Opinion

आणीबाणी : स्वतंत्र भारताचा दुसरा स्वातंत्र्य लढा

२५ जून १९७५ साली आपल्या स्वातंत्र्यावर उघड उघड पणे घाला घालण्यात आला. इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली. पूर्ण देश एक तुरुंगच बनला. मी स्वतः त्यावेळी लहान होतो. माझे वडील तेव्हा जनसंघाचे काम करायचे, त्यामुळे आमच्या घरावर नेहमी पोलीस पाळत असायची. स्वातंत्र्याची गळचेपी काय असते ते स्वतः पाहिलं आणि अनुभवले ही. संघ परिवार आणि त्यावेळच्या राजकीय धुरीणांनी देशव्यापी आंदोलन छेडले. जवळपास दीड लाख कार्यकर्ते सत्याग्रह करून तुरुंगात गेले, यापैकी जवळपास लाखाहून अधिक संघ कार्यकर्ते होते. यापैकी काही जणांना सत्याग्रह करताना तर काहींना तुरुंगात आपले प्राण गमवावे लागले. या आणीबाणी मध्ये जणू माणसाचा जगण्याचा अधिकारच काढून घेण्यात आला, न्याय व्यवस्था हतबल झाली होती. वृत्तपत्रांनी काय छापायचे काय नाही यावर निर्बंध होते, आकाशवाणी केंद्रावरही निर्बंध होते.

किशोर कुमार याने कांग्रेस च्या एका कार्यक्रमात हजर राहायला नकार दिला म्हणून आणीबाणी असे पर्यंत आकाशवाणी वर त्याची गाणी लावायलाही निर्बंध होता. अनेक नेते भूमिगत होते, अनेकांचे हाल केले गेले….. कारण?…. अनिर्बंध सत्ताकारण!! आत्ताचे काही नामवंत नेते त्या वेळी या आणीबाणीचे आणि गांधी परिवाराचे निर्लज्ज समर्थन करत होते. बरीच घरे या आंदोलनात उध्वस्त झाली. पण कोणीही तक्रार केली नाही आणि या आणीबाणी विरुद्ध लढ्यात प्राणपणाने सहभाग दिला. संपूर्ण देश म्हणजे या लढ्याची युद्धभूमी झाली होती. या आंदोलनाला यशस्वी पणे पुढे नेण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोलाचा सहभाग होता. १९७७ पर्यंत हे आंदोलन चालले आणि यशस्वी पणे इंदिराजींची राक्षसी आणीबाणी उलथवली गेली.

त्यावेळी अनेक कुटुंबीयांनी अक्षरशः या पुनः स्वातंत्र्यासाठी बलिदानही दिले. आणि हो त्याची जाहिरात ना त्यांनी केली व त्यांच्या कुटुंबीयांनी. मी स्वतः अशा अनेक कुटुंबांना व्यक्तिशः ओळखतो. असो. आजच्या या पिढीला ना स्वातंत्र्य चळवळीतील बलिदान आणि त्याग माहिती आहे ना या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या लढ्याबद्दल. या कालखंडाचा आणि या लढ्याचा इतिहास सर्वांनी अभ्यासला पाहिजे. कारण हा स्वतंत्र भारताचा दुसरा स्वातंत्र्य लढा होता.

दुर्दैव हे आहे की देशावर आणीबाणी लादणारे, सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याचा गळा घोटणारे, आज जेव्हा सर्व प्रकारचे स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्य हिरावून घेतल्याचे गळे काढत आहेत. ते ही मुक्त पणे. ज्यांनी देशाचे स्वातंत्र्य धोक्यात आणले ते आज स्वातंत्र्याबद्दल बोलत आहेत.

असो, आपणा सर्वांना याची कदाचित माहिती नसेल अथवा आठवण नसेल. म्हणून आणि त्या कालावधीत ज्या ज्या मंडळींनी, कुटुंबीयांनी आपले सर्वस्व हे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी त्याग केला प्रसंगी सर्वस्व अर्पण केले त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. त्यांना शतशः प्रणाम.

अरविंद जोशी ( ठाणे)

Back to top button