News

नितीन राऊत यांनी आपल्या मानसिक आजारावर डॉ. हेडगेवार रूग्णालयात उपचार घ्यावेत

मुंबई, दि. २६ जानेवारी, (वि.सं.कें.): राज्यातील सत्तारूढ मविआ सरकारचे सर्व आघाड्यांवरील अपयश झाकण्यासाठीच महाराष्ट्राचे अकार्यक्षम ऊर्जामंत्री आणि काँग्रेस नेते नितीन राऊत सातत्याने बेताल वक्तव्ये करीत असतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यातील ऐतिहासिक भेटीबद्दल राऊत यांनी ओकलेली गरळ हे त्याचेच द्योतक आहे.

वस्तुतः डॉ. हेडगेवार हे अत्यंत देशभक्त म्हणून नावाजलेले होते. आधी लोकमान्य टिळक व पुढे महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभर चाललेल्या स्वातंत्र्य चळवळीतील ते एक अग्रणी योद्धे होते. वैद्यकीय शिक्षणासाठी कोलकाता येथील नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असताना डॉ. हेडगेवार यांचा संबंध अनुशीलन समिती या क्रांतीकारक संघटनेशी आला होता. ते या समितीचे प्रतिज्ञित कार्यकर्ते होते. तर पुढे महात्मा गांधी विचारांनी प्रेरीत होऊन डॉ. हेडगेवार यांनी काही काळ विदर्भ काँग्रेस समितीचे सचिव म्हणूनही काम पाहिले. पुढे संघाची स्थापना केल्यावर देखील डॉ. हेडगेवार यांनी स्वातंत्र्य चळवळीतील आपला सहभाग कायम ठेवला होता. दि. २२ जुलै १९३० रोजी यवतमाळ येथे जंगल कायदेभंग सत्याग्रहात सहभागी झाल्याबद्दल डॉ. हेडगेवार यांना ९ महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा देखील भोगावी लागली होती. महात्माजींच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून या सत्याग्रहात सहभागी होण्यासाठी डॉ. हेडगेवार यांनी सरसंघचालक पदाचाही काहीकाळ त्याग केला होता, हे येथे विशेषत्वाने नमूद केले पाहिजे. नितीन राऊत विदर्भात ज्या पक्षाचे काम करीत मोठे झाले, निदान त्यांनी त्याचा इतिहास नीट अभ्यासायला हवा होता.

राऊत यांचा सद्य आरोप हा नेताजी बोस व डॉ. हेडगेवार यांच्या ज्या भेटीच्या अनुषंगाने आहे, ती ऐतिहासिक भेट दि. २० जून १९४० रोजी झाली होती. त्यावेळी डॉ. हेडगेवार हे अत्यवस्थ होते. त्यांच्यावर मेयो रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यामुळे ते नागपूर नगर संघचालक बाबासाहेब घटाटे यांच्या निवासस्थानी होते. नागपूर दौऱ्यावर आलेले नेताजी सुभाषचंद्र बोस हे दि. २० जून रोजी सायंकाळी ५ वा. घटाटे यांच्या निवासस्थानी पोहोचले. अंगात बराच ताप असल्यामुळे त्यावेळी डॉ. हेडगेवार यांना झोप लागली होती. आपले काही काम असल्यास आम्ही डॉक्टरजींना उठवतो असा प्रस्ताव त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या स्वयंसेवकांनी ठेवला असता; नेताजींनी त्यांना परावृत्त करून डॉ. हेडगेवार आजारी असल्यामुळे आपण त्यांना भेटण्यास आल्याचे व कामासाठी त्यांना पुन्हा भेटायला येऊ, असे सांगितले. डॉ. हेडगेवार यांच्या शेजारी काहीवेळ बसून नेताजींनी त्यांच्याकडे काहीकाळ एकटक पाहिले व अखेर त्यांना प्रणाम करून आपल्या गाडीने पुढील प्रवासास निघाले. दरम्यान डॉ. हेडगेवार जागे झाल्यावर हा वृत्तांत कार्यकर्त्यांनी त्यांना सांगितला असता डॉ. हेडगेवार यांनीही अतिशय भक्तीभावाने हात जोडून नेताजींना प्रणाम केला.

दुसऱ्याच दिवशी म्हणजे दि. २१ जून १९४० रोजी डॉ. हेडगेवार यांचे निधन झाले. नेताजी व डॉक्टरजी यांची भेट झाली त्याची ही पार्श्वभूमी होती. या दोघांमधील आत्मीय संबंधांचाही आपल्याला या प्रसंगावरून पुरेसा अंदाज येऊ शकतो. मात्र आपल्याच पक्ष संघटनेचे वरिष्ठ नेते राहिलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस व डॉ. हेडगेवार या दोन्ही महानुभावांबद्दल व इतरही स्वातंत्र्ययोद्ध्यांबद्दल राऊत यांचे अज्ञान व द्वेष त्यांच्या वक्तव्यांतून दिसून येतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राऊत यांना फोबिया असल्याचे त्यांच्या अनेक वक्तव्यांतून वारंवार दिसून आले आहे. संभाजीनगर येथील डॉ. हेडगेवार रूग्णालयातून त्यांनी त्यावर इलाज करून घ्यावा. आपल्या सेवाभावी स्वभावानुसार संघ स्वयंसेवक राऊत यांच्या सुदृढ मानसिक आरोग्याची कामना करून, त्यांना योग्य ती मदत करतील, असा विश्वास आम्ही या निमित्ताने देतो.

Back to top button