HinduismNews

सनातन संस्कृतीचा अमृतवारसा – कुंभमेळा

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२६ च्या बातम्या आपण अनेक दिवसांपासून ऐकत होतो, वाचत होतो. या कुंभमेळ्याचा शुभारंभ ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी ध्वजारोहण, गणपतीपूजन आणि पुण्याहवाचनाने झाला आहे.

या कुंभमेळ्याला धार्मिक आणि आध्यात्मिक आयाम आहेत. तसेच त्याला पौराणिक महत्त्व असून, ग्रहांची भौगोलिक स्थिती याची अंगे प्रत्यांगे याचे ही महत्व आहे. कुंभमेळा कुठे भरवला जातो, यामागे एक पौराणिक कथा आहे. पुराणांत तसेच श्रीमद्भागवतात उल्लेख असलेली समुद्रमंथनाची लीला सर्वश्रुत आहे. देव आणि दानव हे दोघेही सामर्थ्यवान होते. त्यामुळे आपापले सामर्थ्य दाखविण्यासाठी त्यांनी मंदार पर्वताची रवी आणि वासुकी चा दोर म्हणून उपयोग करून समुद्रमंथन केले. देवांचा राजा इंद्र, तर दानवांचा बळी होता. या मंथनातून चौदा रत्ने बाहेर आली. त्यात अमृत आणि हलाहल (विष) यांचाही समावेश होता. हलाहलाचे प्राशन भगवान शंकरांनी केले. अमृताच्या वाटपावरून पुन्हा युद्ध सुरू झाले. त्यावेळी भगवान विष्णूंनी मोहिनी अवतार धारण केला. या प्रसंगात अमृताचे थेंब चार पवित्र क्षेत्रांमध्ये पडले. त्यांपैकी एक क्षेत्र म्हणजे गोदावरी नदीवरील रामकुंड. हेच या कुंभमेळ्याचे स्थल महात्म्य होय.

चंद्र कर्क राशीत, तर सूर्य आणि गुरू सिंह राशीत येतात. साधारणतः बारा वर्षांनी असा योग जुळून येतो. म्हणूनच याला सिंहस्थ कुंभमेळा असे म्हणतात. हा काळ अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो. या काळात वैश्विक ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत याठिकाणी असतो. ही सकारात्मक ऊर्जा घेण्यासाठी ऋषी-मुनी, संत-महंत आणि भक्त-भाविक या क्षेत्री येतात.

यंदा ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी या पर्वाचा प्रारंभ होऊन, २०२७ आणि २०२८ असा तीन वेळा गुरू आणि सूर्य सिंह राशीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे या कुंभपर्वाला त्रिखंडात्मक स्वरूप प्राप्त झाले आहे. हा अपूर्व आणि दुर्मीळ योग मानला जातो. याच काळात विविध मठांचे मठाधिपती, श्रद्धेय शंकराचार्य आणि इतर पीठांचे पीठाधीश स्नान करतात. त्यालाच अमृत स्नान असे म्हणतात. थोडक्यात सांगायचे तर, संपूर्ण चराचराला निसर्ग म्हणजे ईश सृ,ठी अनुकूल होते. परिणामी, वातावरण आणि परिसर सुखमय व आनंदमय होतो.

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याचे वैशिष्ट्यही वेगळेपणाने सांगितले जाते. येथे शैव आणि वैष्णव संप्रदायांचे अनुयायी एकत्र येतात आणि रामकुंडात स्नान करतात. संप्रदाय म्हणजे सम्यक प्रदान करतो तो संप्रदाय. सांप्रदायिक उपासना आणि साधनेच्या माध्यमातूनच साधकाला आपल्या गंतव्य स्थानापर्यंत पोहोचता येते. या कुंभमेळ्यात सामाजिक दृष्टिकोनही महत्त्वाचा आहे. यंदा आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. वंचित घटकांतील हजारो बांधवांच्या सहभागाने महाआरतीचेही आयोजन करण्यात आले आहे. थोडक्यात, “पृथ्वीमध्ये जितुकी शरीरे| तितुकी भगवंताची घरे |” किंवा “जे जे भेटे भूत| ते ते मानिजे भगवंत | ” ही संताज्ञा/वेदाज्ञा याचे विलोभनीय दर्शन येथे घडेल.

कुंभमेळ्यात भारतातील सर्व ज्ञानी- महंत येतात. सतत प्रवचने, किर्तने, नामसंकिर्तन, भजन, सत्संग याचा यानिमित्ताने श्रवणलाभ होतो. वेदवचने- शास्त्रवचने- संतवचने देहाच्या कुंभात कर्णपुटातून श्रवण करून जीवन पवित्र करून घेणे याला अमृत स्नान म्हंटले आहे. जलाने देहस्नान, प्रार्थना- भजनाने मानसस्नान, तर वेदांत, शास्त्रविचार, प्रवचन- प्रबोधनातून बौद्धिक स्नान हीच अमृत स्नानाची उद्दिष्टे आहेत.

कुंभ म्हणजे घट होय. देहरूपी घटांचा मेळावा म्हणजेच कुंभमेळा. येथे वैचारिक मंथन घडले पाहिजे. विषयविकाररूपी विष आणि शाश्वत तत्त्वरूपी अमृत यांचे मंथन घराघरात घडले पाहिजे. याच मंथनातून समाजरूपी वस्त्र उत्तम प्रकारे विणले गेले पाहिजे. व्यक्ति प्रबोधनातून समष्टि उत्थान आणि विकास साधणे, हाच यामागचा खरा हेतू आणि प्रयोजन होय.

या कुंभमेळ्यात सत्संगती, सद्विचार, वेदविचार आणि भगवद्भक्ती यांची जणू बाजारपेठच भरते. परिणामी, पुण्यकर्मे आणि पुण्यसंचयासाठी हे सारे पूरकतेने घडते. मानवाच्या चारित्र्याची जडणघडण घडविणारी ही प्रासंगिक सोय आपल्या संस्कृतीने केली आहे. अशा या धन्य सनातन संस्कृतीला नमन करून आपण तिचे पाईक होऊया.

लेखिका – ह.भ.प. अलका मुतालिक

Back to top button