“कुंभ’ या संस्कृत शब्दाचा अर्थ घडा, घट किंवा कलश असा होतो. ‘मेळा’ म्हणजे विविध ठिकाणांहून आलेल्या लोकांचा धार्मिक किंवा सांस्कृतिक सोहळ्यानिमित्त भरलेला समुदाय.” हिंदू संस्कृतीमध्ये कुंभ, घट किंवा कलश पूजनाला विशेष महत्त्व आहे. कलशपूजनाच्या वेळी पुढील मंत्राचे उच्चारण केले जाते.
‘कलशस्य मुखे विष्णुः कण्ठे रुद्रः समाश्रितः ।
मूले त्वस्य स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणाः स्मृताः ॥
कुक्षौ तु सागराः सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरा ।
ऋग्वेदोऽथ यजुर्वेदः सामवेदो ह्यथर्वणः ।
अङ्गैश्च सहिताः सर्वे कलशं तु समाश्रिताः ॥
अर्थ : “कलशाच्या मुखाशी विष्णू, कंठाशी रुद्र आणि मुळाशी ब्रह्मदेव विराजमान आहेत. मध्यभागी मातृगणांचा वास आहे. कलशाच्या उदरात सर्व सागर आणि सात द्वीपांनी युक्त पृथ्वी सामावलेली आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे वेद त्यांच्या अंगांसह कलशात वास करतात.” नाशिक, त्र्यंबकेश्वरच्या पावन भूमीवर १२ वर्षांनंतर अवतरलेला सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ एक धार्मिक सोहळा नसून भारताच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक व सामाजिक प्रगतीचा सूर्योदय आहे. ३१ ऑक्टोबरच्या मंगलमयी अभिजात मुहूर्तावर, मंत्रोच्चारांच्या पवित्र जयघोषात झालेल्या ध्वजारोहणाने तब्बल २२ महिन्यांच्या या प्रदीर्घ ज्ञान व भक्तीच्या महायज्ञाचा श्रीगणेशा झाला आहे. ध्वजारोहण सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नाशिकच्या पवित्र रामकुंडावर झालेले धर्मध्वजाचे आरोहण आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कुशावर्तावर झालेले ध्वजारोहण होय.
देशाच्या राष्ट्रपती या सर्वोच्च घटनात्मक पदावर विराजमान असलेल्या जनजातीय समाजातील महिलेच्या उपस्थितीत या पर्वाचा शुभारंभ होणे, ही भारतीय समाजजीवनातील सर्वसमावेशकतेची आणि जनजातीय समाजाच्या सन्मानाची महत्त्वपूर्ण घटना आहे.ज्या संस्कृतीने शतकानुशतके ‘वसुधैव कुटुंबकम्’चा विचार जपला, तिने आज पुन्हा एकदा आपल्या कृतीतून सामाजिक एकात्मतेचा,बंधुत्वाचा एक अभूतपूर्व संदेश जगाला दिला आहे. एकीकडे नाशिकच्या रामकुंडावर राष्ट्रपतींच्या उपस्थितीने या पर्वाचे राष्ट्रीय आणि जागतिक महत्त्व अधोरेखित झाले, तर दुसरीकडे त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झालेल्या ध्वजारोहणाने प्रशासकीय आणि लोकशाही मूल्यांचा सुंदर संगम घडवून आणला.
शंकराचार्य, आखाड्यांचे प्रमुख, साधू-संत, पुरोहित आणि लोकप्रतिनिधी यांच्या सामूहिक उपस्थितीने विविध धार्मिक परंपरा आणि लोकप्रतिनिधित्वाचा संगम पहायला मिळतो. हा सिंहस्थ कुंभमेळा केवळ स्नानापुरता मर्यादित नसून, तो या देशाच्या सांस्कृतिक पुनरुत्थानाचा आणि सामाजिक परिवर्तनाचा नवा अध्याय ठरणार आहे. परंपरेचा सार्थ अभिमान बाळगत असतानाच, समाज म्हणून आपण किती प्रगल्भ आणि समरस होत आहोत, याचीच प्रचिती या अभूतपूर्व ध्वजारोहण सोहळ्याने संपूर्ण विश्वाला दिली आहे. ध्वजारोहणाच्या मंगल प्रारंभाने नाशिक-त्र्यंबकेश्वर नगरीत आगामी कुंभपर्वाची उत्सुकता, उत्साह अधिक वृद्धिंगत होत जाणार आहे.

सिंहस्थ ध्वजात दडलेला भारतीय संस्कृतीचा गूढार्थ..
नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या पावन भूमीत उलगडणारे सिंहस्थ पर्व ही केवळ लक्षावधी भाविकांच्या श्रद्धेची पर्वणी नसून भारतीय संस्कृतीच्या प्रगल्भतेचा, तत्त्वज्ञानाचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा एक अपूर्व सोहळा आहे. सिंहस्थ पर्वाच्या औपचारिक प्रारंभाचे प्रतीक म्हणजे सिंहस्थ धर्मध्वज.भारतीय परंपरेत ध्वज किंवा पताका हे केवळ वस्त्र नसून ते कोट्यवधी जनमानसाची अस्मिता, सामूहिक चेतना, आध्यात्मिक प्रगतीचे असते. मंदिराच्या उत्तुंग शिखरावरून विश्वाला साद घालणारा भगवा ध्वज असो की रणभूमीवर शौर्याची ग्वाही देणारा विजयध्वज..
प्रत्येक चिन्हामागे एक समृद्ध इतिहास व वैचारिक अधिष्ठान दडलेले असते. त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्यात उभारला जाणारा धर्मध्वजही याला अपवाद नाही. या ध्वजाकडे केवळ एका धार्मिक विधीचा भाग म्हणून न पाहता, भारतीय अध्यात्म आणि सांस्कृतिक वारशाच्या एका भव्य प्रतीकात्मक आविष्काराच्या दृष्टीने पाहणे अधिक संयुक्तिक ठरते. सिंहस्थ धर्मध्वजाची वीण निसर्ग, कालगणना आणि मानवी जीवन यांच्या अतूट नात्याने विणली गेली आहे. बारा राशींचे गतिमान कालचक्र, दशाही दिशांना व्यापून उरणारी ईश्वरी तत्त्वाची व्यापकता, अमृतकुंभाची अलौकिक गाथा आणि आदिगंगा गोदावरीच्या पावित्र्याचा गौरव यांचा एक विलक्षण संगम या ध्वजाच्या रूपामध्ये पाहायला मिळतो.
भारतीय पुराणपरंपरेतील समुद्रमंथनाचा अध्याय या संकल्पनेचा गाभा आहे. देव आणि दानवांच्या सामूहिक प्रयत्नातून निघालेल्या अमृतकुंभाचे रक्षण करण्यासाठी सूर्य, चंद्र आणि देवगुरू बृहस्पती (गुरु ग्रह) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. याच पौराणिक आणि खगोलीय घटनेची स्मृती म्हणून त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ धर्मध्वजावर या खगोलीय घटकांना मानाचे स्थान दिले जाते. हा केवळ योगायोग नसून निसर्गातील शक्तींशी मानवी चेतना जोडण्याचा एक उदात्त यत्न आहे. आजच्या डिजिटल विज्ञानाचा उगम होण्यापूर्वी प्राचीन ऋषीमुनींनी विश्वाच्या रचनेचा आणि ग्रह-ताऱ्यांच्या गतीचा केलेला सखोल अभ्यास थक्क करणारा आहे. आजचे आधुनिक विज्ञान अत्यंत प्रगत उपकरणांच्या साहाय्याने अंतराळाचा वेध घेत असले तरी हजारो वर्षांपूर्वी प्राचीन भारतीयांनी केवळ सूक्ष्म निरीक्षण आणि गणिती अचूकतेच्या जोरावर सिंहस्थासारख्या महाअद्भूत कालपर्वाची रचना केली होती. भारतीय ज्योतिषपरंपरेनुसार गुरू ग्रहाचा सिंह राशीत प्रवेश हा नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थाचा प्रमुख आधार आहे. विशिष्ट पर्वकाळ निश्चित करताना सूर्य आणि चंद्राच्या राशीस्थितीचाही विचार केला जातो. या खगोलीय गणनेशी सिंहस्थाची परंपरा जोडलेली आहे.
सिंहस्थ ध्वजावर असलेल्या चिन्हांचे महत्त्व पुढीलप्रमाणे..

बारा घंटा आणि कालचक्र..
सिंहस्थ धर्मध्वजावरील बारा घंटा हे त्याचे विशेष वैशिष्ट्य.. ज्योतिषपरंपरेत बारा राशींना महत्त्वाचे स्थान आहे. देवगुरू बृहस्पतीच्या राशिचक्रातील भ्रमणाशी संबंधित कालगणना व सिंहस्थ पर्वाचा योग यांचा प्रतीकात्मक संदर्भ या घंटांमधून व्यक्त होतो. बृहस्पतीला राशिचक्राचा एक आवर्तन पूर्ण करण्यासाठी साधारण बारा वर्षे लागतात. याच कालचक्राशी सिंहस्थ कुंभाची परंपरा जोडली गेली आहे. घंटानाद हा भारतीय धार्मिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मंदिरातील घंटा भक्ताचे लक्ष एकाग्र करते, वातावरणात पावित्र्याची अनुभूती निर्माण करून पूजाविधीची सुरुवात दर्शवते.कालचक्र पुढे सरकत राहते, पिढ्या बदलतात..मात्र श्रद्धेचा वारसा सातत्याने पुढे जात राहतो, हाच या संकल्पनेचा व्यापक अर्थ आहे.
सिंह, मगर आणि दिशांचे महत्त्व
धर्मध्वजावरील सिंह हे शौर्य, सामर्थ्य व निर्भयतेचे प्रतीक मानले जाते. सिंहस्थ या नावाशीही त्याचा थेट संबंध आहे. दुसरीकडे, मगर हे गोदावरीच्या धार्मिक-सांस्कृतिक संदर्भाशी जोडलेले प्रतीक आहे. गोदावरी नदीच्या उगमक्षेत्राशी आणि कुशावर्त तीर्थाशी संबंधित त्र्यंबकेश्वरच्या परंपरेत या प्रतीकाला विशेष स्थान आहे. ध्वजावरील ॐ आणि स्वस्तिक ही शुभचिन्हे भारतीय धार्मिक परंपरेत पावित्र्य, मांगल्याशी जोडली जातात. ह्रीं या बीजमंत्राला शक्ती, सृजन आणि वैश्विक चेतनेशी संबंधित आध्यात्मिक अर्थ आहे. तसेच पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ऊर्ध्व आणि अधो या दहा दिशांचा संदर्भ विश्वाच्या व्यापकतेची जाणीव करून देतो. या प्रतीकांतून धर्मध्वज केवळ एका तीर्थक्षेत्रापुरता मर्यादित न राहता व्यापक आध्यात्मिक संकल्पनेचे प्रतिनिधित्व करतो.
ध्वजस्तंभाचे आध्यात्मिक महत्त्व..
मानवी शरीराला ताठ आणि स्थिर ठेवण्यासाठी ज्याप्रमाणे पाठीचा कणा अत्यंत महत्त्वाचा असतो, अगदी त्याचप्रमाणे सिंहस्थ ध्वजाला आकाशात डौलाने फडकवण्यासाठी ध्वजस्तंभ हा त्याचा आधारस्तंभ असतो. अध्यात्मशास्त्रानुसार, ध्वजस्तंभाची रचना खाली बुडाशी जाड आणि वरच्या टोकाकडे निमुळती (बारीक) असणे अत्यंत लाभदायी ठरते. या विशिष्ट आकारामुळे ईश्वराकडून आकाशाच्या माध्यमातून येणाऱ्या सात्त्विक आणि दैवी लहरी स्तंभाच्या वरच्या टोकाकडून सहज ग्रहण केल्या जातात. त्यानंतर या लहरी ‘तेजतत्त्वा’च्या स्तरावर ध्वजामध्ये संक्रमित होतात आणि त्या ध्वजाच्या माध्यमातून संपूर्ण वायुमंडलात प्रक्षेपित होऊन वातावरण शुद्ध करतात. या प्रक्रियेतून उर्वरित लहरी स्तंभाच्या बुडाकडून थेट भूमीमध्ये प्रवाहित होतात, ज्यामुळे जमिनीचेही शुद्धीकरण होते. विशिष्ट आकाराच्या ध्वजस्तंभामुळे सूक्ष्म स्तरावरील आध्यात्मिक कार्य अत्यंत वेगाने पूर्ण होते. म्हणूनच, एकसारख्या जाडीच्या स्तंभापेक्षा, ‘बुडाशी जाड आणि वर निमुळता’ असलेला ध्वजस्तंभ आध्यात्मिकदृष्ट्या अधिक पूरक आणि प्रभावी मानला गेला आहे.
धर्मसंस्थापनेचे विचार जनमानसात रुजेपर्यंत हा ऊर्जास्रोत असाच टिकून राहणे काळाची गरज आहे. परंपरेचा गौरव आणि वर्तमानाची जबाबदारी धर्मध्वजाचे महत्त्व सांगताना त्यामागील मूल्यांचाही विचार झाला पाहिजे. श्रद्धा माणसाला केवळ धार्मिक विधींकडे नेत नाही, तर संयम, सेवा, सहिष्णुता आणि समाजाप्रती कर्तव्याची जाणीवही करून देऊ शकते. कुंभमेळ्यासारख्या विराट पर्वात देशाच्या विविध भागांतून येणारे भाविक, साधू-संत आणि विविध परंपरांचे अनुयायी एकत्र येतात. ही विविधतेतील एकतेची अनुभूती भारतीय समाजजीवनासाठी महत्त्वपूर्ण आहे.
त्र्यंबकेश्वरच्या पावन भूमीत फडकणारा सिंहस्थ धर्मध्वज हा केवळ भूतकाळातील वैभवशाली परंपरेचा गौरव नसून तो उज्ज्वल भविष्याला दिशा दाखवणारा एक गतिमान संदेश आहे. बारा राशींचे गतिमान कालचक्र, दहा दिशांची अथांग व्यापकता, अमृतकुंभाची अलौकिक पौराणिक स्मृती आणि जीवनदात्री गोदावरीचे अनुपम आध्यात्मिक माहात्म्य… या सर्वांचा एक अपूर्व.. दैवी संगम म्हणजेच त्र्यंबकेश्वरचा सिंहस्थ धर्मध्वज.. हा ध्वज आपल्याला भारतीय संस्कृतीच्या चिरंतन समृद्धतेची अखंड साक्ष देत राहणार आहे. उत्तुंग नभाशी संवाद साधणाऱ्या सिंहस्थ धर्मध्वजाकडे पाहताना आपण केवळ श्रद्धेने नतमस्तक होणे पुरेसे नसून त्या श्रद्धेचे रूपांतर कृतीत होणे आवश्यक आहे. या धर्मध्वजाच्या छायेखाली आपण सामाजिक समरसतेची वीण घट्ट केली पाहिजे. पर्यावरणसंवर्धनाचा वसा घ्यायला हवा. हाच सिंहस्थ कुंभपर्वाचा व्यापक आणि वैश्विक सांस्कृतिक अर्थ आहे..
संदर्भ :-
https://navbharatlive.com/maharashtra/nashik/trimbakeshwar-simhastha-kumbh-dharma-dhwaja-significance-astrological-importance-gsp26
https://sanatanprabhat.org/marathi/467833.html
https://www.loksatta.com/nashik/nashik-trimbakeshwar-kumbh-mela-flag-hoisting-president-droupadi-murmu-sap-05-6145595/
https://www.abhangvani.com/kumbh-mela-information
https://divyamarathi.bhaskar.com/news/rel-dha-nashik-kumbh-mela-flag-hoisting-information-5050997-pho.html
https://www-thekumbhyatra-com.translate.goog/blog/significance-of-kumbh-mela/?_x_tr_sl=en&_x_tr_tl=mr&_x_tr_hl=mr&_x_tr_pto=tc
https://www.loksatta.com/nashik/devendra-fadnavis-inspects-nashik-trimbakeshwar-simhastha-kumbh-development-projects-amy-95-6186274/
https://sanatanprabhat.org/marathi/480136.html
https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/nashik-kumbh-mela-flag-significance
https://www.lokmat.com/bhakti/nashik-kumbh-mela-2027-grand-inauguration-to-take-place-from-october-31-the-grand-festival-will-continue-for-2-consecutive-years-a-a679/
https://pudhari.news/amp/story/maharashtra/north-maharashtra/nashik/nashik-kumbh-mela-preparations-set-october-20-deadline-for-security-and-infrastructure-planning-sd22
https://www.loksatta.com/nashik/kumbh-mela-2026-flag-hoisting-nashik-administration-challenges-draupadi-murmu-visit-ssb-93-6190457/
