News

श्रीगुरुजी रुग्णालयामध्ये नवीन ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण

नाशिक दि. ५ जून – मानव सेवा फाउंडेशन, नाशिकच्यावतीने श्रीगुरुजी रुग्णालयामध्येऑक्सिजन जनरेशन प्लांटच्या लोकार्पणाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. बडोदा येथील आरो इंजिनिअरिंग कंपनीने उत्पादित केलेला हा ऑक्सिजन जनरेशन प्लांट असून ३४ जंबो सिलेंडर मध्ये जेवढा ऑक्सिजन बसेल तेवढा ऑक्सिजन एका दिवसात तयार करण्याची क्षमता या प्लांट मध्ये आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये असंख्य कुटुंबावर परिणाम झाला. काही लोकांना मानसिक, काहींना आर्थिक परिणामाला सामोरे जावे लागले तर काहींना आपल्या कुटुंबातील प्रिय व्यक्तीला गमवावे लागले. अनेक रुग्णालयांना या काळात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज निर्माण झाली. पण त्याप्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होत नव्हता. या काळात श्रीगुरुजी रुग्णालयाला सुद्धा ऑक्सिजन पुरवठा नियमित ठेवण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागत होती. रुग्णालय प्रशासनाने भविष्यात असे प्रसंग आलेच तर आपण ऑक्सिजन च्या बाबतीत परिपूर्ण असावे या दृष्टीने नियोजन करण्यासही सुरुवात केली.

याचवेळी नाशिक मधील काही तरुण मनाच्या उद्योजकांनी या कोरोना काळात सामाजिक दायित्व म्हणून वनवासी आणि दुर्गम भागात सेवा देण्याच्या उद्देशाने एकत्रित येऊन ‘ मानव सेवा फाउंडेशनची’ स्थापना केली. आणि नाशिक शहरामध्ये गेल्या १३ वर्षांपासून अविरत रुग्ण सेवेमध्ये कार्यरत असलेले, वाजवी दरामध्ये उत्कृष्ट रुग्ण सेवा देत असलेल्या श्रीगुरुजी रुग्णालयास ऑक्सिजन प्लांट समर्पित करण्याचा संकल्प केला आणि तो प्रत्यक्षात अवतरला.

आपण दिलेले दान हे सत्पात्री असावे किंवा आपण दिलेल्या दानाचा योग्यरित्या उपयोग झाला पाहिजे हा विचार करून मानव सेवा फाउंडेशनने अगदी योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी हा ऑक्सिजन जनरेटर प्लांट श्रीगुरुजी रुग्णालयाला समर्पित करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे असे मनोगत श्रीगुरुजी रुग्णालयाचे अध्यक्ष तथा सुप्रसिद्ध अर्थतज्ञ आणि चार्टर्ड अकाउंटंट डॉ. विनायक गोविलकर यांनी केले.

या छोटेखानी कार्यक्रमात मोजकी उद्योजक मंडळी उपस्थित होती. प्रारंभी मानव सेवा फाऊंडेशनचे राजकुमार जॉली यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी भविष्यात देखील दुर्गम आणि आदिवासी भागात अशाच प्रकारचे कार्य मानव सेवा फाउंडेशन करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.

या कार्यक्रमास राईट टाईट फास्टनर या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालकअमरजीत छाबरा, ऋषभ इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक नरेंद्र गोलिया, TDK / EPCOS चे व्यवस्थापकीय संचालक एच एस बॅनर्जी तसेच श्रीगुरुजी रुग्णालयाचे उपाध्यक्ष तथा सॅमसोनाईट चे माजी उपाध्यक्ष मुकुंद खाडिलकर उपस्थित होते. या प्रकल्पामुळे रुग्णास चांगली सेवा देण्यास नक्कीच मदत होईल असे मत रुग्णालयाचे सचिव तसेच प्रसिद्ध उद्योजक प्रवीण बुरकुले यांनी आभार प्रदर्शनाच्या भाषणात व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीगुरुजी रुग्णालयाचे सुरेन्द्रकुमार पुरकर यांनी केले.

Back to top button