NewsRSS

शक्ती पीठे – विविध संस्था

आपल्या हक्क आणि कर्तव्यांप्रती जागरूक असणारा आणि “राष्ट्र सर्वोपरि” मानणारा संघटित समाज ही कोणत्याही राष्ट्राची शक्ती असते. ही शक्तीच त्या राष्ट्राला अजेय आणि वैभवशाली बनवत असते.

भारतासारख्या १४० कोटी जनतेच्या, भाषा, प्रांत, वेशभूषा, खान-पान, उपासना पद्धती या सर्व बाबतीत विविधता असणाऱ्या विशाल देशातील बहुसंख्य समाजाला जोडून ठेवणारं जर कोणतं सूत्र असेल तर तें, या देशातील बहुसंख्य समाजाने प्राचीन काळापासून अंगिकारलेली हिंदू संस्कृती आणि हिंदू जीवन पध्दती होय. याचा प्रत्यय आपल्याला वेळोवेळी आलेला आहे. दोन अगदी अलिकडची उदाहरणं द्यायची झाली तर ती म्हणजे श्रीराम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळ्‌यापूर्वी घरोघरी झालेले अक्षत वितरण आणि गेल्या वर्षी प्रयागराज येथे झालेला महाकुंभ सोहळा. या दोन्ही वेळी सर्व जाती, पंथ, भाषा, प्रांत विसरुन समाजाचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळालेला आपण पाहिला.

चंद्रगुप्त, समुद्रगुप्त यांच्या कालखंडात भारत वैभवाच्या, ज्ञान, विज्ञानाच्या, साहित्य, कलेच्या, परस्पर पूरक समाज जीवनाच्या परम वैभवशाली स्तरावर होता. परंतु गेल्या हजार बाराशे वर्षातील परकियांच्या आक्रमणांनी, गुलामगिरीने या देशाने आपली किर्ती व वैभव गमावले. केवळ या देशातील भौतिक संपत्तीचीच लूट नाही तर आक्रमकांनी येथील ज्ञान, विज्ञानाची, उच्च शिक्षण परंपरेची स्त्रोत असणारी मोठमोठी विद्यापीठे नष्ट केली. भारताचे मानबिंदू, आस्था या सर्वांवर घाला घालून या देशाला आणि देशातील बहुसंख्य हिंदू समाजाला गलितगात्र केले. ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्यात सक्रिय सह‌भाग घेणाऱ्या एका युगप्रवर्तक द्रष्ट्याने ही स्थिती ओळखली आणि आपल्या विचारांची कक्षा व कृतीची सीमा रुंदावत या देशातील समाजाला संघटित करुन या देशाला पुनर्वैभवाप्रत नेण्याचे स्वप्न उराशी बाळगलं.. डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांनी रा.स्व. संघाची मुहुर्तमेढ रोवली. त्याला आता शंभर वर्ष झाली.

उपहास,अवहेलना, उपेक्षा, संघर्ष, विरोध या सर्व टप्प्यांतून प्रवास करताना सुरुवातीची पन्नास-साठ वर्ष संघाने पूर्णपणे संघटन सक्षम, सुदृढ करण्यावर भर दिला. संघ म्हणजे शाखा, आणि शाखा हे समाजात राहून समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तींच्या निर्माणाचे केंद्र या भावनेने आणि विश्वासाने संघाच्या सुरुवातीच्या तीन पिढ्यांनी स्वतःला या कार्यात गाडून घेतलं. निस्वार्थीपणे ‘राष्ट्राय स्वाहा – इदं न मम’ या भावनेने समाजात काम करणाऱ्या लक्षावधी स्वयंसेवकांनी समाजात राष्ट्रीय भाव जागृत केला… आजही करत आहेत. समाजातील विविध व्यक्ती व संस्थांच्या सज्जन शक्तीशी व्यापक संपर्क, अकृत्रिम स्नेहभाव, सर्व सहमतीने होणारी निर्णय प्रक्रिया, काया वाचा मने झोकून देऊन, कार्यरत राहून सर्वांना बरोबर घेऊन राष्ट्र हिताचा विचार सर्वदूर प्रसारित करण्याची आस, ही आणि अशी अनेक वैशिष्ट्ये घेऊन संघ स्वयंसेवक समाज जीवनाच्या अनेक क्षेत्रात काम करत असतो..

विद्यार्थी, महिला, कामगार, धार्मिक, सांस्कृतिक, ज्ञान, विज्ञान कला, साहित्य अश्या समाजातील विविधांगी क्षेत्रांना, घटकांना राष्ट्रीय विचाराने प्रेरित करून संघटित करण्याचा प्रयत्न स्वयंसेवकांचा असतो. प्रत्येक क्षेत्राची विचारसरणी, कार्यपद्धती वेगळी. त्या त्या क्षेत्राच्या अपेक्षा तसेच त्यांच्या समोरील आव्हानेही वेगवेगळी. जसे काठावर बसून कुणाला पोहणे शिकता वा शिकवता येत नाही. त्यासाठी पाण्यातच उतरावे लागते. त्याचप्रमाणे आपापल्या क्षमतेप्रमाणे, शक्ती, बुद्‌धी व कौशल्य पणाला लावून संघ स्वयंसेवकांनी या विविध क्षेत्रात अनेक संस्था शून्यातून उभ्या करून ‘राष्ट्र सर्वोपरि’ हा विचार रुजवायला, वाढवायला सुरुवात केली.
याच अनुषंगाने स्वातंत्र्यानंतर शिक्षण, विद्यार्थी, राजकारण, कामगार, वनवासी समाज, शेतकरी, वकील, वैज्ञानिक, कलाकार आणि विचारवंत अशा विविध क्षेत्रांत संघाच्या प्रेरणेने संस्था उभ्या राहिल्या. भारताचा सनातन राष्ट्रीय विचार हा त्यांच्या कार्याचा आधार होता. आज राष्ट्रीय सेवा भारती, अखिल भारतीय साहित्य परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विद्या भारती, भारतीय जनता पक्ष, भारतीय मजदूर संघ, अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम, भारतीय किसान संघ, अखिल भारतीय अधिवक्ता परिषद, विज्ञान भारती, संस्कार भारती, लघु उद्योग भारती, प्रज्ञा प्रवाह आणि पूर्व सैनिक सेवा परिषद यांसारख्या ३२ हून अधिक संस्था समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांत सक्रिय आहेत. स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेने त्यांचे कार्य चालवतात. यापैकी काहींची माहिती पुढीलप्रमाणे..

  • कामगारांचे शोषण करणारी भांडवल‌शाही अथवा वर्गसंघर्षांवर आधारित साम्यवादाला बाजूला सारून उद्योग हित आणि कामगार हित हे परस्पर पूरक आहेत, एकमेकांचे विरोधी नव्हेत हा विचार प्रभावी करून ‘भारतीय मजदूर संघ’ ही कामगार संघटना संघ प्रेरणेने उभी राहीली व आता अग्रगण्य आहे.
  • भारतातील बहुसंख्य असणाऱ्या हिंदू समाजाला ग्लानीतून पुन्हा तेजस्वी चैतन्यमयी स्वत्वाचा साक्षात्कार घडवून आणणारी, ‘धर्मो रक्षति रक्षितः’ चा पुनर्जागर करणारी, सेवा, संस्कार, सुरक्षा या त्रिसूत्रीवर आधारलेली विश्व हिंदू परिषद १९६४ मध्ये स्थापन झाली. भारतात कुठेही हिंदू धर्म, संस्कृती वा समाजावर आघात होत असता हिंदू समाजाला.. संघटित करून त्यावर उपाययोजना करण्यात विहिंप.. अग्रेसर असते. रामजन्मभूमी निर्माण आंदोलनही वि.हिं.प. च्या पुढाकाराने झालं आणि अगदी कायद्याच्या चौकटीत राहून यशस्वीही झालं. आज आपण तिथे कोट्यवधी हिंदूंच्या मनातील श्रद्धास्थान असलेल्या प्रभू श्रीरामांच्या भव्य मंदिराची वास्तू उभारलेली पाहात आहोत.
  • भारतीय विद्यार्थी हा उद्याचा नव्हे तर आजचा नागरिक आहे. त्यामुळे देशाच्या विकासात, उत्कर्षात युवा शक्तीची ऊर्जा जोडणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. केवळ सुशिक्षितच नव्हे तर सुसंस्कृत युवा ही. राष्ट्राची मोठी संपत्ती आहे. हा विचार रुजवणारी, वाढवणारी ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ विद्यार्थी क्षेत्रात कार्यरत आहे.
  • भारतात स्थानिक उद्योग आणि व्यापार वाढवून भारतात स्वदेशी उत्पादनांद्वारे आर्थिक आत्मनिर्भरता प्रस्थापित व्हावी हा विचार घेऊन १९९१ मध्ये स्थापन झालेला ‘स्वदेशी जागरण मंच’ स्वदेशी वस्तू व व्यापाराचं राष्ट्र निर्माणातील महत्त्वाचं स्थान या संस्थेने अधोरेखित केलं. आज भारतात मोठ्या प्रमाणात उदयाला येत असलेली स्टार्टअप्स, युनिकॉर्न्स स्वदेशीच्या विचाराला प्रत्यक्ष कृतीत आणून आत्मनिर्भर भारताच्या जडणघडणीत मोलाचं योगदान देत आहेत.
  • एकसंघ हिंदू समाजच या राष्ट्राला परम वैभवापर्यंत घेऊन जाऊ शकतो आणि संपूर्ण विश्वाला मार्गदर्शक ठरू शकतो. त्यासाठी जाती, पंथ, भाषा, प्रांत या भिंतींच्या पलिकडे जाऊन अश्या सर्वसमावेशक समरस समाजाच्या निर्मितीसाठी डॉ.बाबासाहेब आंबडेकरांच्या जन्म जयंती दिवशी म्हणजे १४ एप्रिल १९८३ ला सामाजिक समरसता मंचाची स्थापना झाली. समता (Equality) पेक्षाही समरसता (harmony) या वर आणि स्व. डॉ. बाबासाहेब आबेडकरांच्या विचारावर श्रद्धा असणारी ही संस्था समाजात अस्पृश्यता निवारण आणि सामाजिक एकात्मतेसाठी विविध उपक्रम राबवत असते. रा. स्व. संघाचे तृतीय सरसंघचाल‌क पूजनीय बाळासाहेब देवरस यांच्या प्रेरणेतून संघ स्वयंसेवकानी ही संस्था उभी केली.
  • कलेतून संस्कार, संस्कारातून राष्ट्रीयत्व जोपासणारी ‘संस्कार भारती’
  • साहित्य क्षेत्रात वैचारिक भिंतींचा अडसर न आणता सहिष्णू, सर्वसमावेशक सहजीवनाचा विचार प्रक्षेपित करणारी ‘अखिल भारतीय साहित्य परिषद’
  • संघ स्वयंसेवक आणि समाजातील सज्जन शक्ती यांच्या परस्पर सहकार्याने देशात चालणाऱ्या लाखो सेवा कार्यांचा समन्वय साधणारी ‘ राष्ट्रीय सेवा भारती’

महिलांमध्ये कार्यरत असणारी राष्ट्र सेविका समिती, भारतीय किसान संघ, विज्ञान भारती, वनवासी क्षेत्रात काम करणारी वनवासी कल्याण आश्रम, जनकल्याण समिती, नाना पालकर रुग्णसेवा समिती अश्या व या सारख्या अनेक संस्था आज प्रभावीपणे काम करत आहेत. ज्या योगे संपूर्ण समाजात राष्ट्रीय विचार सर्व व्यापी,सर्वस्पर्शी होत आहे. या संघटित शक्तीच्या आधारे भारताला न केवळ पुनर्वैभवाचे दिवस प्राप्त होतील तर ‘सर्वे भवंतु सुखिनः, सर्वे संतु निरामया’ या विश्व कल्याणाच्या भावनेने संपूर्ण जगाला मार्गदर्शन करणारा एक सामर्थ्यशाली देश म्हणून त्याची प्रतिमा विश्वपटलावर उजळून निघेल. त्या पहाटेचं झुंजुमुंजू क्षितिजावर उमलायला सुरुवात झालेलीच आहे.. लवकरच पूर्ण तेजाने हा राष्ट्रसूर्य विश्व प्रकाशमान करेल.

लेखक :- चंद्रशेखर वझे

Back to top button