“अवघा रंग एक झाला”.. या विशेष मालिकेतून आपण समाजाला समरस करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणाऱ्या संतांबद्दल आपण जाणून घेणार आहोत…
संत नरहरी महाराज..
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन असणारे संत नरहरी महाराज होत. संत नरहरी महाराज आपल्या सोन्याचांदीचा व्यवसाय प्रामाणिकपणे करीत असतांना पंढरीच्या विठोबाच्या कमरेचा करदोडा बनविण्यासाठी विठोबाच्या कमरेचे माप घेतांना त्यांना ईश्वरीय एकत्वाची अनुभूती झाली. तेव्हापासून त्यांच्या मनात पांडुरंगाबद्दल अनन्य भक्तीभाव जागृत होऊन ते विठ्ठलाचे परमभक्त झाले.
आपल्या सराफाच्या व्यवसायात असणारे साहित्य, साधने म्हणजेच त्यामधील प्रतिमांचा परमार्थाशी समन्वय साधताना ते म्हणतात..
देवा तुझा मी सोनार । तुझ्या नामाचा व्यवहार ।।
देह बागेश्वरी जाणे । अंतरात्मा नाम सोने ।।
त्रिगुणाची करुनी मुस । आत ओतीले ब्रह्मरस ।।
जीवशिव करुनी फुंकी । रात्रदिवस ठोकाठोकी ।।
विवेक हातवडा घेऊन । कामक्रोध केला चूर्ण ।।
नरहरी सोनार हरीचा दास। भजन करी रात्रंदिवस ।।
