NewsRSS

भास्कर ब्रम्हनाथकर यांच्या “आणीबाणीचे ते दिवस” या पुस्तकाला निळू फुले वाङ्‌मय पुरस्कार प्रदान..

“आणीबाणीचे ते दिवस” या श्री. भास्कर ब्रम्हनाथकर लिखित पुस्तकाला नुकताच गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलनात मानाचा “निळू फुले वाङ्‌मय पुरस्कार” भावबंधन मंगल कार्यालय नाशिक येथे प्रदान करण्यात आला आहे.. त्यानिमित्ताने..

“आणीबाणीचे ते दिवस”

जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र असलेल्या भारताच्या भाळी आणीबाणीच्या रूपाने काळा कलंक लागला होता. विचार, आचार यांचे स्वातंत्र्य नागरिकांच्या जीवनातून हद्दपार करण्यात आले. तेही केवळ तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या वैयक्तिक अहंकार जोपासणे कामी आणि सत्तालोलुपपनासाठी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक यांनी अनुभवलेली आणीबाणीची दाहकता,आणीबाणी विरोधी झालेले कार्य, याची आज आणीबाणीला ५० वर्षं पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भास्कर ब्रम्हनाथकर यांनी आणीबाणी काळातील स्वतः भोगलेल्या अमानवी अत्याचाराचे यथार्थ वर्णन म्हणजे “आणीबाणीचे ते दिवस” हे पुस्तक होय..

प्रसिद्ध लेखक ,वक्ते असलेल्या विनय सहस्रबुद्धे यांनी “आणीबाणीचे ते दिवस” या पुस्तकासाठी लिहिलेले प्रास्ताविक पुढीलप्रमाणे..

आणीबाणी विरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सत्याग्रह पर्व सुरू केले नसते, तर लोकांनी आणीबाणी स्वीकारली असेच चित्र निर्माण केले गेले अथवा झाले असते; कदाचित आणीबाणी दीर्घकाळ लांबलीही असती. संघाच्या सत्याग्रह, आंदोलनाचे महत्त्व ऐतिहासिक ठरते ते याचसाठी !

या आंदोलनात सहभागी झालेल्या हजारो सत्याग्रहींपैकी एक म्हणजे नांदेड येथील संघ स्वयंसेवक भास्करराव ब्रह्मनाथकर. आधी केले, मग सांगितले या उक्तीनुसार त्यांनी कृतिशील राहून सुरुवातीस आणीबाणी विरोधी जनमत संघटीत केले आणि नंतर स्वतः खुद्द मैदानात उतरून सत्याग्रह केला. पोलीसी अत्याचार, अमानुषतेचे अनुभव घेतले आणि अखेर निवडणुकीत इंदिरा गांधींचा सपशेल पराभव झाल्यानंतर, आणीबाणी उठल्यानंतर ते कारावासातून सुटून बाहेर आले.

आज सुमारे अर्धशतकानंतर भास्कररावांनी आणीबाणीबद्दलच्या अनुभवावर आधारित लिखाण करून नव्या पिढीला सहज समजेल अशा पद्धतीने आणीबाणी आणि तिला लोकांनी केलेला सक्रिय विरोध समजावून सांगितला आहे.

आज काही तथाकथित सेकुलर लोक अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याचे मत मांडतात. अभिव्यक्तीची आणि जीवन जगण्याच्या स्वातंत्र्याची खरी गळचेपी ही तर आणीबाणी होती. इंदिरा गांधी यांच्या विरोधात एकही शब्द न काढणे, देशातील स्थितीची माहिती होऊच नये म्हणून वृत्तपत्रांवर बंदी अशा प्रकारे गळा घोटणारी स्थिती देशावर लादत इंदिरा गांधी यांनी लोकशाहीची लक्तरे बाहेर काढली होती. सध्या ‘भारताचे तुकडे झाले पाहिजे’ इथपर्यंतची भाषा वापरली जाते. तेव्हा हाच प्रश्न निर्माण होतो की, सध्याच्या काळात अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी कशी होत आहे?

विश्व संवाद केंद्राच्यावतीने श्री.भास्कर ब्रम्हनाथकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन.. !

Back to top button