News

मातृवियोग, संन्यासधर्म आणि राजधर्म

२० नोव्हेंबर २०२६ योगी आदित्यनाथजी यांच्या मातोश्री सावित्री देवी यांचे वयाच्या ९१व्या वर्षी उत्तराखंडमधील पंचूर येथे निधन झाले.मातृनिधनाचे वृत्त समजल्यानंतरही त्यांनी गोरखपूरमधील विद्यार्थ्यांना टॅबलेट वितरणाचा कार्यक्रम पूर्ण केला. मातृवियोगाच्या या प्रसंगी पूज्य योगी आदित्यनाथजी महाराजांनी संन्यासधर्म आणि राजधर्म यांचा विलक्षण समन्वय प्रत्यक्ष आचरणातून दाखवून दिला. मातोश्रींच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतरही त्यांनी गोरखपूरमधील विद्यार्थ्यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम पूर्ण केला. त्यानंतर पुत्रधर्माचे पालन करण्यासाठी ते मातेच्या अंतिम दर्शनास गेले.

एका बाजूला जन्मदात्रीच्या वियोगाची असह्य वेदना, तर दुसऱ्या बाजूला कोट्यवधी नागरिकांच्या कल्याणाची जबाबदारी! व्यक्तिगत दुःखातही सार्वजनिक कर्तव्याचे भान न सोडणे, आणि त्याच वेळी मातृऋणाची जाणीव जपणे, हा त्यांच्या जीवनातील संन्यासधर्म आणि राजधर्माचा अनुकरणीय संगम आहे.संन्यासी संसाराचा त्याग करतो, लौकिक बंधनांच्या पलीकडे जातो; परंतु मातृऋणाच्या पलीकडे जाऊ शकत नाही. भारतीय धर्मपरंपरेत म्हटले आहे—

‘सर्ववन्द्येन यतिना प्रसूर्वन्द्या प्रयत्नतः।’

अर्थात, संपूर्ण जगाला वंदनीय असलेल्या संन्याशानेदेखील आपल्या जन्मदात्री मातेचे प्रयत्नपूर्वक वंदन करावे.

योगी आदित्यनाथजी महाराज यांच्या मातृवियोगाच्या निमित्ताने जगद्गुरू आद्य शंकराचार्यांचे मातृपंचकम् विशेषत्वाने स्मरणात येते. अद्वैत वेदान्ताचे सर्वोच्च तत्त्वज्ञान सांगणाऱ्या त्या महान संन्याशानेही आपल्या मातेविषयीची कृतज्ञता आणि अंतःकरणातील आर्तता पाच श्लोकांत व्यक्त केली आहे.

मुक्तामणि त्वं नयनं ममेति
राजेति जीवेति चिरं सुत त्वम्।
इत्युक्तवत्यास्तव वाचि मातः
ददाम्यहं तण्डुलमेव शुष्कम्॥१॥

हे माते! तू मला आपल्या डोळ्यांतील मोती, माझा राजा, माझा लाडका पुत्र म्हणत दीर्घायुष्याचे आशीर्वाद द्यायचीस. आज मात्र त्या प्रेमळ मुखात मी केवळ कोरडे तांदळाचे दाणे अर्पण करीत आहे!

अम्बेति तातेति शिवेति तस्मिन्
प्रसूतिकाले यदवोच उच्चैः।
कृष्णेति गोविन्द हरे मुकुन्दे-
त्यहो जनन्यै रचितोऽयमञ्जलिः॥२॥

हे माते! मला जन्म देताना प्रसववेदनांनी व्याकुळ होऊन तू ईश्वराचा धावा करीत होतीस. त्या तुझ्या असह्य वेदनांचे स्मरण करून आज मी तुझ्या चरणी हात जोडून प्रणाम करीत आहे.

आस्तां तावदियं प्रसूतिसमये दुर्वारशूलव्यथा
नैरुज्यं तनुशोषणं मलमयी शय्या च सांवत्सरी।
एकस्यापि न गर्भभारभरणक्लेशस्य यस्य क्षमः
दातुं निष्कृतिमुन्नतोऽपि तनयस्तस्यै जनन्यै नमः॥३॥

प्रसूतीच्या असह्य वेदना, गर्भधारणेचे कष्ट, शरीराची झीज आणि बालकाच्या संगोपनातील असंख्य यातना यांपैकी एका कष्टाचीही परतफेड कितीही महान झालेला पुत्र करू शकत नाही. अशा जन्मदात्री मातेच्या चरणी शतशः नमन!

गुरुकुलमुपश्रित्य स्वप्नकाले तु दृष्ट्वा
यतिसमुचितवेषं प्रारुदो मां त्वमुच्चैः।
गुरुकुलमथ सर्वं प्रारुदत्ते समक्षं
सपदि चरणयोस्ते मातरस्तु प्रणामः॥४॥

हे माते! स्वप्नात मला संन्याशाच्या वेशात पाहून तू व्याकुळ झालीस. रडत रडत गुरुकुलात आलीस. तुझी ती अवस्था पाहून संपूर्ण गुरुकुलही अश्रूंनी भरून गेले. अशा करुणामयी मातेच्या चरणी माझा प्रणाम! या श्लोकात संन्यास आणि मातृत्व यांच्यातील विलक्षण भावबंध प्रकट होतो. जगाला संन्याशाचे वैराग्य दिसते; पण आईला त्या भगव्या वस्त्रांआडचा आपला लाडका पुत्रच दिसत असतो.

न दत्तं मातस्ते मरणसमये तोयमपि वा
स्वधा वा नो दत्ता मरणदिवसे श्राद्धविधिना।
न जप्त्वा मातस्ते मरणसमये तारकमनु-
रकाले सम्प्राप्ते मयि कुरु दयां मातुरतुलाम्॥५॥

हे माते! तुझ्या अंतिम क्षणी तुला पाणीही देता आले नाही. तुझ्या निधनाच्या वेळी आवश्यक धार्मिक कर्तव्ये पार पाडता आली नाहीत. तुझ्या कानात तारक मंत्रही म्हणता आला नाही. मी अवेळी पोहोचलो आहे. हे माते, माझ्यावर आपली असीम करुणा कर!

या पाच श्लोकांतून एक शाश्वत सत्य प्रकट होते..संन्यास म्हणजे संवेदनाहीनता नव्हे आणि वैराग्य म्हणजे कृतज्ञतेचा त्याग नव्हे. ज्ञान, वैराग्य आणि आध्यात्मिक साधनेच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलेला संन्यासीदेखील आपल्या मातेच्या स्मरणाने व्याकुळ होतो.भारतीय संस्कृतीने म्हणूनच ‘मातृदेवो भव’ हा आदेश दिला आहे. आईचे ऋण कधीच फेडता येत नाही. तिचे संस्कार हेच संततीच्या जीवनातील सर्वांत मोठे संचित असते.

महाभारतात शान्तिपर्वात असे म्हटले आहे की..

वर्तितव्यं कुरुश्रेष्ठ सदा धर्मानुवर्तिना।
स्वं प्रियं तु परित्यज्य यद् यल्लोकहितं भवेत्॥

हे कुरुश्रेष्ठा! धर्माचे पालन करणाऱ्या राज्यकर्त्याने स्वतःच्या वैयक्तिक आवडीनिवडी, सुखसोयी आणि स्वार्थ यांचा त्याग करून सदैव लोककल्याणाला प्राधान्य द्यावे. ज्या कार्यातून जनतेचे हित साधले जाते, तेच कार्य करणे हा खरा राजधर्म होय.(शान्तिपर्व, राजधर्मानुशासन पर्व, अध्याय ५६)

मातृवियोगाच्या वेदनेतही राजधर्माचे पालन..

पूज्य योगी आदित्यनाथजी महाराज यांच्या व्यक्तिमत्त्वात संन्यासधर्म आणि राजधर्म यांचा विलक्षण संगम दिसतो. एकीकडे गोरक्षपीठाचे पीठाधीश्वर म्हणून आध्यात्मिक परंपरेची जबाबदारी तर दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून कोट्यवधी नागरिकांच्या कल्याणाचे दायित्व!

मातृवियोगाच्या दिवशीही आपला पूर्वनियोजित दैनंदिन कार्यक्रम रद्द न करता शासकीय कर्तव्यांना प्राधान्य देण्याची त्यांची भूमिका ही व्यक्तिगत दुःखापेक्षा लोककल्याणाचे कर्तव्य श्रेष्ठ मानणाऱ्या राजधर्माची अत्यंत उदात्त अभिव्यक्ती ठरते. आईच्या निधनाचे दुःख कोणत्याही पुत्रासाठी असह्य असते. परंतु त्या वेदनेतही कर्तव्यापासून विचलित न होणे, संन्यासाची मर्यादा सांभाळणे आणि राज्यकारभाराची जबाबदारी अखंड निभावणे, यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील वैराग्य, संयम आणि कर्तव्यनिष्ठेचे दर्शन घडते.मातृऋणाची जाणीव अंतःकरणात आणि राजधर्माची निष्ठा आचरणात हा संन्यासी राजकर्त्याच्या जीवनातील अत्युच्च आदर्श आहे.

लेखक :- डॉ प्रशांत धर्माधिकारी

Back to top button