पंढरीची वारी: मानवी मूल्यांची खाण
भेटी लागी जीवा लागलीस आस | पाहे रात्रंदिवस वाट तुझी ||
या उत्कटतेने विठुरायाच्या भेटीसाठी व्याकूळ झालेला वारकरी आषाढी-कार्तिकी वारीच्या निमित्ताने शेकडो मैल कित्येक दिवस चालत पंढरपुरी जातो. आषाढात पडणारा धो-धो पाऊस असो किंवा कार्तिक महिन्यातील कडाक्याची थंडी असो. वारकरी एका आंतरिक उर्जेने पंढरीच्या दिशेने चालत असतो. तेथे पोहोचल्यावर बऱ्याचदा मंदिरात न जाता कळसाचे दर्शन घेऊन समाधानाने माघारी येतो. तो वारकरी खरे अध्यात्म जगतो, असे म्हटले तर वावगे होणार नाही. मंदिरातील मूर्ती ही एक प्रतीक आहे. तिच्यासमोर तो श्रद्धेने नतमस्तक होतोच. पण मूर्तीच्या पलीकडे असणारा त्याचा पंढरीराया हा जनमानसात वसलेला आहे यावर त्याचा विश्वास आहे. म्हणूनच प्रत्येक वारकरी एकमेकांना ‘माऊली’ म्हणत प्रेमाने आलिंगन देतात. नमस्कार करतात. त्यावेळी उच्चनीच गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव त्यांच्याठिकाणी नसतो. ‘राम कृष्ण हरी’हा त्यांचा मंत्र आहे. विठ्ठल हा त्यांचा भाव आहे. आणि प्रत्येक माणसात त्यांचा देव आहे.
पंढरीच्या वारीला सुमारे आठ शतकांचा इतिहास आहे. वारकरी पंथाची मुहूर्तमेढ संत ज्ञानदेवांनी रोवली. आजच्या विज्ञान युगातही या वारीचे महत्व टिकून आहे. कारण वारीमध्ये कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही. ते एक भावपूर्ण देशाटन आहे. लाखो भाविकांचे मनोमिलन आहे. शेकडो मानवी मूल्यांची पखरण आहे. माणुसकीचा गहिवर आहे.
कोणत्याही बाबतीत प्रगती करायची असेल तर त्या प्रकल्पात सहभागी लोकांची दिशा आणि ध्येय एक असावे लागते. असे असेल तर प्रगतीच्या दिशेने होणारा प्रवास सहज आणि सुंदर होतो. वारी नेमके हेच शिकविते. विठ्ठलाच्या भेटीसाठी आतूर झालेला वारकरी एका दिशेने अखंड प्रवास करीत असतो. वारीत सहभागी असलेल्या प्रत्येक वारकऱ्याला मुक्कामाचे ठिकाण ठाऊक असते. परंतु त्यांच्यासाठी महत्त्वाचा असतो तो ‘प्रवास’! वारीतील त्याचा तो प्रवास हीच त्याची साधना असते. तोच त्याचा आनंद असतो. तीच त्याची खरी आध्यात्मिक अनुभूती असते. माणुसकीचे दर्शन घेत सर्वजण एका दिशेने चालत असतात. हरिनामाचा खिचडीकाला हा त्यांचा प्रमुख उर्जा स्त्रोत असतो. वारीच्या मार्गावरील शेकडो गावे आणि त्यावेळी सेवेकरी बनलेले गावकरी त्यांची वाट पहात असतात.

पंढरपूरला पोहोचेपर्यंत एक नियोजनबद्ध संरचना आपल्याला पहावयास मिळते. जागोजागी अन्न, पाणी, स्वच्छतागृहे, आरोग्यसुविधा, मदतकक्ष, निवास यांची काटेकोर व्यवस्था दिसते. महाराष्ट्र प्रशासनानेही या व्यवस्थेत प्राधान्यक्रमाने लक्ष घातलेले दिसते. व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण म्हणजे ही पंढरीची वारी!
पंढरीच्या दिशेने अनेक दिवस चालत जाणाऱ्या वारकऱ्याचे पाय दुखतात-सुजतात. तरी तो चालतच राहतो. कुठेतरी एखाद्या वळणावर त्याच्या पायाला मालिश करून देणारा एखादा भाविक त्याची वाट पहात बसलेला दिसतो. तो वारकऱ्याच्या दुखऱ्या पायाला आराम मिळवून देतो. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद त्या भाविकाला परमानंदाची अनुभूती देतो. आणि बसल्या जागी विठुरायाच्या चरणी त्याची माणुसकीची सेवा अर्पण होते. समर्पित भावनेने सेवा देणारी अनेक माणसे या वारीच्या मार्गात दिसतात. काही वारकरी दरमहा नित्यनेमाने पंढरपूरला जातात. तेथे जाऊन फक्त विठ्ठलाचे दर्शन घेत नाहीत तर प्रवचनसेवा, कीर्तनसेवा देतात व समाजप्रबोधनाचे मोठे काम करतात. नामस्मरणाचे आणि सदाचरणाचे महत्व कथन करतात.
वारीतील अखंड नामाचे महत्व:-
‘विठ्ठल हा मंत्र आहे. विठ्ठल हा भाव आहे. विठ्ठल हा देव आहे.’ असे म्हटले जाते. वैद्यकशास्त्रानेही विठ्ठल मंत्राचे विशिष्ट पद्धतीने मोठ्याने केलेले उच्चारण मानवी हृदयाच्या आरोग्याच्या दृष्टीने कसे लाभदायक ठरते हे सिद्ध केलेले आहे. वारीमध्ये प्रत्येकजण नामसाधनेत आकंठ बुडालेला असतो. नाचत असतो. गात असतो. मंत्रमुग्ध झालेला असतो. त्याचा हा आनंद आणि उत्साह नकळतपणे त्याची शरीरसाधना घडवीत असतो. चैतन्य निर्माण करीत असतो.
हरीनामाचे महत्व सांगणारा संत ज्ञानेश्वरांचा हरिपाठ हा वारकरी पंथाचा एक परिपाठ आहे. हरिपाठाच्या पानोपानी नामाचे महत्व अधोरेखित केलेले आहे. एकनाथी हरिपाठातूनही सर्वसामान्य माणसाला आकलन होईल असा सुखाचा सहज मार्ग नाथांनी सांगितलेला आहे. शांती, सुख, समाधान आणि निर्भेळ आनंद यांची प्राप्ती व्हावी असे प्रत्येक माणसाला वाटते. यासाठी सर्वसामान्य माणूस देवाकडे सतत प्रार्थना करत असतो.
रोजचा प्रपंचाचा गाडा ओढताना थकून गेलेल्या सामान्य माणसाला खरे तर गहन अध्यात्माशी काहीही घेणे देणे नसते. त्याला त्याच्या जीवनात केवळ आनंद हवा असतो. पण या आनंदाची परिभाषा मात्र त्याला ठाऊक नसते. तो या आनंदाच्या शोधासाठी सत्ता-संपत्ती, कनक-कांता यांच्या मागे नको तितका धावतो. पण त्याला आनंद काही मिळत नाही. उलट या गोष्टी मिळवण्याच्या नादात तो कलह, तंटे-बखेडे यांना सामोरे जातो. आणि शेवटी पदरात दुःख पडते. अशा भरकटलेल्या समाजाला आनंदाची गुरुकिल्ली देण्यासाठी संत एकनाथ आपल्या हरिपाठात सर्वसामान्य लोकांना त्यांच्याच भाषेत मार्गदर्शन करतात. हरिनामाची सोपी गुरुकिल्ली देऊन गहन अध्यात्माचे भांडार खुले करतात. हरिनामात कोणतेही कर्मकांड नाही, यज्ञयाग नाही, कष्ट नाही आणि खर्चही नाही. सुख आणि शांतीची खात्री निश्चित आहे. हरिनाम घेण्यासाठी काळ वेळेचेही बंधन नाही. ती एक सहज साधना आहे.
हरी बोला देता हरि बोला घेता | हसता खेळता हरी बोला ||
हरी बोला गाता हरी बोला खाता | सर्व कार्य करिता हरी बोला ||
हरी बोला एकांती घरी बोला लोकांती | देह त्यागिता अंती हरि बोला ||
हरी बोला भांडता हरी बोला कांडता | उठता बैसता हरि बोला ||
हरी बोला जनी हरी बोला विजनी | एका जनार्दनी हरी बोला ||
जमेल तसे आणि जमेल तेव्हा हरिनाम घेत त्यात रंगून जाणारा नामधारक आपोआप शांत आणि निवांत होऊ लागतो. त्याची वृथा बडबड बंद होते. आपापसातील हेवेदावे मिटून जातात. कलह शमून जातात. हळूहळू माणूस विरक्त होऊ लागतो. मोहाची बंधने तुटतात. वृत्ती नाममय होऊन जाते. हरिनामाने सामान्य माणूस साधक बनतो. कठोर तपश्चर्येची फळ त्याला हरीनामातून सहज प्राप्त होते. अशा प्रकारे हरिनामाने संसारात स्थिरचित्त झाल्यानंतरच खऱ्या आनंदाचा मार्ग दिसू लागेल, असे नाथांना वाटते.
लेखिका :- डॉ शारदा निवाते (लेखिका संत साहित्याच्या अभ्यासक आहेत)
साभार :- दैनिक अग्रलेख
