HinduismNewsRSS

सेवा हा व्यवसाय नसून समाजाप्रती आपले कर्तव्य आहे – डॉ. मोहन भागवत

नागपूर, १३ नोव्हेंबर :कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीने सिव्हिल लाइन्स येथील चिटणवीस सेंटरमध्ये आयोजित समारंभात दुबई येथे कामगारांना वैद्यकीय सेवा पुरविणारे मूळचे नागपूरचे रहिवासी डॉ. संजय पैठणकर यांना ‘विदर्भ गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कृष्णा अभिमत वैद्यकीय विद्यापीठाचे डॉ. वेदप्रकाश मिश्रा, डॉ. संजय पैठणकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश गांधी आणि श्रीराम काळे उपस्थित होते.

या समारंभात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सांगितले की, ‘सेवा हा व्यवसाय नसून समाजाप्रती आपले कर्तव्य आहे. केवळ पैसा कमावणे हाच कोणत्याही कामाचा मुख्य उद्देश असू नये. उपजीविका मिळवणे हा त्याचा केवळ एक भाग आहे. समाज केवळ आर्थिक समृद्धीच्या आधारावर नव्हे, तर करुणा आणि संवेदनशीलता यांसारख्या मूल्यांच्या आधारावर टिकून राहतो.’

ते म्हणाले की, ‘एखाद्याला समाजसेवेसाठी प्रेरित करण्याच्या उद्देशाने पुरस्कार दिले जात नाहीत. ज्यांचा सन्मान केला जातो, त्यांनी कधीही कोणत्याही अपेक्षेने काम केलेले नसते. संपूर्ण जग ज्याला ‘प्रोफेशन’ (व्यवसाय) म्हणते, त्याला आपल्या देशात ‘सर्व्हिस’ (सेवा) म्हटले जाते. कारण, आपण जे काही करतो, ते केवळ स्वतःचे पोट भरण्यासाठी नव्हे, तर सृष्टीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी करतो, अशी आपली धारणा आहे. आपले जीवनही याच उद्देशाने जगले पाहिजे. ‘पुरस्कार’ या शब्दाचा एक अर्थ पारितोषिक असा आहे, तर दुसरा अर्थ प्रोत्साहन असा आहे. समाजाप्रती आपली काही कर्तव्ये आहेत, या भावनेतून समाजासाठी जीवन समर्पित करणाऱ्या व्यक्तींचा हा सन्मान आहे. ही एक संवेदना आहे आणि संवेदनशीलता हीच मनुष्यत्वाची ओळख आहे.’

ते पुढे म्हणाले, ‘जगात जे दुःख आहे, ते दूर करण्यासाठी मी जे काही करू शकतो, ते करतो, अशी भावना असली पाहिजे. असे करताना आपण काहीतरी फार मोठे काम करत आहोत, असा भाव मनात नसणे हीच माणुसकी ,मानवी संवेदनशीलता आहे. या भावनेचे सहज प्रकटीकरण सेवेतून होते. सेवा केल्याच्या बदल्यात आपल्याला कोणत्याही फळाची अपेक्षा नसते. ही सेवा एकतर्फी नसून आत्मीयता आणि करुणेतून निर्माण झालेली असते. ही भावना अंतर्मनातून जागृत होते आणि त्यातूनच सेवाकार्य घडते. समाज याच संवेदनशीलतेच्या आधारावर चालतो. ही संवेदना कायम टिकून राहिली पाहिजे.’

ही संवेदना प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. मात्र, प्रतिकूल परिस्थितीमुळे ती अनेकदा दडपली जाते. ही संवेदना जिवंत ठेवणे, हाच खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगण्याचा मार्ग आहे. एखाद्याचे जीवन गरिबीत जात आहे की संपन्नतेत, हे महत्त्वाचे नाही. महत्त्वाचे हे आहे की, त्या व्यक्तीने आपल्या जीवनात कोणती मूल्ये जपली आहेत. जीवनात अडचणी असतानाही त्यांचा सामना करण्याची आणि अशाच परिस्थितीशी झुंजणाऱ्या लोकांना मदत करण्याची भावना समाजात कायम राहिली पाहिजे.’

सरसंघचालक डॉ. भागवत म्हणाले, ‘केवळ पैसा कमावण्यासाठी व्यवसाय करणे ही आपली संस्कृती नाही. लोकांनी आपला व्यवसाय आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासोबतच समाजासाठीही योगदान दिले पाहिजे. कारण, समाजाची सेवा करणे हाच आपल्या कार्याचा खरा उद्देश आहे. धर्माची संकल्पना मानवता आणि बंधुभावाशी जोडलेली आहे. सत्य, करुणा, पवित्रता आणि तपस्या हे धर्माचे चार आधारस्तंभ आहेत. स्वतःमध्ये आणि इतरांमध्येही ईश्वराचा वास आहे, या भावनेतून आत्मीयता आणि निःस्वार्थ सेवेची भावना निर्माण होते.’

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, ‘नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाने जगाला अनेक नामवंत डॉक्टर दिले आहेत. त्यापैकीच एक असलेल्या डॉ. संजय पैठणकर यांनी दुबईमध्ये नागपूरचा गौरव वाढविला आहे. त्यांनी दुबईमध्ये वैद्यकीय क्षेत्रात काम केले; मात्र आपल्या मातृभूमीशी असलेले नाते त्यांनी कधीही तुटू दिले नाही.’

Back to top button