NewsSpecial Day

संत नामदेव – भक्ती, संघटन आणि सामाजिक समरसता

आपला महाराष्ट्र ही संतांची पवित्र, पावन भूमी आहे. महाराष्ट्राच्या धरतीला वेळोवेळी संत महात्म्यांच्या वैचारिक संपदेचा वारसा लाभलेला आहे. अनेक अध्यात्मिक विभुतींनी याच मातीत जन्म घेऊन, जगाला अध्यात्मिक ज्ञानाचे धडे दिले. या भूमीत जन्माला आलेल्या समाजाला संतांपासून संस्कारक्षम शाश्वत मूल्यांचा खजिनाच  मिळाला आहे. संतांच्या विभूती जगाच्या कल्याणासाठी असतात. महाराष्ट्राच्या धरतीला वेळोवेळी संत महात्म्यांच्या वैचारिक संपदेचा वारसा लाभलेला आहे. अनेक अध्यात्मिक विभुतींनी याच मातीत जन्म घेऊन; जगाला अध्यात्मिक ज्ञानाचे धडे दिले. थोर संत नामदेव हे या संत परंपरेतील एक ठळक नाव . भागवत धर्माची पताका संबंध भारतभर पोहचवणे आणि संबंध भारत राष्ट्र सांस्कृतिक दृष्टीने एकत्र करणे, हाच उद्देश्य प्रत्येक संतांचा होता. मराठी माणसाने स्वाभिमानाने गर्व आणि गौरव करावा अशा थोर मराठी सुपुत्रांपैकी एक आणि अग्रणी राष्ट्रीय प्रबोधनकार- भावकवी म्हणजे संत नामदेव होय! ७५० वर्षांपूर्वी ते लोकजागरण- प्रबोधन करण्यासाठी पंढपूरहून थेट पंजाबमध्ये गेले आणि तिथे त्यांनी उत्तर भारतातील भक्तिचळवळीचा पाया घातला.   त्यांच्या कार्यातून भक्ती, समाजजागरण आणि सामाजिक समरसतेचा विचार दृढ झाला.

भक्त भागवत बहुसाल ऐकिले।

बहु होऊनि गेले, होतील पुढे।।

परि नामयाचे बोलणे नव्हे कवित्व।

हा रस अद्भूत निरूपम।। 

थोर तत्त्वज्ञ- कवी संत ज्ञानदेवांनी संत नामदेव यांच्या अभंगवाणीबद्दल काढलेले हे उद्गार, संत नामदेव आणि त्यांच्या अभंगसंपदा यांची वाङ्मयीन थोरवी कथन करणारे आहेत.

संत नामदेवांच्या नावावर मराठीत २५०० पेक्षा अधिक अभंग आणि अडीचशे ते तीनशेपेक्षा अधिक हिंदी काव्यरचना आहेत.

  • संत नामदेवांचे राष्ट्रजागरणातील योगदान
  • सामाजिक समरसतेचा आदर्श आपल्या कार्यातून घालून देणारे संत नामदेव महाराज यांनी भक्ती आणि अभंगवाणीच्या माध्यमातून समाजजागृती केली. आपल्या भारतयात्रेतून त्यांनी विविध प्रांतांतील समाजाला भक्तिसूत्रात जोडत सामाजिक समरसतेचा विचार रुजवला.
  • स्वत्व, स्वाभिमान आणि सांस्कृतिक अस्मितेवर आघात करणाऱ्या इस्लामी आक्रमणांच्या काळात समाजाला निर्भयपणे आणि ताठ मानेने जगण्याची प्रेरणा देणे आवश्यक होते. परकीय आक्रमकांच्या दहशतीमुळे खचलेल्या समाजाला आत्मविश्वास देऊन संघटित करणे, हे मोठे आव्हान होते. वैयक्तिक नामसाधनेला सामूहिक भक्तीचे आणि लोकसंघटनाचे स्वरूप देत संत नामदेव महाराजांनी हे आव्हान समर्थपणे पेलले. आख्यानकथा, दशावताराचे वर्णन आणि समकालीन संतांच्या चरित्रांमधून त्यांनी समाजजागरण केले. अभंगवाणीच्या माध्यमातून जनमानसातील भय दूर करून स्वत्व, स्वाभिमान आणि स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित केली.
  • कठीण काळात स्वतःचा आणि समाजाचा उद्धार करण्यासाठी तसेच प्रतिकूल परिस्थितीतही धर्मावरील श्रद्धा टिकवून ठेवण्यासाठी संत नामदेव महाराजांनी प्रयत्न केले. त्यांच्या कार्यातून एक कुशल आणि समर्थ संघटक दिसून येतो. समाजाला उभारी देण्यासाठी त्यांनी लोकांच्या भाषेत संवाद साधला, त्यांच्यात मिसळून त्यांचे विचार बदलले आणि प्रसंगी मोठे धाडसही दाखवले. समाजाला एकत्र आणून त्याच्यात आत्मविश्वास आणि धर्मनिष्ठा जागवणारे संत नामदेव महाराज हे खऱ्या अर्थाने निर्भय आणि कुशल संघटक होते.
  • आजच्या काळात कुटुंबसंस्थेसमोर अनेक आव्हाने उभी असताना संत नामदेव महाराजांचे कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व विशेष लक्ष वेधून घेते. स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जात असलेल्या त्या काळात त्यांनी आपल्या कुटुंबातील महिलांनाही लेखनासाठी प्रोत्साहित केले. गोंदा, विठा आणि महादा या मुलांबरोबरच गोणाई, राजाई, लाडाई, निंबाई आणि जनाई यांच्या रचनांनाही त्यांनी आपल्या गाथेत स्थान दिले. कुटुंबातील प्रत्येकाच्या प्रतिभेला वाव देणारी त्यांची ही समावेशक आणि परिवर्तनशील दृष्टी विलक्षण होती. त्यामुळेच ‘नामदेव गाथा’ ही केवळ एका संताची रचनासंपदा न राहता संपूर्ण परिवाराच्या भक्ती-अभिव्यक्तीचा ठेवा ठरली.
  • संत नामदेव महाराजांच्या भक्तियात्रेचा, अभंगरचनेचा आणि प्रेमळ स्वभावाचा प्रभाव पश्चिम, वायव्य आणि उत्तर भारतातील अनेक संतांवर पडला. स्वामी रामानंद, संत कबीरदास, संत रोहिदास, संत त्रिलोचन, संत धन्नाजाट, पंजाबचे संत नानकदेव, गुजरातचे संत नरसी मेहता, राजस्थानच्या संत मीराबाई आणि आसामचे संत शंकरदेव या सर्व संत-सत्पुरुषांनी संत नामदेव महाराजांना आपले सद्गुरू आणि परमगुरू चे स्थान दिले .या संतांनी भक्तीच्या माध्यमातून समाजाला जागृत केले. तत्कालीन इस्लामी राजवटीतील अन्याय आणि अत्याचारांना न घाबरता त्यांनी हिंदू समाजात आत्मविश्वास आणि सांस्कृतिक अस्मिता जागवली. त्यामुळेच संत नामदेव महाराजांना उत्तर भारतातील वैष्णव भक्तिपरंपरेचे मार्गदर्शक आणि लोकशिक्षणाचे अनौपचारिक विद्यापीठ मानले जाते.
  • संत नामदेवराय मूळातच आत्मसामर्थ्यसंपन्न, परिवर्तनाची आस बाळगणारे आणि त्यासाठी सर्वस्वाची बाजी लावणार्‍या मनोवृत्तीचे आहेत. मात्र, सद्गुरूंच्या भेटीनंतर त्यांच्या जीवनाला एक अनोखे वळण लाभले. ती भेट भारतीय भक्तिआंदोलनाला विधायक वळण लावणारी ऐतिहासिक घटना ठरली. त्यानंतर इ. स. 1297 ते इ. स. 1304 या सहा वर्षांत इस्लामी आक्रमणाने त्रस्त झालेल्या प्रदेशांमधून नामदेवरायांनी पायी प्रवास केला. पश्चिमेकडून पदयात्रेला सुरूवात करून केदार, कैलास, बद्रिनारायण, मानसरोवरापर्यंतचा प्रदेश त्यांनी पिंजून काढला. हिंदीमधून आणि प्रादेशिक भाषांमधून त्यांनी पुन्हा पुन्हा- ‘एकै पाथर कीजै थाऊ। दूजे पाथर धरिए पाऊ॥ जै इहु देऊ तहु भी देवा। कहि नामदेऊ हम हरिकी सेवा॥ (ना.गा. 2258)’
  • संत नामदेव महाराज हे प्रयोगशील कवीही होते. त्यांनी आपल्या तीर्थयात्रेदरम्यान ज्या ज्या प्रदेशांना भेट दिली, तेथील भाषा आत्मसात केली आणि त्या भाषांमध्ये मराठीचा सहजसुंदर बाज आणत अभंगरचना केली. त्यांच्या अभंगांतून त्यांच्या भाषिक जाणिवेची आणि सर्जनशीलतेची प्रचिती येते.
  • संत नामदेव महाराजांनी आपल्या कार्यातून सर्वसामान्यांच्या मनात ईश्वरावरील विश्वास दृढ करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या विचारांतून उत्तर, पश्चिम आणि वायव्य भारतात ईश्वरभक्त संतांचा मोठा समूह उभा राहिला. या भक्ती चळवळीतून पुढे स्वधर्म आणि स्वराज्याची प्रेरणाही जागृत झाली. विठ्ठलावरील श्रद्धा आणि संतसज्जनांचे संघटन या विचारांचे प्रतिबिंब पंजाबमधील निर्भय शीख गुरुपरंपरेत आणि महाराष्ट्रातील हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेत दिसून येते. भक्तीच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणून राष्ट्रजीवन बळकट करण्याचे संत नामदेव महाराजांचे कार्य म्हणूनच अतिशय महत्त्वाचे ठरते.
  • श्रीविठ्ठल हे संत नामदेव महाराजांचे आराध्य दैवत होते. त्यांची विठ्ठलावरील भक्ती दृढ होती; मात्र ती डोळस आणि कर्तव्याची जाणीव करून देणारी होती. ‘सत्य लोपलें धर्म बुडाला । काय पाहतोसि उगला । धावें विठ्ठला।’ अशी आर्त साद ते विठ्ठलाला घालतात. पण केवळ देवाच्या मदतीची वाट न पाहता समाजाला संघटित करण्यासाठी ते स्वतः पुढाकार घेतात. तीर्थयात्रा करतात आणि अभंगांची रचना करतात. कीर्तनासारख्या प्रभावी माध्यमातून लोकजागृती करून समाजाला भक्तीच्या धाग्याने जोडतात.
  • धुर भावकविता लिहिणारे संत नामदेवराय एका अर्थाने प्रयोगशील कवीदेखील आहेत. ते ज्या ज्या प्रदेशात गेले, तेथील भाषा त्यांनी आत्मसात केली आणि तिला मराठीच्या वळणामध्ये बसविण्याचे प्रयोग केले याची साक्ष देणारे त्यांचे अभंग उपलब्ध आहेत.
  • नामदेव महाराजांचे कार्य महाराष्ट्राच्या प्रादेशिक सीमांपुरते मर्यादित राहिले नाही. त्यांनी गुजरात, सौराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पंजाबसह भारतातील विविध प्रदेशांत प्रवास करून भागवतधर्माचा व भक्तिमार्गाचा प्रचार केला. कीर्तन-भजनाच्या माध्यमातून त्यांनी लोकांमध्ये आध्यात्मिक जागृती घडवून आणली. विविध भाषा, प्रांत आणि सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या लोकांपर्यंत भक्तीचा संदेश पोहोचवून त्यांनी समाजातील परस्परबंध दृढ करण्याचे कार्य केले. त्यांच्या कार्यातून भक्तीच्या आधारावर समाजाला जोडणारी आणि भेदभावांपलीकडे जाणारी सामाजिक समरसतेची भावना जागृत केली
  • पंजाबमधील शीख बांधवांना ते आपले वाटतात. शीख बांधव ‘नामदेव बाबा’ म्हणून त्यांचे गुणगान गातात.पंजाबातील ‘शबदकीर्तन’ व महाराष्ट्रातील ‘वारकरी कीर्तन’ यांत विलक्षण साम्य आहे. घुमान (पंजाब) येथे शीख बांधवांनी त्यांचे मंदिर उभारले आहे. बहोरदास, लढ्विष्णूस्वामी, केशव कलाधारी हे त्यांचे पंजाबी शिष्य होत. राजस्थानातील शीख बांधवांनीही नामदेवाची मंदिरे उभारलेली आहेत. `संत शिरोमणी’ असे यथार्थ संबोधन त्यांच्याबद्दल वापरले जाते.
  • अवघड आध्यात्मिक तत्त्वज्ञान लोकभाषेतून मांडत त्यांनी भक्तीला सामान्य माणसाच्या जीवनाशी जोडले. ईश्वरभक्तीच्या माध्यमातून माणसामाणसांतील प्रेम, परस्पर आदर आणि बंधुभाव वाढावा, ही सामाजिक समरसतेची भावना त्यांच्या कार्यातून स्पष्ट होते. याच व्यापक ध्येयामुळे त्यांची दृष्टी प्रांतिक मर्यादांमध्ये अडकून राहिली नाही. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी हिंदीसह विविध प्रांतांतील भाषांचा उपयोग केला. त्या काळातील लोकभाषेतून भक्तीचा संदेश देत त्यांनी अध्यात्म सर्वसामान्यांच्या जीवनाशी जोडले.

पहिले वंचितांचे सखेसोबती संत नामदेव – समाजात वंचित ठरवलेल्या संत चोखामेळा यांची विठ्ठल मंदिराच्या महाद्वाराजवळ स्वहस्ते समाधी बांधून त्यांनी त्यांना मानाचे आणि अढळ स्थान मिळवून दिले. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर ठेवलेल्या भक्ताला सन्मान मिळवून देण्याचे हे महत्त्वपूर्ण कार्य होते.त्याचप्रमाणे, आपल्या घरात काम करणाऱ्या जनाबाई यांच्यातील भक्ती आणि प्रतिभा ओळखून संत नामदेव महाराजांनी त्यांना शिष्यत्व दिले. त्यांच्या संतसंगतीतून ‘दासी जनी’ ते ‘संत जनाबाई’ असा त्यांचा प्रवास घडला. जनाबाईंचे ४८५ अभंग नामदेव गाथेचा अविभाज्य भाग आहेत. भक्तीच्या माध्यमातून व्यक्तिविकास घडवून आणत समाजातील सर्व घटकांना सन्मान आणि अभिव्यक्तीची संधी संत नामदेवांनी दिली .

नाचू कीर्तनाचे रंगी।

ज्ञानदीप लावूं जगी॥

या अभंगचरणांतून संत नामदेवांच्या जीवनकार्याचे सार व्यक्त होते. कीर्तन, अभंग आणि नामस्मरण यांना त्यांनी लोकशिक्षणाचे माध्यम बनवले.

  • राष्ट्रीय एकात्मतेचे आधुनिक प्रणेते

त्यांनी भक्तिगीते आणि अभंगांची रचना करून आपल्या कृती तसेच आचरणातून समता आणि भक्तीची शिकवण दिली. एवढेच नाही तर महाराष्ट्रापासून पंजाबपर्यंत लोकांना देश आणि देवभक्तीच्या एका सूत्रात बांधले. त्या अर्थाने ते राष्ट्रीय एकात्मतेचे आधुनिक प्रणेते ठरतात.अर्धशतकाहून अधिक अशा भक्तिमय कालखंडात संत नामदेवांनी भारतभर अनेक पदयात्रा केल्या.

  • लोकजागरणासाठी, धर्मरक्षणासाठी महाराष्ट्रातील पंढरपूरमधून थेट पंजाबमध्ये पारमार्थिक विचाराची भक्ती पताका घेऊन जाणारे पहिले संत नामदेव आहे. भारतावर होणारे धर्मांध आक्रमकांचे हल्ले प्रथम पंजाब परिसरावर होतात. त्यामुळे त्या भागात भक्तीमार्गाने स्वत्त्व, स्वधर्माचे जनजागरण करण्याच्या हेतूने संत नामदेवांनी पंजाबपर्यंत केलेली ही पदयात्रा त्यांच्या राष्ट्रीय विचारांची द्योतक आहे. केवळ पदयात्रा करून ते थांबले नाहीत तर प्रांतात त्यांनी जवळपास २०-२५ वर्षे वास्तव्यही केले. त्यांनी तेथील भाषा आत्मसात करून हिंदी काव्यरचना केली. त्यांनी हिंदीमध्ये जवळपास २५० पदे लिहिली. पण यातही अभिमानाची गोष्ट म्हणजे या हिंदी पदांपैकी ६१ कविता या शिखांच्या ‘गुरुग्रंथसाहेब’ या परमपवित्र ग्रंथात समाविष्ट आहेत. या अपूर्व कार्यामुळे त्यांना राष्ट्रसंत म्हणणे सार्थ ठरते.

संत नामदेव यांची  भारतयात्रा आणि सामाजिक/आध्यात्मिक कार्य

दक्षिण भारतापासून उत्तर भारतापर्यंतची यात्रा

संत नामदेव यांनी दक्षिण भारतातील अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी देऊन भागवतधर्माचा प्रचार केला.श्रीशैलशिखर, मल्लिकार्जुन, अरुणाचल, चिदंबरम्, विष्णुकांची, रामेश्वर, ताम्रपर्णी, कन्याकुमारी, हरिहरेश्वर आणि जनार्दन यांसारख्या तीर्थक्षेत्रांना त्यांनी भेट दिल्याचे तीर्थावळीतील नोंदींवरून सांगितले जाते. शके १२१८ च्या सुमारास झालेल्या या दक्षिण भारतातील प्रवासातून त्यांनी विविध प्रदेशांतील लोकांपर्यंत भक्तीचा संदेश पोहोचवला.

या कार्याचा दक्षिण भारतातील काही समाजघटकांवरही प्रभाव पडल्याचे उल्लेख आढळतात. विशेषतः दर्जी आणि छिप्पिगा यांसारख्या समाजघटकांमध्ये नामदेव महाराजांच्या भक्तिपरंपरेचा प्रभाव निर्माण झाला आणि काही ठिकाणी या समाजांनी ‘नामदेव’ हे नाव आपल्या सामाजिक ओळखीशी जोडले.

भिन्न प्रदेशांतील लोकांशी त्यांच्या भाषेत संवाद साधणे, स्थानिक परंपरांचा परिचय करून घेणे आणि भक्तीच्या समान सूत्राने त्यांना जोडणे, या कार्यातून सामाजिक समरसतेचा व्यापक आविष्कार दिसून येतो.

 संपूर्ण भारताची सहा वर्षांची पदयात्रा

संत नामदेव महाराजांच्या भारतभ्रमणाचा आणखी एक महत्त्वाचा उल्लेख त्यांच्या तीर्थयात्रेच्या नोंदींमध्ये आढळतो.( वै. प्र. सी. सुबंध यांना पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरात शके १५०३ मध्ये लिहिलेली एक जुनी हस्तलिखित नोंद मिळाल्याचा संदर्भ दिला जातो. या तीर्थयात्रेचे वर्णन चौदा अभंगांत संक्षिप्त स्वरूपात असल्याचे सांगितले जाते.)

या नोंदींनुसार, शके १२२० ते १२२६ या सहा वर्षांच्या कालखंडात नामदेव महाराजांनी भारतातील अनेक तीर्थक्षेत्रांची पायी यात्रा केली. या प्रवासात ते काही तीर्थक्षेत्रांमध्ये अनेक महिने मुक्काम करून कीर्तन-भजनाच्या माध्यमातून भक्तिप्रचार करत असत. या विशिष्ट यात्रेत इतर संत त्यांच्या सोबत असल्याचा उल्लेख आढळत नसल्यामुळे ही यात्रा त्यांनी एकट्याने केली असावी, असे या नोंदींच्या आधारे मानले जाते.

द्वारकेतील त्यांच्या मुक्कामाचा उल्लेख एका अभंगचरणात आढळतो :

“षण्मास राहिल्या द्वारकेचे पुण्य ।
एके दिवशी संकोद्वारी तेथे जाऊनि पाहिला देव ॥”

या ओळींवरून द्वारकेत त्यांनी सहा महिने वास्तव्य केले आणि त्या काळात संकोद्वाराला भेट दिली, अशी माहिती मिळते.

या दीर्घ पदयात्रेत त्यांनी पश्चिमेकडून प्रवास सुरू करून उत्तरेकडील आणि पूर्वेकडील अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. त्यानंतर ते पुन्हा पंढरपूरला परतले. या यात्रेच्या नोंदींमध्ये पुढील ठिकाणांचा उल्लेख आढळतो :

नीरा-भीवर संगम, गोदावरी, नाशिक-पंचवटी, घृष्णेश्वर, ओंकार-मांधाता, द्वारका, रैवतक, ढवळपूर, मुचकुंदगुंफा, प्रभास, सोरटी सोमनाथ, सिद्धपूर, पुष्कर, कुरुक्षेत्र, ठाणेश्वर, यमुनातीर, इंद्रप्रस्थ, हस्तिनापूर, अंतर्वेदी, मायापूर, हरिद्वार, ऋषिकेश, देवप्रयाग, केदार, कैलास, बद्रीनारायण, मानससरोवर, गंडकी, अयोध्या, नैमिषारण्य, मधुपुरी, गोकुळ-वृंदावन, कालियाडोह, गौतमेश्वर, मिथिला अर्थात जनकनगरी, उज्जयिनी, प्रयाग, काशी, विश्वेश्वर, गया, गंगा-सागर संगम आणि महाबळेश्वर.

या प्रदीर्घ यात्रेतून नामदेव महाराजांनी भारतातील विविध तीर्थपरंपरांचा अनुभव घेतला आणि भक्तीचा संदेश दूरवर पोहोचवला. त्यांच्या कीर्तन-भजनातून विठ्ठलनाम आणि ईश्वरभक्तीचा प्रसार झाला. प्रांत, भाषा आणि स्थानिक परंपरांमध्ये विविधता असली, तरी भक्तीची भावना सर्वांना जोडू शकते, हा अनुभव त्यांच्या भारतभ्रमणातून व्यक्त होतो. त्यांच्या कार्याचे पडसाद पुढील काळातील मध्य भारत आणि उत्तर भारतातील भक्तिसाहित्यावरही उमटल्याचे अभ्यासक नमूद करतात.

राजस्थानमधील भक्तिप्रचार आणि सामाजिक समरसतेची परंपरा

राजस्थानमध्ये संत नामदेव महाराजांनी विविध ठिकाणी मुक्काम करून भजन-कीर्तनाच्या माध्यमातून भक्तीचा प्रसार केला. त्यांच्या कार्याचा राजस्थानच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनावर दीर्घकालीन प्रभाव पडल्याचे तेथील नामदेव परंपरेशी संबंधित स्थळे आणि लोकस्मृती दर्शवतात.

जयपूर येथे नामदेवांची तीन मंदिरे असल्याचा उल्लेख आढळतो. जोधपूर आणि अलवर येथेही त्यांची मंदिरे आहेत. बिकानेरजवळील कोलायतजी येथे नामदेवरायांची विहीर असल्याची परंपरा सांगितली जाते. पुष्कर येथे दोन मंदिरे असून बगरू, सांगानेर, काळाडेरा आणि अन्य ठिकाणीही नामदेव महाराजांशी संबंधित मंदिरे आढळतात. राजस्थानातील विविध भागांत लहान-मोठी सार्वजनिक मंदिरे असल्याचे उल्लेख त्यांच्या भक्तिप्रचाराच्या प्रभावाची साक्ष देतात.

या कार्याचा सामाजिक परिणामही दिसून येतो. राजस्थानातील शिंपी समाजातील काही घटकांनी स्वतःची ओळख ‘नामावंशी छिपा दर्जी’ अशी सांगण्याची परंपरा स्वीकारल्याचे उल्लेख आढळतात. यावरून नामदेव महाराजांच्या भक्तिपरंपरेचा धार्मिकतेबरोबरच सामाजिक ओळखीवरही प्रभाव पडल्याचे दिसते.

राजस्थानातील प्रसिद्ध भक्तकवयित्री मीराबाई यांनी आपल्या पदामध्ये नामदेव महाराजांचा आदरपूर्वक उल्लेख केला आहे. त्या म्हणतात :

“दास कबीर घर बालद जो लाया,
नामदेव की छान छबन्द ।।”

या पदातून मीराबाई यांनी नामदेव महाराजांच्या जीवनाशी संबंधित भक्तिपरंपरेचा भावपूर्ण उल्लेख केला आहे. संत नामदेव, संत कबीर आणि अन्य संतांविषयीची ही काव्यात्मक स्मृती उत्तर भारतातील संतपरंपरेत नामदेव महाराजांना मिळालेल्या स्थानाची जाणीव करून देते.

विविध प्रदेशांतील संतांविषयी आदराची भावना निर्माण होणे, त्यांच्या विचारांचे स्मरण केले जाणे आणि त्यांच्या भक्तिपरंपरांमध्ये परस्पर संबंध निर्माण होणे, ही भारतीय संतपरंपरेतील सामाजिक समरसतेची महत्त्वाची बाजू आहे.

उत्तर भारतातील कार्य : भक्ती, समता आणि सदाचाराचा संदेश

राजस्थाननंतर नामदेव महाराजांनी प्रयाग, वाराणसी, गया यांसारख्या महत्त्वाच्या धार्मिक केंद्रांतही भक्तिप्रचार केला. त्या काळात उत्तर भारतात राजकीय अस्थिरता आणि सत्तांतरांचे वातावरण होते. अशा परिस्थितीत त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना भक्ती, नैतिकता आणि आध्यात्मिक स्थैर्याचा आधार दिला.

हिंदी भाषिक प्रदेशांत त्यांनी लोकांना एकेश्वरभक्ती, शुद्ध भक्तिभाव, सदाचरण आणि मानवतेचा संदेश दिला. जात-वर्णाच्या भेदांपलीकडे जाऊन प्रत्येक व्यक्तीच्या आध्यात्मिक उन्नतीला महत्त्व देणारा विचार त्यांच्या कार्यातून व्यक्त झाला. त्यांच्या काही पदांमध्ये निर्गुण भक्तीचा भावही प्रकर्षाने आढळतो.

नामदेव महाराजांनी लोकांना केवळ कर्मकांडावर अवलंबून न राहता अंतःकरणातील भक्ती, नामस्मरण आणि सदाचार यांना महत्त्व देण्याची शिकवण दिली. त्यामुळे भक्ती ही केवळ विद्वानांची किंवा विशिष्ट वर्गाची मक्तेदारी न राहता सर्वसामान्यांच्या जीवनाचा भाग बनली.

मानवतेला केंद्रस्थानी ठेवणारी भक्ती, परस्पर आदर आणि जातिभेदांपलीकडील आध्यात्मिक समानता ही सामाजिक समरसतेची मूलभूत मूल्ये आहेत. नामदेव महाराजांच्या कार्यातून या मूल्यांना लोकजीवनात स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न दिसून येतो.

  • संत नामदेवांचा संदेश

संत नामदेवांचे मन भक्तिभावनेने भजन करण्यातच रममाण होत असे. त्यांच्या दृष्टीने विट्ठल, शिव, विष्णू आणि पांडुरंग हे सर्व एकच आहेत. सर्व जीवांमध्ये एकच आत्मा आहे. त्यामुळे जातीचा विचार खोटा आहे.संत नामदेव यांनी जातीपातींचा कटाक्षाने धिक्कार केला असून भक्तिभावनेला आवाहन केले आहे. रामनाम भजण्याचा त्यांनी उपदेश केला आहे :

नामाचा महिमा नेणेची पैं ब्रह्मा । म्हणोनियां कर्मा अनुसरला ॥१॥
नाम हेंचि कर्म नाम हेंचि धर्म । केशव हेंचि वर्म सांगितलें ॥२॥
नाम शुद्ध स्नान नाम शुद्ध संध्या । नामाविणें वेद आणिक नाहीं ॥३॥
करितां आचमन केशव नारायण । करिती उच्चारण आधीं हेंचि ॥४॥
लग्नाचिये काळीं म्हणती सावधान । लक्ष्मीनारायण चिंतन करा ॥५॥
देहाचिये अंती प्रायश्चित्त देती । शेवटीं वदविती रामनाम ॥६॥
ऐसिया नामापरतें नाहीं सार । गिरिजेसी शंकर उपदेशी ॥७॥
करिती पितृश्राद्ध कर्म आचरती । शेवटीं म्हणती एको विष्णु ॥८॥
नामें होय गति नामें होय मुक्ति । नामयाचे चित्तीं रामनाम ॥९॥

श्री गुरु नानकदेव यांनी पंजाबच्या भूमीवर पुढच्या काळात जो उपदेश दिला त्यातील महत्त्वाचा भाग संत नामदेवांच्या तत्त्वज्ञानातूनच आलेला आहे. श्री गुरु नानक देव यांच्या आधी २०० वर्षे संत नामदेवांनी पंजाबमध्ये शीख गुरूंच्या भक्ति-शक्ती जागृतीसाठी सामाजिक समन्वयाची व्यापक भूमिका तयार करून ठेवली होती.

  • संत नामदेव आणि ज्ञानेश्वरादी चार भावंडे जिव्हाळ्याचे संबंध

 संत नामदेव आणि आणि ज्ञानेश्वरादी चार भावंडे यांचे विशेष जिव्हाळ्याचे साख्यत्व आहे. नामदेवांचे गुरु विसोबा खेचर आहेत. तरीपण संत नामदेवांना संतसखा ज्ञानदेव, निवृत्ती, मुक्ताई, सोपानदेव ही चारही भावंडे गुरुस्थानी आहेत. त्यामुळे ‘ज्ञानदेवांची आदी’-३१ अभंग, ‘ज्ञानदेवांची समाधी’-३९ अभंग, ‘मुक्ताई समाधी’-१९ अभंग, ‘निवृत्तीनाथ समाधी’-५१ अभंग असे सुमारे  २५० ते ३०० अभंग नामदेवांनी ज्ञानदेवादी चार भावंडांवर लिहिले आहेत. या सर्व समाधी प्रसंगी स्वतः नामदेव उपस्थित आहेत, जे त्यांनी पाहिले त्याचे प्रत्यक्ष वर्णन अभंगातून केलेले आहे. संत ज्ञानदेवांचे चरित्र आपणास ज्ञानदेवांच्या साहित्यात सापडत नाही तर ते साद्यंतपणे नामदेव गाथेत मिळते. हे नामदेव गाथेचे ऐतिहासिक महत्त्व आहे. ‘तिन्ही देव जैसे परब्रह्मी ठसे’ अशा शब्दात निवृत्ती, ज्ञानदेव, सोपानदेव यांचे वर्णन, नादेव करतात आणि मुक्ताईला आदिशक्ती म्हणतात.

  • नामदेव पायरी : संतत्वातील विनम्रतेचा सर्वोच्च आविष्कार

श्रीविठ्ठलाच्या मंदिराच्या पहिल्या पायरीचा बहुमान मिळाला असे थोर संत नामदेव…

पंढरपूरच्या श्रीविठ्ठल मंदिरातील ‘नामदेव पायरी’ हे संत नामदेव महाराजांच्या भक्तीचे आणि विनम्रतेचे चिरंतन प्रतीक आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या संत-सज्जनांच्या चरणधुळीचा स्पर्श आपल्या मस्तकाला व्हावा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे मंदिराच्या महाद्वाराजवळील पहिल्या पायरीशी त्यांचे नाव जोडले गेले. संतत्वाच्या शिखरावर पोहोचूनही संतांच्या चरणांशी एकरूप होण्याची त्यांची आकांक्षा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील नम्रता आणि संतपरंपरेविषयीचा आदर दर्शवते.

नामदेव पायरी म्हणजे केवळ मंदिरातील एक पायरी नव्हे तर ती भक्ती, विनम्रता आणि संतसंगतीच्या महत्त्वाची आठवण करून देणारे श्रद्धास्थान आहे.

  • संत नामदेव- अल्पपरिचय

संत नामदेव यांचा जन्म कार्तिक शुद्ध एकादशी विक्रम संवत १३२७ मध्ये सध्याच्या हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव येथे झाला. दामाशेटी हे त्यांच्या वडिलांचे तर गोणाई हे आईचे नाव. नामदेवकृत म्हणून मानले जाणारे एक ‘आत्मचरित्र’ नामदेवांच्या संकलित गाथेत अंतर्भूत आहे. त्यात ‘गोणाई दामाशेटी झाले पाणिग्रहण । संसारी असोन नरसीगावी।।‘ असा निर्देश सापडतो.

शिंपीकाम हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय असला तरी संत नामदेवांचे मन त्यात रमत नसे. त्यांच्या कुटुंबात विठ्ठलभक्तीचे वातावरण होते. नामदेवांनाही लहानपणापासूनच विठ्ठलभक्तीची ओढ लागली. एकदा विठ्ठलासाठी नैवेद्य घेऊन देवळात गेलेले नामदेव देव नैवेद्य खाईना, म्हणून त्याच्या पायांवर डोके आपटून प्राण द्यावयास निघाले आणि भक्तवत्सल देवाने त्यांची ही भक्ती पाहून नैवेद्य आनंदाने खाल्ला, अशी आख्यायिका सांगितली जाते.

संत नामदेवांचा विवाह राजाई यांच्याशी झाला. त्यांना नारायण, महादेव, गोविंद आणि विठ्ठल असे चार पुत्र आणि लिंबाई नावाची मुलगी होती. मात्र त्यांचे मन केवळ विट्ठलाची भक्ती करण्यात लीन होई. दिवस-रात्र ते विठ्ठलाचे नामस्मरण करत असत. एक वेळ अशी आली, की नामदेवांचा प्रत्येक श्वास विठोबाच्या नावासरशी होत असे.

  • संत नामदेव साहित्य
  • नामदेव गाथेचे स्वरूप

संत नामदेव अभंगगाथेच्या अनेक आवृत्त्या आहेत. त्यातील अभंगाची संख्याही एकसारखी नाही. महाराष्ट्र शासन प्रकाशित गाथेमध्ये नामदेवांचे २१०७ मराठी अभंग आणि २२४ हिंदी रचना अशी एकूण २३३१ कविता आहेत. तर साखरे महाराज संपादित आवृत्तीत २३७३ म्हणजे सुमारे ४२ अभंग अधिक आहेत. गुलाबाला पाकळ्या किती? यापेक्षा त्यापेक्षा त्याचा सुगंध कसा आहे हे जसे महत्त्वाचे असते तसे कवीच्या काव्य संख्येला महत्त्व नसून आशय आणि रसात्मकता महत्त्वाची आहे.

‘शत कोटी तुशे करीन अभंग’ असा संत नामदेवांचा संकल्प एका अभंगातून व्यक्त झाला आहे. पण या ओळीतील कोटी शब्दाचा अर्थ संख्यात्मक नसून विविध प्रकार- वर्ग या अर्थी आहे. नामदेव अभंगगाथेत वेगवेगळ्या विषयावर ३० प्रकरणे आहेत. प्रत्येक प्रकरणातील अभंगांची संख्याही वेगळी म्हणजे कमी-अधिक आहे. अर्थात हे वर्गीकरण संपादकांनी केलेले असावे.

‘गंगामाहात्म्य’ नावाच्या प्रकरणात केवळ एकच अभंग रचना आहे तर ‘आत्मसुखप्राप्ती-आर्तोद्गार’ या प्रकरणात सर्वाधिक २७४ अभंग रचना आहेत. नामदेव गाथेचा प्रारंभ ‘मंगलचरण’ प्रकरणाने होतो. या प्रकरणात एकूण पाच अभंग आहेत. पाचही अभंग गणेश वंदनेचे आहेत. ‘प्रथम नमन करू गणनाथा’, ‘प्रथम नमू गजवदन’ हे अभंग गणेशभक्तांमध्ये परिचित आहेत.

श्रीकृष्णाच्या बाललीला सर्व संताच्या अभंगाचा मोहक विषय आहे. नामदेव गाथेतही बाळक्रीडा नावाचे प्रकरण असून २०८ अभंगामधून कृष्णाच्या लडिवाळ लीलांचे वर्णन संत नामदेव करतात. ‘श्रीमद् भागवत’ या संस्कृत ग्रंथातील दशम स्कंधातील बाळकृष्णाचे चरित्र या अभंगातून शब्दमूर्त होते. त्याशिवाय कृष्णलीला वर ७९ अभंग नामदेवांनी लिहिलेले आहेत.

नामदेवांच्या गाथेत ‘रामकथा माहात्म्य’ कथन करणारे २७ अभंग आहेत. तसेच विठ्ठल माहात्म्य- ७२ अभंग, पंढरी क्षेत्र माहात्म्य- ४९ अभंग, विठ्ठलभक्तवत्सलता- १०३ अभंग, तुलसी माहात्म्य- ६ अभंग, नाममहिमा- १९४ अभंग, संत महिमा- ४४ अभंग, तिर्थावळीचे- ६२ अभंग, आत्मनिवेदन- १२० अभंग अशी अनेक विषयांवरील काव्यरचना हे नामदेव गाथेचे वैशिष्ट्य आहे.    

  • मराठी साहित्यातील पहिले आत्मचरित्रकार

संत नामदेव हे साहित्यिकदृष्ट्या साक्षात्कारी अभंग रचनाकार कवी आहेत. तसेच ते मराठी साहित्यातील पहिले आत्मचरित्रकार आहेत. त्यांनी १५२ अभंगातून स्वतःची जीवनगाथा कथन केलेली आहे. त्यांनी ‘नामा म्हणे संत कृपासिंधू।’ असे म्हणत अनेक समकालिन सांगाती संतांची चरित्रे लिहिलेली आहेत. त्यामुळे संत नामदेव हे मराठी साहित्यातील अग्रणी ‘चरित्रकार’ सुद्धा आहेत.

  • संत नामदेवांचे पसायदान

संत ज्ञानदेवांच्या पसादानाप्रमाणेच संत नामदेवांचेही एक पसायदान आहे. ‘आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा।’ त्यामध्ये त्यांनी सकल संतजनांना म्हणजेच समाजातील सज्जनशक्तीला आकल्प आयुष्य लाभावे अशी मागणी केलेली आहे. ‘आमचा स्वदेश। भुवनत्रयामाजी वास।’, ‘हे विश्वचि माझे घर’ अशी भव्य-उदात्त विश्वात्मक दृष्टी बाळगणाऱ्या मराठी संतमंडळीमध्ये ‘अभंगाकार’ नामदेवांचे स्थान महाराष्ट्रातच नाही तर भारतवर्षामध्ये अजरामर आहे.

  • अद्भूत भावकाव्य       

नाचू किर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी ।। हे संत नामदेवांच्या कार्याचे ब्रीद होते. या ओवीतील ‘ज्ञान’, ‘दीप’ आणि ‘जग’ हे तीन शब्द त्यांचे भक्तिकाव्य (अभंगगाथा) मराठी सारस्वताला अनेक अंगाने, अनेक प्रकाराने सुसंपन्न करणारे काव्य आहे. मराठी भाषेच्या आरंभीक काळात इतक्या विविध प्रकारची एवढी भावपूर्ण कविता संत नामदेवांनी लिहिली आहे की, संत ज्ञानदेव म्हणतात, “तसे हा रस अद्भूत आहे. अनेक आधुनिक काव्य समीक्षकांनीही नामदेवांच्या काव्यातील सौंदर्याची आस्वादक समीक्षा केलेली आहे.”

नामदेव अभंगगाथेच्या वेगवेगळ्या संपादकांनी संपादन केलेल्या अनेक आवृत्या प्रकाशित झालेल्या आहेत. त्यामध्ये श्रीजोग महाराज, आवटे, गोंधळकर, तुकाराम तात्या आणि श्रीसुबंध यांनी संपादित केलेल्या आवृत्त्या प्रमुख आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे शिक्षणमंत्री मधुकर चौधरी यांनी संत नामदेव जन्म सप्तशताब्दीनिमित्त १९७० साली ‘नामदेवांची अभंगगाथा’ प्रकाशित केलेली आहे. 

वारकरी संप्रदायाचे थोर तत्त्वज्ञ, किर्तनकार प्राचार्य सोनोपंत दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली खास समिती तयार करून महाराष्ट्र शासनाने ही गाथा मोठ्या परिश्रमपूर्वक तयार केली. त्यासाठी अनेक ठिकाणची अनेक हस्तलिखिते जमा केली गेली होती. सरकारने केवळ १० रुपये अल्प किंमतीत ११५० पानांची सचित्र अभंगगाथा भाविकांना देऊन मराठी भाषा ग्रंथ व्यवहारास मौलिक मदत केली होती. ‘मराठी काव्यात ‘अभंग’ या छंदाचे संत नामदेव हे पहिले उद्गाते आहेत.’ असे अनेक अभ्यासकांचे मत आहे.  

  • नामदेवांचे देहवसान

संत नामदेव हे ऐंशी वर्षांचे झाल्यानंतर इहलोक सोडून जाण्याचे त्यांनी ठरवले. आषाढ शुद्ध एकादशी शके १२७२ रोजी विठ्ठला पुढे जाऊन आज्ञा द्यावी अशी विनंती केली त्यानंतर आषाढ वद्य त्रयोदशी शके १२७२ या दिवशी त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी समाधी घेतली. विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या सर्व संत सज्जनांची धूळ आपल्या मस्तकी लागावी ही त्यांची इच्छा असल्यामुळे महाद्वाराच्या पहिल्या पायरीवर ते समाधिस्थ स्थान तयार करण्यात आले आहे.भगवद्भक्तांच्या व साधु-संतांच्या चरण धुळीचा स्पर्श व्हावा म्हणून पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी ‘पायरीचा दगड’ होण्यात त्यांनी धन्यता मानली.त्याला आज “नामदेवाची पायरी” म्हणतात.

  • संदर्भ :

https://www.vayuveg.com//Encyc/2025/11/1/sant-namdev-maharaj-warakari-sect-legacy.php

https://santmahant.in/sant-namdev-maharaj-information-in-marathi

https://www.spiritualawareness.co.in/bhakt-stories/sant-namdev

https://kavishala.com/sootradhar/namdev/sabda-guru-grantha-sahiba-santa-namadeva-ji

https://www.bbc.com/marathi/india-60384888

https://www.mahamtb.com/Encyc/2024/11/11/samajik-samrasata-sant-namdeorai.html?

Back to top button