NewsRSSकोकण प्रान्त

जनजातीय भागासाठी ‘सेवांकुर भारत’चा उपक्रम

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या आणि देशपातळीवर आरोग्य व समाजसेवेचे व्रत घेतलेल्या ‘सेवांकुर भारत’ या सामाजिक व चिकित्सीय संघटनेच्या वतीने पालघर आणि विक्रमगड परिसरातील जनजातीय बांधवांसाठी एका विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या स्तुत्य उपक्रमांतर्गत मुंबई व पुणे येथील वैद्यकीय महाविद्यालयांमधून ‘एमबीबीएस’, ‘बीडीएस’ आणि ‘बीएएमएस’चे शिक्षण घेणारे तब्बल १४० तरुण व उत्साही वैद्यकीय विद्यार्थी पालघर जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

हे सर्व विद्यार्थी पालघर व विक्रमगड परिसरातील दुर्गम जनजातीय पाड्यांवर जाऊन थेट त्यांच्या घरी दोन दिवस वास्तव्य करणार आहेत. तेथील स्थानिक नागरिकांच्या आरोग्याची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांच्या गरजा समजून घेत त्यांना मोफत औषधोपचार व वैद्यकीय सुविधा पुरविल्या जाणार आहेत.

देशभरात चौदा वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारच्या सेवा शिबिरांचे आयोजन केले जाते, त्यामध्ये आपल्या पालघर जिल्ह्यातील जनजातीय क्षेत्राचाही समावेश असणे हे अत्यंत अभिमानास्पद आहे. या भावी डॉक्टरांच्या उत्साह आणि समाजसेवेच्या भावनांचा सन्मान करण्यासाठी दि. १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.१५ वाजता पालघर रेल्वे स्थानकावर फ्लाईंग राणी ट्रेनने येणाऱ्या या वैद्यकीय पथकाचे स्वागत करण्यात येणार आहे.

मेडिकलच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सामाजिक जाणिवांची ओळख व्हावी, राष्ट्रनिर्माणाचे बाळकडू मिळावे आणि भविष्यात गरिबांच्या व वंचित घटकांच्या सेवेसाठी ते सदैव तत्पर राहावेत, हा या उपक्रमाच्या मागचा मुख्य उद्देश असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.

https://epaper.mahamtb.com/article.php?mid=Mpage_2026-11-19_a992b713b0b1c6153ea93fcb2793d2da_ai

Back to top button