HinduismNewsSpecial Day

सप्तकोटेश्वर : शिवकाळातील इतिहासाचे तेजस्वी पान

कार्तिक वद्य पंचमी | शके १५९० (१३ नोव्हेंबर १६६८)

गोव्यातील नार्वे (ता. डिचोली) येथील श्री सप्तकोटेश्वर मंदिराचा छत्रपती शिवाजी महाराजांनी जीर्णोद्धार केला. गोव्याच्या कदंब राजघराण्याचे आराध्यदैवत असलेल्या सप्तकोटेश्वर मंदिराची पोर्तुगीज राजवटीत नासधूस झाली होती. मंदिरातील शिवलिंग सुरक्षितपणे अन्यत्र हलविण्यात आले होते.

गोवा मोहिमेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी नार्वे येथे जाऊन श्री सप्तकोटेश्वराचे दर्शन घेतले आणि मंदिराच्या पुनर्बांधणीचा संकल्प केला. शके १५९० मधील कार्तिक वद्य पंचमीला मंदिराच्या बांधकामाचा शुभारंभ झाला.

दि. १७ ऑगस्ट १६६६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातील औरंगजेबाच्या मगरमिठीतून निसटले आणि औरंगजेबाची पाठ जमिनीला लागली. असा जीवघेणा पराभव त्याने कधीच पाहिला नव्हता. साऱ्या जगभर त्याची छीःथू झाली; पण करणार काय? आपल्याच माणसांवर आगपाखड करीत राहण्याशिवाय त्याला काहीच करता आले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनादेखील या आघाडीवर काही काळ शांतता हवी होती. त्यांनी औरंगजेबाला खेद व दिलगिरी व्यक्त करणारी पत्रे पाठवली. ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’, हाच विचार करून औरंगजेबानेदेखील शिवाजी महाराजांशी तहाला संमती दिली.

यानंतर आदिलशाहीविरुद्ध मुघल आणि महाराजांच्या मोहिमा झाल्या; पण या आघाडीवर मुघलांना फारसे यश मिळाले नाही. लवकरच शिवाजी महाराजांचे मुघलांशी व आदिलशाहीशी शांततेचे तह झाले. या शांततेच्या काळात शिवाजी महाराजांच्या मनात बराच काळ सलत असलेली एक गोष्ट पुन्हा वर आली. गोव्याची पोर्तुगीज सत्ता आणि त्यांनी चालवलेले धार्मिक अत्याचार शिवाजी महाराजांच्या डोळ्यांत खुपत होते.

काही योजना मनात ठेवून छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण कोकणात कुडाळ येथे येऊन दाखल झाले. गोव्याच्या सरहद्दीवरील महाराजांनी जिंकलेल्या आदिलशाही प्रदेशातील बंडखोर देसाई जमीनदारांना वठणीवर आणण्याच्या निमित्ताने त्यांचा पाठलाग करीत शिवाजी महाराज बारदेशात शिरले. इ.स. १६६८ च्या जानेवारी-मार्च महिन्यांतील ही धामधूम होती. गोव्याच्या वजिरईने तात्काळ आपला वकील पाठवून ही कारवाई थांबवण्याची शिवरायांना विनंती केली. यानंतर ताबडतोब वजिरईने सर्व देसाई जमीनदारांना गोव्यातून हद्दपार केल्याचे जाहीर केले. छत्रपती शिवाजी महाराजांनीदेखील गोव्यातील आपली कारवाई थांबवली व ते माघारी डिचोलीस येऊन राहिले. याच प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांचे लक्ष एका प्राचीन शिवालयाकडे वळले. ते होते कदंब राजकुलाचे दैवत श्री सप्तकोटेश्वर!

गोव्यातील कदंबांचे हे राज्य इ.स. १३५२ मध्ये बहामनी सुलतानाने जिंकून घेतले. त्यावेळी या सुलतानी राजवटीत गोव्यातील हिंदूंवर अनन्वित अत्याचार सुरू झाले. मंदिरे उद्ध्वस्त झाली, धर्मग्रंथ जाळले गेले, देवी-देवतांच्या वैभवशाली मूर्ती फोडून टाकण्यात आल्या. या तडाख्यात सप्तकोटेश्वर मंदिराचीदेखील नासधूस झाली. सप्तकोटेश्वराचे शिवलिंग बहामनी सैन्याने शेताच्या बांधावर चिखलात टाकले. सुमारे चौदा वर्षे हिंदूंचा हा धर्मछळ सुरू होता. पुढे विजयनगरचे सम्राट हरिहर राय यांनी आपले मंत्री विद्यारण्य माधव यांच्या नेतृत्वाखाली मोठे सैन्य पाठवून गोमंतकाची पुण्यभूमी मुक्त केली. पुन्हा एकदा सप्तकोटेश्वराची वैभवात स्थापना झाली. काही वर्षे सुखासमाधानाने गेली नाहीत, तोच अत्यंत असहिष्णू असलेल्या पोर्तुगीजांची धाड गोव्यावर पडली.

पोर्तुगीजांनी गोवा जिंकल्यानंतर एका रात्रीत ६५० मंदिरे उद्ध्वस्त केली होती. इ.स. १५४० मध्ये मिंगेल व्हाज या पोर्तुगीज धर्मगुरूने सप्तकोटेश्वराचे मंदिर उद्ध्वस्त केले. तेथील शंकराचे ते वैभवशाली शिवलिंग मुद्दाम हिंदूंची अवहेलना करण्यासाठी एका विहिरीच्या काठावर अशा रीतीने बसवले की, पाणी काढताना त्या शिवलिंगावर पाय द्यावा लागावा. गोव्यातील बाटगे ख्रिस्ती लोक अनेक वर्षे या शिवलिंगावर पाय देऊन विहिरीतील पाणी काढीत असत. अखेर भतग्राम तर्फ्याचा सरदेसाई नारायण सूर्यराव शेणवी याने ते शिवलिंग काढून रातोरात दिवाड बेटापासून दूर लाटंबारसे या गावी लपवले. दोन-तीन वर्षे ते तिथे तसेच पडून होते. नंतर दिवाडच्या उत्तरेस पंचगंगेच्या उजव्या तीरावरील नार्वे नावाच्या दुसऱ्या गावात ते शिवलिंग आणले आणि तिथे जांभ्या खडकातील जुन्या कोरीव लेण्यात माडांच्या झावळ्यांखाली लपवून ठेवले गेले. पुढे तिथेच त्याची स्थापना होऊन गुपचूप त्याची पूजाअर्चा होऊ लागली. ही परिस्थिती शिवाजी महाराज या भागात येईपर्यंत कायम होती.

इ.स. १६६८ साली जेव्हा बारदेशातील पोर्तुगीजांविरुद्धची आपली लष्करी कारवाई मागे घेऊन शिवाजी महाराज डिचोलीत थांबले होते, तेव्हा ते श्री सप्तकोटेश्वराच्या दर्शनासाठी नार्वे येथे गेले होते. एव्हाना सप्तकोटेश्वराची सर्वच हकीकत त्यांच्या कानावर आली होती. कातळात कोरलेल्या लेण्यात सप्तकोटेश्वराच्या समोर छोटे निरांजन तेवत होते. मंदिराच्या पुढील भागात नारळाच्या झाडांच्या झावळ्यांनी शाकारणी केलेली होती. सप्तकोटेश्वराचे पूजन सुरू असताना महाराजांच्या मनात विचारांचा कल्लोळ सुरू होता. काहीतरी विचार त्यांच्या मनात रेंगाळत होता. तोच वरील झावळ्यांच्या शाकारणीतील एक झावळी निसटली आणि ती महाराजांच्या अंगावर येऊन पडली. शिवाजी महाराजांना हा शुभशकुन वाटला. पूजाविधी आटोपल्यानंतर महाराजांनी आपला संकल्प जाहीर केला, “श्रींचे नवीन मंदिर बांधावे हा श्रींचा कौल आहे. आता इथं आपलं राज्य आलं. आता सप्तकोटेश्वर उन्हा-पावसात राहणार नाही.”
शके १५९०, कीलक नाम संवत्सर, कार्तिक कृष्ण पंचमी (ही तारीख ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार १३ नोव्हेंबर १६६८ आहे.) रोजी मंदिराच्या बांधकामाची सुरुवात झाली. याची माहिती देणारा एक संस्कृत शिलालेख आजही मंदिराच्या सभामंडपाच्या दरवाजावर लावलेला आहे.

ॐ नमः शिवाय श्री सप्तकोटेश्वर शके १५९० किलकाब्दे
कार्तिक कृष्ण पंचम्या सोमे श्रीशिवराज्ञा देवालयास्य प्रारंभ:॥

सप्तकोटेश्वर मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शिवरायांनी त्याची सर्व व्यवस्था लावून दिली. पूजाअर्चा व इतर धार्मिक विधी आणि उत्सव वेळोवेळी पार पाडावेत, यासाठी मंदिराला काही जमीनही दान दिली. दरवर्षी देणगी म्हणून नार्वेच्या ग्रामसंस्थेकडून ७०० होन मिळतील, अशी सनद करून दिली. इ.स. १९५० पर्यंत ही सनद सुरू होती. पुढे हा भाग पुन्हा मुघलांच्या ताब्यात गेला. सावंतवाडीच्या सावंत भोसले यांनी हा भतग्राम महाल मुघलांकडून जिंकून घेतला. बरीच वर्षे हा भाग त्यांच्या ताब्यात होता. इ.स. १७४६ मध्ये हा भतग्राम महाल सावंतवाडीकरांकडून पोर्तुगीजांनी पुन्हा हस्तगत केला. हा भाग पोर्तुगीजांच्या ताब्यात आल्यानंतर तिथे त्यांनी पुन्हा हिंदूंचा धर्मछळ सुरू केला होता. याची झळ शिवाजी महाराजांनी बांधलेल्या सप्तकोटेश्वर मंदिरालाही बसली आणि तेथील देवाची पूजा बंद पडली होती. तेव्हा कोल्हापूरच्या छत्रपती संभाजी महाराजांनी साताऱ्याच्या छत्रपती शाहू महाराजांकडे तक्रार केली होती. त्यातून पुढे या मंदिराच्या संरक्षणासाठी व्यवस्था केली गेली.

पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांनी जे धर्मसंस्थापनेचे कार्य केले, त्या इतिहासातील सप्तकोटेश्वर हे एक तेजस्वी पान आहे. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी शिवरायांनी अशी अनेक महत्त्वाची कामे केली आहेत. कवी भूषण आपल्या काव्यात याचे ठायी ठायी वर्णन करताना म्हणतो.

वेद राखे विधीत पुराण परसिद्ध राखे राम नाम राख्यो अति रचना सुघर मे ।
हिंदून की चोटी रोटी राखी है सिपाहन की कांधे मे जेनेऊ राख्यो माला राखी गर में ।
मिडी राखे मुघल मरोडी राखी पातशाह बैरीपिसी राखे बरदान राख्यो कर में ।
राजन की हद्द राखी तेगबल सिवराज देव राख्यो देवल स्वधर्म राख्यो घर में॥

सप्तकोटेश्वर मंदिराचा प्राचीन इतिहास

हे मंदिर उत्तर गोव्यातील डिचोली तालुक्यातील नार्वे गावात भगवान शिवाला समर्पित असलेले एक प्राचीन आणि ऐतिहासिक हिंदू मंदिर आहे. संगमेश्वर क्षेत्रमाहात्म्यात कोकणातील सहा श्रेष्ठ शिवालयांमध्ये दीपवती बेटावरील सप्तकोटेश्वर मंदिराचा अंतर्भाव केलेला आढळतो. स्कंदपुराणातील सह्याद्री खंडाच्या तिसऱ्या अध्यायानुसार, सह्याद्रीच्या पायथ्यापासून उगम पावलेल्या पाच नद्यांचा समुद्राशी ज्या ठिकाणी संगम झाला आहे, अशा ठिकाणी सप्तर्षींनी अनेक वर्षे उग्र तपश्चर्या करून महादेवाला प्रसन्न करून घेतले. या उग्र तपश्चर्येच्या काळात त्यांच्या मुखातून सात कोटी मंत्र उच्चारले गेले. त्यामुळे महादेवाला सप्तकोटेश्वर असे नाव पडले.

पूर्वीचे सप्तकोटेश्वर मंदिर दिवपवती म्हणजेच आजच्या दिवाड बेटावरील नार्वे गावात होते. हे मंदिर १०व्या ते १४व्या शतकातील कदंब वंशातील राजांचे कुलदैवत आणि आराध्यदैवत मानले जाते. सप्तकोटेश्वराचे परमभक्त असलेल्या कदंबांचे स्वतःचे अत्यंत बलशाली नौदल होते. कदंब राजवंशातील दुसरा जयकेशी याने इ.स. ११३८ मध्ये सोन्याची नाणी पाडली. या नाण्यांवर ‘सप्तकोटेश्वर’ असा स्पष्ट उल्लेख आढळतो. आपल्या कुलदैवताचा अभिमान ‘श्रीसप्तकोटेश्वरलब्धवरप्रसाद श्रीकदंबवीर’ या बिरुदावलीने ते अभिमानाने मिरवीत असत.

वैभवशाली कदंब राजांनी आपल्या कुलस्वामीचा थाटही तितकाच वैभवशाली ठेवला होता. हे मंदिर अतिशय भव्य आणि कलाकुसरीने युक्त होते. या मंदिराचे अवशेष आजही येथे पाहावयास मिळतात. या दिवाड बेटावर मूळ मंदिर परिसरात जांभ्या दगडात कोरलेले ‘कोटी तीर्थ’ हे प्राचीन पवित्र कुंड आणि माधवाची तळी आजही सुस्थितीत असल्याचे पाहायला मिळते. येथील मूळ मंदिर परिसराचे संवर्धन करताना जुना दगडी मार्ग व १४व्या ते १६व्या शतकांतील महत्त्वपूर्ण वास्तुशिल्पीय अवशेष सापडले आहेत. त्यावरून येथे मोठे मंदिर आणि त्याला जोडणारा पवित्र दगडी मार्ग असल्याचे दिसून आले. दैनिक गोमंतक आणि Drishti IAS यांच्या अहवालांनुसार, यामध्ये पुढील काही महत्त्वपूर्ण वास्तुघटक सापडले आहेत. यात कदंबकालीन कीर्तिमुख, स्तंभशीर्ष, देवकोष्ठ यांसारख्या घटकांचा समावेश आहे. याशिवाय या बेटावरील ‘अवर लेडी ऑफ कंपॅशन’ (Nossa Senhora da Piedade) या चर्चच्या स्मशानभूमीत आणि भिंतींमध्ये मूळ कदंबकालीन मंदिराचे कोरीव दगड व वास्तुघटक आढळतात.

लेखक :- श्री. रणजित रमेश हिर्लेकर

Back to top button