatoday.in/education-today/gk-current-affairs/story/alauddin-khilji-south-india-devagiri-deccan-invasion-yadava-capital-2620505-2024-10-21
http://web.archive.org/web/20220415172810/http:/spiritualsciencemuseum.org/Home/Master/485/Sant-Dnyaneshwar
https://99notes.in/upsc-notes/general-studies-1/history/medieval-india/evaluation-of-rajput-states/dnyaneshwar-1275-1296-ce/
https://satyori.com/historical-figures/jnaneshwar/
https://santmahant.in/sant-dnyaneshwar-maharaj-information-in-marathi/
