महात्मा फुले यांची समताधिष्ठित समाजरचना
महात्मा जोतिराव फुले यांनी एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रातील सामाजिक विषमतेविरुद्ध लढा देताना शिक्षणाला परिवर्तनाचे प्रभावी साधन मानले. त्या काळात मुलींचे शिक्षण, वंचित समाजघटकांना शिक्षणाची संधी आणि विधवांचे प्रश्न दुर्लक्षित होते. अशा परिस्थितीत सावित्रीबाई फुले यांच्या सहकार्याने त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली. जातिभेद, स्त्रियांची स्थिती आणि शेतकऱ्यांचे शोषण या प्रश्नांवर प्रत्यक्ष काम करण्याबरोबरच लेखनातूनही प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान दिले. त्यांच्या कार्याचे मूल्यमापन करताना तत्कालीन सामाजिक परिस्थिती आणि परिवर्तनासाठी त्यांनी स्वीकारलेला मार्ग समजून घेणे महत्त्वाचे ठरते.
१८४८ मध्ये पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी शाळा सुरू झाली. सावित्रीबाई फुले यांनी तेथे शिक्षिका म्हणून काम सुरू केले. मुलींनी शिकणेही अमान्य असलेल्या त्या काळात त्यांना विरोध आणि अपमान सहन करावा लागला, मात्र त्यांनी शिक्षणकार्य थांबवले नाही. पुढे फुले दाम्पत्याने वंचित समाजातील मुलांसाठीही शाळा सुरू करून शिक्षणाची संधी सर्व समाजघटकांना मिळावी, यासाठी प्रयत्न केले.
फुले यांच्या मते, शिक्षणामुळे माणसाला स्वतःच्या परिस्थितीची जाणीव होते, हक्क समजतात आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे बळ मिळते. १८८२ मध्ये हंटर शिक्षण आयोगासमोर त्यांनी प्राथमिक शिक्षणाच्या प्रसाराची भूमिका मांडली. गरीब आणि वंचित घटकांपर्यंत शिक्षण पोहोचत नसल्याकडे लक्ष वेधून सर्वसामान्य मुलांना शिक्षणाची संधी मिळण्यासाठी प्राथमिक शिक्षणाला प्राधान्य देण्याची मागणी केली.
फुले दाम्पत्याच्या शैक्षणिक कार्याच्या संदर्भात अलीकडच्या काळात फातिमा शेख यांचे नाव चर्चेत आले आहे. सावित्रीबाई फुले यांच्या सहकारी आणि भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. मात्र, या दाव्यांना आधार देणाऱ्या तत्कालीन शाळांच्या नोंदी, नियुक्तीविषयक कागदपत्रे आणि पत्रव्यवहारांचा अभ्यास आवश्यक आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सल्लागारपदी नियुक्त झाल्याचे सांगितले जाणारे प्रा. दिलीप मंडल यांनी फुले दाम्पत्याच्या चरित्रग्रंथांत फातिमा शेख यांचा उल्लेख नसल्याचे सांगितले. त्यांची प्रतिमा आणि त्यांच्याविषयीचे कथन आपण काल्पनिकरीत्या तयार केल्याची कबुली देत माफीनामा प्रसिद्ध केल्याचे वृत्तही आहे. ब्रिटिशकालीन दस्तऐवजांत त्यांचे नाव आढळत नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या विधानांमुळे त्यांच्या योगदानाविषयीची चर्चा नव्याने सुरू झाली.
मात्र, उपलब्ध कागदपत्रांत उल्लेख नसणे म्हणजे एखादी व्यक्ती अस्तित्वातच नव्हती, असा निष्कर्ष काढता येत नाही. त्याचप्रमाणे प्रचलित दाव्यांनाही ऐतिहासिक पुराव्यांचा आधार असणे आवश्यक आहे. त्यामुळे या विषयाचा निर्णय भावनिक किंवा राजकीय भूमिकांऐवजी मूळ कागदपत्रे आणि ऐतिहासिक नोंदींच्या आधारेच व्हायला हवा. फुले दाम्पत्याचे शैक्षणिक कार्य स्वतःच्या ऐतिहासिक महत्त्वामुळेच महत्त्वाचे ठरते; त्यासाठी अप्रमाणित संदर्भांची जोड देण्याची गरज नाही.
स्त्रियांच्या प्रश्नांवरही महात्मा फुले यांनी ठाम भूमिका घेतली. बालविवाह, विधवांचे केशवपन, त्यांची सामाजिक स्थिती आणि स्त्रियांवरील बंधने यांना त्यांनी विरोध केला. १८६३ मध्ये त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू करून सामाजिक दबावामुळे अडचणीत आलेल्या गर्भवती विधवांना आधार देण्याचा आणि नवजात बालकांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला. विधवांचे केशवपन रोखण्यासाठी न्हाव्यांनी संप करावा, असे आवाहनही करण्यात आले. या कार्यात सावित्रीबाईंची महत्त्वाची भूमिका होती. स्त्रियांच्या प्रश्नांमागील सामाजिक विषमता आणि अन्याय दूर करण्याची आवश्यकता फुले दाम्पत्याने अधोरेखित केली. २४ सप्टेंबर १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
जन्माच्या आधारावर श्रेष्ठ-कनिष्ठ ठरवणारी जातिव्यवस्था आणि धार्मिक कर्मकांडांच्या नावाखाली होणारे शोषण यांना या चळवळीने विरोध केला. प्रत्येक व्यक्तीला समान मानवी प्रतिष्ठा मिळावी, हा तिचा मुख्य विचार होता.विवाहासारखे सामाजिक विधी अनावश्यक खर्च आणि कर्मकांड टाळून साधेपणाने व्हावेत, यासाठी सत्यशोधक विवाहपद्धतीचा प्रसार करण्यात आला. धार्मिक-सामाजिक व्यवहारांसाठी पुरोहितांवर अवलंबून न राहता सामान्य माणसालाही स्वतःच्या विवेकाने निर्णय घेता यावा, अशी या चळवळीची भूमिका होती. यातून बहुजन समाजात शिक्षण, संघटन आणि सामाजिक हक्कांविषयी जागृती निर्माण झाली.
१८७३ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘गुलामगिरी’ या ग्रंथातून फुले यांनी जातिव्यवस्था आणि सामाजिक शोषणावर परखड टीका केली. अमेरिकेतील गुलामगिरीविरोधी चळवळीतील कार्यकर्त्यांना हा ग्रंथ अर्पण करून त्यांनी भारतातील सामाजिक विषमतेचा प्रश्न व्यापक संदर्भात मांडला. जन्माच्या आधारावर माणसांमध्ये श्रेष्ठ-कनिष्ठ भेद निर्माण करणारी व्यवस्था अन्यायकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विषमता टिकवून ठेवणाऱ्या रूढी, परंपरा आणि सत्तासंबंधांचाही त्यांनी लेखनातून समाचार घेतला.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडेही त्यांनी गांभीर्याने लक्ष दिले. १८८३ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘शेतकऱ्याचा असूड’ या ग्रंथात महसूलव्यवस्था, कर्जबाजारीपणा, शेतीतील अडचणी, प्रशासनाची भूमिका आणि शिक्षणाचा अभाव यांचा शेतकऱ्यांच्या जीवनावर होणारा परिणाम मांडला. कष्टाच्या तुलनेत शेतकऱ्याला आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळत नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी शिक्षणाचा प्रसार, प्रशासकीय बदल आणि शोषणाला आळा घालणे आवश्यक असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. आजही शेतीविषयक प्रश्न कायम असल्याने या ग्रंथातील निरीक्षणांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो.
‘तृतीय रत्न’, ‘गुलामगिरी’ आणि ‘शेतकऱ्याचा असूड’ यांसारख्या साहित्यकृतींतून फुले यांनी अन्यायकारक सामाजिक व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. त्यांचे कार्य लेखनापुरते मर्यादित नव्हते. शाळांची स्थापना, सत्यशोधक समाजाची उभारणी आणि स्त्रिया, शेतकरी व वंचित समाजघटकांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष काम अशा विविध माध्यमांतून त्यांनी सामाजिक परिवर्तनाचा प्रयत्न केला. शिक्षण आणि संघटन यांच्या बळावर प्रत्येकाला हक्कांची जाणीव व अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची शक्ती मिळावी, हा त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू होता.
आज शिक्षणाच्या संधी वाढल्या असल्या तरी सर्वांना समान दर्जाचे शिक्षण मिळत नाही. आर्थिक परिस्थिती, ग्रामीण भागातील मर्यादित सुविधा आणि सामाजिक भेदभाव यांमुळे अनेक मुलांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होतात. अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय, भटके-विमुक्त, मातंग, वडार, पारधी यांसह अन्य वंचित समाजघटकांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रगतीसाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, स्त्रियांची सुरक्षितता आणि सामाजिक विषमताही आज महत्त्वाचे विषय आहेत. त्यामुळे शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचावे आणि प्रत्येकाला समान संधी मिळावी, हा फुले यांचा विचार आजही तितकाच महत्त्वाचा आहे.
महात्मा जोतिराव फुले यांच्या कार्याचे मूल्यमापन केवळ त्यांच्या नावाने होणाऱ्या कार्यक्रमांपुरते मर्यादित राहू नये. त्यांच्या शैक्षणिक चळवळीचा, सत्यशोधक समाजाच्या कार्याचा आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध घेतलेल्या भूमिकेचा अभ्यास होणे आवश्यक आहे. स्त्रिया, शेतकरी आणि वंचित समाजघटकांना समान संधी व प्रतिष्ठा मिळावी, यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांतून समताधिष्ठित समाजरचनेचा विचार पुढे आला. त्यांच्या द्विशताब्दी जन्मवर्षानिमित्त त्यांच्या कार्याचा अभ्यास करताना ऐतिहासिक नोंदींची अचूकता जपणे आणि त्यांच्या विचारांचा आजच्या सामाजिक परिस्थितीशी संबंध समजून घेणे अधिक महत्त्वाचे ठरते.
लेखक :- सागर देवरे. कुर्ला, मुंबई