अवघा रंग एक झाला.. भाग १९…
“अवघा रंग एक झाला”.. या विशेष मालिकेतून आपण समाजाला समरस करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणाऱ्या संतांबद्दल आपण जाणून घेणार आहोत…
संत सावता माळी ..
कांदा मुळा भाजी । अवघी विठाबाई माझी ॥
लसूण मिरची कोथिंबिरी । अवघा झाला माझा हरी ॥
अर्थात :- ईश्वर हा केवळ मंदिरात किंवा मूर्तीत नसून आपल्या दैनंदिन जीवनात, श्रमात आणि प्रत्येक वस्तूमध्ये वास करतो. त्यामुळे प्रामाणिक श्रम करताना नेहमी ईश्वराचे स्मरण करावे.
सावता महाराज लहानपणापासून विठ्ठलभक्तीमध्ये रममाण झाले.ऐहिक जीवनात इष्ट कर्तव्यकर्मे करीत असतानाच काया-वाचा आणि मनाने ईश्वरभक्ती करता येते आणि हा अधिकार सर्वांना आहे. ‘न लगे सायास, न पडे संकट, नामे सोपी वाट वैकुंठाची’ असा त्यांचा रोकडा अनुभव होता. त्यांनी जनसामान्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखविला.भक्तिप्रसाराचे कार्य त्यांनी निष्ठेने आचरिले. समरसता आणि अलिप्तता यातील विलक्षण समतोल त्यांच्या व्यक्तिमत्त्वात प्रकर्षाने जाणवतो.
महत्वाचे म्हणजे ते कधीही पंढरपूरला पांडुरंगाच्या भेटीसाठी गेले नाहीत. प्रत्यक्ष भक्तवत्सल पांडुरंगच त्यांना भेटावयास आले. ते कर्मयोगी संत होते. ‘कर्मे ईशु भजावा’ हीच त्यांची धारणा होती.दरवर्षी आषाढी वारी झाल्यावर पांडुरंगाची पालखी संत सावता महाराजांना भेटण्यासाठी आरण येथे जाते.
स्वकर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातो हात।
‘सावत्याने केला मळा। विठ्ठल देखियला डोळा।
