News

‘‘प्रभुणे हे भारताचे भवितव्य घडविणारे एक दीपस्तंभ आहेत.’’ – मा. दा. कृ. सोमण

‘परिसांचा संग’ पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

‘‘पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचे ‘परिसांचा संग’ हे पुस्तक माझ्या हस्ते प्रकाशित होतं आहे हे माझं भाग्य आहे. ‘परिसांचा संग’ असं या पुस्तकाचं शीर्षक आहे. मला याचं कौतुक वाटत की, स्वतः पद्मश्री गिरीश प्रभुणे हे परिसच आहेत, अनेकजणांच त्यांनी सोनं केलं आहे. एका वाक्यात सांगायचं तर माणसाला माणसासारखं जगण्याचा अधिकार त्यांनी प्राप्त करून दिला आहे. हे खूप मोठं काम आहे. अशी ही माणसं ऋषीमुनींसारखी आहेत. सुसंस्कृत समाज घडवणारी प्रभुणेंसारखी माणसं, समाजाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा दृष्टीकोन देतात. हे पुस्तक अनेकांसाठी प्रेरणादायी ठरू शकते. उद्याचा भारत जर घडवायचा असेल तर अशी पुस्तके निर्माण व्हावीत. प्रभुणे हे भारताचं उद्याचं भवितव्य घडविणारे दीपस्तंभ आहेत.’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ खगोलतज्ज्ञ व पंचागकर्ते मा. दा.कृ. सोमण यांनी ‘परिसांचा संग’ या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात केले.


आचार्य अत्रे ग्रंथालय, गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली आणि अखिल भारतीय साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘परिसांचा संग’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ खगोलतज्ज्ञ व पंचागकर्ते मा. दा.कृ. सोमण यांच्या हस्ते सोमवारी 16 मे रोजी डोंबिवलीतील गणेश मंदिर संस्थान येथील वक्रतुंड सभागृहात पार पडले. प्रकाशनाच्या कार्यक्रमासोबतच पुनरुत्थान समरसता गुरुकुलमचे अध्यक्ष आणि पुस्तकाचे लेखक गिरीश प्रभुणे यांची प्रकट मुलाखत सा. विवेकच्या कार्यकारी संपादक अश्विनी मयेकर यांनी घेतली. यावेळी पद्मश्री लेखक गिरीश प्रभुणे, सा. विवेक कार्यकारी संपादक अश्विनी मयेकर, अखिल भारतीय साहित्य परिषदेचे प्राचार्य बळीराम गायकवाड आणि गणेश मंदिर संस्थानच्या उपाध्यक्षा अलका मुतालिक व्यासपीठावर उपस्थित होत्या.


दा.कृ. सोमण पुढे म्हणाले की, ‘‘एकंदर समाजात चालणार्‍या घटना आणि माध्यमांवर येणार्‍या बातम्या या वाचल्या/ऐकल्यानंतर मनाचा उद्वेग होतो. पण अशी पुस्तके आणि अशी कार्यसमर्पित माणसे पाहिली की, समाजात सकारात्मक ऊर्जा अस्तित्वात आहे याची अनुभूती येते.’’ सोमण यांनी या दरम्यान एक कथा सांगितली. त्या कथेचा आशय असा की, प्रत्येकाला आपल्या आयुष्यात परिस भेटत असतात. पण त्याकडे आपले दुर्लक्ष झालेले असते. हे पुस्तक परिसातील परिसपण ओळखण्याची दृष्टी देते. सुजाण नागरिकच भारताचे भविष्य उज्जवल करू शकतात, त्यासाठी आवश्यक असतात ते संस्कार. या पुस्तकात संस्कारक्षम पिढी घडविण्याचे सामर्थ्य आहे. याचा अभिमान वाटतो. त्यामुळे हे पुस्तक अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे.’’ अशी आशा सोमण यांनी व्यक्त केली.


भटके-विमुक्तांच्या आयुष्याला आकार देण्यासाठी आपलं आयुष्य समर्पित करणारे पद्मश्री गिरीश प्रभुणे. भटके विमुक्तांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर त्यांचं आयुष्य समजून घ्यायला पाहिजे. त्यासाठी त्यांच्यासोबतच राहून त्यांच आयुष्य जाणून घेतलं पाहिजे. या समाजाविषयी असलेला त्यांचा कारुण्यभावच त्यांच्या कामाची ऊर्जा बनली. या विषयासंबंधी सा. विवेकच्या कार्यकारी संपादक अश्विनी मयेकर यांनी प्रभुणे काकांच्या जीवनप्रवासातील तीन टप्पे (ग्रमायण, यमगरवाडी प्रकल्प आणि पुनुरुत्थान समरसता गुरुकुलम) यावर गिरीश प्रभुणे यांची मुलाखत घेतली.


मुलाखतीदरम्यान गिरीश प्रभुणे यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक घटनाप्रसंगाचा उल्लेख केला. ग्रमायणात कसा प्रवेश झाला, पहिला दीर्घलेख ते या प्रकल्पामुळे ठोस कार्य करण्याची प्रेरणा त्यांना या प्रकल्पातून कशी मिळाली, तेथे आलेल्या छोट्या-छोट्या प्रसंगातून, अनुभवातून आपण कसे घडत गेलो. एखाद्या समाजात होणारे बदल काय परिवर्तन घडवून आणतात याचे अनेक किस्से त्यांनी सांगितले.


हाच अनुभव गाठीशी घेऊन यमगरवाडी प्रकल्पाची सुरुवात कशी झाली. दलित समाज आणि भटके-विमुक्त अनेक जाती-जमाती यांच्या समस्या पूर्णपणे वेगळ्या. त्यामुळे तेथील काम करण्याचा अनुभव हा त्याहून वेगळा. आपण ज्या गोष्टींची कल्पना करू शकत नाही असे विदारक अनुभव पाहायला मिळाले. अंधश्रद्धा, व्यसनाधिनता, सरकारी नोेंदीत गुन्हेगार म्हणून शिक्कामोर्तब केलेला हा समाज, शिक्षणाचा अभाव, अशा एक ना अनेक प्रश्नांचा सामना करत, अनेकजणांचा विरोध पत्करत या प्रकल्पाचे काम सुरू केले. सुरुवातीला समाजातून आणि संघातूनही हे काम सहजासहजी स्वीकारले गेले नाही. परंतु संघातील वरिष्ठ मंडळी या कामाच्या मागे खंबीरपणे उभी होती. संघाच्या बैठकांतून या कामाचे वृत्त आणि महत्त्व पटवून देण्यात आले. या कामाचे महत्त्व समजल्यावर कामाच्या मान्यतेसोबतच मदतीचा ओघही वाढू लागला.


एखादं काम स्थिरावलं की, या कामातून दुसर्‍या कामात यावं अशा सांगणार्‍या व्यक्ती तुम्हाला भेटल्या किंवा काहीवेळा तुम्हाला नव्या वाटा दिसल्या? या प्रश्नाला उत्तर देताना प्रभुणे म्हणाले, ‘‘खरं आहे! भटके-विमुक्त समाजात काम करत असताना त्या समाजातील विविध कौशल्य आणि ज्ञान बघण्याची संधी मिळाली. तेव्हापासून वाटत होतं की त्यांच्या या ज्ञानाचा, कौशल्याचा त्यांच्यासाठी कसा उपयोग करता येईल, जेणेकरून ते स्वावलंबी बनतील. या संकल्पनेतून ‘पुनुरुत्थान समरसता गुरुकुलम’ची स्थापना करण्यात आली. अभियांत्रिकी, कला, आयुर्वेद, वनस्पतीशास्त्र, धम्मपदे, वेद-उपनिषदे, कौशल्याधारित शिक्षण अशा विविध विषयांवर गुरुकुलममध्ये प्रशिक्षण दिले जाते. ज्या विषयात त्यांची गती आहे त्यात त्यांची प्रगती लवकर होते. गुरुकुलममध्ये 80% कला-कौशल्य विकास आणि 20%पाठ्यपुस्तकी शिक्षण देण्यात येते. एकूण आठ भाषा येथील मुलांना शिकविल्या जातात. मातृभाषा अग्रक्रमी असतेच.


त्यांच्या या छोटेखानी मुलाखतीत गिरीश प्रभुणे परिस आहे हे तर सिद्ध होतेच, पण त्यांना पद्मश्री का मिळाला, याचा प्रत्यय यानिमित्ताने आला, असे गौरवोद्गार अश्विनी मयेकर यांनी काढले. अखिल भारतीय साहित्य परिषदेचे प्रा. बळीराम गायकवाड यांनी परिषदेचे कार्य आणि त्यामागील उद्देश प्रास्ताविकात विशद केला. गणेश मंदिर संस्थानातील विविध उपक्रमांची माहिती संस्थानचे कार्यवाह शिरिष आपटे यांनी करून दिली. पुस्तक प्रकाशन विभागप्रमुख शीतल खोत यांनी सूत्रसंचालन आणि प्रास्ताविकात विवेकची वाटचाल आणि विवेकचे आयाम याविषयी माहिती दिली. कवी जयंत कुळकर्णी यांनी ‘परिसांचा संग’ या पुस्तकाचा परिचय आणि आभार प्रदर्शन केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Back to top button