Opinion

नेताजींच्या कन्येचा सन्मान!

अनीता बोस (फाफ).. ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांची एकुलती एक कन्या. ती अवघी चार आठवड्यांची असताना, नेताजींनी तिला व आपली पत्नी एमिली हिला युरोपमधे सोडून दक्षिण आशियाच्या दिशेनं कूच केलं…. जपानच्या सहाय्यानं ब्रिटिशांचा पराभव करुन भारत स्वतंत्र करण्यासाठी. पुढे, दोन-अडीच वर्षांच्या धामधुमीनंतर नेताजींचा दुर्दैवी व गूढ मृत्यु झाला. त्यामुळे आपल्या मुलीला ते पुन्हा भेटू अथवा पाहू शकले नाहीत.

अनीताला अर्थातच तिच्या आईनं.. एमिलीनं वाढवलं. मुलीचा व स्वतःच्या आई-वडीलांचा सांभाळ करण्यासाठी, नेताजींची पत्नी- एमिली ‘ट्रंक (कॉल) अॉफीसमधे’ विविध शिफ्टमधे काम करत असे. खरं तर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर ब्रिटिशांच्या अटी झुगारुन तत्कालीन सरकारनं नेताजींच्या पत्नीला सन्मानानं भारतात बोलवायला हवं होतं व तिच्या चरितार्थाची व्यवस्था करायला हवी होती. पण तसं घडलं नाही. त्यामुळे अनीताचा भारताशी काही संबंध येऊ शकला नाही. नेताजींचं मोठेपण मात्र एमिलीनं अनीताच्या मनावर चांगलंच ठसवलं होतं.. आणि एक फार महत्वाची गोष्टही सांगितली..”तुझे वडील महापुरुष होते.. पण त्यामुळे तू महान होत नाहीस.. तुला तुझा मोठेपणा स्वतः सिद्ध करावा लागेल!”
अनीता उत्तम शिक्षण घेऊन ‘मोठी’ झाली व तिनं एक ‘अर्थतज्ञ‘ म्हणून नावलौकिक कमावला.

नेताजींच्या मृत्युचं गूढ उकलण्यासाठी तिनं अनेक अयशस्वी प्रयत्न केले. नेताजींच्या अस्थी भारत सरकारनं जपानमधून भारतात आणाव्यात (व DNA टेस्ट करावी) ही तिची मागणीही मान्य करण्यात आली नाही.

ती सध्या ‘अॉस्ट्रिया’ देशाची नागरिक आहे. तिचे पती अर्थातच ख्रिश्चन आहेत. (त्यांचं आडनाव ‘फाफ’) परंतु तिनं भारताशी असलेली आपली नाळ तोडलेली नाही. तिच्या तीन मुलांची नावं ‘पीटर अरुण’, ‘थॉमस कृष्णा’ आणि ‘माया कॕरिना’ अशी ‘ख्रिश्चन-हिंदू’ सरमिसळ असलेली आहेत.

अनीताजींचं वय आता 80 आहे.
काल दि. 23 जानेवारी रोजी, भारत सरकारनं एक अतिशय चांगली गोष्ट केली.. नेताजींच्या 125व्या जयंतीनिमित्त भारताच्या जर्मनीमधल्या दूतावासानं एक ‘खास भोजन समारंभ’ आयोजित केला व ‘सन्माननीय अतिथी’ ( Guest of honour) म्हणून अनीताजींना बोलावलं.
भारतानं बोस कुटुंबाची जी उपेक्षा केली त्या पार्श्वभूमीवर हा सन्मान अगदीच किरकोळ आहे.
पण सरकारी यंत्रणेनं नेताजींच्या 125 व्या जयंतीवेळी किमान त्यांच्या कन्येचं स्मरण केलं हे ही नसे थोडके!

पण, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या समारंभाच्या वेळी अनीताजींनी ‘गेस्ट बुक’ मधे दोन ओळींचा अभिप्राय नोंदवला.. आणि शेवटी दोन समर्पक शब्द लिहिले..

“जय हिंद!”

हे शब्द केवळ अनीता बोस यांचे नाहीत… त्यांच्या धमन्यातून वाहणाऱ्या सुभाषबाबूंच्या रक्ताचा तो सहज हुंकार आहे.

जय हिंद…

Back to top button