NewsSpecial Day

जनजाती गौरव दिन : बिरसा मुंडा यांचा लढा, स्वाभिमानाचा वारसा

जनजाती समाजाचा शौर्यपूर्ण इतिहास, निसर्गाशी असलेले त्यांचे नाते आणि पिढ्यान्‌पिढ्या जपलेल्या सांस्कृतिक परंपरा हा भारताच्या सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा भाग आहे. स्वातंत्र्याच्या ध्यासाने पेटून उठलेले क्रांतिकारक, आपल्या भूमीच्या रक्षणासाठी लढणारे योद्धे, समाजाला जागृत करणारे नेतृत्व आणि पिढ्यान्‌पिढ्या जपल्या गेलेल्या समृद्ध परंपरा, अशा विविध रूपांत या समाजाने राष्ट्रजीवन समृद्ध केले आहे. या गौरवशाली परंपरेचे स्मरण करून देणारा दिवस म्हणजे १५ नोव्हेंबर — जनजाती गौरव दिन!

भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त १५ नोव्हेंबर हा दिवस जनजाती गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. १० नोव्हेंबर २०२१ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला. जनजाती क्रांतिकारकांचे बलिदान नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे, स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या योगदानाची ओळख करून देणे आणि सांस्कृतिक वारशाविषयी अभिमान निर्माण करणे, हा यामागील विचार आहे. संथाल, कोल, भिल्ल, खासी आणि मिझो यांसह अनेक जनजातींनी आपल्या हक्कांसाठी आणि स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. त्यांच्या या इतिहासाचे स्मरण करण्याबरोबरच जनजाती समाजाच्या लोककला, लोकगीते, बोलीभाषा, हस्तकला आणि परंपरांच्या जतनाचे महत्त्वही या दिवसामुळे समोर आले. तसेच वनहक्क, पेसा कायदा आणि शासकीय योजनांची माहिती समाजापर्यंत पोहोचवणे, त्यांच्या विकासाशी संबंधित प्रश्नांकडे लक्ष वेधणे यांनाही महत्त्व मिळाले.

धरती आबा भगवान बिरसा मुंडा : संघर्ष आणि समाजजागृती

१५ नोव्हेंबर १८७५ रोजी झारखंडमधील उलिहातू येथे जन्मलेल्या बिरसा मुंडा यांनी अवघ्या २५ वर्षांच्या आयुष्यात जनजाती समाजाच्या मनात स्वाभिमानाची ज्योत प्रज्वलित केली. ब्रिटिश राजवट, जमीनदार आणि सावकारांच्या अन्यायामुळे आपल्या समाजाचे जीवन, जमीन आणि परंपरा धोक्यात येत असल्याचे पाहून त्यांनी जनजागृती आणि संघटनकार्य सुरू केले. बिरसा मुंडा यांनी जनजाती समाजाला आपल्या मूळ धर्मपरंपरा आणि संस्कृतीची जाणीव करून दिली.

मिशनऱ्यांच्या धर्मांतराच्या प्रयत्नांना विरोध करत त्यांनी स्वधर्मात परतण्याचे आवाहन केले. वेद-पुराणांच्या अध्ययनातून आणि तुळशीच्या पवित्रतेचा संदेश देत त्यांनी समाजात धार्मिक जागृती घडवली. त्यांच्या या कार्यातून जनजाती समाजात स्वधर्म आणि सांस्कृतिक अस्मितेविषयी अभिमान निर्माण झाला. समाजाने त्यांना प्रेमाने ‘धरती आबा’ ही उपाधी दिली.

बिरसा मुंडा यांनी केवळ स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला नाही, तर समाजसुधारणेचे कार्यही केले. व्यसनमुक्ती, स्वच्छता, एकेश्वर उपासना आणि पारंपरिक संस्कृतीविषयी अभिमान बाळगण्याचा संदेश त्यांनी दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या ‘उलगुलान’ अर्थात महाविद्रोहाची ‘अबुआ दिसुम, अबुआ राज’ (आपला देश, आपले राज्य) ही घोषणा जनजाती समाजाच्या स्वाभिमानाचे प्रतीक बनली. ९ जून १९०० रोजी रांची तुरुंगात त्यांचे निधन झाले. त्यांच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पुढे १९०८ मध्ये छोटानागपूर कुळकायदा लागू झाला. या कायद्याने जनजातींच्या जमिनींच्या बिगर-जनजातींकडे होणाऱ्या हस्तांतरणावर निर्बंध घातले.

१५ नोव्हेंबरलाच जनजाती गौरव दिन का?

बिरसा मुंडा हे स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक होते. त्यांचे कार्य केवळ एका जनजातीपुरते मर्यादित नसून, अन्यायाविरुद्धचा संघर्ष आणि स्वाभिमानाची प्रेरणा देणारे आहे. शिवाय, १५ नोव्हेंबर २००० रोजी झारखंड राज्याची स्थापना झाली. ही तारीख जाणीवपूर्वक बिरसा जयंतीची निवडली गेली. त्यामुळे १५ नोव्हेंबर ही तारीख आधीपासूनच जनजाती अस्मितेचे प्रतीक होती.

जनजाती गौरव दिनाच्या माध्यमातून तिलका मांझी, संथाल क्रांतिकारक, भिल्ल योद्धे, राघोजी भांगरे, वीर नारायण सिंह, अल्लुरी सीताराम राजू आणि राणी गायदिन्ल्यू यांसारख्या अनेक जनजाती नायकांच्या योगदानाचे स्मरण केले जाते. स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात या नायकांना अधिक व्यापक स्थान मिळावे, हा या दिवसाचा महत्त्वाचा हेतू आहे.

९ ऑगस्ट आणि १५ नोव्हेंबर : वेगवेगळे संदर्भ, स्वतंत्र महत्त्व

९ ऑगस्ट हा संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेला ‘जागतिक मूलनिवासी दिन’ आहे. १९८२ मध्ये जिनिव्हा येथे संयुक्त राष्ट्रांच्या आदिवासी लोकसंख्याविषयक कार्यगटाची पहिली बैठक झाली. त्या बैठकीच्या स्मरणार्थ ९ ऑगस्ट हा दिवस निश्चित करण्यात आला. जगभरातील मूलनिवासी समाजांचे हक्क, त्यांच्या संस्कृतीचे रक्षण आणि त्यांच्यापुढील प्रश्न यांविषयी जागरूकता निर्माण करणे, हा या दिवसामागील विचार आहे.

मात्र, भारताचा ऐतिहासिक अनुभव इतर अनेक देशांपेक्षा वेगळा आहे. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये युरोपीय वसाहतवादामुळे तेथील मूळ रहिवासी समुदायांना मोठ्या प्रमाणावर विस्थापन, हिंसाचार आणि लोकसंख्येच्या ऱ्हासाला सामोरे जावे लागले. भारतातील जनजाती समाजानेही ब्रिटिश राजवटीत अनेक प्रकारचे अन्याय सहन केले. त्याविरुद्ध त्यांनी ठिकठिकाणी लढे उभारले. हे लढे केवळ आपल्या जमिनी आणि हक्कांच्या रक्षणासाठी नव्हते, तर ब्रिटिश सत्तेविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्यलढ्याचाही तो महत्त्वाचा भाग होता.

या पार्श्वभूमीवर, भारतीय जनजाती समाजाच्या शौर्याचा, सांस्कृतिक वारशाचा आणि राष्ट्राच्या इतिहासातील योगदानाचा गौरव करण्यासाठी भारताच्या स्वतःच्या इतिहासाशी जोडलेल्या दिवसाला महत्त्व देणे आवश्यक आहे, अशी भूमिका यामागे आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचा १५ नोव्हेंबर हा दिवस जनजाती गौरव दिन म्हणून साजरा करण्यामागे ही हेच कारण आहे.हा दिवस भारतीय जनजाती नायकांच्या संघर्षाचे स्मरण करून देतो आणि त्यांच्या योगदानाला राष्ट्रीय इतिहासात सन्मानाचे स्थान देण्याची प्रेरणा देतो.

९ ऑगस्ट आणि १५ नोव्हेंबर या दोन्ही दिवसांचे संदर्भ , महत्त्व वेगवेगळे आहे.

धरती आबा बिरसा मुंडा यांचे जीवन आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्याचे धैर्य, समाजाला एकत्र आणण्याची ताकद आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगण्याची प्रेरणा देते. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करताना जनजाती समाजाच्या योगदानाचा सन्मान करणे, त्यांचा सांस्कृतिक वारसा जपणे आणि त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहणे, हीच बिरसा मुंडा यांना खरी आदरांजली ठरेल.

Back to top button