NewsSpecial Day

बलवंतराय मेहता…

या नावाने काही आठवतंय..? तुम्ही हे नाव ऐकलंय का? कदाचित नाही. चूक तुमची नाही. या देशाला चेतनाहीन आणि निस्तेज बनवणाऱ्या त्या काळच्या सत्ताधाऱ्यांनी या नावाबद्दल आपल्याला कधी सांगितलंच नाही. आजपासून बरोबर ६० वर्षांपूर्वी, बलवंतराय मेहता हे नाव भारताच्या क्षितिजावर वीजेसारखं चमकलं, उजळलं, आणि कायमचं विझून गेलं..!

१९६५ च्या सप्टेंबरमध्ये इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानने भारतावर आक्रमण केलं. १ सप्टेंबर १९६५ रोजी जम्मूतील अखनूर सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने हल्ला केला. या हल्ल्याचा उद्देश होता, काश्मीरची पुरवठा रेषा उद्ध्वस्त करणे. भारताने या हल्ल्याला प्रखर प्रत्युत्तर दिलं. हे युद्ध, ज्याला पाकिस्तानने ‘ऑपरेशन ग्रँड स्लॅम’ असं नाव दिलं होतं, २३ सप्टेंबर १९६५ पर्यंत सुरू राहिलं. यात पाकिस्तानने भारताविरुद्ध, काश्मीरसोबतच पंजाब, राजस्थान आणि गुजरातच्या सीमांवरही मोर्चा उघडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीने २३ सप्टेंबरला युद्धविराम झाला. या युद्धात १९ सप्टेंबरला एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली.

त्या वेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते बलवंतराय मेहता. हितेंद्रभाई देसाई यांच्यानंतर ते गुजरातचे दुसरे मुख्यमंत्री झाले होते. लोकशाहीच्या विकेंद्रीकरणावर त्यांचा दृढ विश्वास होता. म्हणूनच, त्यांनी पंचायती राज व्यवस्थेचा आराखडा तयार केला होता. मुख्यमंत्री बलवंतराय मेहता, गुजरातच्या पश्चिम सीमेचा आढावा घेण्यासाठी कच्छकडे जात होते. त्यांच्या बीचक्राफ्ट लाइट विमानात त्यांची पत्नी सरोजबेन, दोन स्टाफ सदस्य, एक पत्रकार, एक क्रू व एक वैमानिक, इतकी माणसं होती. वैमानिक जहांगीर इंजिनियर हे अनुभवी पायलट होते.

हे विमान कच्छच्या जवळ पोहोचताच, पाकिस्तान एअरफोर्सच्या F-86 सेबर जेट विमानाने बलवंतराय मेहता यांच्या विमानावर गोळ्या झाडल्या. पायलट जहांगीर इंजिनियर, सर्व प्रकारचे संकेत देत होता की हे नागरी विमान आहे, लष्करी नाही. तरीही, भारतीय सीमेत शिरून, पाकिस्तानी वायुसेनेच्या त्या विमानाने आधी उजव्या पंखावर आणि नंतर डाव्या पंखावर गोळ्या झाडल्या. विमानाचं संतुलन बिघडलं. विमान थेट ३००० फुट उंचीवरून खाली कोसळलं. गुजरातच्या मुख्यमंत्र्यासह सात जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची काय प्रतिक्रिया झाली..? काही विशेष नाही. किंबहुना असं म्हणंता येईल की काहीच नाही..!

जरा विचार करा, पाकिस्तानी वायुसेनेचं विमान आपल्या सीमेत शिरून, आपल्या मुख्यमंत्र्यांचं विमान पाडून जातं…आणि आपण तरीही शांत राहतो..! सत्तेत बसलेल्या तत्कालीन नेतृत्वाने आपल्या क्षात्रतेजाला, आपल्या सामर्थ्याला, आपल्या स्वाभिमानालाच पोकळ आणि निष्क्रिय बनवून ठेवलं होतं..!

(नंतर, म्हणजे घटनेच्या ४० वर्षांनी, इ.स. २०११ मध्ये, त्या पाकिस्तानी वैमानिक कैस हुसेन यांनी, भारतीय वैमानिक जहांगीर इंजिनियर यांच्या मुलीला पत्र लिहिलं. या पत्रात त्यांनी मान्य केलं की ‘त्यांना हे माहित होतं की हे नागरी विमान आहे आणि यात गुजरातचे मुख्यमंत्री प्रवास करताहेत. तरीसुद्धा, ते विमान पाडण्याचे आदेश पाकिस्तानी वायुसेनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होते’. कैस हुसेन आयुष्याच्या शेवटपर्यंत या अपराधबोधासकट जगले. म्हणूनच त्यांनी आपल्या या कृत्यावर माफी मागितली होती.)

दरम्यान झेलमपासून रावि, बियास पर्यंत, आणि चिनाबपासून नर्मदा, तापीपर्यंत बरंच पाणी वाहून गेलं. दिनदर्शिकेची पानं फडफडत उलटत राहिली… पाकिस्तानच्या आत फोफावत असलेल्या दहशतवादी, भारतविरोधी कारवायांचा कणा मोडण्यासाठी, भारतीय वायुसेनेने २७ फेब्रुवारी २०१९ रोजी पाकिस्तानच्या आत शिरून जबरदस्त एअर स्ट्राईक केला. बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयावर केलेल्या या हल्ल्यात सुमारे ३०० दहशतवाद्यांना नेहमीकरता संपवले होते…

या कारवाई दरम्यान भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे विमान पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन कोसळलं. अभिनंदन सुरक्षित होते, परंतु त्यांना पाकिस्तानी सैन्याने पकडलं. पण आताचा भारत वेगळा होता. बदललेला होता. अगदी दुसऱ्याच दिवशी, २८ फेब्रुवारी २०१९ रोजी, घाबरलेल्या पाकिस्तानने, सन्मानपूर्वक विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना भारतात परत पाठवलं..!

अगदी काही महिन्यांपूर्वीच, जेव्हा भारताने पाकिस्तानी दहशतवादाविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केलं होतं, त्या दरम्यान बीएसएफचे कॉन्स्टेबल पूर्णम कुमार शॉ, फिरोजपूर सेक्टरमध्ये गस्त घालताना चुकून पाकिस्तानच्या सीमेत गेले. पाकिस्तानी सैन्याने त्यांना पकडलं. पण पाकिस्तानने, १४ मे २०२५ रोजी, सन्मानपूर्वक कॉन्स्टेबल पूर्णम कुमार शॉ यांना भारताच्या ताब्यात दिलं.

गुजरातचे मुख्यमंत्री बलवंतराय मेहता यांना पाकिस्तानने ठरवून ठार मारलं होतं. तो ‘इंडिया’ होता… संपूर्ण देशाला निस्तेज आणि भित्रं बनवणारी सरकारं त्या दिवसांत दिल्लीवर राज्य करत होती.पण विंग कमांडर अभिनंदन वर्धमान आणि पूर्णम कुमार शॉ यांना पाकिस्तानने लगेचच सन्मानपूर्वक परत पाठवलं.

कारण, हा ‘भारत’ आहे, ‘इंडिया’ नाही..!

  • प्रशांत पोळ (आगामी इंडिया’ ते ‘भारत’ : एक प्रवास’ या पुस्तकातील उतारा)
Back to top button