दिल्ली, बंगळूर आणि हैदराबादमध्ये पाकिस्तानी मालिकेची सशुल्क प्रेक्षागृहे, चाहत्यांचा पाकिस्तानी कलाकारांशी थेट संवाद आणि पाकिस्तानी लष्कराचा जनसंपर्क विभाग ISPRच्या भारतीय मनोरंजन बाजारातील घुसखोरीचे धोके वेळीच ओळखायला हवेत.
पाकिस्तानची ‘दर-ए-निजात’ ही दूरचित्रवाणी मालिका सध्या भारतातील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. मालिकेतील अबू बकर या पात्राची लोकप्रियता, त्याच्या व्यक्तिमत्त्वाची प्रशंसा आणि मालिकेतील प्रसंगांवर आधारित रील्स यांमुळे भारतीय तरुण प्रेक्षकांमध्ये विशेषतः तरुणींमध्ये या मालिकेचे आकर्षण वाढले आहे. मनोरंजनाच्या माध्यमातून देशांच्या सीमा ओलांडल्या जातात, कला आणि कलाकारांना राजकीय संघर्षांपासून वेगळे ठेवले पाहिजे, असा युक्तिवादही या लोकप्रियतेच्या समर्थनार्थ दिला जातोय. मात्र, या लोकप्रियतेकडे केवळ मनोरंजन म्हणून पाहणे अपुरे ठरेल. पाकिस्तानमधील मनोरंजन उद्योग, तेथील लष्कराची जनसंपर्क यंत्रणा -ISPR आणि प्रसारमाध्यमांमधील परस्परसंबंध यांचा विचार करता यामागचे धोके तात्काळ ओळखणे महत्त्वाचे आहे. विशेषतः या मालिकांच्या प्रसिद्धीसाठी भारतात, भारतीय प्रेक्षकांसाठी आयोजित होणारे सशुल्क कार्यक्रम, पाकिस्तानी निर्माते आणि कलाकारांशी होणारे थेट संवाद आणि या मनोरंजनविश्वाशी संबंधित व्यक्तींची पार्श्वभूमी मालिकेच्या प्रसिद्धीपेक्षा बरेच काही सूचित करते.
भारतात दर-ए-निजात वाढता प्रभाव
२००२ मध्ये दक्षिण कोरियाची ‘विंटर सोनाटा’ ही दूरचित्रवाणी मालिका प्रसारित झाली होती. या मालिकेने दक्षिण कोरिया आणि जपानच्या अर्थशास्त्रावर अभूतपूर्व परिणाम केला होता. एका अभ्यासानुसार, या मालिकेच्या लोकप्रियतेमुळे जपान आणि दक्षिण कोरियामध्ये २.१ अब्ज डॉलर्सची भर पडली. कोरियन संस्कृती, वेशभूषा, पर्यटन स्थळे, खाद्यपदार्थांना या मालिकेमुळे प्रसिद्धी मिळाली होती. ‘विंटर सोनाटा’च्या यशानंतर मोठ्या संख्येने विदेशी पर्यटक साऊथ कोरिया आणि जपानला भेट देऊ लागले. यातून लक्षात घ्यायला हवे की दूरचित्रवाणी मोठ्या प्रमाणात पर्यटन, लोकप्रियता, अर्थशास्त्र आणि सौम्यसंपदेला हातभार लावू शकते.
‘दर-ए-निजात’ ही मालिका पाकिस्तानमधील ARY Digital या वाहिनीवर प्रसारित होते. उमेहरा अहमद लिखित व साकिब खान दिग्दर्शित या मालिकेची लोकप्रियता पाकिस्तानपुरती मर्यादित न ठेवता सोशल मीडिया, विशेषतः इंस्टाग्राम आणि यूट्युब व्हिडिओच्या माध्यमातून ती भारतीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे. मालिकेतील अबू बकर या पात्राला सोशल मीडियावर अनेक भारतीय तरुण मुली (विशेषतः जेन झी) आदर्श जोडीदार किंवा ‘ग्रीन फ्लॅग’ म्हणून संबोधताना दिसतात.
या मालिकेच्या लोकप्रियतेने आता सोशल मीडियाच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष कार्यक्रमांचे स्वरूप
धारण केले आहे. आयोजक पाकिस्तानी मालिकांचे स्क्रीनिंग करत आहेत, लोकांना पाकिस्तानी पात्रांचे अनुकरण करण्यास प्रोत्साहित करत आहेत आणि इतकेच नव्हे तर पाकिस्तानी पेहराव परिधान करण्याच्या कल्पनेलाही प्रोत्साहन देत आहेत.
या मालिकेच्या आडून भारतीय तरुणांना इस्लामी मजहबी संस्कृती, वेशभूषा, खाद्यपद्धती तसेच पाकिस्तानी चित्रपटसृष्टीकडे आकर्षित केले जात आहे. भारतीय तरुणाईमध्ये या मालिकांचे वाढते आकर्षण दहशतवादी राष्ट्राच्या सॉफ्टपावरला मजबूत करू शकते.
२१ नोव्हेंबर २०२६ रोजी दिल्ली गेट परिसरातील कॅफे ओटेंगा येथे ‘टेल्स ऑफ सिटी’ या संस्थेने हमजा खान आणि सहकाऱ्यांच्या सहभागातून मालिकेच्या भारतीय चाहत्यांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमासाठी ८९९ रुपयांचे प्रवेशशुल्क आकारण्यात आले होते. शुल्कामध्ये खाद्यपदार्थ आणि स्वागतपेयाचाही समावेश होता. कार्यक्रमासाठी ४५ जणांची मर्यादा ठेवण्यात आली होती.

हैदराबादमध्येही ‘सना फरहीन सर्कल’ या समूहाकडून अशाच प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या समूहाने २१ नोव्हेंबर रोजी विशेष स्क्रीनिंग आणि ब्रंचचे आयोजन केले होते. त्याचबरोबर ‘अतरा स्टेस’ या संस्थेकडून मालिकेच्या साप्ताहिक स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात येते. यातील महत्त्वाची बाब म्हणजे हे कार्यक्रम केवळ ऑनलाइन चर्चा किंवा वैयक्तिक मनोरंजनापुरते मर्यादित राहिले नसून त्यासाठी स्वतंत्र जागा, आयोजन, तिकीटव्यवस्था आणि प्रेक्षकांचा प्रत्यक्ष सहभाग असे स्वरूप निर्माण करण्यात आले आहे.
या पाकिस्तानी मालिकेसाठी भारतीय चाहत्यांचा मेळावा आणि विशेष स्क्रीनिंगचे आयोजन २८ नोव्हेंबर रोजी बेंगळुरूच्या फ्रेझर टाऊनमधील ‘शीश कबाब’ येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमात अल्पोपहार आणि पर्शियन/अरबी पद्धतीचे रात्रीचे जेवण समाविष्ट ठेवण्यात आले असून, यासाठी प्रति व्यक्ती १,९९९ रुपये प्रवेश शुल्क ठरवण्यात आले आहे. मालिकेच्या चाहत्यांच्या आणखी एक मेळावा आणि स्क्रीनिंग ५ डिसेंबर रोजी बेंगळुरूच्या ‘मोवी प्रायव्हेट थिएटर’ (Mowie Private Theatre) मध्ये होणार आहे. या कार्यक्रमासाठी ‘पाकिस्तानी पेहराव’ हा अधिकृत पोशाख निश्चित करण्यात आला आहे.
पाकिस्तानी निर्माते आणि माजी लष्करी अधिकाऱ्यांचा थेट सहभाग
पाकिस्तानी मालिकेच्या दिल्लीतील कार्यक्रमामध्ये दर-ए-निजात मालिकेचे दिग्दर्शक साकिब खान यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून भारतीय तरुणांशी संवाद साधला. नियोजित संवादापेक्षा हा संवाद अधिक काळ चालला आणि जवळपास ४० मिनिटे सुरू होता. विशेष म्हणजे या संवादामध्ये पाकिस्तानच्या लष्कराच्या जनसंपर्क विभागाचे (ISPR) माजी लष्करी अधिकारी मुहम्मद हसन मिराज सहभागी होते. मुहम्मद हसन १७ वर्ष पाकिस्तानी लष्करात अधिकारी होते.

पाकिस्तान हा देश अनेक दशकांपासून आर्मीच्या बुटाखाली रेंगाळतो आहे. वरवर लोकशाही भासणाऱ्या पाकिस्तानात लष्करी अधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावरच निर्णय घेतले जातात. ISPR ही पाकिस्तानच्या सशस्त्र दलांची अधिकृत जनसंपर्क आणि माध्यमविषयक यंत्रणा आहे. कागदोपत्री लष्कराची प्रतिमा, अधिकृत भूमिका आणि त्यासंबंधीची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम या विभागाकडून केले जाते. मात्र, हा विभाग निवेदनांपेक्षा पाकिस्तानमधील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, देशभक्तिपर गीते आणि मनोरंजनाच्या इतर माध्यमांमध्येही सहभागी असतो. पाकिस्तानी लष्कराची सौम्यसंपदा निर्माण करणे, ती जपणे आणि पाकिस्तानी विमर्शाचा जमेल तिथे प्रसार करणे ही ISPRची जवाबदारी असते.
पाकिस्तानच्या मनोरंजन क्षेत्रातील ISPRची भूमिका
नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरच्या इन्स्टिट्युट ऑफ साऊथ एशियन स्टडीज (ISAS) ने ऑक्टोबर २०२१ मध्ये प्रसिद्ध केलेल्या अभ्यासात ‘आयएसपीआर (ISPR): लोकप्रिय मनोरंजनाच्या माध्यमातून अजेंडा निश्चित करणे’ या विषयाचा सविस्तर आढावा घेतला आहे. या अभ्यासानुसार, पाकिस्तानच्या लष्कराची जनसंपर्क यंत्रणा मनोरंजन क्षेत्रात अधिक सक्रिय असून दूरचित्रवाणी मालिका, देशभक्तिपर गीते, चित्रपट महोत्सव अशा माध्यमांतून लष्कराची प्रतिमा उंचावणारी कथानके प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते.
ISPR साठी मनोरंजन हे केवळ करमणुकीचे माध्यम नसून त्यातून समाजाची धारणा, एखाद्या संस्थेविषयीची प्रतिमा आणि विशिष्ट विषयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन घडवण्याचे साधन आहे.
‘दार-ए-निजात’ मधील अबू बकर ही भूमिका साकारणारा अभिनेता शेरयार मुनव्वर सिद्दीकी हा पाकिस्तानच्या मनोरंजन क्षेत्रातील परिचित चेहरा आहे. त्याच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा संबंध पाकिस्तानमधील प्रभावशाली माध्यम आणि व्यावसायिक क्षेत्राशी आहे. त्याची आत्या सुलताना सिद्दीकी ही पाकिस्तानमधील ‘हम नेटवर्क’ ची संस्थापिका आहे आणि त्याचे वडील एअर कमोडोर मुनव्वर आलम सिद्दीकी हे पाकिस्तानच्या हवाई दलातून निवृत्त झालेले अधिकारी असून ‘हम नेटवर्क’ च्या संचालक मंडळात होते.
विशेष म्हणजे ‘दार-ए-निजात’ ही ‘हम नेटवर्क’ची निर्मिती नसून एआरवाय डिजिटल या वाहिनीवर प्रसारित होणारी मालिका आहे. एआरवायचा संस्थापक ए. आर. याकूब हा १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांचा आरोपी आणि संयुक्त राष्ट्रे (UN), ब्रिटन व अमेरिकेने विशेष नामनिर्देशित केलेला दहशतवादी इक्बाल मिर्ची याचा सहकारी होता; त्याचे पाकिस्तानी आस्थापनांशी संबंध होते. या वाहिनीने २००७ मध्ये एका भारतीय कंपनीसोबत भागीदारी करून भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. “एआरवाय जस्ट फॉर इंडिया” (ARY Just for India) नावाची वाहिनी सुरू करण्याची त्यांची योजना होती. तथापि, या वाहिनीबद्दल ‘रॉ’ (R&AW) कडून मिळालेल्या गुप्तचर माहितीमुळे त्यांना परवानगी नाकारण्यात आली.
अनेक दशकांपासून, एआरवायच्या परिसंस्थेभोवती खळबळजनक आंतरराष्ट्रीय अहवाल फिरत आहेत. एआरवायच्या संलग्न संस्था लंडन हवाला तपास, सोन्याच्या आयातीतील मक्तेदारी आणि पाकिस्तानी गुप्तचर विभाग ISI -संबंधित कारवायांसाठी मध्यस्थ म्हणून काम करतात. पाकिस्तान लष्कराच्या माजी अधिकाऱ्यांनीच उघड केले आहे की, ISI अंतर्गत शाखा प्रमुख पाकिस्तानी माध्यम संस्थांना विशिष्ट कथानके ठरवून देतात.
लेखिका उमेहरा अहमद आणि ISPR
‘दार-ए-निजात’ च्या लेखिका उमेहरा अहमद यांचे नाव यापूर्वीही भारत-पाकिस्तान संबंधांच्या पार्श्वभूमीवर चर्चेत होते. २०२१ मध्ये ZEE5 या भारतीय डिजिटल मंचावर ‘धूप कि दिवार’ ही मालिका प्रदर्शित झाली होती. या मालिकेत भारतातील हिंदू मुलगा आणि पाकिस्तानमधील मुस्लिम मुलगी यांची प्रेमकथा मांडण्यात आली होती. दोघांच्याही वडिलांचा भारत-पाकिस्तान संघर्षात मृत्यू झालेला असतो. या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये निर्माण होणारे भावनिक नाते हा मालिकेचा मुख्य विषय होता.
या मालिकेच्या निर्मितीच्या प्रक्रियेत ISPRचा संबंध असल्याची बाब उमेहरा अहमद यांनी स्वतः सार्वजनिकरीत्या मान्य केली होती. २०१९ मध्ये या कथेवर काम सुरू केल्यानंतर आपण तिचे कथानक ISPRकडे परीक्षणासाठी पाठवले होते, असे उमेहरानी सांगितले होते. कथेमध्ये आक्षेपार्ह काही असल्यास ते संपादित करता यावे, हा त्यामागील उद्देश होता. ISPRने कथेला मान्यता दिली आणि चर्चेसाठी रावळपिंडी येथे बोलावले, असेही त्यांनी सांगितले होते.
या घटनेतून एक महत्त्वाची बाब स्पष्ट होते. पाकिस्तानमधील लष्करी जनसंपर्क यंत्रणेचा मनोरंजन प्रकल्पांच्या कथानकांच्या परीक्षणाशी थेट संबंध आहे. उमेहरा अहमद यांच्या आधीच्या कामाचा संदर्भ घेताना त्यांच्या कथालेखनाचा आणि पाकिस्तानच्या लष्कराशी त्यांच्या संबंधाचा विशेष विचार व्हायला हवा. दरम्यान दिग्दर्शक साकिब खान यांनी रमेन मॅगसेसे मिळवलेले NDTV चे माजी पत्रकार रवीश कुमार यांचा फॅन एडिट शेयर केला होता, ज्यामध्ये रवीश कुमार ‘दर ए निजात’ चे कौतुक करताना दिसतात.

‘दर-ए-निजात’ नंतर ‘जो बचे है संग समेट लो’
‘दर-ए-निजात’च्या चर्चेबरोबरच एक पाकिस्तानी मालिका भारतात प्रदर्शित होणार असल्याने वाद निर्माण झाला आहे. नेटफ्लिक्स वर ४ डिसेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होत असलेल्या नियोजित ‘बचे हैं संग समेट लो’ या पाकिस्तानी मालिकेला प्रदर्शित करू नये, अशी मागणी ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने केली आहे.
२४ नोव्हेंबर २०२६ रोजी AICWAचे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या मालिकेचे भारतातील प्रदर्शन रोखण्याची मागणी केली. या पत्राची प्रत केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव आणि नेटफ्लिक्स इंडिया यांनाही पाठवण्यात आली आहे.
संघटनेने चार प्रमुख मागण्या केल्या आहेत.
- ‘बचे हैं संग समेट लो’ ही मालिका ४ डिसेंबर २०२६ रोजी किंवा भविष्यात कोणत्याही तारखेला भारतात प्रसारित केली जाऊ नये.
- OTT आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मनी ८ मे २०२५ रोजीच्या केंद्र सरकारच्या सल्ल्याचे पालन करावे.
- पाकिस्तानी चित्रपट, मालिका, कलाकार आणि निर्मिती यांच्यावर भारतीय दूरचित्रवाणी, OTT आणि चित्रपटगृहांमध्ये कायमस्वरूपी बंदी घालणारा कठोर कायदा करण्यात यावा.
- व्यावसायिक हितसंबंधांपेक्षा राष्ट्रीय सुरक्षा आणि दहशतवादी हल्ल्यांमध्ये प्राण गमावलेल्या जवानांच्या व नागरिकांच्या कुटुंबीयांच्या भावना महत्त्वाच्या असल्याचे सर्व प्लॅटफॉर्मनी लक्षात घ्यावे.

या पत्रामध्ये पुलवामा, कारगिल, संसदेवरील हल्ला, २६/११ मुंबई हल्ला, उरी आणि पहलगाम येथील दहशतवादी घटनांचा संदर्भ देण्यात आला आहे. दहशतवादात प्राण गमावलेल्या जवानांच्या आणि नागरिकांच्या कुटुंबीयांना पुन्हा पाकिस्तानी मनोरंजन सामग्री पाहण्याची अपेक्षा कशी करावी, असा प्रश्नही संघटनेने उपस्थित केला आहे.
मालिकेतील अभिनेता आणि हाफिज सईदशी असलेले सार्वजनिक संबंध
‘बचे हैं संग समेट लो’ मालिकेच्या कलाकारांमध्ये हमजा अली अब्बासी याचाही समावेश आहे. हा अब्बासी पाकिस्तानस्थित दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख आणि २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज मुहम्मद सईदचा प्रशंसक आहे. तो हाफिज सईदविषयी म्हणतो, “अमेरिका/भारत म्हणतात की तो (हाफिज) दहशतवादी आहे, पण मी हाफिज सईदला एक सज्जन माणूस म्हणून ओळखतो.”
३१ डिसेंबर २०१७ रोजी त्याने हाफिज सईदसोबतचा सेल्फी पोस्ट केला. त्यासोबत सईदला धार्मिक सहिष्णुता आणि मानवतेचा पुरस्कार करणारा, सभ्य माणूस असे संबोधले होते.

हमजा अली अब्बासीची मालिकेतील उपस्थिती हा केवळ कलाकारांच्या वैयक्तिक मतांचा विषय उरलेला नाही. २६/११ हल्ल्याशी संबंधित आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्बंधित दहशतवादी संघटनेच्या प्रमुखाचे समर्थन करणारी त्याची सार्वजनिक विधाने आणि त्याच्यासोबतचा सेल्फी हे भारतातील प्रेक्षकांसमोर चर्चेसाठी ठेवण्याजोगे महत्त्वाचे संदर्भ आहेत. यापूर्वीही राष्ट्रीय सुरक्षेसाठी मनोरंजन साहित्यावर बंदी घातली होती:
याआधी २०२० ते २०२२ दरम्यान, भारत-चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने TikTok, WeChat, UC Browser, Shareit, CamScanner, Shein, AliExpress यांसह ३०० हून अधिक चिनी ॲप्सवर टप्प्याटप्प्याने बंदी घातली. हे ॲप्स भारतीयांचा वैयक्तिक डेटा चोरून परदेशातील (विशेषतः चीनमधील) सर्व्हरवर पाठवत होते. या डेटाचे विश्लेषण करून त्याचा वापर भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेविरोधात आणि हेरगिरीसाठी केला जाण्याचा धोका असल्याने बंदी घालण्यात आली.
शिवाय, PUBG Mobile (आणि नंतर BGMI वर तात्पुरती बंदी), Garena Free Fire, Clash of Kings, Mobile Legends यांसारख्या अनेक परकीय गेम्सवर बंदी घातली. डेटा चोरीच्या धोक्यासोबतच, या गेम्सच्या माध्यमातून होणारे सायबर हल्ले, तरुणांमधील वाढते व्यसन आणि हिंसक प्रवृत्तीला मिळणारे प्रोत्साहन ही त्यामागची प्रमुख कारणे होती.
मे २०२५ मध्ये पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत सरकारने राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव सर्व ओटीटी आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सना पाकिस्तानमध्ये निर्मित वेब-सीरिज, चित्रपट, गाणी आणि पॉडकास्ट त्वरित हटवण्याचे निर्देश दिले होते. तसेच, यापूर्वी ‘झी जिंदगी’ सारख्या वाहिन्यांवरून प्रसारित होणाऱ्या पाकिस्तानी मालिकांवरही तणावपूर्ण परिस्थितीत बंदी घालण्यात आली आहे. देशविरोधी प्रचार, भारतीय लष्कराबाबत खोटी माहिती पसरवणे आणि धार्मिक तेढ निर्माण करणे या कारणांमुळे भारताने १६ हून अधिक पाकिस्तानी युट्यूब चॅनेल्स आणि परवानगीशिवाय प्रसारण करणाऱ्या २४ परकीय टीव्ही चॅनेल्सवर बंदी घातली आहे.
भारतीय प्रेक्षकांसमोरील प्रश्न
‘दर-ए-निजात’सारख्या मालिकांच्या लोकप्रियतेपासून ते नेटफ्लिक्सच्या आगामी ‘जो बचे हैं संग समेट लो’ पाकिस्तानी मालिकेपर्यंत एक व्यापक चित्र समोर येते. भारतीय प्रेक्षकांमध्ये पाकिस्तानी कलाकार आणि मालिकांविषयी आकर्षण निर्माण केले जात आहे. त्यातील कलाकारांची भारतविरोधी वक्तव्ये आणि दहशतवादी संघटनांच्या सार्वजनिक समर्थनाची भूमिका असतानाही, देशातील तरुण पिढी पाकिस्तानी मालिकांच्या जाळ्यात अडकू नये यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
थोडक्यात सांगायचे तर, पाकिस्तानी मालिका आणि कलाकारांची भारतातील वाढती लोकप्रियता ही केवळ मनोरंजनापुरती दिसत असली तरी ती एक सुनियोजित ‘सॉफ्ट पॉवर’ रणनीती आहे. दिल्ली, हैदराबाद आणि बेंगळूर यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये सशुल्क स्क्रीनिंगचे आयोजन होणे आणि त्यात पाकिस्तानी लष्कराच्या जनसंपर्क विभागाशी (ISPR) संबंधित व्यक्तींचा थेट सहभाग असणे, ही भारतीय राष्ट्रीय सुरक्षेसाठी व सामाजिक मानसिकतेसाठी धोक्याची घंटा आहे.
कलेला सीमा नसतात, असा युक्तिवाद केला जात असला, तरी दहशतवाद्यांचे उघड समर्थन करणाऱ्या कलाकारांच्या कलाकृती भारतीय ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणे हे दहशतवाद्यांच्या हल्ल्यांत प्राण गमावलेल्या जवानांच्या आणि नागरिकांच्या बलिदानाचा अनादर व अपमान करणारे आहे. त्यामुळे, केवळ व्यावसायिक नफ्याचा विचार न करता यावर वेळीच कठोर कायदेशीर पावले उचलणे गरजेचे आहे. तसेच, भारतीय तरुण पिढीनेही या भावनिक व सांस्कृतिक जाळ्यात न अडकता अधिक सजग आणि जबाबदार प्रेक्षक म्हणून भूमिका बजावणे ही काळाची गरज आहे.
परकीय आणि वादग्रस्त मालिकांचे प्रसारण करताना सर्वप्रथम देशाचे सार्वभौमत्व, राष्ट्रीय सुरक्षा आणि सामाजिक एकोपा यांना प्राधान्य दिले पाहिजे. पाकिस्तानी मालिकांमध्ये प्रत्येक वेळी भारतविरोधी कथानक किंवा दहशतवादाचे समर्थन असेलच असे नाही किंबहुना तसे जाणूनबुजून नसेलही. यातून, अशी ओरड करण्याला वाव मिळतो की या मालिकांमध्ये आक्षेपार्ह काहीच नसल्याने यावर बंदी का? त्यामुळे या विषयाकडे केवळ मालिकांमधील आशयाच्या आधारे न पाहता भारत-पाकिस्तान संबंधांची पार्श्वभूमी, पाकिस्तानकडून आजही सातत्याने सुरू असलेला सीमापार दहशतवाद आणि तेथील लष्करी यंत्रणेचा मनोरंजन क्षेत्रातील सहभाग यासंदर्भातून पाहणे गरजेचे आहे.
आजच्या मनोरंजन विश्वात चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, जाहिराती हे केवळ करमणुकीचे साधन राहिले नसून ते राष्ट्राची सांस्कृतिक विचारधारेचा प्रसार करण्याचे, ती जोपासण्याचे, राष्ट्राची सॉफ्ट पॉवर (सौम्यसंपदा) निर्माण करण्याचे साधन आहे. विश्वभर दहशतवादाची निर्यात करणारा देश अशी ख्याती असलेल्या पाकिस्तानची प्रतिमा मागच्या दहा वर्षांत लयाला गेली आहे. अशा वेळी पाकिस्तान त्याची प्रतिमा दूरचित्रवाणी मालिकांतून बदलू पाहत असेल तर त्याला भारतीयांनी मदत का करावी?
पाकिस्तानी मनोरंजन क्षेत्राला मिळू शकणारा आर्थिक लाभ भारतीयांनी का मिळवून द्यावा? असे केल्याने पाकिस्तानचे लष्कर सोशल मीडिया आणि इतर माध्यमांतून भारत आणि भारतीयांविरुद्ध करत असेलला अपप्रचार थांबवेल का? पाकिस्तान सीमापार दहशतवाद थांवण्याची हमी देईल का?मालिकेतील पाकिस्तानी कलाकार सीमापार दहशदवादासाठी पाकिस्तानी लष्कराला जबाबदार ठरवतील का? त्यामुळे पाकिस्तानच्या सर्व दूर चित्रवाणी मालिका, चित्रपट आणि कार्यक्रमांवर तात्काळ बंदी आणणे गरजेचे आहे. याशिवाय, समाजात तेढ निर्माण करणारा, महिलांचा अवमान करणारा किंवा लहान मुलांच्या मनावर विपरीत परिणाम करणारा हिंसक आणि अश्लील आशय देखील प्रसारणासाठी अपात्र ठरला पाहिजे.