NewsRSS

साधेपणा, निःस्वार्थ सेवा आणि समर्पणातून आदर्श स्वयंसेवकत्वाचा वस्तुपाठ घालून देणारे हो. वे. शेषाद्रीजी – सरकार्यवाह दत्तात्रेयजी होसबाळे

बंगळुरू, १३ नोव्हेंबर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक व माजी सरकार्यवाह हो.वे. शेषाद्रीजींनी आपल्या साधेपणातून, सखोल वैचारिक चिंतनातून, संघटनात्मक निष्ठेतून आणि राष्ट्रनिर्माणासाठी आयुष्यभर केलेल्या समर्पित कार्यातून आदर्श स्वयंसेवकत्वाचा वस्तुपाठ घालून दिला असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळेजी यांनी केले. शेषाद्रीजींचे जीवन भावी पिढ्यांतील स्वयंसेवकांसाठी प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

बंगळुरू येथे स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्थानच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात शेषाद्रीजी यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला संबोधित करताना सरकार्यवाहजी म्हणाले की, शेषाद्रीजींनी विद्वत्ता आणि विनम्रता, नेतृत्व आणि आत्मीयता तसेच संघटनात्मक जबाबदारी आणि भौतिक सुखांपासून अलिप्तता यांचा सुंदर समन्वय आपल्या आचरणातून साधून दाखवला. शेषाद्रीजींच्या नेतृत्वशैलीचे उदाहरण देताना त्यांनी एक प्रसंग सांगितला. एकदा संघातील एका कार्यकर्त्याच्या पायातील बुटाची नाडी व्यवस्थित बांधलेली नसल्याचे शेषाद्रीजींच्या लक्षात आले. त्यांनी केवळ त्याकडे लक्ष वेधण्याऐवजी स्वतः खाली वाकून त्या कार्यकर्त्याच्या बुटाची नाडी बांधून दिली. या प्रसंगाची आठवण सांगताना तो कार्यकर्ता म्हणाला होता की, शेषाद्रीजींनी केवळ माझ्या बुटाची नाडी बांधली नाही, तर मला आयुष्यभरासाठी संघाशी आणि राष्ट्राशी जोडून घेतले.

“शेषाद्रीजींनी अशा प्रकारे माणसांना संघटनेशी आणि राष्ट्राशी जोडले,” असे होसबाळेजी म्हणाले. अगदी साध्या वाटणाऱ्या कृतीतूनही एखाद्याच्या मनावर कायमस्वरूपी प्रभाव निर्माण करता येतो आणि त्यातून आयुष्यभराची निष्ठा व समर्पणभाव जागृत करता येतो, हे या प्रसंगातून स्पष्ट होते, असे त्यांनी नमूद केले.शेषाद्रीजींचा साधेपणा आणि विनोदबुद्धी अधोरेखित करणारा आणखी एक प्रसंग त्यांनी सांगितला. शेषाद्रीजींच्या दाढी करण्याच्या आरशाला तडा गेला होता. तो बदलून नवीन आरसा घेण्याची सूचना त्यांना करण्यात आली. त्यावर त्यांनी मिश्कीलपणे उत्तर दिले की, स्वतःचा चेहरा पाहण्यासाठी त्यांना तेवढाच आरसा पुरेसा आहे, उर्वरित भागाची त्यांना आवश्यकता नाही. तुटलेल्या आरशात चेहरा पाहणे अशुभ मानले जाते, असे त्यांना सांगितले असता शेषाद्रीजी म्हणाले की, आयुष्यात जे काही साध्य करायचे होते, ते सर्व साध्य झाले आहे. त्यामुळे आता त्यांना आणखी काही शुभ घडण्याची अपेक्षा उरलेली नाही.

या प्रसंगांचा उल्लेख करताना दत्तात्रेय होसबाळेजी म्हणाले की, शेषाद्रीजींच्या व्यक्तिमत्त्वातील साधेपणा आणि निरहंकारी वृत्ती यातून दिसून येते. आपल्या विद्वत्तेचा किंवा संघटनात्मक पदाचा त्यांनी कधीही वैयक्तिक प्रतिष्ठा अथवा सुखसोयींसाठी उपयोग केला नाही. एम.एस्सी. परीक्षेत सुवर्णपदक मिळवणारे शेषाद्रीजी अत्यंत साधे जीवन जगले आणि सामान्य कार्यकर्त्यांसाठी नेहमीच सहज उपलब्ध राहिले.

काही काळ शिक्षक म्हणून काम केल्यानंतर शेषाद्रीजींनी स्वतःला पूर्णवेळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यासाठी समर्पित केले. संघटनेतील विविध जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे पार पाडल्या. त्यांनी तब्बल १३ वर्षे संघाचे सरकार्यवाह म्हणून काम पाहिले. या काळात संघाच्या विस्तारासाठी आणि संघटनात्मक बळकटीसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले.

शेषाद्रीजींचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी असल्याचे सांगताना होसबाळेजी म्हणाले की, त्यांचे योगदान केवळ संघटनात्मक नेतृत्वापुरते मर्यादित नव्हते. शेषाद्रीजींनी एकूण ३२ ग्रंथांचे लेखन केले असून, त्यांच्या संकलित साहित्याची पाने चार हजारांहून अधिक आहेत. त्यांच्या लेखनातून भारतीय ज्ञानपरंपरा, तसेच आंतरराष्ट्रीय विचारवंत आणि साहित्य यांचा सखोल अभ्यास दिसून येत असे. कन्नड, इंग्रजी आणि हिंदी या भाषांमधून त्यांनी लेखन केले.संघकार्यकर्त्यांसोबतच शिक्षक, शेतकरी, व्यापारी तसेच समाजातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या लोकांना मार्गदर्शन मिळावे, हा त्यांच्या लेखनाचा व्यापक दृष्टिकोन होता.

संघाच्या सेवा कार्याच्या विस्तारातील शेषाद्रीजींच्या योगदानाचाही सरकार्यवाहजींनी विशेष उल्लेख केला. यादव राव जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नाटकात सुरू झालेल्या सेवा कार्याच्या उपक्रमाचा पुढे देशव्यापी सेवा उपक्रमांच्या जाळ्यात विस्तार झाला. या विस्तारामध्ये शेषाद्रीजींची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण होती. शेषाद्रीजी सतत प्रवास करत असत. दुर्गम भागांतील गावांपर्यंत पोहोचून तेथील स्वयंसेवकांशी त्यांचा वैयक्तिक संपर्क प्रस्थापित करणे, हा त्यांच्या कार्यपद्धतीचा महत्त्वाचा भाग होता. त्यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि भावनिक आधार देण्यासाठी तब्बल दहा हजारांहून अधिक पत्रे लिहिली. संघटनात्मक कार्य करताना केवळ औपचारिक संपर्क न ठेवता प्रत्येक व्यक्तीशी आत्मीयतेचे नाते निर्माण करण्यावर त्यांचा भर असे. प्रवासादरम्यान ते स्वयंसेवकांच्या कुटुंबीयांशी, मुलांशी आणि युवकांशीही संवाद साधत. योगाभ्यास, भगवद्गीता आणि भारतीय सांस्कृतिक मूल्यांचे आचरण करण्यासाठी ते त्यांना प्रोत्साहित करत असत.

शेषाद्रीजी योगाकडे केवळ व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे साधन म्हणून पाहत नव्हते, तर सामाजिक परिवर्तन आणि राष्ट्रनिर्माणाचे प्रभावी माध्यम म्हणून त्याकडे पाहत होते. ‘योग : द सोशल इम्परेटिव्ह’ या आपल्या ग्रंथातून त्यांनी योग हा जीवनाचा अविभाज्य भाग बनला पाहिजे आणि त्यातून संपूर्ण मानवजातीचे कल्याण साधले गेले पाहिजे, असा विचार मांडला आहे.

शेषाद्रीजींच्या विचारांचा भगवद्गीतेशी संबंध जोडताना होसबाळेजींनी त्यांचे वर्णन ‘सात्त्विक कार्यकर्ता’ असे केले. सात्त्विक कार्यकर्ता उत्साहाने आपले कर्तव्य पार पाडतो, वैयक्तिक आसक्तीपासून अलिप्त राहतो आणि यश-अपयशाच्या प्रसंगी मनाची समतोल अवस्था कायम राखतो. शेषाद्रीजींच्या जीवनात या गुणांचे दर्शन घडत असल्याचे त्यांनी सांगितले.

शिस्त आणि करुणा, ज्ञान आणि विनम्रता तसेच निष्ठा आणि निःस्वार्थ वृत्ती यांचा समन्वय साधणारा कार्यकर्ता हेच शेषाद्रीजींच्या जीवनातून साकार झालेले आदर्श स्वयंसेवकत्व आहे, असे होसबाळेजी यांनी अधोरेखित केले.

यावेळी होसबाळेजींनी स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्थानने ५० वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण केल्याबद्दल संस्थेचे अभिनंदन केले. योगाच्या क्षेत्रात वैज्ञानिक संशोधन, शैक्षणिक मान्यता, आरोग्यसेवेतील उपयोजन आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसार या माध्यमांतून संस्थेने महत्त्वपूर्ण योगदान दिले असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेचे अध्यक्ष एच. आर. नागेंद्र, उपाध्यक्ष नागरत्ना आणि त्यांच्या संपूर्ण चमूने योग व योगशास्त्राला जागतिक स्तरावर प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे, असेही त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. त्यांनी डिजिटल माध्यमातून एस-व्हायएएसएच्या प्रस्तावित सुवर्णमहोत्सवी प्रशासकीय इमारतीची पायाभरणी केली तसेच संस्थेच्या तिरुवनंतपुरम येथील परिसराचा शुभारंभ केला.

Back to top button