IslamNewsSpecial Day

तेथे कर माझे जुळती

आज गुरू तेगबहादूर यांचा बलिदान दिन. हिंदू धर्म आणि संस्कृतीसाठी शहिदी पत्करणाऱ्या या थोर योद्धा गुरूला अभिवादन.. !!

आजच्या दिवशी म्हणजे २४ नोव्हेंबर १६७५ या दिवशी गुरूंनी बलिदान दिले. त्यांच्या या बलिदानातून प्रेरणा घेऊन हजारो हिंदू आणि सिक्ख बांधवांनी देश आणि धर्मासाठी त्याग आणि बलिदान दिले आणि म्हणूनच आपण सर्व आज मानाने जगू शकतोय.

दुर्दैवाने आपल्या या अशा राष्ट्रपुरुषांची माहिती आज आपल्याला नाही, हा गौरवशाली इतिहास कळावा अशी ना मुघलांची इच्छा होती…. ना इंग्रजांची आणि दुर्दैवाने भारतीय म्हणवणाऱ्या राज्यकर्त्यांची आणि इतिहासकार यांची.

हा इतिहास खरं तर फार मोठा आणि जाज्वल्य आहे. याची थोडीफार माहिती आपल्या सर्वांना व्हावी हाच उद्देश….

गुरू तेगबहाद्दुर यांचा जन्म १ एप्रिल १६२१ रोजी अमृतसर इथे झाला. त्याचं नाव त्यागमल. सहावे गुरू हरगोविंदसिंह आणि माता नानकी यांचे सर्वात लहान पुत्र. हिंदी, संस्कृत, पंजाबी आदी भाषांचे, हिंदू धर्मग्रंथांचे, गुरुबाणीचे आणि त्याचबरोबर तलवारबाजी, भालाफेक, घोडेस्वारी इत्यादीचे प्रशिक्षण लहानपणापासूनच मिळाले होते. तो काळ मुघल सत्तेचा होता. गुरू हरगोविंदसिंह यांनी मुघलांशी लढण्यासाठी सैन्याची उभारणी केली. त्यामुळे तरुणपणापासूनच त्यागमल मुघलांशी लढाया करत होते. त्यांच्या करतारपूर इथे मुघलांशी झालेल्या लढाईत गाजवलेल्या पराक्रमामुळे त्यांना गुरू हरगोविंदसिंह यांनी “तेगबहादूर” असे नाव दिले. तेगबहादूर याचा अर्थच मुळी “शूर तलवारबाज” असा होतो. वडिलांच्या मृत्यूनंतर तेगबहादूर आपल्या आईच्या गावी बकाला इथे गेले. तिथे त्यांनी आपला काळ नामसंकीर्तन आणि ध्यानधारणेत व्यतीत केल्याचे समजते.

गुरू हरगोविंदसिंह यांच्यानंतर झालेले गुरु म्हणजे गुरू हरराय आणि गुर हरक्रीश्न. गुरू हरक्रीश्न यांनी मृत्युसमयी सांगितल्याप्रमाणे बकाला इथून गुरु तेगबहादूर यांना बोलावण्यात येऊन त्यांनी नववे गुरु म्हणून गादी सांभाळली. त्यावेळी औरंगझेबाची जुलमी राजवट होती. जबरदस्तीने धर्मांतरण, मंदिरे उध्वस्त करणे, जिझिया कर लादणे, आया बहिणींवर अत्याचार असे धोरण त्याने अवलंबिले होते!! त्यामुळे सामाजिक आणि राजकीय जीवनात अस्वस्थता पसरली होती.

औरंगजेबाच्या मोगली राजवटीने अत्याचारांचा कळस गाठला होता. धर्मांतराचा उच्छाद मांडला होता. काश्मीर मध्ये त्यांनी काश्मिरी पंडितांना धर्मांतर करण्याची बळजबरी करण्यास सुरुवात केली. त्यांनी विरोध केल्यावर त्यांना मुदत दिली आणि सांगितलं की धर्मांतरास तयार व्हा नाहीतर सर्वांचे शिरकाण केले जाईल…. म्हणजे आजच्या समजणाऱ्या भाषेत मारले जाईल. काश्मिरी पंडित मोठ्या संकटात सापडले आणि आपल्याला या संकटातून कोण वाचवेल याचा विचार सुरु केला आणि त्यांना एकच नाव सुचलं ते म्हणजे गुरू तेगबहाद्दूर….. हे सिक्ख पंथाचे नववे गुरू.

साधारण ५०० पंडित हे पंडित कृपाराम यांच्या नेतृत्वाखाली “चक नानकी”, जे आज आनंदपूर साहिब या नावाने ओळखले जाते, या स्थानी भेटायला आले आणि काश्मिरी हिंदूंची व्यथा त्यांना सांगितली. गुरूंना त्यांच्या या व्यथेने अत्यंत वेदना झाल्या आणि ते एकदम अंतर्मुख झाले. लहानग्या गोविंदराय यांनी आपल्या वडिलांना… गुरू तेगबहाद्दूरांना त्यांच्या अंतर्मुखतेचे कारण विचारलं. गुरूंनी सांगितलं की या संकटातून बाहेर पडण्यासाठी एखाद्या महान आत्म्याचे बलिदान व्हावे लागेल….. ९ वर्षाचा लहानगा गोविंदराय म्हणाला की या साठी गुरूंशिवाय अन्य महान आत्मा कोण असू शकतो. लहानग्या गोविंदसिंहांचे बोल ऐकून गुरू स्वतः या साठी तयार झाले….. त्यांनी काश्मिरी पंडितांना सांगितले की औरंगजेबाला सांगा की जर गुरुजी धर्म बदलायला तयार झाले तरच आम्ही धर्म बदलू!!

गुरू तेगबहाद्दूर यासाठी आपल्या शिष्यांसाह दिल्ली येथे गेले….. आणि त्यांना औरंगझेबाने अटक केली. त्याच्या सर्व भारतास धर्मांतरित करून मुस्लिम करण्याच्या कामात गुरू अडथळा बनून राहिले होते. औरंग्याने त्यांना धर्मांतर करा असे सांगून त्यांचे हाल करायला सुरुवात केली. एकवेळ प्राण देऊ पण धर्म सोडणार नाही असे गुरूंनी ठणकावून सांगितले. कोणीच बधत नाही हे पाहून औरंगझेबाचे क्रौर्य जागे झाले…… आजच्या काळात विश्वास वाटणार नाही असे क्रौर्य …. दिल्लीच्या चंदणी चौकात भाई मतीदास यांना करवतीने कापले, भाई दयाल यांना उकळत्या तेलात टाकले, भाई सतीदास यांना तर जीवंत जाळले….. आणि तरीही गुरूंनी धर्मांतरास नकार दिला. यावर औरंगझेबाच्या आदेशाने चांदणी चौकातच, आजच्याच दिवशी म्हणजे २४ नोव्हेंबर १६७५ रोजी गुरूतेगबहाद्दूर यांचं मस्तक उडवलं…..

जेथे गुरूंच मस्तक उडवलं गेलं त्याठिकाणी चांदणी चौकात आज गुरुद्वारा आहे….शिशगंज गुरुद्वारा…. त्यांच्या शिष्य मंडळींनी त्यांचं मस्तकविना शरीर तिथून पळवून नेलं आणि त्यांच्या एका शिष्याच्या घरी नेऊन औरंग्याचे सैनिक येऊन त्या शरीराचा अपमान करतील म्हणून त्या घरालाच आग लावली…. जेथे त्यांच्या शरीवर अग्निसंस्कार झाले त्याठिकाणी आज गुरुद्वारा आहे…. रकीबचंद गुरुद्वारा!! गुरू तेगबहादूर यांनी धर्मासाठी जे बलिदान दिले त्यामुळे त्यांना “हिंद की चादर” असेही म्हटले जाते.

अंगावर शहारे आणणारे हे हौतात्म्य, ज्याने हिंदू समाजात आत्मसन्मानाचे स्फुल्लिंग जागृत केले….. सिक्ख संप्रदायाने हिंदू धर्मासाठी जे बलिदान केले त्याला तोड नाही…… गुरू गोविंद सिंह यांच्या त्यागासंबंधी एक गीत आहे….
पिता वारियाती लाल चारे वारे… ओ हिंद तेरी शान बदले….. वडील गुरू तेगबहाद्दूर, स्वतःची चार मुलं आणि स्वतः धर्मासाठी त्याग आणि बलिदान…. आपल्या वडिलांच्या बलिदानापासून प्रेरणा घेऊन गुरू गोविंदसिंह यांनी त्यांचे सिद्धांत आणि मूल्य जपले आणि आपला पंथ खालसा ची स्थापना करून पुढे आणखीन वाढवला जो धार्मिकता आणि न्याय यांच्या विरुद्धच्या लढाईचे प्रतीक आहे!! खरं म्हणजे हा मोठा गौरवशाली आणि जाज्वल्य इतिहास आहे त्याची सर्व भारतीयांना जाणीव आणि माहिती व्ह्यायलाच हवी….

मंडळी…. हा इतिहास माहिती होता का? काहींना असेलही…. पण आपल्या देशाचा गौरवशाली आणि जाज्वल्य इतिहास माहिती करून घेणं आवश्यक आहे आणि सर्वांनी तो करून घ्यावा ही कळकळीची विनंती.

सिक्ख पंथाचा परकीयांच्या आक्रमणापासून देशाचे संरक्षण आणि संवर्धन करणे आणि हिंदुधर्म संरक्षण करणे यात मोठ्ठा वाटा आहे…. हा पंथ म्हणजे हिंदू धर्माचे खड्गच… (खड्ग म्हणजे तलवार)….

गुरूंच्या जाज्वल्य आणि प्रेरणादायी बलिदानानिमित्त कृतज्ञता व्यक्त करूयात…. आणि या बलिदानातून प्रेरणा घेऊयात….

लेखक :- अरविंद श्रीधर जोशी

साभार :- मुंबई तरुण भारत

Back to top button