“अवघा रंग एक झाला”.. या विशेष मालिकेतून आपण समाजाला समरस करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणाऱ्या संतांबद्दल आपण जाणून घेणार आहोत…
संत मुक्ताबाई..
अखंडित भेटी आम्हा विठ्ठलाची । वार्ता नाही जगाची आम्हा काही ॥
मुक्ता म्हणे आम्ही मुक्तचि पै झालो । अंतरी निवालो विठ्ठलनामे ॥
अर्थात :- विठ्ठलनामात तल्लीन झाल्याने मनातील मोह, माया आणि अहंकार नाहीसे होतात. आत्मशांती, आत्ममुक्ती आणि ईश्वरप्राप्ती साध्य होते.
संत मुक्ताबाईंच्या कार्याने समाजाला हा संदेश दिला की, अध्यात्माच्या वाटेवर स्त्री-पुरुष असा कोणताही भेद नाही. स्त्रीलाही पुरुषांप्रमाणे आध्यात्मिक साधना, आत्मानुभूती आणि स्वतंत्र अभिव्यक्तीचा समान अधिकार आहे.
वारकरी संप्रदायातील कवयित्री संत मुक्ताबाई यांनी आपल्या अफाट ज्ञान, करुणा तसेच विचार आणि कार्यातून समाजासमोर सर्वसमावेशकतेचा एक नवा आदर्श घालून दिला. त्या केवळ संत ज्ञानेश्वरांच्या भगिनी नव्हत्या तर संपूर्ण भक्तिमार्गाला दिशा देणाऱ्या मार्गदर्शक ठरल्या. अवघ्या चौदाव्या वर्षी त्यांनी वयाने व अनुभवाने ज्येष्ठ असलेल्या योगी चांगदेवांचे अहंकारहरण करून त्यांचा आत्मज्ञानाचा मार्ग प्रशस्त केला.
‘ताटीचे अभंग’ या रचनेतून त्यांनी संत ज्ञानेश्वरांचा रुसवा दूर केला तसेच संपूर्ण मानवजातीला क्षमाशीलता आणि सहिष्णुतेचा संदेश दिला. “विश्व पटकुळ करावे | आपण तरी संत व्हावे |” असे म्हणत त्यांनी अवघ्या विश्वालाच आपले मानण्याची शिकवण दिली.
