CultureOpinion

सीतानवमी – सीता ही भारतीय स्त्रीत्वाचा यथार्थ आदर्श

पतिनिष्ठ, पतिव्रता आदर्श पत्नी, चारित्र्यवान, धैर्यशील व नीतिमान स्त्री म्हणून सीता नेहमीच आदर्शवत मानली गेली आहे. वैशाख शुद्ध नवमी या तिथीला मिथिलेचा राजा जनक यांना एका शेतात सीता सापडली. त्या दिवसापासून ही तिथी सीता नवमी म्हणून साजरी केली जाते. त्रेतायुगात श्रीविष्णू आपला सातवा रामवतार धारण केला. राम हा विष्णूचा अवतार होता, त्याचप्रमाणे राम पत्नी सीता ही लक्ष्मी देवीचा अंश होती, असे मानले जाते. देवाचा अवतार असूनही रामाला वनवास चुकला नाही. सीताही रामासोबत चौदा वर्षे वनवासाला गेली. मात्र, वनवासाची काही वर्षेच शिल्लक राहिली असताना रावण सीताहरण करतो. लंकेला घेऊन जातो. सीतेला परत आणण्यासाठी राम रावणदहन करतो. यानंतर राम सीतेला घेऊन अयोध्येला परत येतो आणि रामराज्याला सुरुवात होते. सीता जयंती, सीता नवमीनिमित्त सीता माते मधील असाधारण वैशिष्टे तसेच जन्मापासून ते जमिनीत पुन्हा अंतर्धान पावेपर्यंत सीतेच्या जीवनात कोणती महत्त्वाची ठिकाणे होती? याविषयी जाणून घेण्याकरिता हा लेखप्रपंच .

सीता मातेचे असाधारण गुण :-१) असाधारण पतिव्रता :भारतीय संस्कृतीत हे एक आश्चर्यच आहे. वनवास प्रभू श्रीरामांना मिळाला होता. परंतु सीतामातेने राजमहालातील सर्व सुख, धन, ऐश्वर्य व वैभव यांचा त्याग करून श्रीराम यांचेसह वनवासाचे कष्टमय जीवन स्वीकारले व वनवासात निघून गेल्यात. विवाहाच्या वेळी आपल्या पतीला सप्तपदी चालतांना दिलेली सर्व वचने त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत काया वाचा व मनाने पूर्णत्वास नेलीत.२) गृहिणी व कामकाजी दोन्ही भूमिका सांभाळणे :- माता सीता केवळ गृहिणी या भूमिकेत राहून स्वयंपाक बनविणे, कपडे धुणे, साफसफाई करणे एवढ्यावरच थांबत नव्हत्या तर श्रीरामांच्या प्रत्येक कार्यात सहकार्य करीत होती या अर्थाने त्या कामकाजी सुद्धा होत्या. श्रीराम वनवासात असतांना जिथे मुक्काम करण्याकरीता जागा निश्चित करायचे तेथे तीन जणांच्या निवासासाठी कुटी बनवायचे, स्वयंपाकासाठी इंधन एकत्र करणे, कंद मुळे एकत्र करणे या सर्व कामात लक्ष्मणासोबत सीता मातही मदत करायच्या३) साहसी सीतामाता :सीतामातेचे रावणाने अपहरण केल्यानंतर दोन वर्ष त्या रावणाच्या कैदेत होत्या. अशोक वाटिकेत असंख्य चित्र विचित्र भयानक राक्षशिणी त्यांच्यावर पहारा करीत होत्या. या कठीण परिस्थितीत सीतामाई शील,सहनशीलता, साहस आणि धर्म यांचे पालन करीत होत्या. रावणाने सम,दाम,दंड, भेद, या सर्व नितींचा अवलंब करून सीतामाईला वश करण्याच पर्यंत केला परंतु सीतामाई वश न होता अतुलनीय साहसाचा परिचय दिला. त्यांना रावणाच्या ताकद व वैभवाच्या तुलनेत प्रभू श्रीरामांच्या शक्तींवर पूर्ण विश्वास होता.४) सीतामातेचा दुर्दम्य विश्वास :- हनुमंत सीतामातेचा शोध घेत अशोक वाटिकेत पोहचतात. सीता मातेला श्रीरामची अंगठी खूण म्हणून देतात. त्यावेळी सीता मातेह्क धीर काही क्षण सुटतो व त्या हनुमंताला विचारतात की श्रीराम माझी सुटका करण्याकरीता इतका विलंब का मावत आहेत. त्यावर हनुमंत भावनिक होऊन म्हणतात माते मी तुम्हाला याक्षणी मुक्त करून श्रीराम प्रभूजवळ घेऊन जातो. त्यावेळी माता सीता म्हणतात माझा श्रीरामांवर पूर्ण विश्वास आहे. ते येतील रावणाचा वध करतील सर्व राक्षसांना मारतील व मला ससन्मान येथून घेऊन जातील. अन्य कुणाही सोबत मी गेल्यास माझ्या पतिव्रत धर्माला योग्य ठरणार नाही. अतिशय कठीण व विपरीत परिस्थितीतही सीता मातेचा श्रीरामंवर व आपल्या पतिव्रत धर्मावर दुर्दम्य विश्वास होता.

सीतामातेच्या जन्मापासून ते जमिनीत पुन्हा अंतर्धान पावेपर्यंत सीतेच्या जीवनात कोणती महत्त्वाची ठिकाणे :१) *पुनौरा मंदिर, सीतामढी:-* नौरा मंदिर, सीतामढी हे स्थान बिहार राज्यात आहे. हे स्थान त्याकाळी राजा जनकाच्या मिथिला राज्यातील राजधानी क्षेत्रात येत असल्याचे सांगितले जाते. काही धार्मिक ग्रंथांनुसार, सीतामढी पुनौरा गावात सीता एका शेतात प्रकट झाली आणि हेच तिचे जन्मस्थान आहे, असे मानले जाते. जनक राजाला शेत नांगरताना सीता सापडली असल्याचेही सांगितले जाते. या ठिकाणी एक मंदिर असून, सीता प्रकट झाल्याच्या घटनांची चित्रे येथे पाहायला मिळते.

२) जनकपूर :-जनकपूर ही राजा जनकाची राजधानी. हे स्थान आता नेपाळ देशात येते. सीता मातेच्या स्मृतिप्रित्यर्थ येथे एका भव्य मंदिराचे निर्माण करण्यात आले आहे. नेपाळच्या प्रमुख पर्यटन स्थळांपैकी प्रमुख हे स्थान आहे. याच ठिकाणी सीतेचा विवाह श्रीराम यांच्याशी झाला होता. १९११ मध्ये टीकमगडची महाराणी वृषभानू यांनी जानकी मंदिराची उभारणी केली असून, या मंदिराच्या निर्माणासाठी ९ लाख रुपयांचा खर्च आला होता. या जानकी मंदिराला नौलखा मंदिर या नावानेही ओळखले जाते.

३) कनक भवन :-अयोध्या येथे कनक भवन असून, हे स्थान म्हणजे सीतेचा महाल असल्याचे सांगितले जाते. रामाशी विवाह झाल्यानंतर याच महालात सीता आणि राम वास्तव्यास होते. या भवनात कौसल्या मातेने प्रथम सीतेला पाहिले होते. याच कनक भवनाचे मंदिरात रुपांतर करण्यात आले आहे. या मंदिरात केवळ श्रीरामांची मूर्ती आहे. याच कारणावरून हे सीता आणि श्रीरामांचे हे अंतःपूर असल्याचे सांगितले जाते. या भवनात हनुमानाची मूर्ती असून, ती अंगणात आहे.

४) पंचवटी :-महाराष्ट्र राज्यातील नाशिकमध्ये पंचवटीचा परिसर आहे. या भागात वडाचे पाच भले मोठे वृक्ष होते. म्हणूनच कालांतराने या भागाला पंचवटी असे नाव पडले. अयोध्येहून वनवासाला निघाल्यावर श्रीराम, लक्ष्मण आणि सीता काही काळ पंचवटी येथे वास्तव्यास असल्याचे दाखले आढळून येतात. याच ठिकाणी लक्ष्मणाने शूर्पणखाचे नाक कापले होते आणि रावणाने सीताहरण केले होते, असे सांगितले जाते. या ठिकाणी श्रीरामांचे एक मंदिर असून, हजारो भाविक या ठिकाणी श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी येत असतात.

५) सीता रसोई :- सीता रसोई नावाचे कोणते स्वयंपाक घर नसून, हे एक मंदिर आहे. हे मंदिर अयोध्येत आहे. हे स्थान रामजन्मभूमीपासून अगदी जवळ आहे. सीता रामाशी विवाहासाठी केल्यानंतर अयोध्येत आल्यानंतर एक परंपरा म्हणून सीतेने या ठिकाणी राज परिवारासाठी एकदा स्वयंपाक केला होता, असे सांगितले जाते. श्रीराम जन्मभूमीच्या जवळच हे स्थान असल्यामुळे या स्थानालाही तितकेच महत्त्व प्राप्त झाले असून, हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात.

६) सीतावनी :- सीतावनी हे स्थान नैनिताल येथे असलेल्या जीम कॉर्बेटच्या जंगलात आहे. हे स्थान पक्षी पाहण्यासाठी आणि जंगली प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे. रामांचा राज्याभिषेक झाल्यानंतर काहीच दिवसांनी सीतेला अयोध्या सोडावी लागली होती. यानंतर सीतेने काही काळ वनवासात व्यतित केला. यानंतर सीता वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात राहिली. तेच हे स्थान. वाल्मिकी ऋषींचा आश्रम याच परिसरात होता. याच आश्रमात सीतेने लव-कुश यांना जन्म दिला, असे सांगितले जाते.

७) सीता समाधी :-रावणदहानंतर लंकेत सीतेला अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागले होते. श्रीरामांच्या राज्याभिषेकानंतर अल्पावधीतच तिला पुन्हा वनवासात जावे लागले. सीतेचे एकूणच आयुष्य संघर्षमयच होते. लव-कुश यांची श्रीरामांशी भेट झाली, तेव्हा सीतेच्या चारित्र्याविषयी पुन्हा चर्चा झाली. याचवेळी सीतेने टाहो फोडला. पृथ्वीचे आवाहन केले. त्याचक्षणी जमीन दुभंगली आणि सीता पृथ्वीमध्ये अंतर्धान पावली. तेच हे ठिकाण. सीतावनी जवळ हे स्थान असल्याचे सांगितले जाते. तर काहींच्या मते उत्तर प्रदेशातील संत रविदास नगर येथे एक सीतेचे समाधीस्थळ आहे. तेथे सीता अंतर्धान पावली, असे सांगितले जाते.

सीतेच्या पदचिन्हांचे अनुसरण करूनच आर्यावर्तातील (भारतातील) स्त्रियांनी आपल्या प्रगतीचा मार्ग आखणे योग्य आहे. सीतेचे चारित्र्य केवळ अनुपम होय. यथार्थ भारतीय स्त्रीत्वाचा सीता म्हणजे नमुनाच होय; कारण त्या एकमेव , ‘सीताचरित्रा’तूनच पूर्ण स्त्रीत्वाचे भारतीय आदर्श विकसित झालेले आहेत.पावित्र्याहून पवित्र, सहनशीलतेची, सहिष्णुतेची मूर्तीमंत पुतळी ती महिमाशालिनी सीता त्या पदावर अगदी अढळ राहील ! जिने ते कटुकठोर दु:खमय जीवन एक अवाक्षर तोंडातून न काढता व्यतीत केले, ती सदाशुद्ध आणि परम पतिव्रता सीता ही आर्यजनांची आदर्श देवता आणि आमची राष्ट्रदेवता आमच्या हृदयसिंहासनावर चिरकाल अधिष्ठित राहीलच राहील ! सीतेचा आदर्श आमच्या अगदी रोमारोमांतून भिनलेला आहे. सीताचरित्रापासून आमचे स्त्री-जीवन दूर नेऊन त्यात आधुनिकता आणण्याचा कोणताही प्रयत्न तात्काळ निष्फळ ठरतो, हे आपण प्रत्यक्षही पहातच आहोत. असे स्वामी विवेकानंद म्हणतात.

लेखांकन :- विवेक वसंतराव सोनक, प्रांत प्रचार प्रमुख

विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत

9370109298

Back to top button