CultureNewsSpecial Day

“स्वामी श्रद्धानंद हे अस्पृश्याचे सर्वात मोठे व अत्यंत कळकळीचे कैवारी होते !“ – डॉ.आंबेडकर

swami shraddhanand balidan diwas

२३ डिसेंबर- महान स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक स्वामी श्रद्धानंदजी यांचा बलिदान दिन !

आधुनिक भारताच्या प्रबोधनाच्या इतिहासात अनेक सुधारकांनी मोलाची कामगिरी केली आहे. “स्वामी श्रद्धानंद सरस्वती” हे त्यातील एक अग्रगण्य सुधारक होते. वैदिक धर्मप्रचार, गुरुकुल कांगडी स्थापना, शुद्धी आंदोलन, दलितोद्धार आदि कार्यात स्वामीजींनी मोलाची भूमिका बजावली होती. तसेच ह्या सर्व प्रबोधन कार्याचा अग्रदूत अशा आर्य समाजांस व्यापक स्वरूप देण्यात व काँग्रेस चळवळीच्या वाढीतही त्यांचे सक्रिय योगदान होते.

स्वामी श्रद्धानंद यांचा जन्म पंजाबातील जालंधर जिल्ह्यातील तलवन येथे संपन्न अशा खत्री कुटुंबात झाला. त्याचे मूळ नाव मुन्शीराम होते. त्यांचे वडील नानकचंद पोलीस अधिकारी होते. घरातल्या सुखसंपन्नतेच्या समृद्धीपूर्ण वातावरणामूळे युवा अवस्थेत ते चैनीकडे वळले व पुढे नास्तिक झाले. अशा स्थितीत १८७९ मध्ये बरेली येथे त्यांचा आर्य समाजाचे संस्थापक, वेदोद्धारक, समग्र क्रांतिचे अग्रदूत अशा महर्षि दयानंद सरस्वती यांच्याशी पहिला संपर्क आला व त्यांचे त्या भेटीने , परिसाचेनिं संगे लोह होय सूवर्ण या संत तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे त्यांचे अवघे जीवनच पालटले.

प्रत्यक्षपणे आर्यसमाज चळवळीशी त्यांचा संबंध १८८४ मध्ये लाहोर येथे आला. विधीज्ञ म्हणजे वकिलीचा व्यवसाय करीत असतांना ते आर्यसमाजाच्या चळवळीत सक्रिय झाले. धार्मिक व सामाजिक उपक्रमात भाग घेऊ लागले. १८८८ मध्ये त्यांनी जालंधर येथे पहिली कन्या पाठशाळा काढली.

‌मुंशीराम यांचा १८८८ मध्ये काँग्रेसशी पहिला संपर्क आला. जनजागृतीसाठी त्यांनी सद्धर्मप्रचारक(१८९०) श्रध्दा, सत्यवादी, तेज, दि लिबरेटर इत्यादी वृत्तपत्रे काढली. आर्यसमाज चळवळींचा पंजाबमध्ये विस्तार करण्यासाठी त्यांनी १८९२ मध्ये आर्यप्रतिनिधी सभा पंजाबची निर्मिती केली. ते सर्वसंमतीने अध्यक्ष निवडले गेले. भारतीय संस्कृतीचे जतन व पाश्चात्य ज्ञानाचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने त्यांनी १९०२ मध्ये कांगडी (हरिद्वार) येथे गुरुकुलाची स्थापना केली. त्यांच्या कार्यक्षेत्राची व्याप्ती वाढत गेली. १९०९ मध्ये आर्यसमाजाच्या अखिल भारतीय स्तरावरील सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा, दिल्ली या संस्थचे ते अध्यक्ष निवडले गेले. त्यांनी हिंदी भाषेच्या केलेल्या सेवेमुळे त्याच वर्षी भागलपूर येथे भरलेल्या हिंदी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष निवडले गेले.

गांधींना महात्मा पदवी देणारे स्वामीजीच!

‌सामाजिक चळवळी बरोबरच काँग्रेसशी त्यांचा संपर्क वाढला. महात्मा गांधींच्या दक्षिण आफ्रिकेतील लढ्यासाठी गुरुकुल कांगडीच्या विद्यार्थ्यांची खरी कमाई करून निधी पाठविला. १९१५ मध्ये म.गांधी गुरुकुल कांगडी येथे आले असता स्वामीं श्रध्दानंदांनी त्यांना सर्वप्रथम “महात्मा” असे संबोधले. म.गांधी स्वामी श्रद्धानंदांना आपले थोरले भाऊ मानत होते.

रौलेट ऍक्ट विरुद्ध चालू असलेल्या असहकार आंदोलनाचे दिल्लीतील नेतृत्व स्वामी श्रध्दानंदांनी केले. ३० मार्च, १९१९ या दिवशी दिल्लीतील चांदणी चौक, घंटाघर येथील निःशस्त्र सत्याग्रहीवर गोळीबार करणाऱ्या पोलिसांना ते सामोरे गेले. “मैं खडा हूँ, गोली मारो ” असे आवाहन त्यांनी केले. भडकलेल्या २५ हजाराच्या जमावाला श्रद्धानंदांनी काही क्षणात शांत केले. या काळातील त्यांच्या भुमिकेमुळे दिल्लीतील जामा मशिदीमध्ये त्यांना व्याख्यानासाठी बोलावले गेले व ४ एप्रिल, १९१९ या दिवशी ३० सहस्त्र मुस्लिमांसमोर त्यांनी वेदमंत्रांच्या आधारे आपले विचार त्यांनी मांडले.

याच वर्षी अमृतसर येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष म्हणून त्यांची निवड केली गेली. या प्रसंगी काँग्रेसच्या व्यासपीठावरून श्रद्धानंदांनी दलितांच्या अडचणी व उपाययोजना मांडल्या. दलितांच्या प्रश्नावरून मतभेद झाल्याने त्यांनी १९२३ मध्ये काँग्रेसचा राजीनामा दिला. आर्यसमाजामध्ये दलितोद्धार सभा स्थापन करून दलितोद्धार चळवळीसाठी संपुर्ण देशभर दौरे केले.

स्वामी श्रद्धानंदांच्या समोर हिंदू संघटनेचे दोन पैलू होते. नवमुस्लिमांना पुन्हा हिंदू धर्मात घेणे व दलित जातींना उन्नत करणे. शुद्धी सभेच्या माध्यमातून त्यांनी ३० हजार मलकानी मुसलमानांना पुन्हा हिंदू धर्मात घेतले. त्यामुळे मुस्लिम श्रद्धानंदांवर चिडून होते. मार्च १९२६ मध्ये कराची येथील असगरी बेगम नावाची एक स्त्री आपल्या मुलांसह दिल्लीला आली. तिने आपल्याला हिंदू धर्मात घ्यावे, अशी विनंती स्वामीं श्रद्धानंदांना केली. तिची व तिच्या मुलांच्या शुद्धी केली गेली. तिचे नाव शांतीदेवी ठेवले गेले. तिच्या पतीने भरलेला खटला फेटाळला गेला. या घटनेचा सूड घेण्यासाठी अब्दुल रशिद या धर्मांधाने २३ डिसेंबर, १९२६ रोजी दिल्ली येथे श्रद्धानंदांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. आयुष्यभराच्या साहसाने स्वामी श्रद्धानंदांना वीर हौतात्म्य प्राप्त झाले.
‌दलितोद्धारक चळवळीचे महत्व ओळखून त्यांनी आपले सर्व आयुष्य त्यासाठी वेचले. म्हणून “डॉ.बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याबद्दल आपल्या “What Congress And Gandhi Have Done To Untouchables” ग्रंथात म्हणतात- “स्वामी श्रद्धानंद हे अस्पृश्याचे सर्वात मोठे व अत्यंत कळकळीचे कैवारी होते !“

‌सौजन्य: वैदिक गर्जना ( अंक – डिसेंबर २०१५ )

Back to top button