NewsSpecial Day

९ ऑगस्ट – जागतिक मूलनिवासी दिवस

World's Indigenous Peoples day..

भारतात हल्ली बऱ्याच ठिकाणी हा जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा करण्याची पद्धत रूढ केली जात आहे. मध्यंतरी नाशिक – त्र्यंबकेश्र्वर ला जाताना आदिवासी एकता वगैरे चे बॅनर ही पाहिले होते!! आणि त्याच बरोबर त्यासंबंधी काही विद्रोहकडे वळणाऱ्या घोषणा!! ९ ऑगस्ट हा दिवस आत्तापर्यंत ऑगस्ट क्रंतीदिन म्हणून प्रसिद्ध होता…. आता जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा व्हावा, त्या दिवशी सार्वत्रिक सुट्टी जाहीर करावी अशा मागण्या व्हायला लागल्या आहेत!! डावे, मधले डावे, बाजूचे डावे, शहरी डावे (शहरी नक्षली असे म्हटलेले हल्ली आवडत नाही यांना!!), काँग्रेस, लिब्राडू मंडळी, विकाऊ पत्रकार, विकाऊ चॅनल्स, समाज माध्यमे (FB, युट्यूब वगैरे) यातून याचा जोरदार पुरस्कार सुरू आहे…. काय आहे नक्की हा जागतिक मूलनिवासी दिवस? थोडी माहिती करून घेऊयात….

पार्श्वभूमी….

आपल्या सर्वांना माहिती आहेच की अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड वगैरे देश ह्या इंग्रज आणि युरोपियन यांच्या वसाहती होत्या…. आजही मानसिकता तीच आहे!! या वसाहती कशा वसवल्या गेल्या?? त्या त्या ठिकाणी जे मूळचे स्थानिक रहिवासी होते त्याच्यावर अनन्वित आणि अमानवीय अत्याचार केले गेले, हजारो लाखो जणांची कत्तल केली गेली, वांशिक विच्छेद केला गेला, त्यांना गुलाम म्हणून वागविले गेले, त्यांची संस्कृती, पूजा स्थाने ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला. अमेरिकेतील मूळचे रेड इंडियन्स आज तुरळक प्रमाणात अस्तित्वात आहेत. लाखो जणांची कत्तल केली गेली…. का? तर युरोपियन मंडळींना तिथे आपली वसाहत करायची होती.

लॅटिन अमेरिकन देश, आफ्रिकन देश इथेही असेच प्रकार झाले. शिवाय या सर्व ठिकाणी आढळणारी एक वास्तविकता म्हणजे वसाहतवादी मंडळींनी त्यांच्या जमिनी हडपल्या, संस्कृती उद्ध्वस्त केली, कत्तली केल्या आणि जे उरलेसुरले होते त्यांचे धर्मपरिवर्तन करायचा आटोकाट प्रयत्न केला!! यात चर्चचा लक्षणीय सहभाग होता !! आपण या मंडळींवर अत्याचार केला अशी काहीशी पुसट भावना युरोपियन मंडळींमध्ये होऊ लागली आहे. ऑस्ट्रेलियाच्या तत्कालीन पंतप्रधान केविन रुड यांना १३ फेब्रुवारी २००८ रोजी त्यांच्या संसदेत देशवासीयांची माफी मागावी लागली होती.

तर, अश्या या अत्याचार पीडित आणि आता फारच अल्पसंख्यांक झालेल्या युरोपियन देशांच्या वसाहती असलेल्या देशातील या मूलनिवासी बांधवांसाठी, त्यांच्या हक्कांसाठी काही करावे असे वाटल्याने, त्यांचे प्रश्न समजून घेण्याच्या उद्देशाने आणि त्यांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे या उद्देशाने संयुक्त राष्ट्र संघाने एक समिती (Working Group) गठीत केली ज्यांची प्रथम बैठक ९ ऑगस्ट १९८२ रोजी झाली. या समितीने जवळपास १२ वर्षे यावर चर्चा आणि अभ्यास केला आणि त्याचा परिणामस्वरूप The United Nations General Assembly (UNGA) यांनी १९९४ साली ४९/२१४ या ठरावा द्वारे ९ ऑगस्ट हा अंतरराष्ट्रीय मूलनिवासी दिवस (International Day of Worlds Indigenous People) म्हणून जाहीर केला. मूलनिवासी समाजाचा आदर आणि त्यांचे हक्क आणि प्रश्न समजून घेऊन त्यासंबंधी जागृती या दिवशी करावी हा उद्देश!! शिवाय जगातील स्थानिक लोकांची परिस्थिती सुधारण्यासाठी, त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि त्यांच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी ‘परमनंट फोरम ऑफ इंडिजिनस पीपल्सची’ स्थापना केली.

आता ९ ऑगस्ट हाच दिवस का यालाही एक रक्तरंजित पार्श्वभूमी आहे, जे सत्य आपल्यापासून लपवले जाते. या दिवसाची सुरुवात खरं म्हणजे कोलंबस दिवसाच्या विरोधात झाली होती. हा तोच कोलंबस जो १४९२ साली अमेरिकेत पोचला होता आणि त्याने अमेरिकेतील मूलनिवासी लोकांचा संहार केला होता. १८१२ ते १८१५ दरम्यान अमेरिकेतील पोव्हटन (Powhatan) शहरात स्थानिक जनजाती आणि परदेशी ख्रिस्ती युरोपियन लोकांमध्ये मोठे युद्ध झाले आणि ९ ऑगस्ट या दिवशी चर्चने इंग्रजांना मदत करण्यासाठी मोठे सैन्य पाठवले, ज्यामुळे ३० हजाराहून अधिक स्थानिक आदिवासींचा मृत्यू झाला…. यामुळे हा दिवस केवळ अमेरिकेच्या मूलनिवासी यांच्यावरील अत्याचारांच्या स्मरणार्थ निश्चित करण्यात आला आहे!! त्यामुळे खरं म्हणजे या दिवसाचा जगातील कोणत्याही देशाशी संबंध नाही आणि भारताशी तर नाहीच नाही!!

भारताला ही स्थानिक रहिवासी – मूलनिवासी संकल्पना लागू पडते का याचा लेखाजोखा घ्यायला हवा!!

संयुक्त राष्ट्रांच्या मते जगभरात ४० देशांमध्ये ४३ कोटी आदिवासी आहेत, त्यापैकी २५%भारतात आहेत. यात एक बाब समजून घेण्याची अत्यंत गरज आहे…. ती म्हणजे भारत सोडून बहुतांशी सर्व देशांमध्ये युरोपियन देशांनी वसाहत निर्माण केली गेली, त्यांना गुलाम केले गेले, त्यांच्या कत्तली केल्या, अत्याचार केले आणि या जमाती नष्ट करण्याचा प्रयत्न केला. भारतात मात्र असे काही झाले नाही. इंग्रजांनी भारतावर आक्रमण केले, अत्याचार केले, भारताला गुलाम केले…. पण त्यांची वसाहत काही इथे होऊ शकली नाही!! त्या दृष्टीने पाहिले तर भारतातील आपण सर्वच मूलनिवासी आहोत!! वनवासी/ जनजाती यांच्यासह कुणीही बाहेरून आलेले नाही आणि सर्व जण एकोप्याने रहात होते.

मुळातच भारतात आदिवासी हा शब्द रूढ नव्हता. जनजाती किंवा वनवासी असे संबोधले जात होते. अगदी रामायण महाभारत काळात डोकावून पाहिले तरी आपल्याला हे सर्व जण समाजाच्या मूळ प्रवाहात असलेले पाहायला मिळतात. रामाची आई कौशल्या ही “कंवर” जमातीची. आजही “कंवर” कौशल्या ची मुलगी म्हणून पूजा करतात. प्रभुराम हे आदिवासी समाजाचे “भानेज” (पुतणे) म्हणून मानले जातात. माता कौशल्या ही कौशल प्रांताच्या राजाची कन्या!! प्रत्यक्ष श्रीकृष्ण यांची एक पत्नी जांबवंती…. वनात राहणाऱ्या जनजातींचा राजा जांबवंत याची मुलगी!! श्रीकृष्णाचा नातू अनिरुद्ध यांचा विवाह वनवासी राजा बाण यांची कन्या उषा हिच्याशी झाला होता!! म्हणजे प्रत्यक्ष राम आणि श्रीकृष्ण यांचे वनवासी समाजाशी केवळ भावनिक आणि सामाजीकच नव्हे तर रक्ताचे नाते आहे!! आता या वनवासी आणि जनजाती बांधवांना वेगळे करून हे नाते नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे!!

संयुक्त राष्ट्रातील भारत सरकारच्या प्रतिनिधीने २००७ च्या यासंबंधीच्या एका घोषणेवर स्वाक्षरी करताना असेही म्हटले होते की, भारतात राहणारे सर्व लोक इथले मूळ रहिवासी आहेत, कोणीही बाहेरून येथे आलेले नाही.

UNO मध्ये भारताचे वनवासी लोकांबद्दलचे विधान:

भारताने सांगितले की, भारताने सातत्याने स्थानिक लोकांच्या हक्कांची बाजू घेतली आहे आणि आदिवासींच्या हक्कांच्या घोषणेसाठी काम केले आहे. परिषदेसमोरील मजकूर ११ वर्षांच्या मेहनतीचे फळ आहे. मजकुरात “स्वदेशी” ची व्याख्या नव्हती. स्वयंनिर्णयाच्या अधिकाराच्या संदर्भात भारताची संपूर्ण लोकसंख्या स्वदेशी मानली जात होती. हे केवळ परकीय वर्चस्वाखाली असलेल्या लोकांसाठीच लागू होते, आणि ही समज असलेल्या स्वदेशी व्यक्तींच्या राष्ट्राला नाही. जाहीरनाम्याचा मसुदा स्वीकारण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा देण्यास भारत तयार होता आणि त्याच्या बाजूने मतदान करेल.

म्हणजे भारताने सुरवातीलाच हे स्पष्ट केले होते की स्थानिक निवासी/ मूलनिवासी ही संकल्पना भारताला लागू होत नाही. मात्र परकीय वर्चस्वाखाली असलेले जे आहेत त्यांच्यासाठी हा प्रस्ताव भारत स्वीकारत आहे!!

आता या पार्श्वभूमीवर भारतात सुरू असलेले “मूलनिवासी” आंदोलन, प्रचार काय आहे जे समजून घ्यायला हवे!! दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाच्या नावाने देशात ठिकठिकाणी छोटे-मोठे कार्यक्रम आयोजित केले जातात, ज्यामध्ये आदिवासी समाज तसेच इतर लोकही उत्साहाने सहभागी होतात. असे बहुतेक कार्यक्रम चर्च किंवा त्यांच्या प्रेरित संस्था आणि व्यक्तींद्वारे आयोजित केले जातात ज्यांचे स्वतःचे मूळ उद्दिष्ट धर्मांतराचे असते. या विषयाची संपूर्ण माहिती नसल्यामुळे आदिवासी समाजातील आणि आपल्यातील काही साधे आणि उत्साही लोकही याच वातावरणात वाहून जातात. त्यामुळे हा विषय गांभीर्याने समजून घेणे आवश्यक आहे.

भारतात हा दिवस आदिवासी दिन म्हणून साजरा केला जात आहे. वनवासी आणि जनजाती हे इथले मूलनिवासी आहेत असा प्रचार केला जात आहे. तुम्ही जंगलात रहाता, तुमची संस्कृती वेगळी आहे, तुमच्या चालीरीती वेगळ्या आहेत, समाजाच्या मूळ प्रवाहापासून तुम्ही वेगळे आहात असा भ्रामक प्रचार करण्यात चर्च प्रणित आणि डावी मंडळी बऱ्याच अंशी सफल होताना दिसत आहेत. वास्तविक इंग्रजांच्या आणि मुघलांच्या काळात वनवासी बांधवांना हेतुपुरस्सर समाजापासून तोडण्याचे षडयंत्र रचले गेले. भारताच्या स्वातंत्र्य युद्धात वनवासी बांधवांचे मोठे योगदान असल्याचे भरपूर दाखले आहेत. संपूर्ण वनवासी समाजाचे श्रद्धास्थान भगवान बिरसा मुंडा हे याचे प्रतीक आहेत. समस्त भारतवर्षात असे बरेच योद्धे देश आणि धर्म यासाठी लढलेले दिसेल!! आपण वरील विवेचनात वनवासी बांधवांचे समाजातील स्थान काय होते हे पाहिले.

राम – कृष्ण आणि एकूणच संस्कृतीशी त्यांचे घट्ट नाते होते. आज राम आणि कृष्ण आणि अन्य देवदेवता तुमचे नाहीत तर तुम्ही रावणाचे वंशज आहात, रावण तुमचा देव आहे, राक्षस हे तुमचे आदर्श आहेत…. आणि असे बरेच काही त्यांच्या माथी मारले जात आहे. दुर्दैवाने आजच्या घडीला या वनवासी मंडळींचा मुख्य समाजापासून असलेला दुरावा, या मंडळींचा भोळेपणा यामुळे या भ्रामक पण अत्यंत विघातक संकल्पना या समाजात रुजू लागल्या आहेत….. आणि यात काही कमी म्हणून की काय तर आता इतर दलीत आणि अनुसूचित जाती यांनासुद्धा या मूलनिवासी संकल्पनेत सामावून घ्यायचे उद्योग सुरू झाले आहेत!!

याला आणखीन एक तात्विक मुलामा द्यायचा प्रयत्न म्हणजे पर्यावरण संकल्पनेचा खुबीने वापर. या सर्व जनजाती या निसर्ग पूजक आहेत. निसर्गात ईश्वराचे स्वरूप पाहतात. याचा उपयोग करून घेऊन ते पर्यावरण पूरक जीवन जगतात आणि म्हणून इतर समाजापासून विशेषतः हिंदू समाजापासून वेगळे आहेत आणि त्यांचा धर्म वेगळा आहे हे रुजविण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहे!! आदिवासींची दिशाभूल करणारे आज आपला धर्म, संस्कृती आणि आपली ओळख नष्ट करण्यात आघाडीवर आहेत, हेही आपण विसरता कामा नये. वनवासी समाजाला भारतापासून तोडण्यासाठी आंतरराष्ट्रीय शक्ती कार्यरत आहेत. मूलनिवासी दिन साजरा करण्यास प्रोत्साहन देणे हे देखील या दलांचे उद्दिष्ट आहे. या कटाचा या दिवसाशी काही संबंध नाही हे समजून घेतले पाहिजे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यांसारख्या देशांतील मूळ रहिवाशांची जी स्थिती झाली ती भारतात कधीच झाली नाही. दुर्दैवाने वानवासी समाजाची दिशाभूल करून त्यांना इतर समाजाशी लढण्यासाठी प्रवृत्त करण्यात काही विदेशी शक्ती कार्यरत आहेत. त्यासाठी त्यांनी ९ ऑगस्टचा दिवस शस्त्रासारखा वापरला आहे.

चर्च तसेच चर्चप्रणित अनेक संस्था, डावी मंडळी, डीपस्टेट असा वर्ग उदयाला आला आहे तो, काँग्रेस सारखे सनातन संस्कृतीला आणि भारतीयत्वाला विरोध करणारे तथाकथित सेक्युलर पक्ष, शहरी नक्षल आणि यांना साथ देणारे विकाऊ पत्रकार आणि चॅनल्स यांच्या पुढाकाराने आदिवासी (मूलनिवासी) दिवस कार्यक्रम आणि त्यामागील मनोभूमिका तयार करण्याचे आणि वनवासी समाजाला तोडण्याचे मोठे षडयंत्र रचले आणि राबवले जात आहे. तुम्हा आम्हाला याचे वास्तव माहिती नसते आणि समजून घ्यायची इच्छाही नसते आणि त्यामुळे हा प्रश्न दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहे.

जगातील काळ्या आणि गैर युरोपियन लोकांचे ख्रिस्तीकरण करण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहे. यासाठी विकसनशील देशात बड्या युरोपिअन शक्ती कार्यरत आहेत. मानवतावादी कामाच्या बहाण्याने हे लोक येतात आणि धर्मांतराचे काम करतात. एव्हढेच नाही तर नवीन राष्ट्र निर्माणाचाही प्रयत्न करतात. संयुक्त राष्ट्र संघटना UNPO मानवी हक्क, ओळख आणि स्वतंत्र देशाची मागणी करणाऱ्या गटांना मदत पुरवते. भारतापासून वेगळ्या देशाची मागणी करणारी नागालँडची संघटना (नागालिम) UNPO ची सदस्य आहे. नॉर्वे आणि अनेक युरोपीय देश वांशिक आणि धार्मिक आधारावर नागांसाठी स्वतंत्र देशाची वकिली करत आहेत. पूर्व तिमोर हे याचे प्रमुख उदाहरण आहे. अगदी आत्ता चर्चेत असणारे उदाहरण म्हणजे बांगलादेशच्या शेख हसीना यांनी ज्याचा उल्लेख केला ते…. अमेरिकेने बांगलादेश आणि म्यानमार यातील काही प्रदेश तोडून वेगळे ख्रिश्चन राष्ट्र निर्माण करायला पाठिंबा द्या तर आम्ही तुम्हाला निवडणुकीत सहाय्य करू असा दिलेला प्रस्ताव!! सध्या भारतातील मणिपूर येथे कुकी आणि मैतेई संघर्ष आणि त्यात चर्च आणि पाश्चात्य राष्ट्रांची भूमिका!!

१९४७ मध्ये ब्रिटीशांनी भारताचे धार्मिक आधारावर दोन तुकडे केले. उर्वरित भारतातही वनवासी बहुल पूर्वांचल हा भारतापासून वेगळा ठेवण्याचे यशस्वी प्रयत्न काँग्रेस आणि नेहरूंच्या मदतीने केले. धर्मांतराचे काम भरभरून केले आणि हा सर्व भाग भारतापासून तोडण्याचे आटोकाट प्रयत्न केले. संघ आणि संघप्रणीत संस्था आणि लष्कराची कणखर भूमिका यामुळे हे उद्देश सफल होऊ शकले नाहीत!! अजूनही हे प्रयत्न सुरूच आहेत. मणिपूर मधील हिंसाचार हा त्याचाच एक भाग!! भारतातील अंदाजे ७०५ आदिवासी जमातींपैकी मोठ्या संख्येने हिंदू धर्मापासून दूर जाण्याचे हेच कारण आहे का?

२०२१ साली जनगणना प्रस्तावित होती. कोरोना महामारी आणि लॉकडाऊन मुळे अजूनही ती झालेली नाही. या जनगणनेमध्ये आदिवासी समाजासाठी स्वतंत्र धर्म संहिता किंवा हिंदू धर्मापासून वेगळा धर्म असावा, जेणेकरून जागतिक स्तरावर हिंदूंची संख्या कमी करता येईल, या मागणीसाठी देश-विदेशातील अनेक संघटना संघर्ष करत आहेत. वनवासी बंधूंनी आपला धर्म हिंदू नाही असे नोंदवावे असा प्रयत्न मोठ्या प्रमाणात केला जात आहे. हे नवीन धर्म नंतर ख्रिश्चन मिशन संस्थांद्वारे ख्रिस्ती धर्मात मिसळले जावेत असा प्रयत्न करता येईल, ज्यामुळे धार्मिक अलिप्ततावादाला चालना मिळेल. आपल्या देशातील विविध देशद्रोही शक्ती या दिशेने काम करताना दिसतात. आपल्या देशातील विविध राज्यांमध्ये, विशेषत: छत्तीसगड, झारखंड, ओडिशा आणि महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या विविध चळवळी आणि नक्षल चळवळ या आंतरराष्ट्रीय कटाचा एक भाग बनत आहेत.

यातील आणखीन एक उल्लेखनीय बाब म्हणजे वनवासी बंधूंना भ्रमित करण्याच्या या कामात चर्च आणि डावे (नक्षली) यांची हातमिळवणी आहे…. धर्म प्रमाण मानणारे आणि धर्म अफूची गोळी समजणारे दोन्ही एकत्र!! Cultural communism आणि Wokism चे हे उदाहरण!! उद्देश एकच – भारत देशाचे विघटन!!

मूलनिवासी दिवस हे दाखविण्याचे दात आहेत पण त्यामागे प्रचंड मोठे षडयंत्र आहे. आत्ता आपण ज्या बाबींचा उहापोह केला त्या म्हणजे हिमनगाचे पाण्याबाहेर दिसणारे टोक आहे. याचे परिणाम फार दूरगामी आणि आपल्या आकलनापलीकडचे असू शकतात. म्हणूनच राष्ट्रहिताचा विचार करून वेळीच हे षडयंत्र थोपविले पाहिजे आणि यासाठी केवळ वनवासी आणि जनजाती यांच्यातच नव्हे तर सर्व समाजघटकात जागृती करण्याची गरज आहे. खर म्हणजे भारत सरकार ने हे षडयंत्र ओळखून १५ नोव्हेंबर भगवान बीरसा मुंडा यांच्या जयंतीचा दिवस हा जनजातीय दिवस म्हणून जाहीर केला आहे. ९ ऑगस्ट नव्हे तर १५ नोव्हेंबर हा दिवस भारतीय जनजाती साठी तसेच सर्व समाज घटकांसाठी महत्त्वाचा ठरावा तसेच आपल्याच समाजाचा एक अविभाज्य घटक असलेल्या वनवासी बंधूपर्यंत पोचण्याचा आणि त्यांना जोडण्याचा सर्वंकष प्रयत्न केवळ सरकारी पातळीवर नाही तर समाजाने आणि निरनिराळ्या राष्ट्रीय विचारांच्या संस्था यांनी पुढाकार घेऊन करणे आवश्यक आहे. या निमित्त भारतीय समाजातील एका मोठ्या घटकाला वेगळे काढून देश तोडण्याचे प्रयत्न हाणून पाडण्याची आवश्यकता आहे.

लेखक :- अरविंद श्रीधर जोशी

Back to top button