
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या निसर्गसंपन्न संकुलात आज भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे उपस्थित होते.
या शुभप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना दत्तात्रयजींनी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याग केलेल्या आणि बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण केले.तसेच आजच्या घडीला भारताच्या बाह्य आणि अंतर्गत सुरक्षेसाठी लढणाऱ्या लष्करी सैनिकांसह सर्व निमलष्करी सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पराक्रमी,शूर,सैनिकांमुळेच देशाच्या सीमा अबाधित राहतात. प्राचीन काळापासून, कोणत्याही संकटावर मात करून पुन्हा उभे राहण्याची, प्रगती, उन्नती करण्याची अंगभूत क्षमता भारत राष्ट्रामध्ये आहे. भारताचे अंतःसत्त्व हे फिनिक्स पक्षासारखे आहे, असे प्रतिपादनही दत्तात्रयजींनी केले.
प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी उपस्थितांचे स्वागत करून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रबोधिनीचे कोषाध्यक्ष नीलेश गोसावी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रकाश आवडे हे देखील यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ‘ग्लोबल आउटरीच कार्यक्रम’ रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी आलेले जगभरातील स्वयंसेवक आणि पदाधिकारी ध्वजारोहण सोहळ्यात सहभागी झाले होते. ध्वजारोहण सोहळा आणि राष्ट्रगीतानंतर ग्लोबल आउटरीच कार्यक्रमासाठी आलेले स्वयंसेवक आणि प्रबोधिनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भारतमाता पूजन करून कार्यक्रमाची सांगता झाली..