नाना पालकर स्मृती समितीच्या रक्तदान शिबिरात ७२ रक्तदात्यांचे योगदान..
गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्तदानाबाबत सामाजिक जनजागृती व्हावी, या उद्देशाने नाना पालकर स्मृती समिती, परळ आणि नायर रुग्णालय रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने परळ येथील रुग्ण सेवा सदनात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ७२ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले.
‘रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा’ हे ब्रीदवाक्य घेऊन रुग्णसेवेच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या नाना पालकर स्मृती समितीच्या या उपक्रमाला विविध क्षेत्रांतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी ९ वाजता सुरू झालेल्या शिबिरात रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून गरजू रुग्णांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपली. रक्तदानातून गरजू रुग्णांना जीवनदान देण्याच्या या उपक्रमात नायर रुग्णालयातील डॉक्टर-कर्मचारी आणि नाना पालकर स्मृती समितीच्या कर्मचाऱ्यांनी विशेष योगदान दिले. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून रक्तदान शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.
शिबिराच्या आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे, नायर रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे आणि इतर सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचे नाना पालकर स्मृती समितीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. रक्तदानासारख्या सामाजिक उपक्रमांत नागरिकांनी अधिकाधिक सहभाग घ्यावा, असे आवाहनही समितीच्या वतीने करण्यात आले.
साभार :- मुंबई तरुण भारत.
