NewsScience and TechnologyWorld

आकाशाशी जडले नाते..

अंतराळात ६०८ दिवस घालवणं म्हणजे काय असतं? याची नुसती कल्पना करणे देखील आपल्याला अवघड आहे. जिथे गुरुत्वाकर्षण नाही, घराची ओढ, पण कामाप्रती निष्ठा. अशा ठिकाणी आयुष्याची तब्बल पावणेदोन वर्ष घालवणाऱ्या भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांनी अखेर नासामधून निवृत्तीची घोषणा केली. २७ वर्षांच्या या झंझावाती कारकिर्दीनंतर त्या निवृत्त झाल्या आहेत. सुनीता विल्यम यांनी आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीमध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर तीन मोहिमा यशस्वीपणे पूर्ण करत अनेक विक्रम आपल्या नावावर नोंदवले आहेत.

सुनीता विल्यम्स यांचा निवृत्तीचा निर्णय जितका मोठा आहे, तितकाच त्यांचा शेवटचा प्रवासही थरारक ठरला. खरं तर त्या जून २०२४ मध्ये अवघ्या ८ दिवसांच्या मोहिमेवर गेल्या होत्या. पण विमानाचे इंजिन आणि नशिबाचे चक्र असे काही फिरले की, त्यांना अंतराळात तब्बल २८६ दिवस अडकून राहावं लागलं. ज्या वयात लोक आरामाचा विचार करतात, त्या ६० व्या वर्षी सुनीता यांनी अवकाशात जगण्यासाठी वेगळ्या पातळीवर झुंज देत स्वतःला आणि आपल्या टीमला सुखरूप परत आणलं.

सुनीता यांच्या आयुष्यात परिश्रम, सातत्य आणि कौशल्य ही त्रिसूत्री आपल्याला आढळून येते. अमेरिकेच्या नौदलात वैमानिक म्हणून त्यांच्या कारकीर्दीला सुरवात झाली. त्यानंतर ‘नासा’च्या अंतराळवीर पथकात त्यांनी प्रवेश मिळवला. विविध मोहिमेदरम्यान त्यांना एकूण ६०८ दिवस अंतराळात रहावे लागले होते. त्यामुळे एका महिलेचा सर्वाधिक काळ अंतराळात वास्तव्याचा विक्रम त्यांच्याच नावावर नोंदवण्यात आला. त्यांनी एकूण ९ वेळा अंतराळात ‘स्पेसवॉक’ (अंतराळयानाच्या बाहेर अंतराळविराने केलेल्या शारीरिक हालचाली) केला. तो कालावधी ६२ तास ६ मिनिटे इतका आहे. शून्य-गुरुत्वाकर्षणात वनस्पती लागवडीशी संबंधित वैज्ञानिक प्रयोग करणे, यंत्रणा दुरुस्त करणे आणि पृथ्वीवरील वैज्ञानिकांसमवेत समन्वय साधणे ही कामे त्यांनी अत्यंत कौशल्याने पार पाडली. त्यांच्या या अजोड कामगिरीविषयी नासाचे नवे प्रशासक जेरेड इसाकमन यांनी त्यांना ‘अंतराळ उड्डाण क्षेत्रातील प्रणेत्या’ अशा शब्दांत त्यांचा गौरव केला आहे.

२०२४ मध्ये सुनीता यांना बोईंगच्या कॅप्सूल चाचणीच्या उड्डाणाच्या वेळी अंतराळ स्थानकात पाठवण्यात आले होते. बोईंगच्या नवीन स्टारलाइनर कॅप्सूलवर उड्डाण करणार्‍या त्या पहिल्या अंतराळवीर होत्या. ते कार्य केवळ एका आठवड्याचे होते; परंतु स्टारलाइनरमधील समस्यांमुळे त्यांना अंतराळात ९ महिन्यांपेक्षा अधिक काळ थांबावे लागले; मात्र खचून न जाता त्यांनी ती परिस्थिती स्वीकारली. यानात अनेकदा तांत्रिक बिघाड होत होते. त्यांच्याकडे केवळ २७ दिवसांचे इंधन पुरेल, अशी स्थिती होती. ‘आपण पुन्हा सुखरूप कधी पोचू ?’ याची शाश्वती देखील नव्हती.

दिवसागणिक अनिश्चितता वाढतच होती. अशा स्थितीत ना त्या घाबरल्या, ना निराश झाल्या. आशावादी रहाणार्‍या सुनीता यांची स्थिरता आणि संयमी वृत्ती प्रत्येकालाच शिकण्यासारखी आहे. पृथ्वीवर पाऊल ठेवल्यावरही त्यांच्या चेहर्‍यावर हास्य होते ! जरासा काही प्रतिकूल प्रसंग घडला, मनाविरुद्ध झाले की, तोंड पाडून बसणारी तरुण पिढी सुनीता यांच्या हास्यातून बोध घेईल का ? ताजे, चविष्ट अन्न न मिळाल्यास विनाकारण त्रागा करणार्‍यांनी, स्वतःच्या अपेक्षा पूर्ण न झाल्यास लगेच अस्वस्थ होणार्‍यांनी, छोट्या-छोट्या प्रसंगांतून दुखावले जाणार्‍यांनी सुनीता यांच्या उदाहरणातून जरूर धडा घ्यावा ! सुनीता यांनी अंतराळ पालथे घातले. आयुष्यभर केवळ कुरबुरी करणार्‍यांनीही स्वतःच्या मनाच्या अंतराळाचा शोध घेऊन त्याला स्थैर्य आणण्यासाठी प्रयत्नशील राहायला हवे…

खरेतर अंतराळातील मोहिमा यशस्वी करणे, हे इतके वाटते तितके साधेसोपे किंवा सरळ नाही. त्यामागे प्रत्येकाचेच कष्ट असतात. सामान्यांना अवकाशगमन म्हणजे एकदम थरारक अनुभव वाटतो; पण तो तितकाच जोखमीचाही आहे. त्यासाठी काटेकोर नियोजन आणि आखणी करावी लागते. पृथ्वीपासून सहस्रो किलोमीटर दूर असल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. असे असतांना स्वतःला सिद्ध ठेवणे म्हणजे कौशल्य पणाला लावावे लागते. अंतराळातील प्रत्येक कसोटीत सुनीता यशस्वी ठरल्या. कर्तव्याशी प्रामाणिक असल्यानेच त्यांना तेथील सर्व संकटांना धैर्याने सामोरे जाता आले. हे सर्व त्यांनी स्वबळावर कसे साध्य केले ? याचा आदर्श वस्तूपाठ सुनीता यांच्या उदाहरणातून सर्वांनाच घेता येईल.

अवकाश संशोधन हे क्षेत्र पुरुषप्रधान मानले जायचे; पण कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स यांनी हा गैरसमज ठामपणे खोडून काढला. शारीरिक क्षमता, मानसिक सामर्थ्य आणि तांत्रिक कौशल्य यांमध्ये सरस ठरून महिला अंतराळवीरही तितक्याच सक्षम अन् उजव्या असतात, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. सुनीता विल्यम्स यांनी २७ वर्षांच्या कार्यकाळात जे मिळवले, ते खरेतर अंतराळविरासाठी स्वप्नवतच असेल; पण सुनीता यांच्या जिद्दीमुळे त्यांनी ते सत्यात उतरवून दाखवले.

अंतराळ विज्ञानाइतकेच भारतीय संस्कृतीशी असलेले त्यांचे नातेही प्रेरणादायी आहे. मोहिमांच्या वेळी त्यांनी ‘भगवद्गीता’, श्रीगणपतीची मूर्ती, उपनिषदे आणि ‘ॐ’ चिन्ह समवेत नेले होते. ‘भारत अंतराळातून कसा दिसतो ?’ असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर सुनीता म्हणाल्या होत्या, ‘‘भारत हा एक महान देश आहे. तो दिव्यांचे जाळे पसरल्यासारखा दिसतो. भारतातील शहरे आणि समुद्र हे अद्भुत आहे.’’ अवकाशाची अथांग पोकळी गाठणार्‍या सुनीता यांची नाळ भारतीय संस्कृतीशी जोडलेली आहे, हे यातून दिसून येते.

‘योग्य संधी, परिश्रम आणि चिकाटी असेल, तर कुणीही आकाशाला गवसणी घालू शकतो’, हा संदेश सुनीता यांच्या व्यक्तीमत्त्वातून अधोरेखित होतो. त्यांची निवृत्ती अंतराळविरांसाठी जरी भावनिक ठरणार असली, तरी त्यांनी निर्माण केलेला वारसा पुढील पिढ्यांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरणार आहे.

ज्या देशात कोणे एकेकाळी सायकलवरून रॉकेटचे पार्ट वाहून आणावे लागत होते,एक तो दिवस होता आणि आजचा दिवस आहे. भारत आता माणूस अंतराळात पाठवण्याच्या दिशेनेही पावले टाकतो आहे.अनेक तरुण-तरुणी अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहेत. शुभांशु शुक्ला यांची ‘एक्जिओम-४’ मोहिमेतील निवड ही भारताच्या वैज्ञानिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली आहे. आत्मनिर्भर भारताच्या नव्या अंतराळ युगाची सुरुवात होत आहे. राकेश शर्मांपासून शुभांशु शुक्लांपर्यंतचा हा प्रवास हे सिद्ध करतो की, भारतीय युवकही आता अवकाश जिंकण्यासाठी सज्ज आहे.यामागे सुनीता विल्यम्ससारख्या अंतराळवीरांच्या अनुभवाचा प्रकाश आपल्यासाठी दिशादर्शक नक्कीच आहे.

“India is amazing every time we went over the Himalayas” — Sunita Williams..

Back to top button