इंग्रजांचा कर्दनकाळ- राजे उमाजी नाईक
“उमाजी नाईक हा सामान्य माणूस नव्हे. त्यांच्यापुढे छत्रपती शिवरायांचा आदर्श होता. त्यांना फाशी दिली नसती, तर ते दुसरे शिवाजी झाले असते.” — कॅ. मॅकिंन्टॉश
“रामोशांहून शूर जगात इतरत्र कोठेही मिळणार नाहीत.” — कॅ. स्मिथ
ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या या नोंदी राजे उमाजी नाईक यांच्या पराक्रमाची आणि त्यांच्या वाढत्या प्रभावाची साक्ष देतात. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरापूर्वीच महाराष्ट्राच्या भूमीत परकीय सत्तेविरुद्ध सशस्त्र संघर्षाची मशाल पेटवणाऱ्या उमाजी नाईकांचे नाव मात्र इतिहासाच्या मुख्य प्रवाहात तुलनेने कमी परिचित राहिले.
स्वराज्याची प्रेरणा
७ सप्टेंबर १७९१ रोजी पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या भिवडी येथे उमाजी नाईकांचा जन्म झाला. त्यांचे वडील दादोजी खोमणे हे पुरंदर आणि वज्रगडाच्या संरक्षणाची जबाबदारी सांभाळत होते. बालपणीच वडिलांचे छत्र हरपल्याने आई लक्ष्मीबाईंनी उमाजींच्या मनावर स्वराज्याचे संस्कार केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या, गनिमी काव्याच्या आणि स्वराज्यनिर्मितीच्या कथा त्यांच्या मनात रुजल्या. याच प्रेरणेतून उमाजींनी शस्त्रविद्येत प्रावीण्य मिळवले. स्वराज्य ही केवळ भूतकाळातील गोष्ट नसून परकीय सत्तेविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा आहे, अशी त्यांची धारणा दृढ होत गेली.
अन्यायाविरुद्धचा उठाव
१८०२ नंतर ब्रिटिशांचे वर्चस्व वाढू लागले. किल्ले आणि प्रदेश त्यांच्या ताब्यात गेले. रामोशी समाजाची पारंपरिक वतने व उपजीविकेची साधने हिरावली गेली. या परिस्थितीचा उमाजींनी केवळ स्वतःच्या समाजाचा प्रश्न म्हणून विचार केला नाही; परकीय सत्तेविरुद्ध संघर्ष करण्याचा तो व्यापक प्रश्न आहे, अशी त्यांची भूमिका होती. विठोजी नाईक, कृष्णा नाईक, खुशाबा रामोशी, बाबू सोळसकर अशा सहकाऱ्यांसह त्यांनी विविध समाजघटकांना जोडले. ब्रिटिश सत्तेला साथ देणाऱ्या शोषकांविरुद्ध कारवाया सुरू केल्या. त्यांच्या संघर्षामागे वैयक्तिक स्वार्थापेक्षा स्वराज्याची प्रेरणा आणि परकीय सत्तेला आव्हान देण्याची भूमिका अधिक ठळक होती.
संघटन आणि गनिमी युद्धनीती
उमाजी नाईक केवळ शूर योद्धा नव्हते; ते कुशल संघटक आणि रणनीतीकारही होते. डोंगर-दऱ्यांतील लहान लहान गट, त्यांच्यातील संपर्कव्यवस्था, गुप्त माहितीचे जाळे आणि शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवणारी व्यवस्था त्यांनी उभी केली. ब्रिटिशांच्या प्रचंड सैन्याशी थेट संघर्ष न करता, संधी साधून हल्ला करणे आणि त्वरित माघार घेणे, ही त्यांची युद्धनीती होती. आपल्या सहकाऱ्यांनी सामान्य जनतेला त्रास देऊ नये, असे निर्देशही त्यांनी दिले होते.“रयतेस उपद्रव देऊ नये, फक्त पोटास सरंजाम घेत जावा,” असे त्यांनी ६ फेब्रुवारी १८३१ रोजी आपल्या सहकाऱ्यांना बजावले होते. संघर्षाच्या काळातही सामान्य जनतेचा विचार करणारी ही भूमिका त्यांच्या नेतृत्वाचे वेगळेपण अधोरेखित करते.
ब्रिटिशांना दिलेले आव्हान
१८२४ मध्ये भांबुर्डा येथील ब्रिटिश सरकारचा खजिना लुटण्याची धाडसी कारवाई उमाजींनी केली. मिळालेल्या पैशाचा वापर शस्त्रास्त्रे घेण्यासाठी करण्यात आला. या घटनेनंतर ब्रिटिश प्रशासनाने उमाजींचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले. १८२६, १८२७ आणि पुढे १८३१ मध्ये ब्रिटिशांनी वारंवार जाहीरनामे काढले. उमाजींना पकडून देणाऱ्यांसाठी बक्षिसांची रक्कम वाढवत नेली. अखेरीस ती १० हजार रुपयांपर्यंत पोहोचली. तरीही दीर्घकाळ ब्रिटिशांना उमाजींचा ठावठिकाणा मिळवता आला नाही. पुण्याचे कलेक्टर रॉबर्टसन यांच्या पत्रव्यवहारातून ब्रिटिश प्रशासनाची चिंता स्पष्ट होते. “हा उमाजी रामोशांचा राजा होऊन छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे हिंदूंचे राज्य स्थापन करणार नाही, कशावरून?” अशी भीती त्यातून व्यक्त झाली होती.
व्यापक राष्ट्रदृष्टी
उमाजी नाईकांच्या संघर्षाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची वाढती व्यापक दृष्टी. सुरुवातीचा संघर्ष रामोशी समाजाच्या हक्कांपुरता मर्यादित असला, तरी पुढे त्याचे रूप परकीय सत्तेविरुद्धच्या व्यापक लढ्यात झाले. १६ फेब्रुवारी १८३१ च्या जाहीरनाम्यात त्यांनी हिंदुस्थानातील विविध घटकांना एकत्र येण्याचे आवाहन केले. राजे, सरदार, जमीनदार, वतनदार, सैनिक आणि सामान्य जनता—सर्वांनी परकीय सत्तेविरुद्ध एकत्र उभे राहावे, अशी त्यांची भूमिका होती.
फुटीचा फायदा घेऊन ब्रिटिशांनी सत्ता प्रस्थापित केली आहे, याची जाणीव उमाजींना होती. म्हणूनच एकाच वेळी व्यापक उठाव करण्याचे आवाहन त्यांनी केले. यात भौगोलिक सीमा ओलांडून संपूर्ण हिंदुस्थानाला एका संघर्षाच्या सूत्रात जोडण्याची राष्ट्रदृष्टी दिसून येते.
तडजोड नव्हे, ध्येयाशी निष्ठा
ब्रिटिशांशी झालेल्या तहानंतर उमाजींना कंपनीच्या सेवेत स्थान मिळाले. काही काळ त्यांनी ब्रिटिशांच्या पोलीस व्यवस्थेत काम केले. परंतु सुखसोयीचे जीवन आणि नियमित पगार त्यांच्या स्वराज्याच्या ध्यासापुढे टिकले नाहीत. पुण्यात सुरक्षित जीवन उपलब्ध असतानाही उमाजी पुन्हा डोंगर-दऱ्यांकडे वळले. कारण त्यांच्यासाठी व्यक्तिगत सुखापेक्षा स्वातंत्र्याचे ध्येय मोठे होते.
विश्वासघात आणि बलिदान
ब्रिटिशांना लष्करी सामर्थ्याने उमाजींना पकडता येत नसल्याने त्यांनी फितुरीचा मार्ग स्वीकारला. नाना चव्हाण आणि इतरांच्या माध्यमातून जाळे रचण्यात आले. १५ डिसेंबर १८३१ रोजी भोर तालुक्यातील उत्रोली येथे उमाजी नाईकांना ब्रिटिशांनी पकडले.त्यानंतर त्यांच्यावर खटला चालवून मृत्युदंड सुनावण्यात आला. ३ फेब्रुवारी १८३२ रोजी पुण्यात उमाजी नाईकांना फाशी देण्यात आली. ब्रिटिशांनी त्यांच्या मृतदेहाचे सार्वजनिक प्रदर्शन करून जनतेत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र दहशतीने विचार मरत नाहीत आणि बलिदानाची प्रेरणा संपत नाही, हेच त्यांच्या मृत्यूनंतरच्या स्मरणातून स्पष्ट झाले.
इतिहासातील प्रेरणादायी स्थान
अवघे ४१ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या उमाजी नाईकांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा काळ परकीय सत्तेविरुद्धच्या संघर्षासाठी दिला. मर्यादित साधने, कमी मनुष्यबळ आणि प्रतिकूल परिस्थिती असूनही त्यांनी ब्रिटिश सत्तेला सातत्याने आव्हान दिले. त्यांच्या जीवनातून तीन गोष्टी विशेषत्वाने अधोरेखित होतात.. स्वराज्याची प्रेरणा, समाजाला संघटित करण्याची क्षमता आणि ध्येयासाठी वैयक्तिक सुखाचा त्याग.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यपरंपरेने प्रेरित होऊन परकीय सत्तेविरुद्ध उभे राहिलेले राजे उमाजी नाईक हे केवळ एका समाजाचे नेते नव्हते; ते स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि स्वराज्याच्या ध्यासाचे प्रतीक होते. म्हणूनच उमाजी नाईकांचे स्मरण केवळ एका क्रांतिकारकाचे स्मरण नाही; ते अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची, समाजाला एकत्र आणण्याची आणि राष्ट्रहितासाठी सर्वस्व अर्पण करण्याची प्रेरणा आहे.
