HinduismNewsReligion

बहीण-भावाच्या अतूट नात्याचा पवित्र सोहळा : भाऊबीज

दीपावलीच्या आनंदोत्सवातील शेवटचा पण प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करणारा सण म्हणजे ‘भाऊबीज’.  रक्ताच्या आणि आदराच्या नात्याला कृतज्ञतेची झालर लावणारा हा कौटुंबिक सोहळा हिंदू संस्कृतीचे एक अमूल्य लेणे आहे. या सणाला ‘यमद्वितीया’ असेही म्हटले जाते, ज्याच्या मागे एक पौराणिक कथा आहे. 

या दिवशी म्हणजेच कार्तिक शुद्ध द्वितीयेला मृत्यूचे देवता ‘यमराज’ आपली बहीण ‘यमुना’ हिच्या घरी गेले होते. यमुनेने आपल्या भावाचे अत्यंत प्रेमाने स्वागत केले. यमुनेच्या यमराजाच्या कपाळावर टिळक लावून त्याची ओवाळणी केली  आणि सुग्रास भोजनाचा आस्वाद दिला. यमुनेच्या या आदरातिथ्याने प्रसन्न होऊन यमराजाने तिला एक वर दिला. तो वर असा होता की, “भाऊबीजेच्या जो भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जाऊन तिचे आतिथ्य स्वीकारेल आणि बहिणीकडून ओवाळून घेईल, त्याला अकाल मृत्यूची भीती राहणार नाही आणि त्याचे जीवन सुख-समृद्धीने भरेल.” तेव्हापासून बहिणीने भावाला ओवाळण्याची आणि भावाने बहिणीचे रक्षण करण्याची ही सुंदर परंपरा सुरू झाली. 

तेंव्हापासून भाऊबीजेच्या दिवशी बहीण आपल्या भावासाठी मनोभावे प्रार्थना करते. भावाला पाटावर बसवून, त्याच्या कपाळावर कुंकवाचा टिळक लावला जातो आणि अक्षता लावल्या जातात. त्यानंतर चांदीच्या तबकात निरंजन ठेवून भावाला ओवाळले जाते. बहीण भावाच्या आवडीचे गोडधोड पदार्थ  बनवते. भावाला अत्यंत प्रेमाने जेवू घालणे हा या सणामागे आनंद असतो. ओवाळणी झाल्यानंतर भाऊ आपल्या बहिणीला तिच्या रक्षणाचे वचन देतो आणि प्रेमपूर्वक ‘ओवाळणी’ म्हणून भाऊबीजेची भेट देतो.

आजच्या धावपळीच्या युगात जेव्हा भावंडे शिक्षणासाठी, नोकरीसाठी एकमेकांपासून दूर राहतात, तेव्हा भाऊबीज हे पुन्हा एकत्र येण्याचे एक हक्काचे निमित्त असते. बालपणीच्या आठवणींना उजाळा देणे, एकमेकांच्या सुख-दुःखात सोबत असण्याची ग्वाही देणे आणि नात्यातील गोडवा अधिक दृढ करणे, हेच या सणाचे मूळ उद्दिष्ट आहे. 

थोडक्यात सांगायचे तर, भाऊबीज हा सण परिस्थिती कितीही बदलली तरी बहीण-भावाच्या नात्यातील ओलावा आणि प्रेम कधीच कमी होऊ देत नाही. अशा बहीण-भावाच्या नात्याचा गौरव करणाऱ्या मंगल पर्वाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 

Back to top button