कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा..
आज कृष्ण जन्माष्टमी. एका परिपूर्ण योगेश्वराची आठवण जागवण्याचा दिवस. त्याच्या जन्मापासून पूर्ण आयुष्य मानवजातीसाठी युगानुयुगे आदर्श निर्माण करणारं होतं. तेव्हा या योगेश्वराने जे केले आणि सांगितले ते आजही जसेच्या तसे लागू होतेय….. प्रश्न फक्त एकच…. तुम्ही आम्ही तो आदर्श आज जागवतोय का आणि जगतोय का?
श्रीकृष्णाची अनेक रुपं….
मातेसाठी कान्हा…. खट्याळ, खोडकर आणि तेव्हढाच प्रेमळ मुलगा.
“पित्यासाठी एक आदर्श मुलगा”
सवंगाड्यांसाठी उत्तम मित्र, गावातल्या मुखीयाचा मुलगा असून सर्वांशी सहजाणे मिळून मिसळून रहाणे, जंगलात गुरे चरायला जाणे, त्यांच्या बरोबर गोपाळकाला करून जेवणे, त्यांना बलशाली करण्यासाठी दूध, दही, लोणी आणि तूप खायला घालणे. सध्या व्यवस्थापनात ज्याला “टीम बाँडिंग” म्हणतात त्याचे जणू प्रत्यंतरच!! सुदामा आणि कृष्णाच्या मैत्रीत सामाजिक दर्जा आड येत नाही!! अर्जुनाशीसुद्धा कृष्णाची मैत्री होती. म्हणून संकटात तो अर्जुनाला एकटा सोडत नाही!!
गोपिकांबरोबर रासक्रीडा करणे, राधे बरोबर एक अद्भुत आणि दैवी प्रेमाचे नाते….. ते सुद्धा असे की आपण आजही सहजपणे राधेकृष्ण असेच म्हणतो!! इथे एक समजून घेणे महत्त्वाचे की श्रीकृष्ण जेव्हा कंस वधासाठी गोकुळातून बाहेर पडले तेव्हा त्यांचे वय जेमतेम १०/११ वर्षांचे असावे. राधा ही विवाहित गोपिका होती. त्यामुळे आज जे काही राधा कृष्णाचे रोमँटिक चित्र रंगवले जाते ते किती विपरीत आहे हे लक्षात घ्यायला हवे!!
उत्तम संगीताचे ज्ञान…. बासरीतून दैवी सूर काढत मनुष्य प्राण्यांनाच नव्हे तर पशु पक्षी आणि वन्यसृष्टी यांनाही वेड लावणारा अवलिया…
कंसासारख्या समाजातील दुष्ट शक्तींचे निर्दालन करणारा संकटमोचन…..
कृष्ण-बलराम ही तर बंधुप्रेमाचा आदर्श असणारी जोडी….
प्रजाहितदक्ष असा एक आदर्श राजा ज्याने द्वारकेसारखी अभेद्य नगरी वसवली….
द्रौपदी चा आदर्श सखा आणि बंधू, नेहमी हाकेसरशी मदतीला धावून जाणारा….
पांडवांचा बंधू आणि सखा…. त्यांचा मार्गदर्शक. त्यांची न्याय्य बाजू समर्थपणे मांडणारा. वेळप्रसंगी त्यांच्या चुका दाखवून देणारा… त्यांच्या सुखदुःखात त्यांना साथ देणारा…..
नेतृत्वाचा आदर्श…. गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचलून गोकुळाचे रक्षण केले. पण त्याचवेळी भोवतालचे सर्व गोपाळही आपल्या काठ्या पर्वताला लावून उभे असल्याचे आपण पाहतो. खरं म्हणजे देवस्वरूप कृष्णाला या काठ्यांची आवश्यकता नव्हती. पण खरा नेता सगळे मीच केले असे सांगत नाही, तो सर्वांना सहभागी करून घेतो. त्यांनी सामान्य गोपाळांच्या मनात गोवर्धन उचलताना माझीही काठी होती हा आत्मविश्वास निर्माण केला. नेतृत्व करणाऱ्याचे हेच तर खरे काम आहे ना??
राजकारण कसे असावे आणि करावे याचा वस्तुपाठ म्हणजे श्रीकृष्ण आणि फक्त श्रीकृष्णच…. आजच्या राजकारण्यांनीही अनुकरण करावे असा…. राजकारणात शठे शाठम्य भूमिका असणारा…. ठकासी महाठक असणारा….. असा हा कृष्ण . राजकारणातही संयम बाळगून शिशुपालाला १०० अपराध भरेपर्यंत सुधारण्याची संधी देणारा आणि नंतर आपले सुदर्शन चक्र चालवणारा….. आजच्या काळात राजकारणात शिशुपालच बरेच दिसतात त्यामुळे कृष्णनितीची आवश्यकता अधिक भासते आहे!!
कंस वधानंतर स्वतः राजा न होता उग्रसेन, कंसाचे वडील, यांनाच पुन्हा सिंहासनावर बसविले. जरासंधाच्या वारंवार आक्रमणांमुळे यादवांचे नुकसान होणार हे लक्षात घेऊन मथुरा सोडून द्वारकेला जाण्याचा निर्णय घेतला. म्हणून त्याच्या शत्रूंनी त्याला “रणछोड” म्हटले. कधी कधी अहंकारापायी लढाई न लढता मागे हटून आपली शक्ती वाचवणे हे सुद्धा महत्त्वाचे असते. हा पराभव नसून पुढील विजयाची तयारी असते हाच धडा त्यांनी दिला. रणनीतीच्या भाषेत याला Strategic Retreat असे म्हटले जाते!!
कृष्णाला युद्ध नको होते. म्हणून त्याने शेवटपर्यंत प्रयत्न केले. अगदी शेवटचा उपाय म्हणून स्वतः दूत बनून दुर्योधनाकडे गेला. अर्धे राज्य नको फक्त पाच गावे द्या हा प्रस्तावही दिला. त्यातून मार्ग निघणार नाही हे माहिती असूनही त्याने हे केले. युद्ध टाळण्यासाठी संवादाची प्रत्येक शक्यता त्याने वापरली. जेव्हा संवाद संपला तेव्हाच संघर्षाचा पर्याय असतो याचे उदाहरण घालून दिले!!
स्वतः जगातील सर्वात शक्तिशाली असणारा हा योगी…. सुदर्शन चक्र हाती असूनही त्याचा कधिही गैरवापर न करता जगाच्या कल्याणासाठी आणि दुष्टांच्या निर्दालनासाठीच त्याचा वापर करणारा असा हा संयमी अवतार…. महाभारतातले युद्ध केवळ एकट्याने लढण्याची क्षमता असलेला परंतु तरीही ‘न धरी शस्त्र करी मी’ असे म्हणत अर्जुनाचे सारथ्य स्वीकारणारा….
आणि असा हा भगवंताचा पूर्ण अवतार….. त्याचे लोकोत्तर आणि सर्वात मोठे कार्य म्हणजे भगवद्गीता….. रणांगणावर गलितगात्र झालेल्या अर्जुनाला गीता सांगितली आहे. त्याला परिस्थितीकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली. कर्तव्य समजावले. परिणामाच्या भयापेक्षा योग्य कर्मावर लक्ष देण्याचा कर्मयोग सांगितला. ” कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन” हा संदेश दिला. दुर्दैवाने याच गीतेच्या नावाने अहिंसा जपायला आम्हाला शिकवले गेले!! अर्जुनाला उपदेश म्हणून सांगितलेली गीता आजही मानवजातीला आदर्शवत आहे…. मानवाच्या जगण्याचा आदर्श मार्ग… त्यात काय नाही??…. स्वतः कसे जगावे, समाजाप्रती कर्तव्य काय, व्यवस्थापन कसे करावे, सुष्टांशी आणि दुष्टांशी कसे वागावे, योग साधना म्हणजे काय, समाज-देश याप्रती आपले कर्तव्य काय, समाजाचं आणि देशाचं रक्षण कसं करावं, आपला आणि देशाचा मित्र आणि शत्रू कसा ओळखावा, शत्रूशी कसे वर्तन करावं, राजकारण म्हणजे काय, कौटुंबिक जबाबदारी म्हणजे काय….. थोडक्यात वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनाचा आदर्श वस्तुपाठ दाखविणारा दस्तऐवज म्हणजे भगवद्गीता…. (आणि ही भगवद्गीता सांगितली कुठे तर रणांगणावर…. अर्जुनाला युद्धाला प्रवृत्त करण्यासाठी!!) आजही त्याचं महत्व तेवढेच आहे…..
आणि एवढे सर्व असूनही सामान्य माणसासारखे जीवन संपवून आपला अवतार समाप्त करणारा हा अवलिया….
खरं तर हा विष्णूचा अवतार, दैवी शक्तींनी युक्त असलेला…. तरीहि स्वतः सामान्य माणसासारखे आयुष्य जगला. कितीतरी संकट सोसून त्यातून मार्ग काढून पुढे जाणार असा आदर्श जागविणारा, तेही सहज शक्य असून एकट्याने नाही तर सर्वांना बरोबर घेऊन…. प्रसंगी स्वतःकडे रणछोड असे दूषण घेऊन ते मिरवणारा…. एकीचे आणि युक्तीचे बळ आणि त्याला शक्तीची जोड द्यायची असते ही शिकवण सहजपणे देणारा असा हा अवतार….
एवढे अफाट शौर्य आणि कर्तृत्व असणारा हा अवलिया आजही प्रेमाची मूर्ती म्हणूनच ओळखला जातो यातच त्याच्या आयुष्याचे रहस्य दडलेले आहे.असा हा आमचा आदर्श….आज आपण तो नीट समजून घेऊन त्याप्रमाणे आचरण करतो का?? हा प्रश्न स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे. श्रीकृष्णाचे जीवनातील आदर्श आजच्या परिप्रेक्ष्यात पडताळून वैयक्तिक, सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनातही त्याप्रमाणे जगण्याची आणि वागण्याची आवश्यकता आहे. सध्या आपल्या देशातील वातावरण फारच गढूळ आहे. स्वतःच्या राजकीय इर्षे पायी समाजात फूट पाडणे, देशाचे वातावरण बुद्धिभेदाने भरण्याचे, या देशाचा सांस्कृतिक आणि धार्मिक गाभा डळमळीत करण्याचे उद्योग जोरात सुरू आहेत……
आपण या कारवायांकडे कशा प्रकारे पाहतो आणि त्याप्रति कसा व्यवहार करतो यावर आपल्या देशाचे भवितव्य अवलंबून आहे……म्हणूनच…. देशाची चिंता न करता इथले वातावरण बिघडवणारे राजकीय पक्ष आणि राजकारणी, लाल कारवाया करून या देशाचे अस्तित्व पणाला लावायला निघालेले उघड आणि छुपे लालभाई आणि उघड वा छुपे आक्रमक परकीय यांना वेळीच ओळखून त्यांच्याप्रती प्रसंगी कठोर, प्रसंगी त्यांना त्यांच्याच राजकारणाने आणि कुटिलतेने उत्तर देण्याची गरज आहे. नको त्या ठिकाणी आणि नको ती मानवता दाखवण्याची सवय सोडावी लागेल….. यांच्यातील ‘पूतना मावशी’ ओळखावी लागेल!! सुरवातीला, मध्ये आणि शेवटपर्यंत मातृभूमी, मातृभूमी आणि मातृभूमीचेच हित एवढीच एकमात्र भूमिका आणि तसा व्यवहार, बस्स. याचीच आवश्यकता आहे….. आणि त्या योगेश्वराने याचाच आदर्श आपल्यासमोर ठेवला आहे……
सध्या आपण राजकीय आणि आर्थिक संकटाचाही सामना करत आहोत, विदेशी शक्ती या घरभेद्यांशी हातमिळवणी करून कारवाया करत आहेत… संकटातून मार्ग काढत शून्यातून ऐश्वर्याचे प्रतीक असलेली द्वारका उभी करण्याचा आदर्श योगेश्वरने आपल्या पुढे ठेवला आहे. आपल्याकडे अनेक अभ्यासू आणि कर्तृत्ववान मंडळी आहेत. त्यांना सोबत घेऊन, सद्यस्थितीचा अभ्यास करून यातून योग्य तो मार्ग नक्कीच काढता येईल. योगेश्वरासारखे कर्तृत्व आणि पुरुषार्थ याच्या प्रकाशात यातूनही मार्ग नक्कीच निघू शकेल!!
म्हणूनच त्या योगेश्वराच्या जीवनाचा आदर्श सच्चेपणाने जागविण्याची वेळ आली आहे. दुर्दैवाने आज भगवद्गीता हे वार्धक्यात वाचायचे पुस्तक असा आपला समज आहे. श्रीकृष्ण हा फक्त दहीहंडी, रासक्रीडा, माखन चोर, गोविंदा याच स्वरूपात आपण पाहतो. त्याचे राजकारण, शत्रूला कठोरपणे शासन देणारा, समाज आणि देश यांना प्राथमिकता देणारा, सतत सत्याची आणि न्यायाची बाजू घेणारा, समाजहित जपणारा राजा, उद्योजक, शासक या भूमिकांचा आठव आणि जागरण करण्याची अवश्यकता आहे.
देशाच्या आजच्या कठीण प्रसंगी आपण योगेश्वर श्रीकृष्णाचे खऱ्या अर्थाने जागरण करतो का याचा विचार आणि त्याप्रमाणे कृती करण्याची वेळ आली आहे. अन्यथा येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. जगही हसून विचारेल….. अरे एवढा आदर्श या योगेश्वराने घालून देऊनही तो न उमजणारे कपाळ करंटे कसे निपजलात?
जय योगेश्वर..
कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा .. !!
लेखक :- अरविंद श्रीधर जोशी
