HinduismNews

महानुभाव पंथ :- भाग ५

mahanubhav panth chakradhar swami

श्री चक्रधर स्वामी यांच्या जयंती निमित्त ५ भागांची विशेष मालिका (५-५)

परस्परांपासून पूर्णपणे स्वतंत्र अनादिचे चार पदार्थ-

१) जीव :- निरानंद, संख्येने अनंत, अज्ञान, अन्यथाज्ञान, अविद्यायुक्त, परमेश्वराच्या आनंदास, मोक्षास पात्र.
२) देवता :- ८१ कोटी सव्वालक्ष १०. सर्वात मुख्य माया. सृष्टीची सर्व कामे तीच्या अधिन व ती परमेश्वराच्या अधिन.
देवतांच्या ठिकाणी पंचप्रकार आहे. १) ज्ञान २) सुख ३) सामर्थ्य ४) ऐश्वर्य ५) प्रकाश
३) प्रपंच:- नाशिवंत, मिथ्या, पंचमहाभूतांनी व तीन गुणांनी युक्त. १) भूमी २) पाणी ३) अग्नी ४) वायू ५) आकाश. तीन गुण : रज, तम , सत्त्व.

४) परमेश्वर:- दयाळू, मायाळू, कृपाळू, कनवाळू, अशा अनेक गुणांनी युक्त ज्ञानमय, आनंदमय, निराकार, अनंत, शक्ती युक्त, जीवना संसारचक्रापासून मुक्ती देण्यासाठी अवतार घेतो.

विधी- चतुर्विध साधन- परमेश्वर अवतार घेऊन अधिकारी जीवांना ज्ञाना-प्रेमाचे दान करतात. आपले सन्निधान ( सहवास ) देऊन त्यांना सेवा-दास्य घडवून योग्य करतात आणि मुक्ती देतात. पण ज्यांना परमेश्वराचे सन्निधान लाभत नाही. अशा जीवांसाठी सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामींनी चतुर्विध सांगितली त्याद्वारे जीव मोक्ष प्राप्त करू शकतो. साधन म्हणजे माध्यम. स्थान, प्रसाद ही दोन साधने जड व भिक्षुक, वासनिक ही चेतन आहेत.

१) स्थान : स्थान या शब्दाचा अर्थ ठिकाण, जागा परंतु महानुभाव पंथात ज्या ठिकाणाला जागेला परमेश्वर अवताराचा संबंध (स्पर्श) झाला त्याला ‘स्थान’ असे म्हणतात.

२) प्रसाद : परमेश्वराने प्रसन्न होऊन दिलेले वस्त्र किंवा वस्तू.

३) भिक्षुक : परमेश्वराला आपले जीवन समर्पित करून त्याने सांगितल्यानुसार वागणारा आचारणशील जीव.

४) वासनिक : गृहस्थाश्रमी राहून परमेश्वराची आराधना करणारा. आपले जीवन परमेश्वराला अर्पित करण्याची इच्छा असणारा. विशेष : ज्या ठिकाणाला परमेश्वर अवताराचा संबंध झालेला आहे अशा जागेहून म्हणजेच स्थानापासून ‘आणलेला पाषाण’ म्हणजेच विशेष होय.

चतुर्विध स्मरण- एक-एक नामाचा क्रमाक्रमाने जप (समरण) करावा तो करताना ज्या अवताराच्या नामाचा जप त्याच अवताराच्या लीळा, चेष्टा आठवाव्या श्रीकृष्ण नामाचा जप तर त्यांचीच लीळा (चरित्र) असावी. परमेश्वर नामाचा जप करताना ते खाली सांगितलेल्या चार प्रकारांनी करावे, स्मरणाने अनेक विघ्न नष्ट होतात, दु:ख निवृत्ती होवून सुख प्राप्ती होते व मोक्ष मिळतो.

१) नाम : पंचावतारांच्या नावाचा जप करावा.
२) लीला : पंचावतारांनी केलेली चरित्रे आठवावी.
३) मूर्ती : ज्या अवताराच्या नामाचा जप त्याच अवताराची मूर्ती वर्णनाप्रमाणे आठवावी.
४) चेष्टा : परमेश्वर अवताराने जड वास्तूशी केलेला खेळ.

महास्थाने- १) माहूर २) पांचाळेश्वर ३) फलटण ४) ऋद्धपूर ५) पैठण ६) डोमेग्राम ७) बेलापूर जाळीचादेव.

महत्त्वाचे उत्सव- १) पंचावतार अवतारदिन साजरे करणे. २) पविते पर्व (नारळी पौर्णिमा)

प्रमुख यात्रा- जाळीचादेव (दंडी पौर्णिमा), फलटण (चैत्र पंचमी), पांचाळेश्वर (चैत्रसप्तमी), माहूर (श्रीदत्त जयंती)

नियम (१) …

१) गुरूच्या मुखाने ज्ञान एकणे.
२) सकाळ – सायंकाळ देवपूजा , आरती करणे.
३) सकाळी – रात्री परमेश्वराचे स्मरण करणे.
४) आश्रमांमध्ये दान करणे.
५) प्रसंगानुसार किंवा वर्षातून एकवेळ स्थान वंदनाला जावे
६) आषाढी एकादशी, शिवरात्री, अष्टमी या वेळेस प्रसाद वंदनासाठी जावे.
७) संत-महंतांना, रिकाम्या हाताने भेटू नये. यथाशक्ती दान द्यावे.
८) गावात, परिसरात, स्थान, मंदिर, आश्रम असेल तर तिथे नेहमी दर्शनार्थ जावे.

नियम (२) …

१) महानुभाव पंथाचा उपदेश घेताना सप्तव्यसनांचा त्याग करणे.
२) परमेश्वराशिवाय कुण्याही देवतेला न भजने, एकनिष्ठ भक्ती करणे.
३) अंधश्रद्धा न बाळगणे.
४) हिंसा न करणे.
५) दारूचे दुकान, शेळ्या-मेंढ्या, कोंबड्या मारणे, इत्यादी व्यवसाय न करणे.
६) मंत्र-तंत्राला शरण जाऊ नये.

सप्तव्यसनापासून दूर राहणे :-

१) जुगार २) मद्यपान ३) मांसाहार ४) वेश्यागमन ५) चोरी ६) शिकार ७) परस्त्रीगमन.

महानुभाव पंथ (mahanubhav panth) माणसाला ऐहिक सुखात रमण्यापेक्षा पारमार्थिक आनंदात रमण्याचा मार्ग दाखवितो. श्री चक्रधरांनी पंथापुढे जे आदर्श घालून दिले ते आजही सर्वांनाच आचरणीय आहेत. वेदांनी किंवा वैदिक-हिंदू धर्माने ज्यांची उपेक्षा केली त्या स्त्री-वंचितांना हा पंथ मानाने,आदराने वागवितो, मोक्षाचा मार्ग दाखवितो.

महानुभाव पंथाची जी नीतिमूल्ये सांगितली आहेत ती त्रिकालाबाधित असून सार्वत्रिक महत्त्वाची आहेत. हा पंथ केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर सिंध, पंजाब, तेलंगण, गुजराथ इ. प्रांतात आजही अस्तित्वात आहे. महाराष्ट्रात आजही अनेक गावांतून विशेषतः विदर्भ, मराठवाडा या भागात ह्या पंथाचे लोक मोठ्या संख्येने आढळतात.

भागवत पंथात ज्याप्रमाणे प्रत्येक कर्म कृष्णार्पण तसेच फलही कृष्णार्पण करीत. जीवन तन-मन-धन कृष्णभावना भावित असावे. त्याप्रमाणेच हा महानुभाव पंथ ही ‘कृष्ण’ या दैवताच्या अधीन होण्याचेच सांगतो. गीता ज्याप्रमाणे सर्व हिंदूंना प्राणप्रिय आहे, भागवतांना आचरणीय वाटते तेवढीच महानुभवांनाही वाटते.
महानुभाव हे श्रीकृष्णाला ( sri krishna) आराध्य मानत असले तरी ते अवैदिक परंपरेत समाविष्ट होतात. म्हणूनच वारकरी संप्रदायाने त्यांना विरोध केलेला दिसतो.

म्हणजे काही बाबतीत हा महानुभाव पंथ वेदांच्या विरोधात बंड करत असलेला दिसत असला तरी भगवद्गीतेला (Bhagavad Gita) वेद-उपनिषिदांचे ‘सार’ मात्र जरूर म्हणतो.

महानुभाव पंथाने विटाळ, स्पृश अस्पृश्यता ह्यांविषयी समाजात रूढ असलेल्या कल्पना दूर करून, जाती निर्मुलनाचे मौलिक कार्य ८०० वर्षांपूर्वी केले..

समाप्त ..

संदर्भ :-

https://papers.ssrn.com/sol3/papers.cfm?abstract_id=3636560

https://www.esakal.com/saptarang/sadanand-more-writes-about-mahanubhav-and-varkari-22838#google_vignette

https://www.hmoob.in/wiki/Mahanubhava

Back to top button