“अवघा रंग एक झाला”.. या विशेष मालिकेतून आपण समाजाला समरस करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणाऱ्या संतांबद्दल आपण जाणून घेणार आहोत…
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज..
मार्ग झाडणे हाचि धर्म । सार्वजनिक कार्यात घालणे सर्वस्व ॥
जेणे सुखी होईल ग्राम । तोचि मानावा मुख्य धर्म ॥
अर्थात:- आपले रस्ते, सार्वजनिक जागा स्वच्छ ठेवणे आणि गावाच्या किंवा शहराच्या विकासासाठी स्वतःचे योगदान देणे हेच प्रत्येक नागरिकाचे मुख्य कर्तव्य आणि धर्म आहे.
गुलामगिरीत हरवलेला “स्व” समाजाला सत्त्वहीन करतो. परकीयांचा धर्म, चालीरीती आणि आपले गतवैभव हा समाज हरवून बसतो. अशा स्वकीयांमध्ये राष्ट्रीय चेतना निर्माण करणे हे मोठे अवघड काम तुकडोजी महाराजांनी केले.
जेव्हा समाजाला “स्व”चा बोध होतो तेव्हा तो गुलामगिरीच्या विरुद्ध लढण्यास सिद्ध होतो. तुकडोजी महाराज भगवान श्रीकृष्णालाच या भूमीवर येण्याचे आवाहन करतात. राम, कृष्ण हे तर या राष्ट्राचे मानबिंदू आहेत. भारताचे भावविश्व या दोन राष्ट्रपुरुषांनी व्यापून टाकले आहे. तुकडोजी महाराज म्हणतात..
कधी येशील मनमोहना,
पाहण्या भारत अपुला पुन्हा ।
