गोवा विद्यापीठ विद्यार्थी परिषद निवडणुकीत अभाविपचा ऐतिहासिक क्लीन स्वीप; सर्व ९ जागांवर विजय
बॅलेट पेपरमधून Gen-Z चा कौल, राष्ट्रविरोधी विचारांना चोख प्रत्युत्तर : डॉ. वीरेंद्र सिंह सोलंकी..
गोवा विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी झालेल्या विद्यार्थी परिषद निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप)ने ऐतिहासिक विजय मिळवत सर्व ९ जागांवर आपले उमेदवार निवडून आणले आहेत. बॅलेट पेपरद्वारे पार पडलेल्या या निवडणुकीत विद्यार्थ्यांनी अभाविपचे नेतृत्व, विचारधारा आणि विद्यार्थीहितासाठी असलेल्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त केला. अध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनिधी यांसह सहाही कार्यकारी सदस्यांच्या जागांवर विजय मिळवत अभाविपने विद्यार्थी परिषदेत सर्व जागांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
या निवडणुकीत अध्यक्षपदी कल्पेश संतोष वाल्के, सचिवपदी श्रेयांश तुळशीदास नाईक आणि महिला प्रतिनिधीपदी पूर्वी विजय परब यांची निवड झाली आहे. तर कार्यकारी सदस्य म्हणून अनिश यशोदान गावन्स देसाई, अर्थिकेश अशोक नाईक, माधव संदेश देसाई, निधी नामदेव मलिक, सावालो संजय शेट आणि व्यंकटेश ऊर्फ श्रेयश श्रीराम शेट वेरेणकर यांनी विजय मिळवला आहे.
देशभरातील विविध विद्यापीठे आणि शैक्षणिक परिसरांमध्ये अभाविपला मिळत असलेले निवडणुकीतील यश हे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक आणि राष्ट्रहिताला प्राधान्य देणाऱ्या विद्यार्थी राजकारणाला मिळणाऱ्या स्वीकारार्हतेचे द्योतक आहे. दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत तीन प्रमुख पदांवर, पंजाब विद्यापीठात सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदावर, तर उत्तराखंडमधील ११० हून अधिक महाविद्यालयांमध्ये अभाविपने विजय मिळवला आहे. लडाख विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुकीतही अभाविपने आठपैकी पाच जागांवर विजय मिळवला. केरळमधील त्रिप्पुनिथुरा शासकीय संस्कृत महाविद्यालयात सर्व सहा प्रमुख पदांवर, तसेच ओडिशातील विविध विद्यापीठांमध्येही अभाविपला महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. गोवा विद्यापीठात सर्व नऊ जागांवर मिळालेला विजय हा विद्यार्थ्यांच्या याच व्यापक विश्वासाचे प्रतिबिंब आहे.
या ऐतिहासिक विजयाबद्दल अभाविपचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. वीरेंद्र सिंह सोलंकी यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे आणि अभाविप कार्यकर्त्यांचे अभिनंदन करताना सांगितले की,
“गोवा विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी बॅलेट पेपरच्या माध्यमातून स्पष्ट जनादेश देत राष्ट्रविरोधी विचारसरणी आणि शैक्षणिक परिसरांमध्ये अराजकतेचे वातावरण निर्माण करणाऱ्या शक्तींना चोख प्रत्युत्तर दिले आहे. गेल्या काही काळापासून देशभरातील शैक्षणिक परिसरांमधील लोकशाही व्यवस्था कमकुवत करण्याचे आणि विद्यार्थ्यांच्या वास्तविक प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचे प्रयत्न होत आहेत. अशा प्रयत्नांविरोधात अभाविपने देशभरात आंदोलने करून लोकशाही विद्यार्थी व्यवस्थांच्या बळकटीकरणासाठी आणि शैक्षणिक परिसरांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी आपली भूमिका ठामपणे मांडली आहे.
अभाविप नेहमीच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या, परिसरातील व्यवस्था, विद्यार्थी सुविधा आणि त्यांच्या अधिकारांशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य देत आली आहे. गोवा विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आपल्या जनादेशातून अभाविपच्या याच विद्यार्थीहिताच्या कार्यावर, राष्ट्रहिताप्रती असलेल्या बांधिलकीवर आणि सकारात्मक विद्यार्थी राजकारणावर विश्वास व्यक्त केला आहे. ही विजयश्री स्पष्ट करते की, Gen-Z नकारात्मकता आणि अराजकतेऐवजी राष्ट्रहित, लोकशाही मूल्ये आणि विद्यार्थ्यांच्या वास्तविक प्रश्नांना प्राधान्य देणाऱ्या विद्यार्थी राजकारणाच्या पाठीशी उभी आहे.”
अभाविप कोकण प्रांताचे प्रांतमंत्री श्री. राहुल रजोरिया यांनीही या विजयाबद्दल सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की,
“गोवा विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी अभाविपच्या विद्यार्थीहिताच्या कार्यावर आणि सकारात्मक नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. हा विजय अभाविपच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या सातत्यपूर्ण परिश्रमांचा आणि विद्यार्थ्यांसोबत ठेवलेल्या निरंतर संवादाचा परिणाम आहे. नवनिर्वाचित विद्यार्थी परिषद विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण, शैक्षणिक वातावरण अधिक चांगले बनवणे तसेच परिसरात विधायक आणि लोकशाहीवादी विद्यार्थी उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध राहील.”