जोधपूर, १५ नोव्हेंबर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जोधपूर प्रांतात आयोजित चार दिवसीय घोष शिबिराचा ‘मरु निनाद २०२६’ हा समारोप सोहळा सरसंघचालक डॉ. मोहन भागवत जी यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहणारी व्यक्तीच खऱ्या अर्थाने आनंदी जीवन जगू शकते. सुसंस्कारी व्यक्तीच देशासाठी निःस्वार्थ भावनेने कार्य करू शकते, असा संघाचा विश्वास आहे. इतरांच्या सुख-दुःखात धावून जाणारी व्यक्ती समाजाला जोडण्याचे कार्य करते. संगीताचे महत्त्व केवळ संगीताच्या मैफलीपुरते मर्यादित नसून रणांगणातही त्याची महत्त्वपूर्ण भूमिका असते. आपले स्वतंत्र रणसंगीत असले पाहिजे, कारण संगीतामुळे स्वाभिमानाची भावना जागृत होते.
‘मरु निनाद २०२६’ या घोष शिबिराचा समारोप सोहळा लूणी येथील शिकारपुरा परिसरातील श्री राजाराम आश्रमाच्या विशाल प्रांगणात पार पडला. या सोहळ्याला १५ हजारांहून अधिक स्वयंसेवक आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत जी म्हणाले की, आताच आपण घोषवादनाचा आविष्कार पाहिला, मात्र या वादनामागे संस्कार आणि शिस्त यांची मोठी परंपरा आहे. हीच शिस्त सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा मार्ग दाखवते. आपल्या देशात रणसंगीताची प्राचीन परंपरा आहे. भगवद्गीतेतही त्याचे उल्लेख आढळतात. पणव, पाञ्चजन्य, शंख आदी वाद्यांचा उल्लेख त्यात आलेला आहे. विविध एकलगीते, संगीत आणि घोषवादन यांच्या माध्यमातून संघाने संगीताची स्वतंत्र परंपरा निर्माण केली आहे. आता भारतीय संगीतविश्वात रणसंगीतालाही महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. संघाचे संगीतकार हे व्यावसायिक संगीतकार नाहीत. संगीत ही एक कला असून, त्यामध्ये भारतीय जीवनपद्धती, जीवनसंस्कार आणि जीवनमूल्ये यांचा समावेश आहे. एखाद्या सुंदर गीतातून वातावरणनिर्मिती होते आणि मनात विशिष्ट भावभावना जागृत होतात, असेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, संघात कोणीही वैयक्तिक वादन करत नाही. सर्वजण मिळून वादन करतात. अशा सामूहिक वादनातून सर्वांची मने एकमेकांशी जोडली जातात. एका ठिकाणी एकत्र येणे, एकोप्याने राहणे आणि एकत्रितपणे काहीतरी श्रेष्ठ कार्य करणे, हीच संघाची कार्यपद्धती आहे. संगीताचे खरे जाणकार केवळ त्यातील तज्ज्ञ नसतात, तर त्याचे मनापासून श्रवण करणारे श्रोतेही असतात.
समारोप सोहळ्याची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर शिबिरात प्रशिक्षण घेतलेल्या स्वयंसेवक घोषवादकांनी विविध रचनांचे सुरेल आणि शिस्तबद्ध घोषवादन सादर केले. जोधपूर प्रांताचे संघचालक हरदयाल वर्मा यांनी शिबिराचा अहवाल सादर केला तसेच व्यासपीठावरील मान्यवरांचा परिचय करून दिला.या सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले महेशा राम जी मेघवाल यांनी सर्वांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. तसेच उपस्थित विशेष अतिथी मेजर जनरल अर्जुन सिंह राठोड यांनी घोषवादकांच्या सादरीकरणाचे कौतुक केले. या घोषसंगीतामुळे संपूर्ण वातावरणात सकारात्मक ऊर्जेचा संचार झाल्याचे त्यांनी नमूद केले. स्वयंसेवक घोषवादकांचे सादरीकरण एखाद्या पूर्ण प्रशिक्षित सैन्यदलाच्या तुकडीच्या वादनाप्रमाणे असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
यावेळी स्वयंसेवकाने सादर केलेल्या,
“कुरूक्षेत्र के शंखनाद का, अर्थ समझना होगा
धर्म पक्ष में कौन खड़े हैं, उन्हें समझना होगा….
….अर्थ समझना होगा!”
या गीताने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
