HinduismNews

धर्मध्वजाच्या ग्रामपरिक्रमेतून सनातन मूल्यांचा शंखनाद

प्राचीन तत्त्वज्ञानापासून ते कृत्रिम प्रज्ञेपर्यंतची राष्ट्रजागर यात्रा; ध्वजारोहणाच्या पूर्वसंध्येला गोदाआरतीला जनसागराचा भक्तिभाव

नाशिक, ३० ऑक्टोबर २०२६ : पंचवटीतील पावन रामकुंडाने आज एका अभूतपूर्व, मंगलमय आणि ऐतिहासिक सोहळ्याची पूर्वसंध्या अनुभवली. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्व २०२७ च्या मंगल पर्वाचा प्रारंभ आज एका भव्य आणि अद्भूत ‘धर्मध्वज ग्रामपरिक्रमेने’ झाला. याप्रसंगी संपूर्ण नाशिक नगरी सनातन वैश्विक मूल्यांच्या जयघोषाने आणि राष्ट्रभक्तीच्या भावनेने उजळून निघाली होती.

श्रीमद्‌ रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराजांच्या उपस्थितीत निघालेल्या या परिक्रमेने संपूर्ण नाशिक भूमीला भक्तिरसात न्हाऊन काढले. निनादणारा ढोल-ताशांचा गजर, गगनभेदी शंखनाद, विविध आखाड्यांचे साधू-संत आणि लक्षावधी धर्मप्रेमी-राष्ट्रप्रेमी अनुयायांच्या जयघोषाने पंचवटी परिसर दुमदुमून गेला होता.

श्री गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघ, कुंभमेळा प्राधिकरण आणि नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात भारतीय संस्कृतीचा अफाट वारसा प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला. तपोवन येथील मोदी मैदानातून प्रारंभ झालेली ही शोभायात्रा पंचवटी, संत गाडगे महाराज चौक, नेहरू चौक, मेनरोड, रविवार कारंजामार्गे गोदातीरावरील रामकुंडापर्यंत अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडली. मार्गावर ठिकठिकाणी आबालवृद्धांनी धर्मध्वजाचे पूजन करून ‘धर्मो रक्षति रक्षितः’ या सनातन महामंत्राचा पुनरुच्चार केला.

‘जनरेशन झेड’ आणि ‘अल्फा’चा राष्ट्रजागर :

या परिक्रमेचे मुख्य आकर्षण ठरले ते रामानंदाचार्य दक्षिण पीठ-नाणीजधामच्या नेतृत्वाखालील शिस्तबद्ध व राष्ट्रीय प्रवाह दर्शवणारे चित्ररथ. यामध्ये एका बाजूला प्राचीन वेदज्ञान, योग, ध्यान आणि भारतीय नैतिक मूल्यांचे दर्शन घडवले गेले, तर दुसऱ्या बाजूला ‘जनरेशन झेड’ (Gen Z) आणि ‘जनरेशन अल्फा’ (Gen Alpha) ही नवी पिढी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाची कास धरून राष्ट्रसेवेसाठी कशी सज्ज होत आहे, याचे तेजस्वी प्रतिबिंब पाहायला मिळाले.

राष्ट्रहित आणि समाजसेवेचा संकल्प

१. अध्यात्माच्या प्रेरणेतून चालणाऱ्या राष्ट्रहितकारी सेवाकार्यांची झलकही या महोत्सवात विशेषत्वाने उठून दिसली.
२. आरोग्य व जीवनदान: विनामूल्य रुग्णवाहिका सेवा, रक्तदान शिबिरे, देहदान-अवयवदान जनजागृती.
३. समाजप्रबोधन व पर्यावरण: व्यसनमुक्ती अभियान, आपत्ती व्यवस्थापन, वृक्षारोपण, नदी स्वच्छता आणि जलसंधारण.
४. संस्कृती व स्वावलंबन: गोसेवा आणि गरजू कुटुंबांचे आर्थिक स्वावलंबन.
या सर्व उपक्रमांनी भारतीय समाजजीवनाला संघटित, बलशाली आणि सक्षम बनवण्याचा स्पष्ट संदेश दिला.

गोदाआरतीने वातावरणात चैतन्य :

गोदावरीच्या पावित्र्याचा गजर करत आणि साधू-संत परंपरेचे आशीर्वाद घेत रामकुंडावर या ऐतिहासिक परिक्रमेचा समारोप झाला. त्यानंतर पार पडलेल्या गोदावरी मातेच्या भव्य महाआरतीने संपूर्ण वातावरण भक्तिमय व पुनीत केले. उद्या होणाऱ्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्याच्या पूर्वसंध्येला पार पडलेल्या या राष्ट्रधर्म आणि संस्कृतीच्या महोत्सवाने नाशिककरांमध्ये नवचैतन्य फुंकले असून, सिंहस्थाच्या स्वागतासाठी संपूर्ण धर्मनगरी पूर्णतः सज्ज झाली आहे. रामतिर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने आयोजित आरतीला आखाड्यांचे महंत उपस्थित होते.

Back to top button