CultureNewsSpecial Day

लोकनायक टंट्या मामा भिल्ल

jannayak tantya mama

मातृभूमीला मुघल आणि ब्रिटिशांच्या सत्तेतून मुक्त करण्यासाठी प्राणाचे बलिदान देणारे अनेक शूर वीर आपल्या देशात होऊन गेले त्यात जनजातीतील लोकही अग्रेसर होते. असेच जनजाती समाजातील एक क्रांतीकारक म्हणजे टंट्या मामा भिल्ल. टंट्या भिल (jannayak tantya mama) यांचा जन्म 4 एप्रिल १८४२ साली मध्यप्रदेशातील बदादा गावात झाला.त्यांच्या वडिलांचे नाव भाऊसिंह होते. भिल्लांना स्वसंरक्षणासाठी लहानपणापासूनच भालाफेक आणि धनुष्यबाण चालवण्याचे शिक्षण मिळे. या युध्द कलांमध्ये टंट्या तरबेज होते.

सामान्य लोकांवर ब्रिटिश करत असलेले अत्याचार पाहून टंट्यांच्या मनामध्ये आगडोंब उसळे. त्यांनी गावा गावात जाऊन जनजाती युवकांची एक सेना तयार केली. ही सेना जनतेला लुटणार्‍या सावकारांच्या आणि जमीनदारांच्या विरूध्द लढत होती. टंट्या या लोकांची संपत्ती लुटत आणि गोर गरीबांमध्ये वाटून टाकत. कोणाच्याही संकट काळात ते त्यांच्या मदतीला धाऊन जात. लोकांच्या सुख दुःखात समरस झाल्यामुळे त्यांच्याविषयी लोकांच्या मनात त्यांच्याविषयी आदर निर्माण झाला आणि ते जनतेत मामा म्हणून संबोधले जाऊ लागले.

जमीनदार आणि सावकार हे इंग्रजांचे हस्तक असल्याने टंट्या मामांनी इंग्रजांविरूध्द संघर्षास सुरूवात केली.इंग्रजांनी त्यांना पकडून खांडवाच्या तुरूंगात डांबले. पण तुरूंगात बंदिवासात राहाणे त्यांना सहन होत नव्हते.त्यांनी तुरूंगाच्या भींतीवरून उडी मारून पलायन केले.५ सप्टेंबर १८५७ ला त्यांची आणि तात्या टोपेंची भेट झाली. त्यांनी तात्या टोपेंकडून गनिमी काव्याने लढण्याचे शिक्षण घेतले आणि त्यांनी इंग्रजांशी गनिमी काव्याने लढण्यास सुरूवात केली.इंग्रजांनी त्यांना पकडण्यासाठी जग जंग पछाडले पण ते इंग्रजांच्या हाती लागेनात. टंट्या मामांचा एक विशेष म्हणजे त्यांना उलटे चालण्याची कला अवगत होती.जेव्हा जेव्हा इंग्रज सेना त्यांना पकडण्यासाठी येई तेव्हा तेव्हा ते उलटे चालत जात.त्यांच्या पाऊल खुणांमुळे इंग्रजांची दिशाभूल होई.इंग्रज सैन्य बरोबर विरूध्द दिशेला त्यांचा शोध घेई आणि टंट्या मामा निसटून जात. निमाड,बेतुल,होशींगाबाद या भागात त्यांचा जबरदस्त दरारा होता.

११ वर्षं त्यांनी ब्रिटिश सत्तेशी झुंज देऊन त्यांच्या तोंडचे पाणी पळवले होते. ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी १०,५०० रू.रोख आणि पंचवीसशे एकर जमीनीचे बक्षिस जाहीर केले. ‘टंट्या पोलिस ‘नावाचे स्वतंत्र पोलिस दल निर्माण केले.गावा गावात पोलिस चौक्या वसवल्या, जमीनदार आणि सावकारांना मोफत शस्रे दिली. तरी हा वीर ११ वर्षं पोलिसांच्या हातावर तुरी देऊनडोंगर दर्यासत तळपत होता. शेवटी इंग्रजांनी षड्यंत्र रचून त्यांना पकडले आणि इंदौरला आणले.तिथून त्यांना जबलपूर जेलमध्ये आणले गेले. शेवटी ४ डिसेंबर १८८९ ला त्यांना फाशी दिली.निर्घृणपणे त्यांचे शव पाताल पानी जवळ रेल्वे रूळांवर फेकून दिले.आजही तिथे त्यांचे स्मारक आहे.

आपली वीरता ,अदम्य साहस आणि इंग्रजांविरूध्द बुलंद आवाज उठवणारे टंट्या भिल्ल जनजातींचे लोकनायक बनले.त्यांना जनजातींचे राॅबिनहूड म्हणूनही संबोधले जाते.

लेखिका – शोभा जोशी

साभार – विश्व संवाद केंद्र, देवगिरी

Back to top button