स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती : सेवा, श्रद्धा आणि समर्पण
ओडिशाच्या सामाजिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक इतिहासात स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांचे नाव आदराने घेतले जाते. अध्यात्माला लोकसेवा आणि सांस्कृतिक जागृतीची जोड देत त्यांनी आपले आयुष्य उपेक्षित, वंचित आणि जनजातीय समाजाच्या उत्थानासाठी समर्पित केले. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह मा. दत्तात्रेय होसबाळे यांनी इंदूर येथे अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीत स्वामीजींच्या जीवनकार्याचा गौरव केला. धर्मरक्षणासाठी प्राणार्पण करणारे संत आणि समाजाच्या स्वाभिमानासाठी अखेरच्या श्वासापर्यंत झटणारे द्रष्टे कार्यकर्ते, अशा शब्दांत त्यांनी स्वामीजींचे वर्णन केले.
स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांचा जन्म १८ ऑगस्ट १९२६ रोजी ओडिशातील अनुगुल जिल्ह्यातील गुरूजांग येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. ग्रामीण संस्कृती, साधेपणा आणि कष्टाचे संस्कार त्यांच्यावर बालपणापासून झाले. तरुणपणी ओडिशातील संस्थानांच्या विलीनीकरणासाठी आणि ब्रिटिश सत्तेविरोधात सुरू असलेल्या ‘प्रजामंडळ’ आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची आणि समाजासाठी समर्पित होण्याची वृत्ती या आंदोलनातून त्यांच्या मनात रुजली.
स्वातंत्र्योत्तर काळात काही काळ गृहस्थाश्रमाची जबाबदारी पार पाडल्यानंतर आध्यात्मिक सत्याचा शोध आणि लोककल्याणाच्या ओढीने त्यांनी संन्यासदीक्षा घेतली. ‘स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती’ या नावाने ते ओळखले जाऊ लागले. काशी आणि हिमालयात त्यांनी वेदांत, उपनिषदे, हिंदू धर्मशास्त्रे आणि संस्कृत व्याकरणाचा सखोल अभ्यास व साधना केली. भारतीय संस्कृतीची एकात्मता आणि लोकसेवेचे महत्त्व जाणून, केवळ वैयक्तिक मोक्षसाधनेऐवजी समाजाच्या दुःखमुक्तीसाठी कार्य करण्याचा संकल्प त्यांनी केला आणि ओडिशाच्या दुर्गम भागात परतले.
१९६० च्या दशकात त्यांनी कंधमाळ (पूर्वीचा फुलबानी) हा डोंगराळ, दुर्गम आणि वनवासीबहुल जिल्हा कार्यक्षेत्र म्हणून निवडला. त्या काळात हा प्रदेश दळणवळणाच्या सुविधांपासून वंचित होता. डोंगरदऱ्यांत विखुरलेल्या जनजातीय समाजाला गरिबी, निरक्षरता, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता आणि आरोग्य सुविधांचा अभाव अशा समस्यांना सामोरे जावे लागत होते. या परिस्थितीचा गैरफायदा घेत प्रलोभने आणि फसवणुकीच्या माध्यमातून धर्मांतर घडवून आणण्याचे प्रयत्नही होत होते. समाज आपल्या मूळ संस्कृतीपासून दूर जात असल्याची जाणीव झाल्याने स्वामीजींनी चकापाद येथे आश्रम स्थापन करून तेथेच वास्तव्य केले.
चकापाद आश्रमातून वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्याला बळ देत त्यांनी जनजातीय समाजाच्या सर्वांगीण विकासाची मोहीम सुरू केली.
भाषणे आणि उपदेशाऐवजी प्रत्यक्ष कृतीतून विश्वास संपादन करणे ही त्यांची कार्यपद्धती होती. शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्यांनी दुर्गम पाड्यांवर शाळा आणि संस्कृत पाठशाळा सुरू केल्या. जनजातीय मुलींच्या शिक्षणासाठी जलेशपट्टा येथे निवासी कन्याश्रम उभारला. येथे मुलींना शालेय शिक्षणासोबत शिवणकाम, हस्तकला, संगीत आणि स्वावलंबनाचे धडे दिले जात. संस्कृत शिक्षणातून मुलांना प्राचीन परंपरा, नीतिशास्त्र आणि सांस्कृतिक वारशाची ओळख करून देत आत्मसन्मान जागृत केला. दुर्गम गावांत प्राथमिक आरोग्य केंद्रे, फिरते दवाखाने आणि आयुर्वेदिक उपचारांची सोय केली. साथीच्या आजारांच्या काळात स्वामीजी स्वतः झोपड्यांमध्ये जाऊन रुग्णांची सेवा करत असत.
त्यांचे कार्य शिक्षण आणि धर्मापुरते मर्यादित नव्हते. शेती, गोपालन आणि जलसंवर्धनाच्या माध्यमातून समाजाला आर्थिक स्वावलंबनासाठी प्रेरित केले. महिला भजन केंद्रांच्या स्थापनेतून ग्रामीण महिलांना सामूहिक धार्मिक उपक्रमांत सहभागी होण्याची संधी दिली. भजन हे श्रद्धेसोबत सामाजिक एकजूट आणि सामुदायिक सहभागाचे माध्यम बनले. श्रद्धा आणि उपजीविका या दोन्हींचा विचार समाजकल्याणासाठी आवश्यक आहे, हे त्यांच्या कार्यातून दिसून येते. साधे संन्यस्त जीवन जगणारे स्वामीजी पायी गावागावांत जात ग्रामस्थांच्या सुखदुःखात सहभागी होत असत.
कंधमाळमधील जनजातीय समाजाच्या स्थानिक श्रद्धा आणि परंपरांचा त्यांनी आदर केला. परंपरा बाहेरून लादण्याऐवजी स्थानिक संस्कृतीला व्यापक हिंदू जीवनदृष्टीशी जोडण्याचा प्रयत्न केला. सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनीही या कार्याचा विशेष उल्लेख केला. जनजातीय समाजाचे आराध्य ‘धरणीपेनू’ (धरतीमाता) यांच्या पूजेला व्यापक सांस्कृतिक संदर्भ देत त्यांनी निसर्गपूजेचे महत्त्व अधोरेखित केले. स्थानिक नृत्य, संगीत आणि उत्सवांना प्रोत्साहन देऊन कलावंतांचा गौरव केला. वनसंवर्धन आणि निसर्गरक्षण हे धर्मपालनाचे महत्त्वाचे अंग असल्याचा संदेश त्यांनी समाजाच्या पारंपरिक जीवनशैलीतून दिला.
ओडिशाच्या लोकजीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या भगवान जगन्नाथाच्या भक्तीचा प्रवाह त्यांनी कंधमाळच्या घराघरांत पोहोचवला. जगन्नाथ संस्कृती सर्व समाजघटकांना एकत्र बांधणारी आहे, हा संदेश त्यांनी दिला. दुर्गम भागातील वनवासी बांधवांना तीर्थक्षेत्रांपर्यंत पोहोचणे कठीण असल्याने स्वामीजींनी त्यांच्या गावांत रथयात्रा, संकीर्तन मेळावे आणि महायज्ञ आयोजित केले. यातून धार्मिक श्रद्धा आणि सांस्कृतिक अस्मिता दृढ झाली. प्रलोभने किंवा दिशाभूल करून धर्मांतरित झालेल्यांना मूळ सांस्कृतिक प्रवाहात सन्मानाने परत आणण्यासाठी त्यांनी ‘घरवापसी’ उपक्रम राबवला. भगवान जगन्नाथाचे निर्माल्य, तुळशीची पाने, माती आणि गंगाजल यांच्या साहाय्याने ही प्रक्रिया साधी, सहज आणि आत्मीय बनवली. यातून हजारो कुटुंबे पुन्हा आपल्या मूळ सांस्कृतिक प्रवाहात सामील झाली.
स्वामीजींच्या कार्यामुळे कंधमाळमध्ये सामाजिक जागृती, शैक्षणिक प्रगती आणि धर्मांतराला आळा घालण्याचे प्रयत्न बळकट झाले. त्यामुळे काही विघातक शक्ती अस्वस्थ झाल्या. त्यांच्यावर दबाव, धमक्या आणि प्राणघातक हल्ल्यांचे प्रयत्न झाले. तब्बल आठ वेळा जीवघेणे हल्ले होऊनही ते आपल्या कार्यापासून विचलित झाले नाहीत. आश्रम सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला मिळूनही वनवासी बांधवांना सोडून जाण्यास त्यांनी नकार दिला. संकटांची जाणीव असूनही सेवाकार्यातून त्यांनी माघार घेतली नाही.
अखेरीस, २३ ऑगस्ट २००८ रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी जलेशपट्टा कन्याश्रमावर कट्टरतावाद्यांनी नियोजनबद्ध हल्ला केला. पूजा, भजन आणि जन्माष्टमी उत्सव सुरू असताना सशस्त्र हल्लेखोरांनी गोळीबार करून स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती आणि त्यांच्या चार सहकाऱ्यांची हत्या केली. आश्रमातील लहान मुली थोडक्यात बचावल्या. या हत्येमुळे देशभरात संताप आणि दुःखाची लाट उसळली. ओडिशासह देशभरातील नागरिकांनी या घटनेचा निषेध केला. विधायक आणि सेवाभावी कार्याला हिंसेने प्रत्युत्तर देण्याच्या प्रवृत्तीचे हे क्रूर उदाहरण होते. या घटनेनंतरही स्वामीजींचा शांती, बंधुभाव आणि सेवाकार्याचा संदेश अधिक व्यापक झाला.
स्वामीजींच्या हत्येनंतरही त्यांनी प्रज्वलित केलेली सेवा आणि सांस्कृतिक जागृतीची ज्योत कायम आहे. चकापाद आणि जलेशपट्टा येथील आश्रम आजही वनवासी मुला-मुलींच्या शिक्षणाचे आणि संस्काराचे कार्य करत आहेत. येथून शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी शिक्षक, डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून समाजसेवा करत आहेत.
जन्मशताब्दीनिमित्त बिपिन बिहारी नंद आणि बांछानिधी पांडा यांनी संपादित व लिखित केलेल्या ‘वेदांत केसरी स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती : वर्क्स अँड पर्सनॅलिटी’ या चरित्रग्रंथाचे २८ जुलै २०२६ रोजी भुवनेश्वर येथे प्रकाशन झाले. स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती मेमोरियल ट्रस्टने प्रकाशित केलेल्या या ग्रंथातून त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा आणि कार्याचा दस्तावेज भावी पिढ्यांसाठी उपलब्ध झाला आहे. तसेच, २२ ऑगस्ट २०२६ रोजी द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी स्वामीजींचे जन्मगाव गुरूजांग हे ‘वारसा गाव’ आणि ‘आदर्श ग्रामपंचायत’ म्हणून विकसित करण्याची घोषणा केली. त्यांच्या सामाजिक आणि आध्यात्मिक योगदानाचा हा राज्यस्तरीय गौरव आहे. जन्मशताब्दीनिमित्त देशभरात विविध संस्थांकडून व्याख्यानमाला, सेवा शिबिरे आणि सांस्कृतिक उपक्रम आयोजित केले जात आहेत.
दत्तात्रेय होसबाळे यांनी अधोरेखित केल्याप्रमाणे, धर्म, संस्कृती आणि मातृभूमीवरील अढळ निष्ठेचे मूर्तिमंत रूप म्हणजे स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती. शिक्षण, आरोग्य, कृषी, गोपालन, महिला सक्षमीकरण आणि सांस्कृतिक जागृतीचे त्यांनी उभारलेले कार्य आजही असंख्य कार्यकर्त्यांना प्रेरणा देत आहे. त्यांचे जीवन केवळ एका संताच्या बलिदानाची करुण गाथा नसून, प्रतिकूल परिस्थितीत समाजपरिवर्तनाचा ध्यास घेणाऱ्या द्रष्ट्या कर्मयोग्याचा आदर्श आहे.
जन्मशताब्दीनिमित्त त्यांचे स्मरण भावी पिढ्यांना निःस्वार्थ सेवा, सामाजिक समरसता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा मार्ग दाखवणारे ठरेल. त्यांचे जीवन आणि विचार अनेक पिढ्यांसाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक राहतील.
लेखक- श्रीपाद गर्गे